दुष्काळी गावाला पाणीदार करणारा बारीपाडा पॅटर्न काय आहे? पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले चैत्राम पवार कोण आहेत?

फोटो स्रोत, Facebook/Akhil Bharatiya Vanvasi Kalyan Ashram
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारत सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. 2025 च्या पद्म पुरस्कारांच्या या यादीत 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील दहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामध्ये अभिनेते अशोक सराफ, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली, शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे आणि पर्यावरण रक्षणाचा 'बारीपाडा पॅटर्न' राबवणारे चैत्राम पवार या मराठी व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असणाऱ्या सुमारे शंभर उंबऱ्यांच्या बारीपाडा गावात मागच्या तीन दशकांमध्ये जो काही बदल घडल्या, त्यामुळेच चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कोकणा आणि भिल्ल या आदिवासी जमातीचे लोक राहत असलेल्या बारीपाड्यात तीन दशकांपूर्वी दरवर्षी दुष्काळ पडायचा.
डिसेंबर महिना उलटला की गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागायचं, गावात कसलाही रोजगार उपलब्ध नव्हता, पाणी नसल्याने शेती व्हायची नाही आणि या सगळ्याला कंटाळलेले बारीपाड्याचे लोक हिवाळ्यानंतर स्थलांतर करायचे. कुणी ऊसतोडणीसाठी गाव सोडायचं तर तर कुणी बांधकामावर मजूर म्हणून कामाला जायचं.
या गावात साधी नियमित शाळादेखील नव्हती. अशातच एका जिद्दी बापाचा मुलगा मिळेल तसं शिक्षण घेतो, एम. कॉमची पदवी मिळवतो आणि शिक्षणानंतर गावाचा कायापालट करण्यासाठी बारीपाड्यात परत येतो.


काही संस्था, संघटनांची मदत आणि बारीपाड्यातील लोकांच्या सहकार्याने या गावाच्या आजूबाजूला असलेलं जंगल वाचवण्याचा निश्चय करतो आणि त्यानंतर पुढची तीन दशकं या गावाचा कायापालट करणारा बारीपाडा पॅटर्न राबवला जातो.
बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावातली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीच नाव आहे चैत्राम पवार.
काय आहे बारीपाडा पॅटर्न?
पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना चैत्राम पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "बारीपाडा हे सीमाभागावरचं एक छोटंसं गाव आहे. 1991पूर्वी हे बारीपाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी आणि वन याबाबतीत हे गाव पूर्णपणे विस्कळीत होतं. गावात बदल करण्याची माझी इच्छा होती आणि त्याच कामात मला वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची मदत झाली.
"या संस्थेने लक्षात आणून दिलं की भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आपलं अस्तित्वच संपेल. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचं काम करण्यासाठी आम्ही 1991मध्ये एक गाव निश्चित केलं. दोन वर्षे गावाला संघटित करण्यामध्ये वेळ गेला आणि या कामाला एक दिशा मिळाली. गावाच्या शेजारचं जंगल तोडलं जात होतं, कुणीही त्याकडे लक्ष देत नव्हतं. गावकऱ्यांना वाटायचं की हे शासनाचं काम आहे. त्यांना वाटायचं की जंगल तोडण्याचं काम फक्त आपलं आहे ते वाचवण्याचं नाही," पवार सांगतात.

फोटो स्रोत, Facebook
चैत्राम पवार यांनी ज्या वनवासी कल्याण आश्रमाचा उल्लेख केला आहे ती संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचा एक भाग आहे. देशातील आदिवासी समुदायाच्या विविध विषयांवर ही संस्था काम करते.
जंगल वाचवण्याचा विडा उचललेल्या बारीपाड्याच्या लोकांनी यासाठी अनेक नियम बनवले, याबाबत बोलताना चैत्राम पवार म्हणाले, "आम्ही गावातील लोकांचं संघटन करून वनव्यवस्थापन सुरू केलं.
गावाच्या शेजारील जंगलाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही नियम बनवले. मुख्य झाड तोडताना सापडला तर त्याला 1051 रुपये दंड, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, मुळ्या आणल्या तरी दंडात्मक कारवाई, राखीव जंगलात बैलगाडी नेऊ नये, वॉचमन आम्ही स्वतः बसवले या सगळ्या प्रयत्नांमधून बघता बघता तब्बल अकराशे एकरचं जंगल गावाने उभं केलं. बॉटनिकल सर्वेक्षण केल्यानंतर लक्षात आलं की आता 27 प्रजाती आमच्या जंगलात आहेत. आम्ही वनभाजी महोत्सव सुरू केला. एकूण 445 भाज्या तिथे असतात.
"2006च्या सामुदायिक वनाधिकार कायद्यानुसार या जंगलाचा मालकी हक्क गावाला मिळाला. यातून गावाच्या मालकीची पाच ते सहा हजार कोटींची मालमत्ता तयार झाली. सर्वांगीण विकासासाठी आणखीन काही प्रयोग करायचे ठरवले," पवार सांगतात.
जंगल तर वाचलं पण शेतीचं काय? स्थलांतर कसं थांबवलं?
वनसंरक्षणाच्या कामासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता प्रश्न होता उदरनिर्वाहाचा.
दरवर्षी पाचवीला पुजलेल्या दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी विस्थापित होणाऱ्या कुटुंबाना स्थिर करण्यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करणं गरजेचं होतं.
याबाबत चैत्राम पवार म्हणाले, "गावात शेतीमध्ये काही प्रयोग आम्ही करू शकतो का हे तपासलं. पण गावात पाणीच नव्हतं तर शेती कुठून करणार? मग श्रमदानातून बंधारे बांधायचं ठरवलं. आम्ही श्रमदानातून 485 बांध बांधले, जवळपास 5 किलोमीटर भरता येईल एवढी सी.सी.टी. (खोल सलग समतल चर) गावाने मिळून खोदली. यामुळे जलस्तर हळूहळू वर यायला लागला. अशाप्रकारे वनसंवर्धन आणि श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतीमध्ये बदल घडून आला.
आमच्या गावातले निम्म्यापेक्षा जास्त कुटुंब ऊसतोडणीला जायचे, विस्थापित व्हायचे पण गावात पाणी आलं आणि हे लोक गावाकडे परतले. गावाकडे माणसं परत आली, ती स्थिर झाली. यामुळे गावातील शिक्षण, आरोग्य आणि शेतीवर काम करणं सोपं झालं. वनसंवर्धन, भूसंवर्धन आणि जलसंवर्धनावर काम केलं.
"पण जोपर्यंत यासाठी आपल्यात मानसिक बदल होत नाही. ही संपत्ती आपली आहे असं वाटत नाही तोपर्यंत हे शक्य नसतं. हे व्हावं म्हणून आम्ही आमच्या छोट्याशा गावात चार समित्या केल्या आहेत. ऊर्जा बचाव आणि निर्मिती समिती, वनव्यवथापन समिती, आरोग्य समिती आणि ग्रामविकास समिती या समित्यांच्या माध्यमातून आम्ही तरुणांचं संघटन केलं," चैत्राम पवार सांगतात.
बारीपाडा पॅटर्नचे पाच 'ज'
केवळ बारीपाडा या गावचाच विकास न करता संपूर्ण परिसराचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचं चैत्राम पवार म्हणतात. गावातील अधिकाधिक लोकांनी शेताकडे वळावं म्हणून 'गोआदर्श शेती'चा प्रयोग राबवल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाने आदिवासी गावांच्या विकासासाठी पाच बिंदूंवर काम करण्याचं निश्चित केलं. ज्यामध्ये जल, जंगल, जमीन, जन (माणूस) आणि जनावर यांचा समावेश आहे.
चैत्राम पवार म्हणतात की, "गाय वाचली तर गोबर (शेण) मिळेल आणि गोबर मिळालं तर शेतीत त्याचा उपयोग होईल. भविष्यात सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल, गॅस परवडणार नाही मग आतापासूनच आपण गोआदर्श शेती आपण करू शकतो का? हे तपासलं आणि गावात पूर्णपणे गोआदर्श शेती सुरू झाली.
"आमच्या कामाला 30 वर्षं झालीत. मागे वळून बघताना असं लक्षात आलं की वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा, जनसंपदा आणि गोसंपदा यांचं योग्य व्यवस्थापन करून शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. बारीपाडा आणि परिसरातील 11 हजार 767 हेक्टर वनक्षेत्र गावकऱ्यांच्या मालकीचं केलं. त्यामुळे विकासाला चालना मिळाली," पवार सांगतात.

फोटो स्रोत, sewagatha.org
गावाच्या अवतीभोवती असणाऱ्या संसाधनांचा योग्य वापर करून पुढच्या पिढीला स्वच्छ पर्यावरणाचा वारसा देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं चैत्राम पवार म्हणाले.
"हे सगळं काम करत असताना आम्हाला वेगवेगळ्या संस्थांनी मदत केली. आयआयटी मुंबई, मीनाक्षी मेहता फाउंडेशन या संस्थांनी मदत केली. या कंपनीने आम्हाला सामुदायिकरीत्या सौर ऊर्जा वापरता यावी, यासाठी 32 सौर पंप लावून दिले. हे पंप आम्ही मापलगाव, सावरीपाडा, मोहगाव, कालघर आणि बारीपाडा या गावांमध्ये वाटून दिले," असं चैत्राम पवार सांगतात.
अशिक्षित पालकांच्या पोटी जन्माला आलेल्या चैत्राम पवार यांनी विविध शाळांमध्ये शिक्षण घेतलं. ज्याठिकाणी राहण्याची आणि खाण्याची सोय होत होती तिथे शिक्षण घेतल्याचं चैत्राम पवार सांगतात.
"त्याकाळी आमच्या गावात नियमित शाळा नव्हती. आता गावात चौथीपर्यंत शाळा आहे, शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे. गावातील एक व्यक्ती प्राध्यापक झाली आहे आणि बऱ्याच मुलांनी पदवी मिळवून नोकऱ्या देखील मिळवल्या आहेत," असं चैत्राम म्हणाले.
पर्यावरणाच्या नुकसानीसाठी कोण जबाबदार?
वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आम्ही देशभर काम करत आहोत. केवळ बारीपाडाच नाही झारखंड, ओरिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश अशा राज्यांमध्ये आदिवासी समुदायाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं चैत्राम पवार यांनी सांगितलं.
पर्यावरण बदलाबाबत बोलताना पवार यांनी सांगितलं की, "आमचं काम आहे जमिनीवर लोकांना एकत्र करणं, त्यांना संघटित करणं आणि त्यांच्यामध्ये या पाच बिंदूंबाबत जनजागृती करणं ते काम आम्ही करतोय. हे झालं तर पुढचे प्रश्न आपोआप सुटतील. हवामान बदलाला जबाबदार कोण हा प्रश्न खूप वेगळा आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आम्ही हे संवर्धनाचं काम केलं तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे."

राष्ट्राचा विकास आणि पर्यावरण दोन्ही महत्त्वाचं असल्याचं चैत्राम पवार म्हणाले.
"राष्ट्राच्या विकासासाठी एखादी खाण सुरू होणार असेल तर तिथे राहणाऱ्या लोकांची संमती घेतली पाहिजे. त्यांच्या गरजांचा विचार झाला पाहिजे. विकासामध्ये आदिवासींचा सहभाग असला पाहिजे. खाणींसाठी जो जंगलाचा परिसर नष्ट होणार आहे त्याला पर्याय उभा केला पाहिजे आणि ते केवळ कागदावर न करता प्रत्यक्ष व्हायला हवं.
"शंभर हेक्टरवर खाणकाम होणार असेल तर दुसऱ्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण केलं पाहिजे. या कामांमध्ये लोकसहभाग वाढवला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. पर्यावरण बचावासाठी काम करणाऱ्या कार्यकर्ता आणि संघटनांनी पुरस्कारासाठी काम करू नये," असं पवार सांगतात.
वनवासी की आदिवासी?
वनवासी कल्याण आश्रमाकडून आदिवासींचा उल्लेख नेहमी वनवासी असा केला जातो. देशातील अनेक आदिवासी कार्यकर्ते आणि संघटनांनी 'वनवासी' या शब्दाचा विरोध केला आहे.
बारीपाड्यात राहणाऱ्या चैत्राम पवार यांचं मत मात्र यापेक्षा थोडं वेगळं आहे. ते म्हणतात, "यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की, वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना छत्तीसगडच्या जसपूरमध्ये 1952साली झाली. त्यावेळच्या कायदा आणि नियमाप्रमाणे नोंदणी केलेली ही संस्था आहे. आदिवासी हा शब्द इंग्रजांनी आणला आहे. आपली जनगणना सुरू झाली तेव्हा जमातींना कोणत्या नावाने संबोधलं गेलं हे पाहिलं पाहिजे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला 'आदिवासी' हा शब्द आला असं मला वाटतं.

फोटो स्रोत, Facebook/Akhil Bharatiya Vanvasi Kalyan Ashram
काही ठिकाणी या शब्दाला विरोध होत असेल तर आम्ही त्यामध्ये थोडा बदल देखील करू शकतो. उदाहरणार्थ नागपूर ते लातूर अशा अकरा जिल्ह्यांच्या विकासासाठी आम्ही देवगिरी कल्याण आश्रम असं नाव दिलं आहे."
आंदोलन करणाऱ्या आदिवासींबाबत बोलताना चैत्राम पवार म्हणाले, "आमच्या संस्थेचं नाव वनवासी कल्याण आश्रम आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही देशभर काम करतो. शब्दावरून संघर्ष करत बसण्यापेक्षा या समाजाला पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे. आपण नुसते मोर्चे आणि संमेलन करायचे का? विरोध करणारे करत राहतील, ज्यांना जायचं आहे ते निघून जातील पण आम्ही आमचं काम करत राहणार," असं चैत्राम पवार सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











