You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हॉटेलमध्ये भांडी धुणाऱ्याने 'अशी' बनवली गुगल आणि अॅमेझॉनपेक्षा मोठी कंपनी
Nvidia (एनव्हीडिया) हा शब्द खरं तर दोन शब्दांचं संयोजन आहे. NV म्हणजे 'नेक्स्ट व्हिजन' आणि Vid या शब्दाचा अर्थ व्हीडिओ आहे.
या कंपनीची स्थापना 1993 मध्ये जेन्सेन हुआंग यांनी केली होती. त्यांनी कंपनीसाठी हाच शब्द का निवडला? तर कंपनीने संगणकासाठी ग्राफिक्स कार्ड बनवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना मत्सर या शब्दासाठी लॅटिन शब्द Invidia असा मिळाला.
गेल्या वर्षभरातील या टेक कंपनीचे प्रभावी परिणाम पाहता, स्पर्धकांना कंपनी आणि तिच्या संस्थापकाचा खरच मत्सर वाटू शकतो.
मार्च 2023 आणि मार्च 2024 दरम्यान या कंपनीच्या एका स्टॉकची किंमत 64 वरून 886 डॉलरवर गेलीय. कंपनीचं एकूण मूल्य 2 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे.
अल्फाबेट (गुगल), ॲमेझॉन आणि मेटा यांना मागे टाकत ती जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. यात आघाडीवर मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल अशा दोन कंपन्या आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शक्य करणाऱ्या 70 टक्क्यांहून अधिक चिप्सचा पुरवठा ही कंपनी करते. त्यामुळे तिचं मूल्य वेगाने वाढत आहे.
अर्थात जेन्सेन हुआंग यांच्या दूरदृष्टीशिवाय हे शक्य झालं नसतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात होण्यापूर्वीच ते या तंत्रज्ञान क्षेत्रात आले.
'वायर्ड' मासिकाने अलीकडेच त्यांचं कौतुक केलं आहे. तर सीएनबीसी गुंतवणूक विश्लेषक जिम क्रेमर यांच्या मते, कंपनीच्या संस्थापकाने इलॉन मस्क यांच्याही दूरदृष्टीला मागे टाकलंय.
हुआंग यांचं जीवन कष्ट, धोके आणि कठोर परिश्रमाने भरलेलं आहे. ही कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहे आणि टेबल साफ करण्यापासून बरीच कामं केली आहेत.
हुआंग यांचं बालपण
1963 मध्ये जन्मलेल्या हुआंग यांचं बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेलं. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं.
दोन्ही भावांना इंग्रजी येत नव्हतं. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवण्यात आलं. ते नातेवाईक फार पूर्वीपासून अमेरिकेत स्थायिक झाले होते. दोघांनी केंटकी येथील ओनिडा बॅप्टिस्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं.
2016 मध्ये शाळेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रानुसार, दोन्ही भावांना तिथे राहण्याची, खाण्याची आणि काम करण्याची परवानगी होती. या संस्थेत फक्त उच्च शिक्षण दिलं जातं.
लहानपणी हुआंग शौचालय साफ करायचं काम करत.
हुआंग यांनी 2012 साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "अनेक अडचणी असूनही, मी नेहमी आनंदी असायचो त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव होता."
हुआंग आणि त्यांची पत्नी लोरी यांनी 2016 मध्ये शाळेतील मुलींसाठी वर्गखोल्या आणि वसतिगृहांसह इमारत बांधण्यासाठी 2 दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती.
रेस्टॉरंटमध्ये काम केलं
काही वर्षांनी त्यांचे आई-वडीलही अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये स्थायिक झाले. नंतर ते आई-वडिलांसोबत राहत होते.
हुआंगने ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं.
त्यांच्या मते, तेव्हाच त्यांना संगणकाची भुरळ पडली. तिथेच त्याची पत्नी लोरीशी भेट झाली. दोघेही एकत्र काम करायचे.
80 विद्यार्थ्यांच्या वर्गात फक्त तीन मुली शिकत होत्या. लोरी त्यांच्यापैकी एक होत्या.
विद्यापीठातील 2013 च्या व्याख्यानात, हुआंग यांनी कंपनीचे सह-संस्थापक ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रिम यांना योगायोगाने कसे भेटले याबद्दल सांगितलं.
त्यांनी सांगितलं, "मी अनेकदा म्हणतो की साधेपणा ही यशाची गुरुकिल्ली आहे."
कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील डेनीसच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करताना एनव्हीडियाच्या तीन सह-संस्थापकांना कंपनीची कल्पना सुचली.
वयाच्या 15 व्या वर्षी पोर्टलँडमधील डेनिसच्या रेस्टॉरंटमध्ये भांडी धुणे, टेबल साफ करणे आणि वेटर म्हणून काम करणे ही पहिली नोकरी मिळाल्यापासून हुआंगचे डेनिसशी चांगले संबंध होते.
हुआंग सांगतात, "हे एक मोठं काम होतं. प्रत्येकाने रेस्टॉरंट व्यवसायात त्यांची पहिली नोकरी केली पाहिजे. यामुळे आपल्या अंगी नम्रता येते आणि कठोर परिश्रम कसे असतात ते समजतं."
स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस येथे नुकत्याच झालेल्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं होतं की, "मी सीईओ होण्यापूर्वी माझं पहिलं काम भांडी धुण्याचं होतं आणि मी त्यात खूप चांगला होतो."
त्यांच्या मते, रेस्टॉरंटच्या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या लाजाळूपणावर काम करण्यास मदत झाली.
त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितलं होतं की, "मला लोकांशी बोलताना खूप अवघडायचं."
'आव्हानं स्वीकारली पाहिजेत'
हुआंग यांनी 1984 मध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. आणि याच वर्षी संगणकाचं युग सुरू झाल्याचं ते सांगतात. त्याच वर्षी मॅकिंटॉश हा पहिला संगणक तयार झाला.
त्यानंतर, त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ती पूर्ण व्हायला त्यांना आठ वर्षे लागली.
अभ्यासासोबतच त्यांनी ॲडव्हान्स मायक्रो डिव्हाईस आणि एलएसआय लॉजिक सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम केलं. एनव्हीडियाची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच नोकऱ्या बदलल्या.
2013 मध्ये ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या भाषणात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, तीन संस्थापकांनी स्वतःला प्रश्न विचारले होते की आम्हाला खरोखर हे हवंय का? हे काम करण्यायोग्य आहे का आणि हे करणं खरोखर कठीण आहे का?
हुआंग म्हणतात, "मी नेहमी स्वतःला हे प्रश्न विचारतो, कारण तुम्हाला आवडत नसलेली गोष्ट तुम्ही करू नये, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं केलं पाहिजे."
स्पष्ट बाजारपेठ नसली तरी अशी महत्त्वाची कामं करण्यासाठी जोखीम स्वीकारणं हे त्यांनी आपलं धोरण मानलं.
स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस येथे भाषणात ते म्हणाले, "आम्ही आमच्या कामाला महत्त्व देतो, बाजाराला नाही. कारण कामाचं महत्त्व हे भविष्यातील बाजारपेठेचं प्रारंभिक सूचक आहे."
आपली तत्त्वं ठाम असणं हीच संधी निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे यावर त्यांचा विश्वास आहे.
अशा प्रकारच्या कल्पना अंमलात आणून हुआंग यांनी स्वतःची एक कंपनी तयार केली आहे. कंपनीकडे 40 पेक्षा जास्त कर्मचारी नाहीत, ते सर्वजण त्यांच्या कामाचे अपडेट थेट हुआंगला यांना देतात.
त्यांनी स्पष्ट केलं की, कल्पना आणि माहितीचा प्रवाह सुलभ करण्याचा आणि माझ्या टीमला सर्वोत्तम कल्पनांबद्दल सतत जागरूक ठेवण्याचा हा एक मार्ग आहे.
स्टॅनफोर्ड येथे एका भाषणात ते म्हणाले, "प्रेरणा, सशक्तीकरण आणि इतरांना महान गोष्टी साध्य करण्यासाठी पाठिंबा देणे, ही उद्दिष्टे संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाकडे असली पाहिजेत."
डिआरएए मेमरीच्या समस्येवर तांत्रिक उपाय शोधण्याच्या पहिल्या दोन वर्षांत, त्याची किंमत 90 टक्क्यांनी कमी झाली.
कंपनीचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला आणि डझनभर कंपन्यांना चांगले ग्राफिक्स 'चिप्स' तयार करण्यासाठी शर्यतीचे दरवाजे उघडले.
हुआंग यांच्या कंपनीने पुन्हा प्रयत्न केला आणि 1999 मध्ये ग्राफिक प्रोसेसिंग युनिट (जीपीयु) सादर केले. हा जीपीयु एक मायक्रोप्रोसेसर आहे ज्याने पीसी गेमिंगसाठी दारं उघडली.
तेव्हापासून, कंपनीने जीपीयु संगणकीय क्षमतांच्या विकासावर काम करणं सुरू ठेवलं. हे संगणकीय मॉडेल आहे. हे समांतर ग्राफिक्स प्रोसेसरचा वापर करून अशा प्रोग्राम्सला गती देते ज्यांना मोठ्या प्रमाणात संगणकीय शक्ती आवश्यक असते. जसं की, विश्लेषण, डेटा सिम्युलेशन, व्हिज्युअलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता.
या कामामुळे एनव्हीडियाच्या स्टॉकच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. आणि हुआंगची वैयक्तिक संपत्ती 79 अब्ज डॉलर झाली. फोर्ब्स मासिकानुसार, ते जगातील 18वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
या सुपर 'चिप'च्या निर्मितीवर एनव्हीडियाची जवळपास मक्तेदारी असल्याने यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या सुपर 'चिप्स'ची मागणी यापुढेही वाढण्याची अपेक्षा आहे.
द न्यू यॉर्कर मॅगझिनमध्ये एका विश्लेषकाने म्हटल्याप्रमाणे, "कृत्रिम बुद्धिमत्तेचं युद्ध सुरू आहे. आणि एनव्हीडियाची ही एकमेव शस्त्र विक्रेता कंपनी आहे."