भारतात सापडला आजपर्यंतचा सर्वात दुर्मिळ रक्तगट, काय आहेत त्याची वैशिष्ट्यं?

रेड ब्लड सेल्स (लाल रक्तपेशी) चा प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी बंगळुरूहून

रक्तगट म्हटला की, तुम्ही 'ए', 'बी', 'ओ' आणि 'आरएच'सारख्या रक्तगटांबद्दल ऐकलं असेल. मात्र, या रक्तगटांव्यतिरिक्त इतर काही दुर्मिळ रक्तगटदेखील असतात. मात्र, आता भारतात एक नवीन रक्तगट सापडला आहे. त्याचं नाव आहे सीआरआयबी.

सीआरआयबीमध्ये 'सी'चा अर्थ आहे क्रोमर (क्रोमर म्हणजे सीएच). तो एकूण 47 रक्तगटांपैकी एक असतो, तर 'आय'चा अर्थ आहे इंडिया आणि 'बी' चा अर्थ आहे बंगळुरू.

सोप्या भाषेत सांगायचं तर हा नवीन रक्तगट बंगळुरूजवळ एक महिलेमध्ये आढळून आला आहे.

सामान्यपणे शस्त्रक्रिया करताना रुग्णाला रक्त चढवण्याची (ट्रान्सफ्युजन) आवश्यकता पडल्यास तयारी म्हणून डॉक्टर आधीपासूनच एक किंवा दोन बाटल्या रक्त तयार ठेवतात.

मात्र, हा रक्तगट इतका दुर्मिळ आहे की, या 38 वर्षीय महिलेच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी रक्ताच्या बाटल्या तयार ठेवण्याची पद्धत अंमलात आणली नाही.

कारण डॉक्टरांना या महिलेचा रक्तगटच ओळखता येत नव्हता.

या घटनेला 11 महिने झाल्यानंतर डॉक्टर अंकित माथुर शस्त्रक्रियेचा तो दिवस आठवताना समाधान व्यक्त करतात. ही शस्त्रक्रिया कोणतंही अतिरिक्त रक्त चढवल्याशिवाय यशस्वीरित्या पार पडली होती.

डॉक्टर अंकित माथुर, बंगळुरूच्या रोटरी-टीटीके ब्लड सेंटरचे अतिरिक्त वैद्यकीय संचालक आहेत. कोलारच्या आरएल जलप्पा हॉस्पिटलच्या डॉक्टरांसाठी, डॉक्टर अंकित माथुर संपर्काचं महत्त्वाचं साधन होते. याच हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला ह्रदयविकाराच्या समस्येसाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

असा सापडला वेगळा रक्तगट

डॉक्टर अंकित माथुर यांनी बीबीसीला सांगितलं, "या महिलेचा रक्तगट इतर कोणत्याही रक्तगटाशी मेळ खात नव्हता. आम्ही इतर रक्तगटांबरोबर त्याची चाचणी केली, मात्र प्रत्येक वेळेस हा रक्तगट रिॲक्ट होत होता."

ते म्हणाले, "त्यानंतर आम्ही त्या महिलेच्या कुटुंबात या रक्तगटाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आम्ही कुटुंबातील 20 सदस्यांच्या रक्ताचे नमुने घेतले. सर्व सदस्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मात्र तरीदेखील कोणाचाही रक्तगट त्या महिलेच्या रक्तगटाशी मेळ खात नव्हता."

त्यानंतरचा पुढचा पर्याय होता की रक्ताचा नमुना युकेच्या ब्रिस्टलमध्ये असलेल्या इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरन्स लॅबॉरेटरी (आयबीआरजीएल) मध्ये पाठवण्यात यावा.

याच प्रयोगशाळेत जगभरातील रक्ताचे नमुने पाठवले जातात. रक्ताच्या नमुन्याचा रक्तगट इतर रक्तगटांशी मेळ खातो की नाही हे तपासण्यासाठी ते पाठवले जातात.

खातरजमा करण्यासाठी रक्ताचे नमुने ब्रिटनला पाठवण्यात आले

फोटो स्रोत, NICOLAS MAETERLINCK/BELGA MAG/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, खातरजमा करण्यासाठी रक्ताचे नमुने ब्रिटनला पाठवण्यात आले

दक्षिण भारताच्या विविध भागातून रक्ताचे नमुने बंगळुरूच्या रोटरी-टीटीके ब्लड सेंटरमध्ये पाठवले जातात, तसंच उत्तर भारतात चंदीगडमधील पीजीआयमध्ये पाठवले जातात. त्याचप्रमाणे जगभरातील रक्ताचे नमुने युकेतील या प्रयोगशाळेत पाठवले जातात.

डॉक्टर अंकित माथुर पुढे म्हणाले, "या रक्ताचं संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी त्यांना 10 महिने लागले. फेब्रुवारी-मार्च महिन्यात त्यांनी आम्हाला कळवलं की रुग्णाच्या रक्तात युनिक अँटिजन आहे."

"त्यानंतर ही माहिती इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजनला (आयएसबीटी) पाठवण्यात आली. तिथे रेड ब्लड सेल इम्युनोजेनेटिक्स अँड टर्मिनॉलॉजी गटाचे तज्ज्ञ असतात. त्यांनी या रक्तगटाला सीआरआयबी नाव देण्यास मंजुरी दिली."

यावर्षी जून महिन्यात इटलीच्या मिलान शहरात आयएसबीटीच्या 35 व्या परिषेदत या नव्या रक्तगटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दुर्मिळ जनुक आणि रक्तगट

कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट त्याच्या आई-वडिलांच्या जनुकावर अवलंबून असतो. मग या महिलेच्या बाबतीत तिच्या जनुकिय रचनेत एखादी समस्या होती का?

याबद्दल डॉक्टर माथुर सांगतात, "आम्हाला वाटलं होतं की कुटुंबातील एखाद्या सदस्यामध्ये तरी हा अँटिजन असेल. मात्र कुटुंबात कोणाच्या रक्तात तो नसल्याचं आम्हाला आढळून आलं."

अँटिजन हे एकप्रकारचं प्रथिन (प्रोटीन) असतं आणि ते शरीरात सर्वत्र आढळतं.

रक्तगट कसे तयार होतात, रक्तगटांबद्दल सर्वकाही जाणून घ्या - फिट जिंदगी

फोटो स्रोत, Nasir Kachroo/NurPhoto via Getty Images

फोटो कॅप्शन, रक्तगट कसे तयार होतात, रक्तगटांबद्दल सर्वकाही जाणून घ्या - फिट जिंदगी

डॉक्टर माथुर म्हणतात, "एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जेव्हा काहीही तयार होतं, तेव्हा त्याची संपूर्ण माहिती किंवा कोडिंग, त्या व्यक्तीच्या आई-वडिलांकडून येते."

"अर्धी माहिती वडिलांच्या जनुकातून येते आणि जर त्यात काही उणीव किंवा कमतरता असेल तर आईकडून ती पूर्ण केली जाते. त्याचप्रकारे जर आईकडून आलेल्या जनुकात काही कमतरता असेल तर ती वडिलांकडून पूर्ण केली जाते."

"मात्र या प्रकरणात, फक्त अर्धी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळेच त्या महिलेचा रक्तगट पूर्णपणे वेगळा आहे. या प्रकरणात तो अँटिजन आहे क्रोमर."

डॉक्टर अंकित माथुर पुढे म्हणाले, "आतापर्यंत क्रोमर ब्लड ग्रुप सिस्टममध्ये 20 अँटिजनची ओळख पटवण्यात आली आहे. सीआरआयबी हा आता या सिस्टममधील 21 वा अँटिजन झाला आहे."

आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत काय होतं?

कोलारच्या या महिलेप्रमाणे असलेल्या रुग्णांच्या बाबतीत आपत्कालीन स्थितीत काहीही सुरक्षित नसतं.

जर एखाद्या व्यक्तीमध्ये हे प्रोटीन नसेल आणि त्या रुग्णाला सामान्य पद्धतीप्रमाणे रक्त देण्यात आलं, तर त्याचं शरीर त्याला बाह्य घटक मानतं. त्यानंतर शरीरात या बाह्यघटकाला नष्ट करण्यासाठी अँटिबॉडी बनतात. म्हणजेच ते रक्त शरीरात स्वीकारलं जातं.

बॉम्बे ब्लड ग्रुप एक दुर्मिळ रक्तगट आहे, जगातील दहा लाख लोकांपैकी एकामध्ये तो आढळतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बॉम्बे ब्लड ग्रुप एक दुर्मिळ रक्तगट आहे, जगातील दहा लाख लोकांपैकी एकामध्ये तो आढळतो

डॉक्टर अंकित माथुर म्हणतात की "जोपर्यंत कुटुंबातील एखाद्या सदस्यात सीआरआयबी प्रकारातील रक्तगट सापडत नाही", तोपर्यंत या प्रकारच्या रुग्णांमध्ये कोणताही पर्याय नसतो.

ते म्हणतात की अशा प्रकरणांमध्ये "दुसरा पर्याय असतो तो म्हणजे शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांनी त्या रुग्णाचंच रक्त गोळा करून ठेवावं. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत तेच रक्त त्या रुग्णाला देता यावं. याला ऑटोलोगस ब्लड ट्रान्सफ्युजन म्हटलं जातं."

ऑटोलोगस ब्लड ट्रान्सफ्युजन ही काही अगदीच वेगळी प्रक्रिया नाही. दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत ही प्रक्रिया अनेकदा वापरण्यात येते.

दुसऱ्या रक्तगटाचं रक्त घेणं किंवा देणं शक्य आहे का?

सीआरआयबी रक्तगटाचं प्रकरण इतर 47 रक्तगटांच्या सिस्टमपेक्षा वेगळं नाही. या सिस्टममध्ये 300 अँटिजन आहेत. मात्र फक्त एबीओ आणि आरएचडी रक्तगटाच्या बाबतीत ट्रान्सफ्युजनसाठी किंवा रक्त चढवण्यासाठी मॅचिंग केलं जातं.

डॉक्टर स्वाति कुलकर्णी, मुंबईच्या आयसीएमआर-एनआयआयएच (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी) च्या माजी उप-संचालक आहेत. त्या 1952 मध्ये डॉक्टर वाय एम भेंडे आणि डॉक्टर एच एम भाटिया यांनी शोधलेल्या दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे एचएच चं उदाहरण देतात.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "ज्या लोकांमध्ये बॉम्बे फेनोटाईप (अनुवांशिक गुण) असतो, त्यांच्यात 'ओ' ग्रुपप्रमाणे 'ए' आणि 'बी' अँटिजन नसतात. मात्र असे लोक 'ओ' रक्तगटाच्या लोकांकडून रक्त घेऊ शकत नाहीत."

सीआरआयबी रक्तगटाचं प्रकरण इतर 47 रक्तगटांच्या सिस्टमपेक्षा वेगळं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीआरआयबी रक्तगटाचं प्रकरण इतर 47 रक्तगटांच्या सिस्टमपेक्षा वेगळं नाही.

बॉम्बे ब्लड ग्रुप एक दुर्मिळ रक्तगट आहे. जगात दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये हा रक्तगट आढळतो. अर्थात मुंबईत दर दहा हजार लोकांमध्ये एकामध्ये तो आढळत असल्याचं सांगितलं जातं.

1952 मध्ये डॉक्टर वाय एम भेंडे आणि डॉक्टर एच एम भाटिया यांनी या रक्तगटाचा शोध लावला होता. भारतात तुलनात्मकरित्या तो अधिक लोकांमध्ये आढळतो.

डॉक्टर अंकित माथुर म्हणतात, "कोलारच्या महिला रुग्णाच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. ती दुसऱ्या कोणाकडून रक्त घेऊ शकत नाही, मात्र इतरांना रक्त देऊ शकते. बॉम्बे ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांच्या बाबतीत देखील असंच असतं."

डॉक्टर स्वाति कुलकर्णी म्हणतात, "बॉम्बे ब्लड ग्रुप आणि क्रोमर ब्लुड ग्रुप सिस्टममध्ये सीआरआयबी अँटिजनव्यतिरिक्त भारतात इंडियन ब्लड ग्रुप सिस्टमचा देखील शोध लागला आहे. 1973 मध्ये आयसीएमआर - एनआयआयएचनं याचा शोध लावला होता."

दुर्मिळ रक्त दान करणाऱ्यांचं रजिस्टर

डॉक्टर स्वाती कुलकर्णी म्हणतात की एनआयआयएच राष्ट्रीय स्तरावर दुर्मिळ रक्त दान करणाऱ्यांची एक यादी (रजिस्टर) बनवण्याचा प्रयत्न करतं आहे.

हा एक डेटाबेस असेल. त्यात दुर्मिळ रक्तगटाच्या डोनर्सची माहिती असेल. जेणेकरून रुग्णांना लवकर रक्त उपलब्ध करून देता येईल.

त्या म्हणतात की, ज्या रुग्णांच्या शरीरात अनेक प्रकारच्या अँटिबॉडी तयार झाल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या रक्तगटाशी मेळ खाणारा रक्तगट हवा आहे, अशा रुग्णांसाठी हे रजिस्टर अतिशय फायदेशीर ठरेल.

डॉक्टर स्वाती कुलकर्णी म्हणतात की एनआयआयएच राष्ट्रीय स्तरावर दुर्मिळ रक्त दान करणाऱ्यांची एक यादी (रजिस्टर) बनवण्याचा प्रयत्न करतं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉक्टर स्वाती कुलकर्णी म्हणतात की एनआयआयएच राष्ट्रीय स्तरावर दुर्मिळ रक्त दान करणाऱ्यांची एक यादी (रजिस्टर) बनवण्याचा प्रयत्न करतं आहे.

रेड सेल एलो इम्युनायझेशन आणि नेगेटिव्ह ब्लड अँटिजनची आवश्यकता पडण्याच्या स्थितीत (जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा बाह्य घटकाशी लढण्यासाठी अँटिबॉडी बनवू लागते) याप्रकारचं रजिस्टर आणखी महत्त्वाचं ठरतं.

थॅलेसीमियाच्या रुग्णांमध्ये लो इम्युनायझेशनचं प्रमाण 8 ते 10 टक्क्यांपर्यंत आढळलं आहे. याप्रकारच्या प्रकरणांमध्ये रुग्णाला वारंवार रक्त द्यावं लागतं.

डॉक्टर स्वाति कुलकर्णी म्हणतात, "सामान्य लोकांमध्ये ट्रान्सफ्युजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांमध्ये अँटिबॉडी बनण्याची शक्यता जवळपास एक ते दोन टक्के असते. वेगवेगळ्या जाती समूहांमध्ये एलो इम्युनायझेशनच्या घटना आणि ब्लड ग्रुप अँटिजन तयार होण्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)