पत्ता एक, मतदार अनेक; शंभरीपार वयाचे 113 मतदार कुठून आले? वरळीतल्या मतदार यादीचं वास्तव काय? - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"आमच्या घरात लोक तीन, पण 38 मतदार आमच्या घराच्या पत्त्यावर दाखवले आहेत. आम्ही सध्या या रूममध्ये राहत नसून भाड्याने दिलीय. पण आम्ही 30 वर्षांपासून इथं राहत होतो. बाहेरचे लोक आमच्या पत्त्यावर आले कसे? असा प्रश्न पडला आहे."
मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा (नाव बदललेलं आहे) बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या.
मतदार यादीत बोगस मतदारांची नावं, पत्ते, मृतांची नावे या आणि अशा इतर आक्षेपांमुळे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे.
आदित्य ठाकरे हे वरळीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनीच मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात 27 ऑक्टोबर 2025 रोजी एक सादरीकरण करत भाष्य केलंय.
वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घेण्यात आलेल्या आक्षेपांसंदर्भातील वास्तव जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम वरळी मतदारसंघातील आंबेडकर नगर, घई सीताराम, गांधी नगर, वरळी नाका परिसरात पोहोचली.
वरळी मतदारसंघांमध्ये काही मतदार यादीत एका पत्त्यावर अनेक मतदार, मृत मतदारांचे बोगस मतदान, नावं चुकीची, एकाच नावाचे असंख्य मतदार, चुकीचे किंवा नीट दिसत नसणारे फोटो, मतदारांच्या वयात तफावत, अस्तित्वात नसलेल्या वस्त्यांमध्ये मतदार अशा अनेक समस्या इथे आढळल्या. यातल्या अनेक गोष्टी आदित्य ठाकरेंनी त्यांच्या सादरीकरणातही मांडल्या होत्या.
मात्र, वरळी विधानसभा मतदार याद्यांसंदर्भात होणाऱ्या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. निवडणूक आयोगानं प्रतिक्रिया दिल्यास इथे अपडेट केली जाईल.
पत्ता एक, मतदार अनेक
वरळी मतदारसंघात आंबेडकर नगर येथे साधारण 120 झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये साधारण 300 मतदार आहेत, असे तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
मात्र, या झोपडपट्टीत एका खोलीत एका कुटुंबाऐवजी 38 विविध मतदार हे यादीमध्ये दाखवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात त्या खोलीच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेले मतदार, त्या घरातले नाहीतच असे स्वतः घरमालकांनी आणि शेजाऱ्यांनी बीबीसी मराठीच्या टीमला सांगितले.

घरमालक स्वतः 30 वर्षापासून तेथे वास्तव्यास होते. आता सध्या घर भाड्याने देण्यात आलेले आहे.
आंबेडकर नगर रहिवासी संघाचे सेक्रेटरी सुरेश कुंभार यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "एका खोलीच्या पत्त्यावर अशाप्रकारे बाहेरचे, आम्ही न ओळखणारे मतदार आमच्या यादीत दिसत आहेत. यापूर्वी देखील आम्ही यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र, कारवाई काहीही करण्यात आली नाही. अशाप्रकारे आणखी असण्याची शक्यता आहे."
जिवंत असून मतदान नाही, अन् मृतांची मतदार यादीत नावं
वरळी विधानसभेतील गीता कुमकुम टेरेस या इमारतीमध्ये आम्ही मतदार यादीत असलेली नाव तपासण्यासाठी पोहोचलो.
या इमारतीमध्ये शिवशंकर रावल नामक 104 वर्षाची व्यक्ती 18 वर्षांपूर्वी निधन झाल्याचे त्यांचे शेजारी निराबेन पेटीगरा सांगतात.

रावल कुटुंबीय आता सध्या तिथे राहत देखील नाही, तरीही त्यांचं नाव गेल्या काही वर्षांपासून मतदार यादीत येते. त्यांच्या नावे मतदान देखील केले जाते, असा स्थानिक शिवसेना शाखाप्रमुखांनी दावा केलाय.
ग्राऊंड रिपोर्ट :'हो, मी ओटीपी दिला'; बहुचर्चित राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचं वास्तव काय? - ग्राऊंड रिपोर्ट
यामुळेच 86 वर्षाच्या निराबेन पेटीगरा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "मी वयोवृद्ध असून आजारी असते. माझं नाव मतदार यादीत आहे. पण मतदानासाठी कसलीच सोय नसल्याने मतदान करता आलं नाही. मी जिवंत असून मतदान करता आलं नाही, अन् मृतांची मतदार यादीत नावं आहेत."
मृतांची नावे काढण्याऐवजी अजूनही जोडलेलीच
वरळी विधानसभा मतदार संघामध्ये 100 पेक्षा अधिक वयाचे 113 मतदार दाखवण्यात आलेले आहेत.
यातील चार मतदारांच्या घरी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही पोहोचलो.
प्रत्यक्ष पाहणीत हे मतदार हयात नसल्याचं समोर आलं. यासंदर्भात शिवसेना शाखेचे शाखाध्यक्ष दीपक बागवे यांनी 'मतदारसंघांमध्ये अशाप्रकारे अधिक वयोवृद्ध नसतानाही मतदार यादीत दाखवण्यात आल्याचं' बीबीसीला सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना दीपक बागवे म्हणाले की, "मृतांची नावे काढण्याऐवजी अजूनही जोडलेलीच आहेत. काहींचे मतदान देखील झाले आहे. ते कसे झाले? हा आम्हाला प्रश्न पडलाय."
व्यक्तीच अस्तित्वात नसताना मतदार यादीत नाव
वरळी विधानसभा मतदारसंघातील गीता कंपाउंड परिसरामध्ये मतदार यादीमध्ये एका महिलेचे नाव चुकीच्या घर क्रमांकासहित टाकण्यात आलेले आहे.
प्रत्यक्षात मात्र ती महिला त्या परिसरात वास्तव्यच करत नसल्याचं स्थानिक सांगतात.

या संदर्भात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनीष पाटणकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "ही व्यक्तीच इथे अस्तित्वात नाही तरीदेखील मतदार यादीत नाव आहे. ही एक चूक आमच्या लक्षात आली आहे. आम्ही आणखी चुका आणि दुरुस्ती तपासत आहोत."
पत्त्याचाही पत्ता नाही!
वरळी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार यादी क्रमांक 10 आणि 16 पाहिले असता, या यादीमध्ये मतदारांचे फोटोच देण्यात आलेले नाहीत.
यादीत फोटोच नसल्यामुळे स्थानिक लोकांना ती व्यक्ती नक्की कोण हेच ओळखता आलेलं नाही.
तर दुसरीकडे एकाच नावाचे इतर काही व्यक्ती असल्यामुळे यावरून देखील स्थानिक लोक संभ्रमात असल्याच पाहायला मिळालं.
या मतदारसंघांमध्ये काहींची नावे व इतर माहिती स्पष्ट लिहिण्यात आलेली आहे. मात्र, मतदारांच्या पत्त्यात घर क्रमांक आणि पत्ताच रिकामा ठेवण्यात आलेला आहे.

मतदार यादी क्रमांक 38 आणि 150 यामध्येही बाब समोर आली आहे. साधारण 4 हजार मतदारांची अशाच प्रकारे नोंद मतदार याद्यांमध्ये असल्याबाबत राजकीय पक्षाचे स्थानिक नेते सांगतात.
माझी जबाबदारी माझी यादी; आदित्य ठाकरेंचे आवाहन
वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी वरळी डोम येथे निर्धार मेळाव्यादरम्यान वरळी मतदारसंघातील मतदार यादीतील घोळ सर्वांसमोर मांडला.
वरळी मतदारसंघात 19333 मतदार संशयास्पद आणि बोगस असल्याचं आदित्य ठाकरे यांनी आरोप केला. उपशाखाप्रमुखांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "दिवाळी झाली. आता आपल्या हक्काचा निवडणुकीचा सण जवळ येतोय. आता निवडणुकीची तयारी, सभा, बॅनर सर्व काही करायचं आहे. पण हे सर्व केवळ हिंमतीनं होणार नाही. 'माझी जबाबदारी माझी यादी' हा मंत्र सर्व उपशाखाप्रमुखांनी पाळायला हवा.

फोटो स्रोत, Facebook/Aaditya Thackeray
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, "वरळी मतदार संघात 502 मतदार असे आहेत, त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचं नाव सारखंच आहे. म्हात्रे नावाच्या मतदाराचे वडील पटेल असलेले 720 आहेत. स्त्रीलिंगीचे पुल्लिंग केलेले 643 मतदार आहेत. तसंच एपिक नंबर नसलेले 28 मतदार वरळीत सापडले. समान एपिक असलेले 133 मतदार सापडले आहेत."

एका ठिकाणी एकाच खोलीत 38 मतदार असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुंबईत तर असे लाखो मतदार आहेत. काही मतदान कार्डांवर मतदारांचा फोटो नाही. काही मतदान कार्डावर एकाच ठिकाणी अनेक लोक राहतात. काही मतदारांचा मृत्यू झालेला आहे.
एका मतदान कार्डावर तर मतदाराचे फक्त नाक दाखवण्यात आले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या कथित अनियमितता शोधून काढल्या पाहिजेत, असे उपस्थितांना आवाहन केलं आहे.
विरोधकांची एकजूट
काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्या निकालाच्या विश्लेषणानंतर मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली होती.
यानंतर हळूहळू महाराष्ट्रात देखील विरोधी पक्षांनी हा मुद्दा हाती घेत प्रत्येक मतदारसंघातील वास्तव एकत्रित पत्रकार परिषद घेत काही दिवसांपूर्वी मांडले आणि यात योग्य कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी त्यावेळी केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), कम्युनिस्ट पक्ष, शेकाप तसेच इतर पक्षाने देखील या विरोधात आवाज उठवत एकजुटीने या विरोधात मोर्चा बांधला आहे.
जोपर्यंत या याद्या दोषमुक्त होत नाहीत तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
वरळी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि बीबीसी मराठीच्या पाहणीदरम्यान समोर आलेल्या बाबींसंदर्भात निवडणूक आयोग, महाराष्ट्र आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी बीबीसी मराठीच्या टीमने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या संदर्भात निवडणूक अधिकारी व आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेले नाही. प्रतिक्रिया आल्यास यात अपडेट करण्यात येईल.
मात्र, राहुल गांधी आणि राजकीय पक्षांनी राज्यात मतदार याद्यात घेतलेल्या आक्षेपांच्या निमित्तानं बीबीसी मराठीच्या टीमने 23 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या एका वृत्तादरम्यान निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त एस.चोक्कलिंगम यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "आम्ही पारदर्शक आहोत. आमच्याकडे विस्तृत तक्रार जर दिली तर आम्ही लगेच योग्य ती कारवाई करतो."
एक नोव्हेंबर रोजी मुंबईत 'सत्याचा मोर्चा'
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये होत असलेला घोळ आणि निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विविध राजकीय पक्षांकडून 'सत्याचा मोर्चा' आयोजित करण्यात आलेला आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नियोजनासंदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील.
यासंदर्भात 28 ऑक्टोबर 2025 रोजी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेन सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अरविंद गावडे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, राखी जाधव, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, शेकापच्या साम्या कोरडे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस कमिशनर देवेन भारती ह्यांची भेट घेऊन मोर्च्याच्या निर्योजनसंदर्भात चर्चा केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











