कॅन्सरवर लवकरच लस उपलब्ध होईल का? ती किती गुणकारी ठरेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
सध्या दर पाचपैकी एका व्यक्तीला कॅन्सरचा धोका आहे, आणि हा आकडा वाढत चालला आहे.
एका अंदाजानुसार 2025 या वर्षामध्ये जगभरात कुठल्या ना कुठल्या कॅन्सरनं पीडित व्यक्तींची संख्या दोन कोटीपर्यंत पोहोचू शकते.
पण दुसरीकडे, जसजसं औषधीविज्ञान प्रगत होतंय आणि लशीद्वारा आजारांना आळा घालण्यात यश येऊ लागलंय, तसतशी कॅन्सरवरील उपचाराची पद्धतही बदलते आहे.
एप्रिल 2024 मध्ये युकेमध्ये पहिल्यांदाच एक प्रयोग म्हणून मेलानोमा कॅन्सरनं त्रस्त रुग्णांना या आजारावरची लस देण्यात आली.
अमेरिकेत फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांनीही एक लस तयार केली आहे, जी सामान्य स्वरुपातल्या ब्रेन कॅन्सरला आळा घालू शकेल. अन्य सात देशांमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी तयार केलली एक लस प्रायोगिक तत्त्वावर दिली जाते आहे.
उपचाराच्या या नव्या लशींची सुरुवात कोव्हिडच्या काळात तयार केलेल्या काही लशींपासून झाली.
नवं mRNA तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या या लशी पारंपरिक लशींपेक्षा जास्त प्रभावी आहे.
आता अनेक प्रकारच्या कॅन्सरवरील लशींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मग कॅन्सरवरची लस लवकरच येऊ शकते का?


कॅन्सर काय आहे आणि तो कशानं होतो?
कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे नेमका काय आजार आहे आणि या आजाराचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही मरडिथ मॅककीन यांच्याशी बोललो.
त्या अमेरिकेतील टेनेसी इथे सारा कॅनन रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये मेलानोमा आणि स्किन कॅन्सरवरील संशोधनाच्या संचालक आहेत.
मरडीथ सांगतात, "आपलं शरीर अब्जावधी पेशींनी बनलं आहे. यातल्या काही पेशी अनियंत्रित पद्धतीनं तयार होऊ लागतात आणि वाढू लागतात, त्याला कॅन्सर होणं असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या पेशींचं रूप वेगवेगळं असतं."

मानवी शरीरात जवळपास दोनशे प्रकारच्या सेल्स म्हणजेच पेशी आहेत. शरीरातली वेगवेगळी इंद्रियं, अवयव पेशींनीच बनले आहेत.
या पेशी त्यांना मिळालेल्या सूचनांनुसार म्हणजे डीएनएनुसार काम करतात. जेव्हा नवी पेशी तयार होते, तेव्हा तिच्या केंद्रकात या डीएनएची कॉपी तयार होते.
पण कधी कधी ही डीएनएची कॉपी योग्य पद्धतीनं होत नाही. मग ती खराब झालेली पेशी चुकीच्या निर्देशांनुसार काम करू लागते.
अशा पेशींची संख्या नियंत्रणाबाहेर गेली की त्यातून शरीरात ट्यूमर म्हणजे गाठींची निर्मिती होते. पण असे कॅन्सरस ट्यूमर आणि इतर सामान्य स्वरुपातले ट्यूमर यांच्यात काय फरक असतो?
मरडीथ त्यातला फरक समजावून सांगतात, "आपल्या शरिरात अनेक प्रकारचे ट्यूमर तयार होऊ शकतात. साध्या ट्यूमरनं शरिराला फार नुकसान पोहोचत नाही.
"मात्र ज्या गाठींमधल्या पेशी डीएनएनुसार काम करत नाहीत, त्या कॅन्सरस म्हणून ओळखल्या जातात. मायक्रोस्कोपमधून पाहिलं तर या कॅन्सरस पेशींचं रूप मूळ रुपातल्या पेशींपेक्षा बरंच बदलल्याचं दिसून येतं."

फोटो स्रोत, Getty Images
पेशी नियमानुसार काम करणं बंद करतात, तेव्हा शरीरातल्या अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यांचं काम ठीकपणे होत नाही. पण असं कशामुळे होतं?
वय, धूम्रपान, खाण्यापिण्याच्या सवयी, पर्यावरणातले बदल, व्हायरस अनुवांशिक प्रभाव आणि जीन्स म्हणजे गुणसूत्रं अशा अनेक गोष्टींमुळे कॅन्सर होऊ शकतो.
कॅन्सरवर उपचार कसा केला जातो?
"कॅन्सरचं निदान लवकर झालं असेल, तर उपचारात फायद्याचं ठरतं. अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या बाबतीत लवकर निदान झालं तर शस्त्रक्रियाही करता येते. तसंच औषधं, केमो थेरपी, रेडिएशन आणि इम्यून थेरपीने कॅन्सरवर उपचार करता येतात." अशी माहिती मरडीथ मॅककीन देतात.
केमोथेरपी किंवा रेडिएशननं कॅन्सरस सेल्स नष्ट करण्याचा प्रयत्न करता येतो, पण त्याचे अनेक साईड इफेक्ट्स म्हणजे कुप्रभावही आहेत. कारण या उपचारपद्धतींमध्ये शरीरातल्या निरोगी पेशी आणि उतींचही नुकसान होतं.
पण मग आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा म्हणजे इम्यून सिस्टिम काय करते? ती कॅन्सरचा सामना करू शकते का?
मरडीथ मॅककीन सांगतात की कॅन्सरच्या पेशी त्यांच्याभोवती एक प्रोटीनचं आवरण तयार करतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार यंत्रणा या पेशी हुडकून नष्ट करू शकत नाही.
पण इम्यूनोथेरपीमध्ये ही रोगप्रतिकार यंत्रणा कॅन्सरस सेल्सना ओळखून नष्ट करण्यासाठी तयार होते. ही उपचारपद्धती अशा पेशीही नष्ट करते ज्या केमो थेरपी किंवा सर्जरीनं नष्ट होत नाहीत.
व्यक्तीनुसार उपचार
कॅन्सरवर सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशननं उपचारही प्रभावी ठरतात मात्र या उपायांमध्ये शरीरातल्या कॅन्सरस पेशींसोबतच निरोगी पेशींचंही नुकसान होतं. तसंच कॅन्सर पेशींचेही अनेक प्रकार असतात.
मग आपण नेमक्या कॅन्सर पेशी ओळखून नष्ट करू शकतो का? त्याविषयी आम्ही लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रीसर्चमधल्या प्राध्यापक आणि कॅन्सतज्ज्ञ सामरा टुरालिच यांना विचारलं.
त्या सांगतात, "कॅन्सरच्या रुग्णांना त्यांच्या आजार आणि शरीरानुसार औषध देणं गरजेचं असतं. यालाच प्रीसिजन मेडिसिन किंवा पर्सनलाईज्ड मेडिकेशन म्हणजे व्यक्तीनुसार उपचार म्हणून ओळखलं जातं.
"कॅन्सर शेकडो प्रकारचे असतात आणि प्रत्येक कॅन्सरचं रूप वेगवेगळं असतं. जर प्रत्येक प्रकारच्या कॅन्सर पेशीची ओळख पटली, तर उपचार करणं सोपं जाऊ शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर मानवी शरिरातील पेशी कशानं तयार झाल्या आहेत याची विस्तृत माहिती पंचवीस वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली होती. यालाच 'मॅप ऑफ ह्यूमन जिनोम' म्हणजे मानवी गुणसुत्रांचा नकाशा असं म्हणतात.
या नकाशाच्या मदतीनं कॅन्सरस पेशींचा शोध कसा घेता येऊ शकतो, याविषयी सामरा महिती देतात.
"जीनॉमिक टेक्नॉलॉजीच्या वापरानं आपल्याला हे समजलं आहे की कॅन्सर पेशींमध्ये होणारे जेनेटिक बदल हे फक्त कॅन्सर पेशींमध्येच होतात. सामान्य पेशींमध्ये ते बदल होत नाहीत. या बदलांमुळेच कॅन्सर सेल शरीरात जिवंत राहू शकतात.
कॅन्सरस पेशीचा जेनेटिक सिक्वेन्स म्हणजे तिच्यातल्या गुणसूत्रांची आखणी कशी आहे हे समजलं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या पेशी आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेपासून कशा बचावतात किंवा या यंत्रणेला कसं निकामी करतात हेही समजून घेता येईल.
या माहितीच्या आधारे असं औषध तयार करता येईल, जे शरिरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेला कॅन्सरस पेशी ओळखण्यासाठी तयार करू शकेल.
"कॅन्सरस पेशी आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेपासून कशा लपून राहतात हे लक्षात आलं, तेव्हा इम्यूनोथेरपीमध्येही बदल झाला. या माहितीच्या आधारावर इम्यून चेक पॉइंट ब्लॉकर औषधं तयार करण्यात आली. ही औषधं आपल्या रोगप्रतिकार यंत्रणेला कॅन्सर पेशी ओळखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी मदत करतात," असं सामरा सांगतात.
अशी इम्यून चेकपॉइंट ब्लॉकर प्रकारची औषधं वेगवेगळ्या कॅन्सरवर उपचारासाठी वापरता येतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण एखाद्या व्यक्तीला झालेल्या कॅन्सरच्या प्रकारानुसार विशिष्ट औषधं तयार केली, तर ती आणखी प्रभावी ठरू शकतात. यालाच पर्सनलाइझ्ड मेडिकेशन म्हणतात.
सामरा टूरालिच सांगतात की अशा औषधांचं संशोधन प्रगतीपथावर आहे.
कॅन्सरचं वेगवेगळ्या उपप्रकारांत वर्गीकरण केलं आहे आणि कोणत्या उपप्रकाराचा कॅन्सर आहे, त्यानुसार उपचारासाठी विशेष औषधं तयार करण्याचं काम सुरू आहे.
पण अशी वेगवेगळ्या प्रकारानुसार औषधं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
रोगप्रतिकारक यंत्रणेचं ट्रेनिंग
कॅन्सर आपल्या शरिरातली रोगप्रतिकारक यंत्रणा ठप्प करतो. पण लशीच्या मदतीनं आपण ही यंत्रणा दुरुस्त करून तिला कॅन्सरचा सामना करण्यासाठी सज्ज करू शकतो.
कॅन्सरला पूरक असलेल्या अनेक विषाणूंना आळा घालायचा असेल तर लशीचा वापर आधीपासूनच होतो आहे.
उदाहरणार्थ, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस अर्थात एचपीव्ही. हा विषाणू सर्वायकल कॅन्सर (गर्भाषय ग्रीव्हेचा कॅन्सर) सारख्या अनेक कॅन्सर्सशी निगडीत असल्याचं दिसून आलं आहे.
तसंच हेपेटायटिस बी हा विषाणू लिव्हर म्हणजे यकृताच्या कॅन्सरमागचं मोठं कारण मानला जातो.
या दोन्ही विषाणूंचा सामना करून कॅन्सर होऊ देणार नाहीत, अशा लशी उपलब्ध झाल्या आहेत, पण त्या कॅन्सरची लागण झाल्यावर उपयोगाच्या नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, आता अशी लस तयार केली जाते आहे, जी कॅन्सरच्या पेशी शरीरात तयार झाल्यावरही काम करू शकेल.
त्याविषयी अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातल्या एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरचे प्रा. एडुआर्डो विलार सँचेझ माहिती देतात.
"एक प्रकारे कॅन्सरच्या पेशी रोगप्रतिकार यंत्रणेला आंधळं बनवतात. त्यामुळे ही यंत्रणा कॅन्सर पेशींना हुडकून नष्ट करू शकत नाही. लशीद्वारा आपण रोगप्रतिकार यंत्रणेला कॅन्सरपेशी शोधण्यासाठी पुन्हा प्रशिक्षित करू शकतो आणि आणखी सक्षमही बनवू शकतो."
इम्यूनोथेरपीमध्येही रोगप्रतिकार यंत्रणा कॅन्सर पेशी हुडकून नष्ट करते. पण इम्यूनोथेरपी आणि लस यात फरक आहे. कारण लस ही कॅन्सर पसरण्याआधीच रोगप्रतिकार यंत्रणेला त्याचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित करू शकते.
इम्यूनोथेरपी आणि लस यांचा वापर एकत्रितपणेही करता येऊ शकतो.
सांचेझ संगतात की, "आजार सुरुवातीच्या टप्प्यात असतो, तेव्हा कॅन्सरच्या पेशींमध्ये रोगप्रतिकार यंत्रणेला फसवू शकतील असे रेणू सक्रीय झालेल नसतात. तोवर रोगप्रतिकार यंत्रणा नेहमीसारखी काम करत असते. त्यावेळी इम्यूनोथेरपीऐवजी रुग्णाला लस देता येईल कारण तेव्हा रोगप्रतिकार बंद झालेली नसते.
"आता अशीही लशी तयार केली जाते आहे, जी कॅन्सर होऊच देणार नाही. जेव्हा केव्हा ही लस येईल तेव्हा ती सर्वात प्रभावी ठरेल, हे मात्र खरं."
पण मग ही लस जेनेरिक असेल की ती विशेष प्रकाराच्या कॅन्सर आणि ट्यूमरसाठी तयार करत आहेत?
तर एक जेनेरिक व्हॅक्सिन तयार केली जाते आहे, जिचा वापर कॅन्सरशी लढण्यासाठी केला जाईल. दुसऱ्या काही लशी कॅन्सरच्या पेशींनी शरिरात केलेल्या बदलांना रोखण्यासाठी मदत करू शकतील.
आशेचे किरण
पॅट्रिक ओट हे डाना-फार्बर इंस्टिट्यूटच्या मेलानोमा डिसीज सेंटरचे संचालक आहेत. त्यांच्या मते लस ही कॅन्सरला दीर्घकाळ तोंड देऊ शकेल अशी इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकार क्षमता निर्माण करू शकते.
केमोथेरपी किंवा रेडिएशनसारख्या उपचारांच्या साईड इफेक्ट्सच्या तुलनेत लस हा चांगला पर्याय आहे, असं त्यांना वाटतं.
"लशीचं काम काय असतं, तर केवळ कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये जे अँड्रोजेन असतं, त्यावर हल्ला करण्यासाठी रोगप्रतिकार यंत्रणेला तयार करायचं. अगदी तसंच जसं एखाद्या विषाणूच्या बाबतीत लस करते. कॅन्सरवरील बाकीच्या उपचार पद्धतींमध्ये निरोगी उतींचंही नुकसान होतं."

फोटो स्रोत, EPA
पण मग एखाद्या ब्लड कॅन्सर झालेल्या व्यक्तीवर उपचार करताना लशीचा वापर कसा आणि कधी होऊ शकतो?
पॅट्रिक ओट सांगतात, "हे आत्ताच सांगता येणार नाही. पण संशोधकांच्या मते, सर्जरीद्वारा डॉक्टर कॅन्सरस पेशींना शरिरातून हटवतील, तेव्हा लशीचा सर्वाधिक फायदा होईल.
"कारण शस्त्रक्रिया करून एखादा अवयव काढला, तरी कॅन्सरच्या पेशी शरिरात दुसरीकडे लपून राहू शकतात. लस त्या उरलेल्या कॅन्सर पेशींना पुन्हा वाढण्यापासून आणि कॅन्सरची पुन्हा लागण होण्यापासून रोखू शकते."
कॅन्सरवर फक्त लस वापरूनच उपचार होईल, असं मात्र नाही. कारण लशीनं रोगप्रतिकार यंत्रणेला कॅन्सरचा सामना करण्यासाठी तयार करेपर्यंत वेळ लागतो.
त्यामुळे ज्या रुग्णांच्या शरिरात कॅन्सर पसरतो आहे, त्यांच्यावर हा उपचार करणं योग्य ठरणार नाही, असं पॅट्रिक सांगतात. कारण या रुग्णांना अशा उपचारांची गरज असते, जे कॅन्सरला लगेचच आणखी पसरण्यापासून थोपवू शकतील.
पॅट्रिक सांगतात की शरीरात लपलेल्या पण अजून सक्रीय नसलेल्या कॅन्सरपेशीही लशीद्वारा नष्ट करता येईल.
तसंच लशीमुळे रोगप्रतिकार यंत्रणेला कॅन्सर सेल्स ओळखून नष्ट करण्याचं प्रशिक्षण मिळतं, ते अनेक दशकं कायम राहतं. त्यामुळे पुन्हा कॅन्सर होण्याचा म्हणजे तो रिलॅप्स होण्याचा धोका टळू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
मग आता अशी लस आल्यावर पुढच्या पाच दहा वर्षांत कॅन्सरविरोधातल्या लढाईत किती मोठे बदल होऊ शकतात?
"सध्या काहीच सांगता येणार नाही, पण कॅन्सरच्या रुग्णांवर उपचारांची शक्यता वाढेल. सोबतच कॅन्सर पुन्हा परतण्याचा धोका कमी करता येईल, " असं पॅट्रिक म्हणतात.
ते सांगातात," मला तर वाटतं की, कॅन्सर होण्याआधीच लस देता आली, तर या आजाराचा सामना करण्यात मदत होईल. तात्विकदृष्ट्या असं करता येणं शक्य आहे. म्हणजे हे लगेचच होईल असं मला म्हणायचं नाहीये. पण शास्त्रज्ञ या दिशेनं संशोधन मात्र करत आहेत."
मग कॅन्सरवरची लस लवकरच येऊ शकते का? तर कॅन्सरशी निगडीत एचपीव्ही आणि हेपेटायटीस बी सारख्या विषाणूंचा बिमोड करणाऱ्या लशी आताही उपलब्ध आहेत.
पण कॅन्सरच्या गाठी म्हणजे ट्यूमर अनेक प्रकारचे असतात. सगळ्यांवर एकच लस लागू होईल असं नाही. अर्थात सगळे कॅन्सर रोखेल अशी बहुगुणी लस तयार करण्याचं कामही प्रगतीपथावर आहे.
गंमतीची गोष्ट म्हणजे या कामाला वेग मिळाला, तो कोव्हिडच्या साथीमुळे. कोव्हिडच्या काळातच पहिल्यांदा एमआरएनए लशीचा वापर करण्यात आला.
आता कॅन्सरला आळा घालू शकेल अशा mRNA लशीवरही काम सुरू आहे आणि लवकरच अशी लस उपलब्ध होण्याची शक्यताही आहे.
संकलन - जान्हवी मुळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












