'माझ्या मुलीच्या हातापायाचे, चेहऱ्याचे लचके तोडले', भटक्या कुत्र्यांच्या दहशतीला जबाबदार कोण?

फोटो स्रोत, KIRAN SAKALE
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"माझ्या मुलीची अवस्था पाहण्यासारखी नव्हती. तिच्या चेहऱ्याचे, हातापायचे लचके तोडले होते. अशास्थितीत मी तिला कसं पाहू शकत होतो?"
दीपक गोस्वामी जालन्यात एका खासगी कंपनीत काम करतात. दीपक यांच्या 3 वर्षांच्या मुलीचा, परी गोस्वामी हीचा ऑक्टोबर महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
दीपक यांची पत्नी छठ पूजेसाठी बिहारला जाण्यासाठी निघाली, तेव्हा छोटया मुलीनं वडिलांसोबतच राहण्याचा हट्ट केला. दीपक त्यांच्या पत्नीला रेल्वे स्टेशनला सोडून आले आणि परी त्यांच्यासोबत घरी परत आली.
दीपक सांगतात, "मी तिला साडेअकरा वाजता झोपवलं होतं. झोपेतून ती कधी उठली मला काही समजलंच नाही. सकाळी साडेसहा वाजता माझी झोप झाली, तेव्हा मी पाहिलं तर परी माझ्याजवळ नव्हती. तेव्हा मला धक्काच बसला."
पहाटे 4 च्या सुमारास परी घराचे दरवाजे उघडून बाहेर गेली. काही अंतर चालत गेल्यावर तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला, तिचे लचके तोडले. यात परीचा मृत्यू झाला.
भटक्या कुत्रे चावल्याच्या घटना इथे आधीही घडल्याचं, पण कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पहिलीच असल्याचं दीपक राहतात त्या यशवंत नगरमधील रहिवासी सांगतात.
दीपक यांनी काही दिवसांपूर्वीच परीचं शेजारच्यात शाळेत ॲडमिशन घेतलं होतं. परीच्या आठवणीत दीपक आणि त्यांच्या पत्नीचे डोळे पाणावतात.

फोटो स्रोत, KIRAN SAKALE
"परीसोबत मीही स्केटिंग करायचो. माझंही स्केटिंग कीट आहे. माझ्यासाठी ती माझं जग होती. मी कामाला निघालो की माझं हेल्मेट, चष्मा ती आणून देत असे. एकदा मी गाडीचा हॉर्न वाजवला की, घराचा दरवाजा उघडत होती," दीपक यांच्या डोळ्यात अश्रू वाहायला लागतात.
दीपक यांच्या पत्नी रानी म्हणतात, "माझ्यासाठी माझ्या दोन्ही मुलीच संपूर्ण जग होत्या. मी खूप खूश होते. मी कधीही तिसऱ्या अपत्याचा विचार केला नाही."
दीपक यांना आणखी एक मुलगी आहे. परीचा फोटो घरातील भिंतीवर लावण्यात आलाय.
परीचे स्केटिंग कीट, स्कूल बॅग आणि कपडे दाखवताना गोस्वामी दाम्पत्याला भावना अनावर झाल्या.
दररोज 40-50 श्वानदंशाचे रुग्ण
भारतातील अनेक शहरांच्या भागात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय.
सार्वजनिक ठिकाणांवरुन भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं नुकतेच राज्य सरकारांना दिलेत. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, श्वानदंशाचे दररोज सरासरी 40 ते 50 रुग्ण येत असल्याचं इथल्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
सप्टेंबर 2025 मध्ये 1219, तर ऑक्टोबर 2025 मध्ये 1405 रुग्णांनी या रुग्णालयात श्वानदंशावरील लस घेतलीय.
आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा इथल्या ओपीडीत श्वानदंशावरील लस घेण्यासाठी रांग लागल्याचं दिसून आलं.
इथं आमची भेट विशाल गंगावणे यांच्याशी झाली. शहरातील हर्सूल भागात ते राहतात.
ते म्हणाले, "कुत्रे खूप ॲग्रेसिव्ह झालेले आहेत. मी चाललो होतो रस्त्यानी, अचानकं पिल्लं आली आणि त्यांनी मला बाईट केलं."

फोटो स्रोत, kiran sakale
रोहित सोनवणेही त्यांच्या मुलाला लस देण्यासाठी आले होते. त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला होता.
रोहित सोनवणे म्हणाले, "मुलाचं वय 5 वर्षं पूर्ण झालंय. त्याला कुत्रा चावलाय. तो उभा होता, अचानक कुत्रा आला आणि हाताला चावला."
'कमीतकमी शंभरएक कुत्रे आमच्या एका कॉलनीत'
20 व्या पशुधनगणनेनुसार, देशभरातील भटक्या कुत्र्यांची संख्या 1 कोटी 53 लाख 9 हजार 355 असून महाराष्ट्रातील भटक्या कुत्र्यांची संख्या 12 लाख 76 हजार 399 एवढी आहे.
भारतात 2022 मध्ये, श्वान दंशाची 21 लाख 89 हजार 909, 2023 मध्ये 30 लाख 52 हजार 521, तर 2024 मध्ये 37 लाख 15 हजार 713 प्रकरणं समोर आली. याचा अर्थ श्वान दंशाच्या प्रकरणांमध्ये 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये जवळपास 70 % वाढ झालीय.
देशभरातील श्वान दंशाच्या एकूण प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात घडली आहेत. महाराष्ट्रात 2022 मध्ये 3 लाख 93 हजार 20, 2023 मध्ये 4 लाख 72 हजार 790, तर 2024 मध्ये 4 लाख 85 हजार 345 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय.

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकही दहशतीत आहेत. एकट्याने घराबाहेर पडता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सकाळी फिरायला जातानाही अनेक जण काठी सोबत घेऊन जाताना दिसले.
छत्रपती संभाजीनगर मधील बसवराज जिभकाटे म्हणाले, "आमच्या भागात कमीतकमी 15 ते 20 जणांना कुत्री चावलेली आहेत. आज कमीतकमी शंभरएक कुत्रे आमच्या एका कॉलनीमध्ये आहेत. हाकललं तर अंगावर येतात, फोर व्हीलर्सच्या टपावर जाऊन बसतात. फोर व्हीलरवर टाकलेली कव्हर फाडून टाकताहेत."

फोटो स्रोत, kiran sakale
तर, तरुणी अनुजा न्यायाधीश म्हणाली, "एकदा दुपारी मी माझी कार काढत होते. ते माझ्या कारखाली होते. जसं मी कार अनलॉक केली, ते माझ्या मागे आले. दोन कुत्र्यांनी मला अटॅक केलं. माझ्या पायात पाय अडकले आणि मी पडले. मला हेड इन्जुरी झाली होती."
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे उघड्यावरील कचरा हे सुद्धा एक प्रमुख कारण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. उघड्यावरती जो कचरा टाकला जातो, त्या कचऱ्यातून भटक्या कुत्र्यांना प्रजननासाठी आवश्यक ते अन्न सहजपणे उपलब्ध होतं. त्यामुळे उघड्यावरील कचऱ्याचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणं गरजेचं असल्याचं मतही जाणकार नोंदवतात.
रेबीजमुळे लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक
प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे 'रेबीज' हा आजार होतो. रेबीजमुळे भारतात 2022 मध्ये 21, 2023 मध्ये 50, तर 2024 मध्ये 54 जणांचा मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. पण मृत्यूचं प्रमाण यापेक्षा अधिक असल्याचं इतर संशोधनांतून समोर आलंय.
Indian Council of Medical Research नं फंडिंग केलेल्या आणि लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, रेबीजमुळे भारतात दरवर्षी 5 हजार 726 मृत्यू होतात.
कुत्रा चावलेल्या पाचपैकी एकाला रेबीजविरोधी लस मिळाली नसल्याचं आणि आणि उपचार सुरू केलेल्यांपैकी जवळजवळ अर्ध्या लोकांनी त्यासाठीचा कोर्स पूर्ण केला नसल्याचंही या संशोधनातून समोर आलंय.
लोकांमध्ये रेबीज या आजाराबाबत आणि वैद्यकीय उपचारांबाबत पुरेशी जनजागृती नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, kiran sakale
ज्येष्ठ पशुतज्ज्ञ डॉ. अनिल भादेकर सांगतात, "प्रश्न येतो पुरवठ्यामध्ये, लशींचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा व्यवस्थित पुरवठा झाला पाहिजे. जिथेजिथे कुत्र्याचे चावे बसतात, तिथेतिथं त्याच्यावर कंट्रोल झाला पाहिजे. लोकांना याच्याबद्दलची माहिती मिळणं, देशभरात सगळीकडे लस मिळणं, हे जितकं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्याच्याबद्दलची माहिती पण लोकांना मिळाली पाहिजे."
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी रेबीजविरोधी लशींच्या एकूण 1.33 कोटी कुपी खरेदी केल्या, त्यापैकी 1.26 कोटी कुपी त्याच वर्षी वापरण्यात आल्या.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा अधिक लोक रेबीजमुळे मृत्यूमुखी पडतात. भारतात दरवर्षी रेबीजमुळे 18 ते 20 हजार मृत्यू होतात. देशातील एकूण रेबीज केसेस पैकी 30-60 % मृत्यू हे 15 वर्षांखालील मुलांचे आहेत.

फोटो स्रोत, kIRAN SAKALE
परी गोस्वामीची आई रानी गोस्वामी म्हणतात, "दिवस असो की रात्र प्रशासनानं भटक्या कुत्र्यांवर खूप लक्ष दिलं पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे की असं कधीही कुणासोबत होऊ नये."
"आपलं मूल गमावणं एखाद्या बापासाठी मृत्यूपेक्षाही मोठी गोष्ट असते. देवानं मृत्यू द्यावा, पण आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बाळाचे असे हाल पाहण्याची वेळ येऊ देऊ नये. मी सगळ्या पालकांना विनंती करतो की, तुमच्या मुलांवर जास्तीत जास्त ध्यान ठेवा," दीपक गोस्वामी म्हणतात.
अपुरे निवारागृह, कुत्रे ठेवायचे कुठे?
सार्वजनिक ठिकाणांवरुन भटकी कुत्री हटवून त्यांची नसबंदी करावी आणि त्यांना प्राण्यांसाठीच्या संगोपन केंद्रात स्थलांतरित करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. पण भटक्या कुत्र्यांच्या तुलनेत त्यांच्यासाठीच्या शेल्टर्सची, निवारागृहांची संख्या अपुरी आहे.
मुंबईत 90 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत, पण त्यांच्यासाठी उपलब्ध शेल्टर्स फक्त 8 आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात जवळपास 50 हजार भटकी कुत्री असून 2 निवारागृह आहेत. या निवारागृहांमध्ये 57 पिंजरे आहेत, ज्यात जवळपास 250 भटक्या कुत्र्यांना ठेवण्याची सोय आहे.

फोटो स्रोत, kiran sakale
भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण, लसीकरण करावं, त्यांच्या निवाऱ्याची सोय करावी, तसंच भटक्या कुत्र्यांकरता खाण्यासाठीच्या जागा निश्चित कराव्यात, असे आदेश महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना दिलेत.
औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या बेरील सांचीस सांगतात, "जसजसं शहर वाढतंय, घरं वाढताहेत, काँक्रिटीकरण वाढतंय. जंगल कुठेच नाही राहिलंय. शहरामध्ये कुत्र्यांना निवारा नाहीये राहायला. त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होताहेत.
"आज तुम्ही म्हटलं कुत्र्यांना बाहेर करा किंवा त्यांना फिनिश करा, तर ते शक्य नाहीये. किंवा त्यांच्या सगळ्यांचा एका ठिकाणी बंदोबस्त करा, तर ते शक्य नाहीये. कारण त्याने अजून आजार पसरू शकतो. एखाद्या कुत्र्याला गरज असेल तर मात्र आपण त्याला शेल्टर होममध्ये ठेवू शकतो."
नसबंदी एक मोठं आव्हान
छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून दररोज 10 ते 15 श्वानांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. महापालिका क्षेत्रातील एकूण श्वानांपैकी 25 % श्वानांची नसबंदी बाकी आहे. महापालिकेकडे नसबंदीसाठी केवळ एकच सेंटर आहे.
प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे डॉ. निलेश भणगे सांगतात, "व्यापक प्रमाणावर महानगरपालिका आणि नगरपरिषदांनी नसबंदीचा कार्यक्रम हातामधी घेतला पाहिजे. सध्या काय होतंय की, एकाएका महानगरपालिकेमध्ये एकच सेंटर आहे आणि ते अपुरं आहे. तिथून एका आठवड्यात साधारण 100 श्वानांची नसबंदी होते, परंतु तिथली श्वानांची संख्या लाखोमध्ये आहे. त्यामुळे ते 100 % अपुरं आहे."

फोटो स्रोत, kiran sakale
केंद्र सरकारनं संसदेत दिलेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतो. स्थानिक संस्थांना या संबंधित बाबींचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार आहेत.
स्थानिक संस्थांनी प्राणी जन्म नियंत्रण नियमांची सखोल अंमलबजावणी करणं, हा भटक्या कुत्र्यांच्या अतिसंख्येवर आणि रेबीजच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकमेव तर्कसंगत आणि वैज्ञानिक उपाय आहे, असंही सरकारनं स्पष्ट केलंय.
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमाद्वारे 2030 पर्यंत देशातून रेबीज निर्मूलनासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय.

तर, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांचं लसीकरण करणं, सर्व भटक्या कुत्र्यांना रेबीजविरोधी लस देणं, यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रियांची संख्या वाढवणं, त्यासाठी जागोजागी सेंटर्स उभारणं, रेबीज या आजाराविषयी सामान्य लोकांमध्ये जनजागृती करणं आणि उघड्यावरील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, ही पावलं तातडीनं उचलण्याची गरज असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











