You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पराग अग्रवाल: भारतीयांचा सिलिकॉन व्हॅलीत इतका दबदबा कसा वाढला?
- Author, निखील इनामदार आणि अपर्णा अल्लूरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पराग अग्रवाल हे नाव केवळ भारत आणि अमेरिकेतच नव्हे, तर आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. आयआयटी बॉम्बे आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेल्या पराग अग्रवाल हे सिलिकॉन व्हॅलीतल्या ट्विटरचे नवे बॉस असणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ट्विटरचे ते नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनले आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अल्फाबेटचे सुंदर पिचाई यांसह आयबीएम, अॅडोब पालो ऑल्टो नेटवर्क्स, व्हीएमवेअर आणि वीमियो या सर्वच कंपन्यांचे बॉस आता भारतीय वंशाचे आहेत.
अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत एक टक्के लोकसंख्या भारतीय वंशाच्या लोकांची आहे आणि सिलिकॉन व्हॅलीत भारतीय वंशाच्या लोकांच्या संख्या 6 टक्के आहे. मात्र, सिलिकॉन व्हॅलीतल्या बहुतांश मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्च स्थानी भारतीय अधिक आहेत. असं का? ते आपण या बातमीतून जाणून घेऊया.
'गुंतागुंतीच्या समस्येवरही मार्ग काढण्याची क्षमता'
टाटा सन्सचे माजी कार्यकारी संचालक आणि 'द मेड इन इंडिया मॅनेजर'चे सहलेखक आर. गोपालकृष्णन म्हणतात, "जगातला कुठलाच देश इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांना त्या प्रकारचं प्रशिक्षण (ग्लॅडिटोरियल ट्रेनिंग) देत नाही, जे भारतात दिलं जातं."
"जन्म दाखला बनवण्यापासून मृत्यू दाखला बनवण्यापर्यंत, शाळेत प्रवेशापासून नोकरीपर्यंत, कमी साधन-सुविधांमध्ये मोठे होणारे भारतीय सहजाकिच मॅनेजरच बनतात. वाढती स्पर्धा आणि असुविधेत जगणारे भारतीय सहजरित्या परिस्थितीमध्ये स्वत:ला सामावून घेतात आणि समस्येंवर मार्ग काढतात," असं आर. गोपालकृष्णन म्हणतात.
एक मोठं सत्य हेही आहे की, भारतीय वैयक्तिक आयुष्यापेक्षा व्यावसायिक जीवनाला अधिक महत्व देतात. भारतीयांचा हा स्वभाव अमेरिकन वर्क कल्चरला अनुकूल आहे.
आर. गोपालकृष्णन म्हणतात की, या सर्व गोष्टी जगातील कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्तीची खासियत असते.
सिलिकॉन व्हॅलीतले भारतीय वंशाच्या सीईओ त्या 40 लाख अल्पसंख्यांक गटाचे भाग आहेत, जे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुशिक्षित लोकांमध्ये समाविष्ट होतात. यातले 10 लाख लोक शास्त्रज्ज्ञ आणि इंजिनिअर आहेत.
70 टक्के एच-वनबी व्हिजावर अमेरिकेमध्ये काम करत आहेत, हा तोच व्हिजा आहे, जो अमेरिका भारतीय इंजिनिअर्ससाठी जारी करतं. त्याचवेळी, सिएटलसारख्या शहरात काम करणारे 40 टक्के इंजिनिअर भारतीय आहेत.
भारतीयांचा दबदबा कसा वाढला?
2016 मध्ये प्रकाशित झालेल्या 'द अदर वन परसेंट : इंडियन्स इन अमेरिका' या पुस्तकाचे लेखक लिहितात, "हा सर्व 1960 च्या दशकातल्या अमेरिकन इमिग्रेशन धोरणात झालेल्या बदलाचा परिणाम आहे."
"नागरिक हक्क आंदोलनावेळी राष्ट्रनिहाय संधीचा कोटा बदलून कौशल्य आणि कौटुंबिक एकीकरणाला प्राधान्य दिलं गेलं. यानंतर उच्च शिक्षित भारतीय - त्यात शास्त्रज्ञ, इंजिनिअर, डॉक्टर आणि नंतर मोठ्या संख्येत सॉफ्टवेअर प्रोघ्रामर अमेरिकेत येऊ लागले."
लेखकाचं म्हणणं आहे की, भारतीय स्थलांतरितांचा हा गट इतर देशांमधील स्थलांतरितांपेक्षा वेगळा होता.
या लोकांची निवड तीन स्तरावर करण्यात आली - हे लोक केवळ उच्च जातीतले आणि विशेष सामाजिक गटातून येणारेच केवळ नव्हते, तर हे लोक अमेरिकेत मास्टर डिग्रीचा खर्च उचलण्यासही सक्षम होते. सिलिकॉन व्हॅलीतल्या बहुतांश सीईओंकडे अमेरिकेतील मास्टर्स डिग्री आहे. त्यानंतर व्हिजाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग, स्टेम कोर्स (गणित आणि विज्ञानाचे अधिक कोर्स) या क्षेत्रापर्यंत मर्यादित करण्यात आलं, जेणेकरून अमेरिकेच्या 'लेबर मार्केट'ची मागणी पूर्ण केली जाऊ शकेल.
टेक आंत्रप्रन्योर विवेक वाधवा सांगतत की, "ही भारतातील सर्वोत्तम गुणवत्ता आहे, कारण हे लोक त्या ठिकाणी पोहोचत आहेत, जिथं सर्वोत्तम गुणवत्ता असलेले पोहोचतात किंवा पोहोचू पाहतात. या लोकांनी सिलिकॉन व्हॅलीत जे नेटवर्क तयार केलंय, त्याचा त्यांना फायदा मिळतो. या नेटवर्कचा उद्देश असा आहे की, एकमेकांची मदत करणं."
भारतीयांकडे नेतृत्व असण्यात विशेष काय आहे?
वाधवा सांगतात की, भारतात जन्मलेल्या यातल्या अनेक सीईओंनी सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. या मेहनतीदरम्यान त्यांनी अनेक संस्थापक-सीईओंच्या भेदभाव, अहंकारी स्वभावाचा अनुभवसुद्धा घेतलाय. मात्र, त्यामुळे ते अधिक विनम्र बनले.
नडेला आणि पिचाई यांसारख्यांकडे आपल्याला एक 'सभ्य' संस्कृती दिसते, जी त्यांना उच्चपदापर्यंत घेऊन जाते. आणि हा काळही महत्वाचा आहे, कारण काँग्रेसमध्ये सुनावणीदरम्यान मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची विश्वासार्हता खालावली आहे.
ब्लूमबर्गसाठी भारतातील वृत्तांकन करणाऱ्या सरिता राय सांगतात की, भारतीय वंशाच्या लोकांमधील डाऊन टू अर्थ राहण्याची सवय आणि सकारात्मक स्वभाव पूरक ठरतो.
भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश आणि उद्योगपती विनोद खोसला यांना वाटतं की, भारतातील विविध समाज, रिती-रिवाज आणि भाषांचा अनुभव त्यांना (भारतीय वंशाच्या सीईओंना) गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता प्रदान करतो. त्याचसोबत मेहनत करण्याचा गुण आणि इमानदारी त्यांना पुढे घेऊन जाते.
त्याचसोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय लोक इंग्रजी सहज बोलतात आणि ही गोष्ट अमेरिकन व्यवसायात पुढे जाण्यासाठी त्यांना महत्वाची ठरते. शिवाय, भारती शिक्षण व्यवस्था विज्ञान आणि गणितावर जोर देते, ज्यामुळे भारतात चांगली सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे. पदवीचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आवश्यक कौशल्य शिकवले जातात, ज्यामुळे अमेरिकन शिक्षण संस्थांमध्ये जाऊन त्यात आणखी सुधारणा करतात.
विविधतेसाठी हे सर्व पुरेसं आहे?
अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळण्यासाठी होणारी अडचण आणि भारतीय बाजारात निर्माण झालेल्या संधी पाहता, परदेशात जाऊन करिअर करण्याची ओढ कमी होतेय.
सरिता राय सांगतात की, अमेरिकन ड्रीमची जागा आता भारतीय स्टार्टअप ड्रीमने घेतली आहे.
भारतात वाढणाऱ्या यूनकॉर्न कंपन्या पाहता, जाणकारांना वाटतं की, भारतात महत्वपूर्ण तंत्रज्ञान कंपन्या बनत आहेत. मात्र, त्यांच्या जागतिक परिणामांबाबत आताच निष्कर्षाला पोहोचणं घाई ठरेल.
खोसला सांगतात की, "भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम अजून नवीन आहे. आंत्रप्रन्योरशिप आणि कार्यकारी रँकमध्ये यशस्वी भारतीयांनी रोल मॉडेलचं काम केलंय. मात्र, हे पुढे नेण्यासाठी आणखी अवधी लागेल."
इथं आणखी एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे, सिलिकॉन व्हॅलीतले बहुतांश सीईओ पुरुष आहेत आणि त्यांची वाढती संख्या विविधतेच्या पातळीवर फारशी नाही.
सरिता राय म्हणतात, तंत्रज्ञानाच्या जगतात महिलांचं प्रतिनिधित्व फार कमी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)