You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धोतऱ्याच्या फुलाचं विष वापरून 'लोकांकडून हवं ते करुन घेण्याच्या घटना’
- Author, तफसीर बाबू
- Role, बीबीसी न्यूज बांगला
बांगलादेशात एका औषधाचा वापर करून फसवणूक किंवा लूटमार केल्याच्या घटना वाढत आहेत. बांगलादेशातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांसमोर यामुळं आव्हान निर्माण झालं आहे. पोलिसांनी काही जणांना अटकही केली आहे. मात्र या प्रकारच्या घटना सुरुच असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.
बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्यात राहणाऱ्या तहमिना बेगम (नाव बदललेले) काही दिवसांपूर्वी फसवणुकीच्या एका वेगळ्याच घटनेला बळी पडल्या.
बाजारातून घरी परतताना त्यांच्यासमोर अचानक एक तरुणी आली. तहमिना यांच्या अगदी जवळ येऊन तिनं एका ठिकाणाबद्दल माहिती विचारली.
त्यानंतर आणखी एक तरुण समोर आला. पण अवघ्या दोन-तीन मिनिटांतच तहमिनाला काय झालं ते कळालंच नाही?
तहमिना म्हणाल्या की, "ही घटना अत्यंत विचित्र आणि भीतीदायक आहे. या परिसरात कोणी परिचित गरीब किंवा अनाथ आहे का? असं तरुण मला विचारत होता. त्या अनाथांची मदत करायची असं तो म्हणाला होता. माझ्या घराजवळच एक गरीब कुटुंब राहत होतं. त्यामुळं मी त्या तरुणाकडं यासंदर्भात विस्तारानं माहिती विचारली. मी त्याच्याशी काही मिनिटंच बोलले. पण त्यानंतर काय झालं ते मला कळलंच नाही. माझं डोकंच जणू बंद झालं होतं."
त्यानंतर तहमिना यांनी त्या अनोळखी तरुणी आणि तरुणाच्या सांगण्यावरून त्यांचे दागिने म्हणजे कानातले, गळ्यातील चेन आणि जवळ असलेले काही हजार रुपये त्यांना देऊन टाकले.
"ते मला म्हणाले की, आंटी तुम्ही दागिने आणि पैसे बॅगेत ठेवा नाहीतर ते हरवतील. मीही तसंच केलं. मी दागिने का काढू? ते कसे हरवणार? मी ते बॅगेत का ठेवू? हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यानंतर तरुणानं मला त्याच्या सोबत चला असं म्हटलं आणि मीही बॅग तरुणीला देऊन त्यांच्यामागे चालू लागले," असं त्या म्हणाल्या.
काही वेळाने शुद्धीत आल्या तहमिना
काही अंतरावर गेल्यानंतर तहमिना यांना शुद्ध आली. पण, तो तरुण त्यांना कुठंही दिसत नव्हता. भेट झाली तिथं गेल्यावर त्यांना तिथं तरुणीही दिसली नाही. त्यादिवशी तहमिना सोन्याची साखळी, कानातील्या रिंग, हजारो रुपये आणि मोबाईल फोन गमावून घरी परतल्या.
त्या म्हणाल्या की, "मला अजूनही कळत नाही की. हे सर्व कसे घडले. त्या लोकांनी मला काहीही केलं नाही. फक्त ते दोघं माझ्याजवळ उभे होते आणि ती तरुणी माझ्या चेहऱ्यासमोर हात हलवून एका कागदावर लिहिलेल्या कोणता तरी पत्ता विचारत होती."
बांगलादेशात अलीकडच्या काही वर्षांत तहमिना यांच्याप्रमाणंच इतर काही लोकांनाही अशाच वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. या घटनेमागं 'स्कोपोलामाइन' नावाचं अंमली औषध असल्याचं कारण सांगितलं जातं आहे.
हे औषध द्रव आणि पावडर दोन्ही स्वरूपात मिळतं, अशी माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी हेतूनं हे औषध कागद, कापड, हात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर लावून त्याच्या वासाचा वापर करून काही वेळासाठी कोणाच्याही मेंदूवर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं.
पण, खरंच अशाप्रकारचं औषध आहे का? आणि जर खरोखरंच ते असेल तर बांगलादेशात त्याचाच वापर केला जात आहे, याची खातरजमा कशी करणार?
बांगलादेशात स्कोपोलामाइनचा वापर केल्याचे पुरावे काय आहेत?
सप्टेंबर 2023 मध्ये बांगलादेशमधील नारायणगंजमध्ये एका खासगी शाळेत शिक्षकाची हत्या झाली होती. हत्येचा तपास सुरू असताना पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. नंतर ढाक्यातून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी आधी त्यापैकी एका व्यक्तीकडून स्कोपोलामाइन हस्तगत केल्याचं मान्य केलं होतं. त्या व्यक्तिकडून बाटलीत पावडर रूपानं भरलेल्या स्कोपोलामाइनसह इतर काही अंमली वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
न्यायालयाच्या आदेशानंतर सीआयडीच्या प्रयोगशाळेत चाचणी केल्यावर ते स्कोपोलामाइन असल्याचं निश्चितही झालं होतं.
नारायणगंजचे पोलीस अधीक्षक गुलाम मुस्तफा रसेल यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, सुरुवातीला त्यांना स्कोपोलामाइनबद्दल माहिती नव्हती.
"रासायनिक तपासणीनंतर मिळालेल्या अहवालात त्यात स्कोपोलामाइन, पोटॅशिअम सायनाइड आणि क्लोरोफॉर्म असल्याचं निश्चित झालं होतं. यामधील स्कोपोलामाइन आमच्यासाठी एकदम नवी गोष्ट होती. आम्हाला याचं नावदेखील माहिती नव्हतं. त्याचा वापर कसा आणि कुठे-कुठे केला जाऊ शकतो हेदेखिल माहिती नव्हतं. नंतर अभ्यास केल्यानंतर आम्हाला अनेक लोक याला डेव्हिल्स ब्रीथ म्हणतात हे समजलं," असं त्यांनी सांगितलं.
अंमली पदार्थांची तस्करी करणारे कुरिअरच्या मार्गानं हे अंमली औषध देशात आणत असल्याचं तपासातून समोर आल्याचंही मुस्तफा सांगतात.
धोतऱ्याच्या फुलापासून स्कोपोलामाइन कोण तयार करते?
स्कोपोलामाइन हे मुळात एक सिंथेटिक ड्रग आहे. औषध तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मोशन सिकनेस आणि काही प्रकरणात शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसाठी आवश्यक असलेली औषधं बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
पण, हे नैसर्गिक नाही. नैसर्गिक बाबी आणि आणि इतर काही साहित्याचा वापर करून कृत्रिमरित्या स्कोपोलामाइन तयार केले जाते. ते द्रव आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात मिळतं.
ते तयार करण्यासाठीचा मुख्य किंवा महत्त्वाचा घटक धोतऱ्याच्या फुलातून मिळतो.
अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुख्य रासायनिक विश्लेषक डॉ. दुलाल कृष्ण साहा यांच्या मते, "देशात एकेकाळी लोकांना वेडं करण्यासाठी दुधात धोत्रा किसून ते पिण्यासाठी देण्यात येत असे. धोतऱ्याचं फूल एक प्रकारचं विष आहे. त्यातील काही भाग काढून कृत्रिमरित्या स्कोपोलामाइन तयार करण्यात येतं. मेक्सिकोमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या टोळ्या हे औषध बनवून संपूर्ण जगात विकतात."
स्कोपोलामाइन कधी आणि कसे काम करते?
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुप्तहेर संघटनांकडून स्कोपोलामाइनचा वापर केल्याची उदाहरणं मिळतात. त्यावेळी याचा वापर द्रव स्वरुपात इंजेक्शनद्वारे केला जायचा.
बांगलादेशच्या बंगबंधू शेख मुजीब मेडिकल विद्यापीठाच्या फार्माकॉलॉजी विभागाचे मुख्य प्राध्यापक डॉ. सैदूर रेहमान म्हणाले की, "औषध म्हणून आजही स्कोपोलामाइनचा वापर केला जातो. त्याचा आणि त्यासारख्या अनेक औषधांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुप्तहेर संघटना शत्रूकडून माहिती उकळण्यासाठी ट्रूथ सीरमच्या रुपात याचा वापर केला जात होता. म्हणजे या औषधाचं इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित व्यक्ती खरं बोलू लागायची. यामागचं कारण म्हणजे त्याचं स्वत:च्या मेंदूवर नियंत्रण राहत नसे. तो दुसऱ्याच्या नियंत्रणात जायचा आणि मग त्या व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणं वर्तन करू लागायचा."
रेहमान पुढे म्हणाले की, "जेव्हा तुम्ही एखाद्याकडून खरी माहिती जाणून घेण्यासाठी याचा वापर करता तेव्हा हे ट्रूथ सीरम असतं. मात्र जेव्हा तुम्ही पावडरच्या रुपात एखाद्याला याचा वास देता तेव्हा हे औषध 'डेव्हिल्स ब्रीथ' म्हणजे 'सैतानी श्वास' बनतं. तर उलटी किंवा मोन सिकनेससारख्या प्रकरणांमध्ये याचा वापर केला जातो तेव्हा हे औषधाच्या रूपात काम करतं."
फसवणूक, लूटमार सारख्या प्रकरणात स्कोपोलामाइनचा वापर मुख्यत: पावडर रूपात केला जातो आहे. व्हिजिटिंग कार्ड, कागद, कापड किंवा मोबाइल फोनच्या स्क्रीनवर हे औषध लावून खूपच चलाखीने एखाद्या व्यक्तीच्या नाकासमोर नेलं जातं.
अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे मुख्य रासायनिक विश्लेषक डॉ. दुलाल कृष्ण साहा यांच्या मते, "हे औषध कोणत्याही माणसाच्या नाकापासून चार ते सहा इंच अंतरावर नेल्यास त्याच्या श्वासाच्या टप्प्यात येतं. म्हणजेच एखाद्याची फसवणूक करायची असेल तर हे औषध त्याच्या नाकापासून चार ते सहा इंच अंतरावर नेणं आवश्यक आहे."
"श्वासाद्वारे आत गेल्यानंतर 10 मिनिटांच्या आत किंवा त्याच्या आधीच या औषधाचा परिणाम दिसू लागतो. त्यानंतर स्मृती आणि मेंदू सचेतन स्वरुपात काम करू शकत नाहीत. त्याता परिणाम जाऊन पूर्ववत होण्यासाठी काही जणांना एक तास लागतो तर काही लोक तीन-चार तासांनीही पूर्णपणे पूर्ववत होत नाहीत."
सुरक्षा यंत्रणा काय करत आहेत?
सुरुवातीला बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातून या औषधाचा वापर करून फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र आता ढाक्याबाहेर देशातील इतर जिल्ह्यांमधूनदेखील या प्रकारच्या तक्रारी होत आहेत.
पोलिसांकडं मात्र या प्रकारच्या घटनांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. एक मोठा प्रश्न म्हणजे, अंमली पदार्थांचे तस्कर सुरक्षा यंत्रणांना चकवून देशात स्कोपोलामाइन कसं आणत आहेत?
नारायणगंजच्या घटनेनंतर गुप्तहेर विभागाला स्कोपोलामाइनची ऑनलाइन विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. आधी ज्या दोन जणांना अटक करण्यात आली होती त्या दोघांचाही या औषधाच्या ऑनलाइन विक्रीशी संबंध आहे, असं पोलिसांनी सांगितलं होतं. हे औषध मूळ रूपात देशाच्या बाहेरून इथपर्यत पोहचत आहे.
हे औषध देशात आणण्यासाठी कुरिअर सेवेचा सर्वाधिक वापर केला जात आहे. औषधासाठी कच्चा माल म्हणून किंवा कायद्यातील पळवटांचा फायदा घेऊन स्कोपोलामाइन देशात आणले जात आहे का? याचाही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.
याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक इनामुल हक सागर म्हणाले की, "या गुन्ह्याशी निगडित लोकांना अटक करण्यात येत आहे. आतापर्यत अनेक लोकांना अटक केली आहे. याआधी नारायणगंजमधूनही अटक करण्यात आली आहे. सध्या आम्ही मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करत आहोत. अटक केलेल्या लोकांबरोबरच या व्यवसायात आणखी कोण-कोण सहभागी आहेत याचा छडा लावण्यात येत आहे. नंतर त्या सर्वांना अटक केली जाईल."
दरम्यान स्कोपोलामाइनचा वापर करून फसवणूक केल्याच्या तक्रारी सातत्यानं येत आहेत आणि अनेक लोकांना त्यांचे दागिने, पैसा गमावावे लागत आहेत, त्याचीच सध्या सर्वाधिक भीती आहे.