राम मंदिर आंदोलनातील साध्वी ऋतंभरा यांना पद्म पुरस्कार देण्यावरून झालेला नेमका वाद काय?

फोटो स्रोत, Getty Images
2025 च्या पद्म पुरस्कारांच्या या यादीत 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांच्या यादीतील एक नाव साध्वी ऋतंभरा यांचंदेखील आहे. त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
साध्वी ऋतंभरा यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
एका बाजूला सरकारवर पद्म पुरस्कारांचं राजकारण केल्याचा आरोप होतो आहे. तर दुसऱ्या बाजूला काही लोक या निर्णयाचं स्वागत देखील करत आहेत.
दरम्यान पद्मभूषण पुरस्कार दिल्याबद्दल साध्वी ऋतंभरा म्हणाल्या, "22 जानेवारीला श्रीराम जेव्हा राम मंदिरात स्थानापन्न झाले होते, तेव्हाच मला सर्वात मोठा पुरस्कार मिळाला होता."


कोण काय म्हणालं?
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी म्हणाले, "साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार मिळणं ही आनंदाची बाब आहे. राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होत त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात जागृती करण्याचं काम केलं होतं."
तर दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साध्वी ऋतंभरा यांना पद्म पुरस्कार देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
एक्स या सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं, "मोदी सरकारच्या कार्यकाळात पद्म पुरस्कार राजकीय तमाशा झाले आहेत."
वरिष्ठ पत्रकार आणि लेखक दयाशंकर मिश्रा म्हणाले, "भाजपाच्या प्रचारक साध्वी ऋतंभरा यांना पद्म भूषण पुरस्कार देणं हे राज्यघटनेबद्दल सरकारच्या भूमिकेचं स्पष्ट उदाहरण आहे."
वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलं, "साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात त्यांनी सक्रियरित्या भाग घेतला होता."
"सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीला एक 'गुन्हेगारी कृत्य' ठरवलं आहे. ही घटना घडण्याआधी त्यांनी द्वेष पसरवणारी भाषणं केली होती."

फोटो स्रोत, @DIDIRITAMBHARA
लेखक उदय महूरकर यांनी एक्सवर लिहिलं, "साध्वी ऋतंभरा यांना पद्म भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं कौतुक करतो."
"त्यांनी सामाजिक सेवेसह त्यांच्या कार्याद्वारे विघटनकारी शक्तींच्या विरोधात राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक चेतना जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे."
प्रसिद्ध लोक गायिका मालिनी अवस्थी यांनी एक्सवर लिहिलं, "आम्हा सर्वांच्या दीदी साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणं, ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे."
"राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी देशात जागृती निर्माण करण्याचं काम केलं आणि एका खऱ्या संताप्रमाणे लोककल्याणासाठी जीवन समर्पित केलं."
मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी लिहिलं, "द्वेष पसरवणाऱ्या, दुर्गा वाहिनीच्या संस्थापक, वरिष्ठ नेत्यांना राखी बांधणाऱ्या, बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यातील भागीदार, साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे."
"भारतीय प्रजासत्ताकावरील ताबा जवळपास पूर्ण झाला आहे. विरोधी पक्ष हे पाहतो आहे का?"
पत्रकार विजैता सिंह यांनी लिहिलं, "साध्वी ऋतंभरा यांना 'सामाजिक कार्य' श्रेणीत पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात त्या सहभागी होत्या. केंद्रीय तपास यंत्रणेनं (सीबीआय) त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणात आरोप देखील लावला होता."
भारतातील अल्पसंख्याकांच्या विरोधात द्वेषावर आधारित गुन्ह्यांवर वार्तांकन करणारे स्वतंत्र पत्रकार अशरफ हुसैन यांनी एक्सवर लिहिलं, "या साध्वी ऋतंभरा आहेत. बाबरी मशीदीच्या विरोधात अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेत त्यांनी भरपूर 'द्वेषयुक्त भाषणं' दिली होती."
"आता मोदी सरकारनं साध्वी ऋतंभरा यांना 'समाज सेवा' करण्यासाठी पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे."
साध्वी ऋतंभरा कोण आहेत?
ऋतंभरा यांचा जन्म पंजाबच्या गरीब मंडी दौराहा गावातील अशा एका कुटुंबात झाला होता, ज्याला खालच्या जातीतील समजलं जातं.
सुधीर कक्कड मनोविश्लेषक आहेत. त्यांनी 'द कलर्स ऑफ व्हायोलन्स' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "वयाच्या 16 व्या वर्षी ऋतंभराला हिंदू पुनरुत्थानासाठी काम करत असलेल्या अनेक 'संता'पैकी प्रमुख संत स्वामी परमानंद यांचं प्रवचन ऐकून आत्मानूभुती झाली."
त्यानंतर त्या हरिद्वार इथं असणाऱ्या त्यांच्या आश्रमात गेल्या आणि तिथेच त्यांनी भाषण देण्याची कला आत्मसात केली.
त्यात त्या इतक्या पारंगत झाल्या की विश्व हिंदू परिषदेनं त्यांना राम मंदिर आंदोलनाच्या वेळेस प्रवक्ता केलं.

फोटो स्रोत, ANI
सप्टेंबर 1990 मध्ये राम मंदिरासाठी गुजरातमधील सोमनाथ इथून रथ यात्रेची सुरुवात झाली. ही रथयात्रा एक महिन्यात 10,000 किलोमीटरचा प्रवास करून अयोध्येत पोहोचणार होती.
भाजपाच्या अंदाजानुसार, 10 कोटींपेक्षा अधिक लोक रथ यात्रेच्या विविध टप्प्यात सहभागी झाले. याच दरम्यान ऋतंभरा यांनी त्यांच्या नावाबरोबर 'साध्वी' जोडून घेतलं.
वृंदावनमध्ये साध्वी ऋतंभरा यांचा वात्सल्यग्राम नावाचा आश्रम आहे.
राम जन्मभूमी आंदोलनाचा प्रमुख चेहरा
1990 च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनात हिंदू महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. साध्वी ऋतंभरा या देखील या आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा होत्या.
आंदोलनातील प्रक्षोभक संदेश अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेट्स तेव्हा एक-एक रुपयांत विकल्या जायच्या. तसंच भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांच्या घरी वाटल्या जायच्या.
साध्वी ऋतंभरा या हिंदूंमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. इतिहासकार तनिका सरकार त्यांच्या 'हिंदू वाईफ, हिंदू नेशन' या पुस्तकात लिहितात, "अयोध्येतील पंडितांनी मंदिरांमधील त्यांचे रोजची पूजा-पाठ थांबवून साध्वी ऋतंभरा यांची ऑडिओ कॅसेटमधील भाषणं वाजवण्यास सुरुवात केली होती."

फोटो स्रोत, ANI
बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या एक वर्षापूर्वी, 1991 मध्ये दिल्लीत लाखो लोकांच्या सभेत भाषण करताना त्या म्हणाल्या होत्या, "जगातील कोणतीही ताकद राम जन्मभूमीत मंदिराची उभारणी होण्यापासून रोखू शकत नाही."
6 डिसेंबर 1992 ला जेव्हा कारसेवक बाबरी मशिदीवर चढले होते, तेव्हा साध्वी ऋतंभरा, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आणि अनेक साधू संतांबरोबर मंचावर उपस्थित होत्या.
वरिष्ठ पत्रकार हेमंत शर्मा यांनी त्यांच्या 'युद्ध में अयोध्या' या पुस्तकात त्या दिवसाच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थितीबद्दल लिहिलं आहे.
त्यांच्यानुसार, साध्वी ऋतंभरा कारसेवकांना उद्देशून सांगत होत्या की, या शुभ आणि पवित्र कामात त्यांनी स्वत:ला झोकून द्यावं.
साध्वी ऋतंभरा यांच्यावर या विध्वंसाचा गुन्हेगारी कट रचण्याचा आणि दंगल भडकावण्याचा खटला देखील चालला.
30 सप्टेंबर 2020 ला बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष सोडलं होतं.
पद्म पुरस्कार कसे दिले जातात?
पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली होती. 1978, 1979 आणि 1993 पासून 1997 पर्यंतची वर्षे वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.
हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्म विभूषण पुरस्कार दिला जातो.
उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण पुरस्कार तर विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो.
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, नागरी सेवा, व्यापार यासह अनेक क्षेत्रांमधील विशिष्ट कामासाठी हे पुरस्कार दिले जातात.
सरकारनुसार, या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या कार्यात लोकसेवेचं मूल्य असलं पाहिजे.

फोटो स्रोत, PADMA PURASKAR
दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कार समिती नियुक्त करतात. पद्म पुरस्कार समिती ज्या लोकांची पुरस्कारांसाठी शिफारस करते, ती नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवली जातात.
नाव घोषित झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रपती भवनात पुरस्कार समारंभ आयोजित केला जातो.
या पुरस्कारात राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि एक पदक यांचा समावेश असतो.
प्रत्येक पुरस्कार विजेत्याची थोडक्यात माहिती देणारी एक स्मरणिका देखील समारंभाच्या दिवशी प्रकाशित केली जाते.
पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला पदकाची एक रेप्लिका म्हणजे प्रतिकृती देखील दिली जाते. ही प्रतिकृती त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही कार्यक्रमात परिधान करता येते.
भारत सरकारनुसार, पद्म पुरस्कार म्हणजे कोणतीही पदवी नाही. या पुरस्काराचा उल्लेख आमंत्रण पत्रिका, पोस्टर, पुस्तकं यावर पुरस्कार विजेत्याच्या नावाआधी किंवा नंतर केला जाऊ शकत नाही.
पुरस्कार विजेत्यांना कोणतीही रोख रक्कम आणि रेल्वे किंवा विमान प्रवासात सूट मिळत नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











