भटके कुत्रे कोणाला लक्ष्य करतात? भटक्या कुत्र्याने तुमचा पाठलाग केला तर काय करावे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मोहन
- Role, बीबीसी तमिळ
दिल्लीत भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यामुळं रेबीजची लागण होऊन एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्याची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. त्यानंतर एकूणच या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
पण तज्ज्ञांच्या मते, एकीकडे काही ठिकाणी कुत्र्यांच्या लसीकरणाचं काम सुरू असताना अनेक शहरांमध्ये तर कुत्र्यांच्या संख्येबाबत स्पष्ट अशी आकडेवारीच उपलब्ध नाही.
भटक्या आणि पाळीव कुत्र्यांमध्ये फारसा फरकच नसल्याचं चेन्नईतील निवृत्त आरोग्य संचालक काटी सॅमी यांनी सांगितलं.
ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता कुत्रा हा मानवाच्या सर्वात जवळचा प्राणी राहिला आहे, असंही त्यांनी म्हटलं.
"माणूस शिकार करून उदरनिर्वाह करायचा अगदी तेव्हापासून कुत्रे माणसाला मदत करत आहेत. पण संस्कृतीमध्ये होत जाणारा बदल आणि शहरीकरण अशा काही घटकांमुळे मोठ्या शहरांत कुत्र्यांना उघड्यावर एकटं राहावं लागतं," असंही काटी सॅमी म्हणाले.
तसंच सगळीच भटकी कुत्रे आक्रमकपणे वागतात असं नसल्याचं श्वानांच्या वर्तनाबाबत अभ्यास असलेल्या श्रीदेवी यांनी म्हटलं आहे. माणसांनी मानवांनी भटक्या कुत्र्यांशी कसं वागावं याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
या दोन्ही तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवरून कुत्र्यांच्या वर्तनाबाबतची माहिती 8 प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून थोडक्यात दिली आहे.

कुत्र्यांच्या काही विशिष्ट गरजा असतात. योग्य पोषण, फिरण्याचे स्वातंत्र्य आणि काही जैविक गरजा त्यात सर्वात महत्त्वाच्या आहेत.
पाळीव कुत्र्यांना पौष्टिक अन्न मिळू शकतं, परंतु त्यांना फिरण्याचे स्वातंत्र्य किंवा त्यांच्या जैविक गरजा पूर्ण करण्याचं साधन मिळत नाही.
त्यामुळं कधीकधी पाळीव कुत्रीही आक्रमकपणे वागतात.
त्याचवेळी रस्त्यावरील कुत्र्यांच्या शारीरिक आणि जैविक गरजा पूर्ण होत असल्या तरी, त्यांना पोषण मिळत नाही. त्यामुळं भुकेपोटी ती आक्रमकपणे वागतात.

भटकी कुत्रे प्रथम प्रौढांना लक्ष्य करत नाहीत. तर, लहान मुलं लक्ष्य असतात. एखादा भटका कुत्रा प्रौढाचा पाठलाग करतो तेव्हा त्यांनी थोडा आवाज केला किंवा हल्ला केला तर ते लगेच मागे हटतात.
त्यामुळं भटकी कुत्री आधी लहान प्रथम मुलांना लक्ष्य करतात, कारण ती लगेच प्रतिकार करू शकत नाहीत किंवा प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत.

फोटो स्रोत, SRIDEVI
पाळीव कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी मालक असतात. पण रस्त्यावरील कुत्र्यांना तसं प्रेम मिळत नाही. भटकी कुत्री कोणी त्यांच्याकडं दया दाखवून आलं तर, शक्यतो हल्ला करत नाहीत.
फक्त भूकेनंच नाही, तर भटकी कुत्री कधीकधी तळमळीनंही लोकांशी आक्रमकपणे वागतात.
पावसाळा आणि पुरासारख्या संकटातही भटक्या कुत्र्यांना अन्न मिळणे कठीण होते. अशावेळी ते घाबरलेले असतात. त्यामुळं ते लोकांवर हल्ला करण्याची किंवा त्यांचा पाठलाग करण्याची शक्यता जास्त असते.

भटक्या कुत्र्यांमधील समूहाची मानसिकता सामान्य आहे. अन्नापासून ते भटकंतीपर्यंत सगळंकाही ते एकत्र करतात. त्यामुळं भटका कुत्रा एकटा असतो त्यापेक्षा समूहात अधिक आक्रमकपणे वागतो.

अगदीच सामान्यपणे असं म्हणता येणार नाही. सर्वच भटके कुत्री आक्रमकपणे वागतात असं नाही. मानवी जीवनशैली बदलली आहे. त्यामुळं कुत्री मानवी हस्तक्षेपाशिवायही जगतात.
भटकी कुत्री शक्यतो त्यांचा भाग सोडून इतरत्र जात नाही. पण अन्न, ठिकाण आणि वर्चस्व यासारखे अनेक घटक यावर त्यांचं वर्तन ठरतं.

अन्नाच्या उपलब्धतेनुसार भटकी कुत्री सीमा ठरवतात. एखाद्या ठिकाणी सतत अन्नाचा पुरवठा होत असेल, तर ती तिथंच राहतात. पण अन्न मिळणं थांबलं तर ते इतरत्र जातात. एखाद्या ठिकाणी जर कुत्र्यांना अन्नच मिळत नसेल, तर कुत्री तिथं राहत नाहीत.

भटक्या कुत्र्यांना शक्यतो फार चांगले अनुभव येत नाहीत. लहानपणापासून आलेले वाईट अनुभव हेच त्यांचं वर्तन ठरवत असतात.
कुत्र्यांना वाहनांच्या धडक बसण्याची किंवा मानवाकडून हल्ला केला जाण्याची शक्यता जास्त असते.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजेच, कुणी कुत्र्यावर दगड फेकला तर तो कुत्रा माणसाशी आक्रमकपणे वागेल.
एखाद्या कुत्र्याला किंवा गटातील दुसऱ्या कुत्र्याला वाहनाने धडक दिली तर कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. हे त्यांच्या अनुभवांवर अवलंबून असल्यानं त्याला त्यांचं वर्तन म्हणता येणार नाही.

प्राणी त्यांच्या देहबोलीद्वारे संवाद साधतात. भटक्या कुत्र्यांबरोबर कधीही पाळीव प्राण्यांसारखं वागण्याचा प्रयत्न करू नये.
कोणीतरी त्यांच्या जागेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, सं कुणाला वाटलं तर ते पाठलाग किंवा हल्ल्याचा प्रयत्न करतात.
कुत्र्यांची देहबोली समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे. कुत्र्यांचा समूह असेल तर अंतर राखणे चांगले.

दुचाकी चालवताना कुत्रा पाठलाग करत असेल तर थोडे वेगाने निघून जायला हवे. तसं केल्यास कुत्रा थांबतो.
चालताना हातात काठी किंवा इतर काही तरी असणे उपयुक्त ठरते. बहुतेक कुत्री हल्ला करत नाहीत, फक्त भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

फोटो स्रोत, Getty Images
आपण आवाज केला किंवा त्यांना धोका वाटेल असं काही तरी दाखवले तर कुत्री मागी हटतील.
भुंकणं हे त्यांच्या सामान्य नसण्याचं पहिलं लक्षण आहे. आपण आहोत तिथली परिस्थिती समजून घेत त्यानुसार वागलं पाहिजे.
मुलांना एकटं सोडू नये. बहुतेक कुत्री एकट्या मुलावर हल्ला करतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











