मतदानाचा टक्का कसा वाढला, याचा फायदा कोणाला? जाणकार काय सांगतात?

फोटो स्रोत, ANI
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. वाढलेल्या मतदानाची टक्केवारीमुळे 23 तारखेला येणाऱ्या निकालाची देखील चुरस वाढली.
सहा प्रमुख पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामुळे लढतींची चुरस वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी उन्हाळा होता त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. पण यावेळी मात्र मतदारांनी उत्साहाने मतदान केल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेतही मतदानाचा टक्का वाढल्याचे आपल्या लक्षात येईल.
जिल्हानिहाय आकडेवारी
राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - 71.73 टक्के
अकोला - 64.98 टक्के
अमरावती - 65.57 टक्के
औरंगाबाद- 68.89 टक्के
बीड - 67.79 टक्के
भंडारा - 69.42 टक्के
बुलढाणा - 70.32 टक्के
चंद्रपूर- 71.27 टक्के
धुळे - 64.70 टक्के
गडचिरोली - 73.68 टक्के
गोंदिया - 69.53 टक्के
हिंगोली - 71.10 टक्के
जळगाव - 64.42 टक्के
जालना - 72.30 टक्के
कोल्हापूर - 76.25 टक्के
लातूर - 66.92 टक्के
मुंबई शहर- 52.07 टक्के
मुंबई उपनगर - 55.77 टक्के
नागपूर - 60.49 टक्के
नांदेड - 64.92 टक्के
नंदुरबार- 69.15 टक्के
नाशिक - 67.57 टक्के
उस्मानाबाद - 64.27 टक्के
पालघर - 65.95 टक्के
परभणी - 70.38 टक्के
पुणे - 61.05 टक्के
रायगड - 67.23 टक्के
रत्नागिरी - 64.55 टक्के
सांगली - 71.89 टक्के
सातारा - 71.71 टक्के
सिंधुदुर्ग - 68.40 टक्के
सोलापूर - 67.36 टक्के
ठाणे - 56.05 टक्के
वर्धा - 68.30 टक्के
वाशिम - 66.01 टक्के
यवतमाळ - 69.02 टक्के
मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा यावर्षी अधिक मतदान
2014 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 63.3 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 ला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 61.40 टक्के मतदान झाले होते.
मागील दोन विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत यंदा 3.71 टक्के मतदान वाढलेलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सर्वांत जास्त आणि कमी मतदान कोणत्या भागात
यंदा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून मत मतपेटीत टाकलेली आहेत. यात सर्वात अग्रेसर कोल्हापूर जिल्हा आहे 62.25 टक्के मतदान या जिल्ह्यात झाले. तर दुसरीकडे सर्वांत कमी मतदान हे मुंबई शहरात 52.7 टक्के सर्वात कमी मतदान हे मुंबईत झाले आहे.
यंदा शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान पाहायला मिळाले आहे. ग्रामीण भागातील स्थानिक राजकारण, अनेक योजना, राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासनं आणि त्या भागातील समीकरण यामुळे ग्रामीण भागात मतदारांची टक्केवारी वाढली असल्याचं जाणकार सांगतात.
मात्र दुसरीकडे शहरी भागामध्ये आश्वासने पक्ष देतायेत. मात्र यासाठी निधी कुठे आणणार कुठून आणि शहरातील समस्या, मागील काही वर्षातील राजकारण यामुळे मतदारांनी मतदानासाठी पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ज्येष्ठ पत्रकार सचिन गडहिरे सांगतात.


वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या फायद्याचा?
राज्यात निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे वाढलेला टक्का महायुतीच्या उमेदवारांना, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना की आणखी इतर कोणासाठी फायदेशीर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणाची डोकेदुखी ठरणार आणि कोणाला तरी फायदेशीर ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र वाढलेला मतदानाचा टक्का हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यामुळे वाढलेल्या मतदान टक्केवारी संदर्भात ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार राजेंद्र साठे यांची बीबीसी मराठीने प्रतिक्रिया जाणून घेतली असता, साठे म्हणाले "सकाळपासून मतदान ज्या पद्धतीने होत होतं ते पाहून वाटत होतं कमी मतदान होईल. मात्र मतदानाची शेवटची आकडेवारी पाहून आश्चर्य वाटलं. मागील काही वर्षात जे राजकारण झालं त्यामुळे मतदानावर फरक पडेल असं वाटत होतं."
"मात्र राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारांना मतदानासाठी जास्तीत जास्त उतरवलं असण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरचे मुद्दे आणि चुरशीच्या लढतींमुळे देखील मतदान वाढले असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ. रायगड जिल्ह्या विद्यमान आमदार भरत गोगावले आणि स्नेहल जगताप यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली आणि त्यामुळे जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी दोघांनी प्रयत्न केले. त्यातूनच राज्यभरात अशाप्रकारे अधिक मतदान झालं असं वाटतंय," असं साठे सांगतात.
"राजकीय पक्षांना 23 नोव्हेंबरपर्यंत आम्हाला फायदा होईल असं म्हणण्यासाठी वाव आहे. मात्र असा साधारण गेल्या काही वर्षांचा समज आहे की, ज्या वेळेला जास्त मतदान होतं, तेव्हा असं मानलं जातं की सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच होत. मात्र इतर राज्यात ज्याप्रमाणे एका भावनेने मतदान होतं तसं इथे देखील झाले आहे का हा कळीचा मुद्दा आहे," असे साठे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
मतदारांना पर्याय मिळाल्यामुळे टक्केवारी वाढल्याची शक्यता
जेष्ठ पत्रकार सचिन गडहिरे यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला असता गडहिरे म्हणाले, "मतदानाची टक्केवारी वाढली ही आनंदाची बाब आहे. याचा फायदा कोणाला होणार न होणार त्यापेक्षा लोकांनी आपली मतं पेटीत टाकली आहेत हे लोकशाहीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत मत मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पक्षांनी दिलेली आश्वासन, मागील पाच वर्षातील घडामोडी, तसेच भविष्याच्या दृष्टीने यंदा विचार करत मतदारांनी या वेळेला मतदान करण्याचा ठरवलेलं दिसते, त्यानुसार मागील निवडणुकींच्या तुलनेत यंदा थोड अधिक मतदान पार पडलय असं दिसतंय."
"सध्याच्या घडीला कोणी दावे करत असेल आम्हाला फायदा होईल तर त्यांना निकाल लागेपर्यंत मोबाईल, 23 निकाल तारखेला स्पष्ट सांगेलच. मात्र सध्या तरी मतदानावरून आणि यंदा मतदारांसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता आहे. मतदान अधिक झाले त्यामुळे मुख्य राजकीय पक्षांपेक्षा इतर राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना याचा फायदा ही होऊ शकतो. सध्या तरी झालेल्या मतदानानुसार त्रिशंकू परिस्थिती राज्यात उद्भवण्याची शक्यता वाटते, त्यामुळे कोणाला फायदा किंवा तोटा हे आत्ताच सांगता येत नाही," असे सचिन गडहिरे म्हणतात.


वाढलेल्या टक्केवारीचा युतीला फायदा - फडणवीस
वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो आपण बघितला आहे. आताही टक्केवारी वाढली आहे त्यामुळे महायुतीला याचा फायदा होईल," असं फडणवीस म्हणाले.
मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मतदारांचे आभार मानत ही फक्त निवडणूक नव्हती तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई होती. मतदानाचे कर्तव्य पार पाडून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदात्यांचे मनःपूर्वक आभार ! अशी समाज माध्यमावर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
तर सरकारविरोधात लाट असली तरच मतदान मोठ्या प्रमाणात वाढते - काँग्रेस
काँगेस प्रवक्ते सचिन सावंत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "आतापर्यंत इतिहास पाहता सरकारविरोधात लाट असली तरच मतदान मोठ्या प्रमाणात वाढते. यावेळी देखील लोक अशाच प्रकारे सत्ताधाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मतदानानिमित्ताने बाहेर पडले आणि सरकार घालवण्यासाठी मतदान केले. ज्याप्रकारे सत्तेत आले, राज्यात काही पक्षांसोबत ज्या घडामोडी घडल्या, त्यामुळे यांना घालवण्यासाठी मतदार मैदानात उतरले होते."
मतदान वाढीसाठी सर्वांनी केलेत प्रयत्न...
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार होते. तत्पूर्वी गेले महिना दोन महिने निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना या मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी प्रयत्न करत होते.
काल प्रत्यक्षात मतदान पार पडलं त्या वेळेला अनेक कलाकार, क्रीडापटू, राजकीय मंडळी आणि इतर मान्यवरांनी देखील सर्व मतदारांना मतदान करण्याविषयी आवाहन केलं होतं. तसेच निवडणूक आयोग गेल्या काही महिन्यांपासून मतदानाविषयी आणि मतदान वाढावं यासाठी विविध उपक्रम राबवत प्रयत्नशील होत.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा मतदान वाढलं किंवा कमी झालं तर...
राजकीय विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग स्टडीज (सीएसडीएस)-लोकनितीचे सहसंचालक प्रोफेसर संजय कुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मतदान जास्त होतंय म्हणजे राजकारणात लोकांचा रस वाढलाय. दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने मतदानाविषयी जनजागृती आणि अनेक उपक्रम राबवत मतदान अधिक होइल यासाठी भर असून व्यवस्थित मतदानाची सोय केली. मतदान वाढण्याच तिसर कारण म्हणजे मतदारांची संख्या वाढलीय आणि मतदार यादीत सुटसुटीतपणा आलाय."
पुढे संजय कुमार म्हणतात, "राजकीय पक्ष मतदान अधिक वाढल्याचा फायदा आम्हाला होईल याचा दावा करत असतील तर याचा संबंध नाही. अनेकदा मतदान वाढलं किंवा कमी झालं, तरी सत्ताधारी आणि विरोधक निवडणुका पराभूत होतात आणि विजयी होतात. राजकीय पक्षांचे नेते आपण विजयी व्हावे या दृष्टीने बोलत असतात. पण त्यांच्या अंदाजाचां मतदान वाढण्याशी काही संबंध नाही. आतापर्यंत अनेकदा काही राज्यात मतदान वाढलं किंवा कमी झालं त्याबाबतीत 100 टक्के पैकी 50 टक्के उदाहरणार्थ सरकार गेले आहे किंवा 50 टक्के विजयी झाले आहेत."
राज्यात एकूण मतदार आणि उमेदवार किती?
महाराष्ट्रात एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या 9.59 कोटी आहे.पुरुष मतदारांची संख्या 4.59 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी आहे.
तृतीयपंथीय मतदारांची संख्या 6 हजार आहे.वय वर्ष 85 च्या पुढे असलेल्या मतदारांची संख्या 12.48 लाख आहे. पहिल्यांदाच मतदान करणारे 19.48 लाख मतदार आहेत.
तर निवडणुकीच्या रिंगणात 158 राजकीय पक्षांचे 2050 उमेदवार आणि अपक्ष 2086 उमेदवार असे एकूण 4136 उमेदवार निवडणुकीत उभे होते.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटच्या काही तासात मतदान टक्केवारी वाढली
विधानसभेसाठी काल राज्यात पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं होतं. यानंतर शेवटच्या तासाभरात किती मतदान होतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. त्यात संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर आश्चर्यकारक मतदानाची आकडेवारी समोर आली.
राज्यात काल शेवटपर्यंत 65.11 टक्के मतदान झालं. राज्यात पाच वाजल्यानंतर शेवटच मतदान संपेपर्यंत 6.89 टक्क्यांनी वाढ झाली. शेवटच्या काही तासात पार पडलेले मतदान हे शेकी पद्धतीचा असू शकत असं राजकीय जानकार आणि पत्रकार सांगतात.
कुंपणावरच्या मतदारांचं गणित
कुंपणावरचे म्हणजे, असे मतदार जे अंतिम क्षणात मत कोणाला द्यायचं याबाबत निर्णय घेतात. अशा मतदारांचा मोठा प्रभाव निवडणुकांत दिसून येतो. त्यातही अटीतटीच्या निवडणुकांमध्ये या मतदारांचा वाटा निर्णायक ठरू शकतो.
याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले, "असे मतदार ज्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत मत कोणाला द्यायचं याबाबत चलबिचल असते त्याला ‘शेकी’ असं म्हणतात. त्यांची मतं ही शेवटच्या क्षणी काय घडतंय त्यानुसार पडतात.
गेल्या दोन दिवसात जे काही पैसेवाटपाचे मुद्दे बाहेर आले किंवा हल्ल्याच्या घटना समोर आल्या त्याचा निगेटीव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. या ऐनवेळेच्या काही घटना या ‘शेकीं’चं मतपरिवर्तन करण्यास प्रभावी ठरण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम निवडणुकांवर होतो. चुरशींच्या लढतींमध्ये एक टक्के मतानं पूर्ण चित्र बदलू शकतं याला ‘शेकी’ प्रभावी ठरू शकतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











