पद्म पुरस्काराबद्दलच्या या गोष्टी जाणून घ्या

फोटो स्रोत, PAdma puraskar
पारंपरिक पद्धतीची साडी नेसून, अनवाणी पायांनी चालत जात पुरस्कार स्वीकारणाऱ्या तुलसी गौडा..पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपतींना आशीर्वाद देणारे 102 वर्षांचे नंदा प्रुस्ती ऊर्फ नंदा सर..ही दृश्यं आपण काहीच महिन्यांपूर्वी आपण पाहिली...
हा होता 2021 च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा...
25 जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया...
सैन्य दलांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्यांना Gallantry Awards म्हणजेच शौर्य पुरस्कार दिले जातात.
भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे Civilian Honours म्हणजे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात.
पद्म पुरस्काराचे 3 प्रकार-
- पद्म विभूषण
- पद्म भूषण
- पद्मश्री
पद्म विभूषण पुरस्कार हा भारतरत्नच्या नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान मानला जातो.
पद्म पुरस्कारांचा इतिहास काय?
1954 मध्ये हे पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आणि आजवर फक्त 1978, 1979, 1993 आणि 1997 मध्ये पद्म पुरस्कार देण्यात आले नाहीत.
भारतातला प्रत्येक नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहे. धर्म, लिंग, जात, हुद्दा, वय याची कोणतीही आडकाठी नाही… अपवाद म्हणजे सरकारी नोकरी करणारे, PSUs मध्ये काम करणारे कर्मचारी.
ते या पुरस्कारांसाठी पात्र ठरत नाहीत. पण या नियमातही काही अपवाद आहे. सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांना मात्र हे पुरस्कार दिले जातात.
परदेशी नागरिकांनाही हे पुरस्कार दिले जाऊ शकतात.
काहीवेळा हे पुरस्कार मरणोत्तरही देण्यात आलेत. भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 2022 च्या पुरस्कारांमध्ये एकूण 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले आहेत.

फोटो स्रोत, TWITTER / @RASHTRAPATIBHVN
एखाद्या व्यक्तीला एक पद्म पुरस्कार देण्यात आल्याच्या किमान 5 वर्षांनंतर पुन्हा दुसरा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकतो.
दरवर्षी जास्तीत जास्त 120 पद्म पुरस्कार दिले जाऊ शकतात. यामध्ये मरणोत्तर पुरस्कार, आणि NRI, परदेशी नागरिक म्हणजे फॉरिनर्स आणि Overseas Citizens of India म्हणजे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना देण्यात आलेल्या पुरस्कारांचा समावेश नसतो.
पद्म पुरस्कारांची निवड प्रक्रिया काय?
2015 पर्यंत फक्त राज्यांचे मंत्री, मुख्यमंत्री, गव्हर्नर, खासदारच या 'पद्म' पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करू शकत होते. पण 2015 मध्ये हा नियम बदलत ही प्रक्रिया खुली करण्यात आली.
पुरस्कारांची ही नामांकन प्रक्रिया सर्वांसाठी खुली आहे आणि यामध्ये Self Nomination सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही स्वतःचं नावही सुचवू शकता, असं पद्म पुरस्कारांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय सरकारी पदांवरील व्यक्ती - मुख्यमंत्री, राज्य सरकार किंवा खासदारही कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीचं नाव सुचवू शकतात.
1 मे ते 15 सप्टेंबरच्या कालावधीत साधारणपणे ही नामांकन केली जातात. यानंतर पद्म पुरस्कार समिती या सगळ्यांमधून अंतिम नावांची निवड करते. भारताचे पंतप्रधान दरवर्षी पद्म पुरस्कार समितीची स्थापना करतात. ही समिती पुरस्कारांसाठीची नावं सुचवते. कॅबिनेट सचिव या समितीचे प्रमुख असतात. आणि या समितीत गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंतांचा समावेश असतो.
ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे recommend करते आणि अंतिम मंजुरी या दोघांकडून मिळते.
पद्म पुरस्कार नाकारला जाऊ शकतो का?
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. पण आपण तो नाकारत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. पण असं करणारे ते पहिले नाहीत. यापूर्वीही अनेकांनी पद्म पुरस्कार नाकारलेला आहे.
"पद्मभूषण पुरस्काराबद्दल मला काहीही माहिती नाही. कोणीही मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. जर मला हा पुरस्कार जाहीर झाला असेल, तर तो मी नाकारत आहे." असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बुद्धदेव भट्टाचार्य यांनी म्हटलंय.
साधारणपणे पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी त्याविषयीची कल्पना त्या विजेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येते.
भट्टाचार्य यांनी पुरस्कार का नाकारला याचं कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ट्वीट करत दिलंय. सरकारकडून कोणताही पुरस्कार न स्वीकारणं ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कायमच भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. आमचं काम हे लोकांसाठी आहे, पुरस्कारांसाठी नाही असंही यात म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याच पक्षाचे नेते EMS नंबुद्रीपाद यांनीही 1992 मध्ये पद्म विभूषण पुरस्कार नाकारला होता.
केलेल्या कामासाठी पुरस्कार स्वीकारणं योग्य वाटत नसल्याचं सांगत ब्युरोक्रॅट पी. एन. हक्सार यांनीही पद्म विभूषण नाकारला होता.
रामकृष्ण मिशनला पुरस्कार जाहीर न करता वैयक्तिकरित्या स्वामी रंगनाथानंद यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांनीदेखील हा पुरस्कार नाकारला होता.
इतिहासकार रोमिला थापर यांनीही याअगोदर पद्म पुरस्कार नाकारला होता, तर माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा यांच्या कुटुंबियांनीही 2014 मध्ये त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला पुरस्कार नाकारला होता. ते स्वतः असते तर त्यांनीही हा पुरस्कार स्वीकारला नसता, असं वर्मा कुटुंबियांचं म्हणणं होतं.

फोटो स्रोत, Pti
काही जण असेही आहेत ज्यांनी एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपल्याला पूर्वी मिळालेला पद्म पुरस्कार परत केलाय.
भारतात 1975 मध्ये लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ कन्नड साहित्यक के. शिवराम कारंथ यांनी त्यांना 1968 मध्ये देण्यात आलेला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता.
ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेधार्थ लेखक खुशवंत सिंह यांनी पद्म पुरस्कार परत केला होता. कवी कैफी आझमी यांनीही त्यांचा पद्म पुरस्कार परत केला होता.
2020 साली शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनीही त्यांना देण्यात आलेला पद्म विभूषण पुरस्कार केंद्र सरकारच्या निषेधार्थ परत केला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








