You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
44 अब्ज डॉलर्सची फसवणूक : 6 टन पुरावे, 2700 साक्षीदार, 200 वकील आणि मृत्युदंड
- Author, जोनाथन हेड, थू बुई
- Role, बीबीसी प्रतिनिधी
व्हिएतनामच्या ट्रुओंग माय लॅन यांना जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
व्हिएतनामच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ट्रुओंग माय लॅन यांच्यावर 11 वर्षं देशातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या सायगॉन कमर्शियल बँकेला लुटल्याचा आरोप आहे.
लॅन यांनी बँकेकडून 44 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं. वकील म्हणतात की, यापैकी 27 अब्ज डॉलर्स कधीही वसूल होणार नाहीत.
व्हिएतनाममधील कम्युनिस्ट अधिकारी, जे सहसा गुप्त तपासाला पसंती देतात, त्यांनी आश्चर्यकारकपणे या प्रकरणाविषयी बरीच माहिती माध्यमांसोबत शेअर केली आहे.
अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून 2,700 साक्षी नोंदवण्यात आल्या असून यात 10 सरकारी वकील आणि जवळपास 200 वकील सहभागी झाले होते.
साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी तब्बल 104 पेट्यांची गरज भासली. या कागदपत्रांचं वजन सुमारे सहा टन भरलं. ट्रुओंग माय लॅनसह, इतर 85 आरोपींवर दोषपत्र ठेवण्यात आलं असलं तरी त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
व्हिएतनाममध्ये दीर्घकाळ सेवा बजावणारे यूएस स्टेट डिपार्टमेंटचे निवृत्त अधिकारी डेव्हिड ब्राउन म्हणाले, "कम्युनिस्ट काळात असा तपास कधीच झाला नव्हता, आणि या प्रमाणात तर नक्कीच नाही."
कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्रॉन्ग यांच्या नेतृत्वाखालील "ब्लॅझिंग फर्नेसेस" भ्रष्टाचारविरोधी मोहीम अनेक वर्षांपासून सुरू आहे. ट्रॉन्ग यांनी 2016 नंतर ही मोहीम अधिक तीव्र केली.
या मोहिमेमुळे दोन अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. शेकडो अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं.
आता देशातील सर्वात श्रीमंत महिला ट्रुओंग माय लॅन यांचं पितळ देखील उघडं पाडण्यात त्यांना यश मिळालं आहे.
ट्रुओंग माय लॅन या हो ची मिन्ह शहरातील चिनी-व्हिएतनामी कुटुंबातून आल्या आहेत. ट्रुओंग यांनी आपल्या करिअरची सुरुवात आपल्या आईसोबत कॉस्मेटिक्स विकणाऱ्या मार्केट स्टॉलवर केली.
पण 1986 मध्ये जेव्हा कम्युनिस्ट पक्षाने 'डोई मोई' नावाच्या आर्थिक सुधारणा आणल्या तेव्हा ट्रुओंग यांनी जमीन आणि इमारती खरेदी करण्यास सुरुवात केली.
1990 च्या दशकापर्यंत ट्रुओंग यांनी भरपूर पैसा कमावला. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची सुरुवात केली.
उत्पादन उद्योगात चीनला पर्यायी पुरवठा साखळी म्हणून पुढं येणाऱ्या व्हिएतनामला आंतरराष्ट्रीय स्तरावर याचमुळे ओळख मिळाली. याच दरम्यान देशातील अनेक श्रीमंत लोक त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू लागले.
मात्र देशातील सर्व जमीन अधिकृतपणे सरकारच्या मालकीची आहे. त्या जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चांगल्या संबंध असावे लागतात.
थोडक्यात देशाची अर्थव्यवस्था वाढली, तसा भ्रष्टाचारही वाढीस लागला.
2011 पर्यंत ट्रुओंग माय लॅन या 'हो ची मिन्ह' शहरातील एक प्रसिद्ध व्यावसायिक महिला म्हणून पुढं आल्या.
त्यांना देशातील तीन लहान बँका एका मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये विलीन करण्याची परवानगी मिळाली. त्याचं रूपांतर सायगॉन कमर्शियल बँकेत झालं.
मात्र, व्हिएतनामी कायदा व्यक्तींना कोणत्याही बँकेत 5 टक्क्यांहून अधिक शेअर्स ठेवण्यास आळा घालतो. या पार्श्वभूमीवर, ट्रुओंग माय लॅन यांनी सायगॉन कमर्शियल बँकेतील 90 टक्के शेअर्स ताब्यात घेण्यासाठी शेकडो शेल कंपन्या (बेनामी-खोट्या कंपन्या) आणि बेनामी मालमत्ता तयार केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.
त्यांनी आपल्याच माणसांना व्यवस्थापक म्हणून नेमलं आणि नंतर संबंधित शेल कंपन्यांना कर्ज मंजूर करण्याचे निर्देश दिले, असा आरोप आहे. बँकेने दिलेल्या एकूण कर्जांपैकी 93 टक्के कर्जं एकट्या ट्रुओंग लॅन यांनी घेतलं आहे.
फिर्यादींचा असा आरोप आहे की, ट्रुओंग माय लॅन यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सोबत घेऊन फेब्रुवारी 2019 पासून तीन वर्षांसाठी बँकेतून 108 अब्ज व्हिएतनामी डाँग (33 हजार कोटी) काढले आणि ते तळघरात ठेवण्याचे आदेश दिले. त्या रोख रकमेचे वजन अंदाजे दोन टन आहे.
ट्रुओंग माय लॅन यांना लाचखोरीच्या आरोपांचा देखील सामना करावा लागला. त्यांनी या कर्जाचे ऑडिट होऊ नये यासाठी लाच दिली होती.
सेंट्रल बँकेच्या माजी मुख्य निरीक्षकाने 50 लाख युएस डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप आहे.
प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला मोठं कव्हरेज दिलं आहे. ट्रुओंग माय लॅन यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची बातमी सार्वजनिक होताच मोठा जनआक्रोश सुरू झाला आहे.
एवढी मोठी फसवणूक करूनही त्या एवढ्या वर्षात सापडल्या कशा नाहीत असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
ट्रुओंग माय लॅन यांच्या सायगॉन कमर्शियल बँकेचा वापर रिअल इस्टेट खरेदीसाठी वैयक्तिक निधीचा स्रोत म्हणून केल्यामुळे ली हाँग हायप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ली हाँग हायप हे सिंगापूरमधील युसोफ इशाक इन्स्टिट्यूटमध्ये व्हिएतनाम अभ्यास कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.
त्यांना कुठून तरी पैसे मिळायचे हेही स्पष्ट होते पण ही पद्धतही सर्रास वापरली जाते. अशी पद्धत वापरणारी सायगॉन कमर्शियल बँक ही एकमेव बँक नाही. अशी अनेक प्रकरणे असल्याने कदाचित सरकार लक्ष ठेवू शकत नाही असे मत ली हाँग हायप यांनी व्यक्त केलं आहे.
डेव्हिड ब्राउन यांच्या मते, ट्रुओंग यांना शक्तिशाली लोकांचं संरक्षण होतं. कारण त्यांनी हो ची मिन्ह शहरात अनेक दशकांपासून व्यवसाय आणि राजकारणावर प्रभुत्व मिळवलं होतं. देशाच्या दक्षिणेकडील व्यवसाय संस्कृतीवरील कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं ते सांगतात.
ते सांगतात की, "नगुयेन फु ट्रंग आणि त्यांचे सहयोगी सायगॉनवर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. किमान हा भाग आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे."
"2016 पर्यंत कम्युनिस्ट पक्षाने चिनी-व्हिएतनामी माफियांना या शहराच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवू दिलं. कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी यावर काही प्रमाणात टीका केली असेल, पण त्याच वेळी त्यांना त्यांचा वाटाही मिळत होता."
पक्षाचे प्रमुख गुयेन फु ट्रॉन्ग यांचं वय आज 79 इतकं आहे. 2026 मध्ये कम्युनिस्ट पक्षाने नवीन नेता निवडल्यावर ते निवृत्त होणार आहेत.
ते व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात जास्त काळ कार्यरत असलेले सरचिटणीस होते. त्यांच्या प्रभावाखाली अनेक दूरगामी निर्णय घेतले गेले. यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षाच्या पुराणमतवादी गटाने आपला प्रभाव पसरवण्यासाठी 1980 च्या दशकातील सुधारणा केल्या. कारण, त्यांना त्यांच्या पक्षाचा देशाच्या राजकीय सत्तेवरील प्रभाव कमी होऊ द्यायचा नव्हता.
मात्र, तेही विरोधाभासात अडकले आहेत. 2045 पर्यंत देशाला तंत्रज्ञान आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेवर आधारित श्रीमंत राष्ट्र बनवण्याचं त्यांच्या पक्षाचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळेच व्हिएतनाम अमेरिकेशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.
मात्र, यामुळे भ्रष्टाचार देखील झपाट्याने वाढला. या भ्रष्टाचाराविरुद्ध जास्त लढा दिल्यास आर्थिक विकास मंदावू शकतो. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काही गोष्टी उघड होतील म्हणून अधिकारी निर्णय घेण्यास टाळाटाळ करतात. यात नोकरशाही सुस्त झाल्याच्या तक्रारी आधीच सुरू आहेत.
ली हाँग हायप म्हणतात की, "व्हिएतनामचे आर्थिक विकास मॉडेल भ्रष्टाचारावर अवलंबून आहे. भ्रष्टाचार हे असं तेल आहे ज्यामुळे यंत्रं काम करतात. जर ते तेल बंद झालं तर यंत्रं देखील काम करणं बंद करतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)