ट्विटर CEO जॅक डॉर्सी यांचंच ट्विटर अकाऊंट झालं हॅक

अकाऊंट हॅक होऊ नये यासाठी सोशल मीडिया साईट्सद्वारे वेळोवेळी सूचना केल्या जातात. अकाऊंटचा दुरुपयोग होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितल्या जातात. मात्र जी मंडळी या सूचना देत असते, त्यांचेच अकाऊंट हॅक झाले तर...?

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांच्याबाबतीत असंच घडलंय. जॅक यांचंच ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने घरचं झालं थोडं अशी अवस्था झाली आहे.

'चकलिंग स्क्वॉड' असं नाव असलेल्या हॅकर्सच्या टोळीने जॅक यांचं अकाऊंट हॅक केल्याचं म्हटलं आहे.

अकाऊंट हॅक केल्यानंतर या टोळीने अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत 15 मिनिटं अनेक ट्वीटचा भडिमार केला. थोड्याच वेळात जॅक यांना झालेला प्रकार लक्षात आला. जॅक यांचं अकाऊंट पूर्ववत झाल्याचं ट्विटरने म्हटलं आहे. ट्विटरच्या यंत्रणेला कोणताही धोका नाही, असंही कंपनीने म्हटलं आहे.

'होलोकास्ट'चा उल्लेख करत जॅक यांच्या अकाऊंटवरून ज्यू समुदायाविरोधातला मजकूर टाकण्यात आला. ट्विटरच्या मुख्यालयात बाँब ठेवण्यात आल्याचं एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.

या हॅकिंग हल्ल्यासंदर्भात कोट्या, खिल्ली उडवण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली होती. मात्र थोड्या वेळात ही वेबसाईट बंद करण्यात आली.

दरम्यान, चकलिंग स्क्वॉडने याआधी ब्युटी ब्लॉगर जेम्स चार्ल्स, युट्यूब पर्सनॅलिटी डेसमंड अमोफा यांचे अकाऊंट हॅक केले होते.

चकलिंग स्क्वॉडने डॉर्सी यांच्या अकाऊंटवर ताबा कसा मिळवला, हे समजू शकलेलं नाही. थर्ड पार्टी अॅप यंत्रणेतील त्रुटीमुळे हा प्रकार झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डॉर्सी यांचं अकाऊंट हॅक केल्यानंतर क्लाऊडहॉपर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेसेज पोस्ट करण्यात आले. ट्विटरने 2010 मध्ये SMS इंटिग्रेशनसाठी क्लाऊडहॉपर प्लॅटफॉर्म मालकी हक्क घेतले होते.

जॅक यांचे 42 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्यासाठी हा नामुष्की ओढवणारा प्रसंग आहे. अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून डॉर्सी यांनी पुरेशी काळजी घ्यायला हवी होती, असं सायबर सुरक्षातज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गेल्या वर्षी डॉर्सी भारतात एका वेगळ्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

नोव्हेंबर 2018 मध्ये डॉर्सी भारतात आले होते तेव्हा त्यांनी काही भारतीय महिला पत्रकार, लेखिका आणि विचारवंतांबरोबर एक बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर काढलेला एक फोटो समोर आला होता, ज्यात जॅक एक पोस्टर Smash Brahmanical Patriarchy असं लिहिलेलं एक पोस्टर हातात धरून होते.

मग Brahmanical Patriarchy या शब्दावर मोठा वाद निर्माण झाला आणि सोशल मीडियावरील अनेकांनी आरोप केला की हा सगळा प्रकार ब्राह्मणांच्या विरोधात किंवा त्यांच्याप्रतिच्या द्वेषातून आला आहे. वाद इतका वाढला की #Brahmins आणि #Brahmnicalpatriarchy हा हॅशटॅग वापरून हजारो लोकांनी ट्वीट केले आणि त्यानंतर ट्विटरला त्याबद्दल स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)