'स्त्रीबीज आणि शुक्राणू आमचे घेतले, पण बाळ दुसऱ्यांचंच दिलं'; सरोगसीआडून बाळं विक्रीचा घोटाळा

गर्भवती महिला- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, अमरेंद्र येरलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"माझं स्त्रीबीज (बीजांड) आणि माझ्या नवऱ्याचे शुक्राणू (स्पर्म) वापरून आम्हाला सरोगसीद्वारे मूल जन्माला घालता येईल असं त्यांनी सांगितलं. पण आम्हाला दिलं ते बाळ आमचं नव्हतंच. फसवणूक झाल्याचं आमच्या नंतर लक्षात आलं."

हैदराबादमधल्या 'युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर' या संस्थेविरोधात दिलेल्या तक्रारीत एका राजस्थानी महिलेनं ही माहिती दिली.

हैदराबादमधल्या गोपालपुरम भागातल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे सरोगसी केंद्र नियमांचं उल्लंघन करून चालवलं जात असल्याचं समोर आलंय.

सरोगसीच्या नावाखाली इथं लहान मुलांची विक्री सुरू असल्याचं, पोलिसांनी सांगितलं आहे.

या आरोपाखाली या केंद्राच्या व्यवस्थापक डॉक्टर नम्रता यांच्यासह एकूण 8 लोकांना अटक केली असल्याचं हैदराबादमधल्या उत्तर विभागीय पोलीस आयुक्त रश्मी पेरुमल माध्यमांशी बोलताना सांगत होत्या.

युनिव्हर्सल सरोगसी केंद्राच्या प्रशासकीय विभागात काम करणाऱ्यांशी बीबीसीने बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते पोलीस कोठडीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सिकंदराबाद भागात वास्तव्यास असणारं आणि मूळचं राजस्थानमधलं एक जोडपं युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च केंद्रात उपचारांसाठी गेलं होतं.

मूल होण्यासाठी त्यांना आयव्हीएफद्वारे उपचार घ्यायचे होते. पोलिसांनी या जोडप्याचं नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.

"तिथे 66,000 हजार रुपये भरल्यानंतर आमच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या. त्यातही सगळं व्यवस्थित असल्याचंच निदान झालं होतं. मात्र, डॉ. नम्रता यांनी आमच्यावर सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्यासाठी दबाव टाकला.

माझं स्त्रीबीज आणि पतीचे शुक्राणू वापरुन भ्रूण तयार करतील आणि सरोगसीद्वारे मूल होईल असं त्यांनी सांगितलं."

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत जोडप्याने ही माहिती दिली.

विशाखापट्टणम, गुंटूर आणि गोपालपुरम या भागात या केंद्राविरोधात 10 पेक्षा जास्त तक्रारी आधीच दाखल झालेल्या आहेत असं पोलिस उपायुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, HYDPolice

फोटो कॅप्शन, विशाखापट्टणम, गुंटूर आणि गोपालपुरम या भागात या केंद्राविरोधात 10 पेक्षा जास्त तक्रारी आधीच दाखल झालेल्या आहेत असं पोलिस उपायुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितलं.

या सगळ्याला 30 लाख रुपये खर्च येईल, असं फर्टिलिटी केंद्राच्या व्यवस्थापकांनी सांगितलं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या जोडप्याला केंद्राच्या विशाखापट्टणममधल्या शाखेत नेलं गेलं.

तिथेच त्यांच्या शरीरातून स्त्रीबीजं आणि शुक्राणूचे नमुने जमा केले गेले.

सिकंदराबाद, विशाखापट्टणम आणि विजयवाडा या ठिकाणी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च केंद्राच्या शाखा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर

फोटो स्रोत, HYDPolice

फोटो कॅप्शन, युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर

पुढे, सरोगसीसाठी महिला उपलब्ध झाली असल्याचं 23 सप्टेंबरला केंद्राच्या व्यवस्थापकांनी या जोडप्याला कळवलं. एक अधिकृत करार करुन ही महिला जोडप्याचं मूल स्वतःच्या गर्भात वाढवणार होती.

"फर्टिलिटी केंद्राच्या व्यवस्थापकांनी टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. यावर्षी मे महिन्यापर्यंत आम्ही जवळपास 30.26 लाख रुपये भरले," असं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

गर्भाचे सोनोग्राफी स्कॅन्सही जोडप्याला वेळोवेळी दाखवले जात होते, असंही तक्रारीत पुढे म्हटलंय.

मूल त्यांचं नाही हे कसं कळालं?

हा घोटाळा समोर कसा आला? याबाबत पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्टिलिटी केंद्र आणि राजस्थानी जोडप्यात झालेल्या करारात बाळाची डीएनए चाचणी करण्याबाबत कलम घातलं होतं.

बाळ जन्माला येण्याआधीच ही डीएनए चाचणी करण्याची विनंती जोडप्याने केली. मात्र, डॉ. नम्रता यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, तेव्हाच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

पुढे सरोगेट झालेली आई आणखी पैसे मागत आहे, असं केंद्राच्या व्यवस्थापकांनी जोडप्याला कळवलं. त्यानंतर जोडप्याने आणखी 2 लाख रुपये भरण्याचं मान्य केलं.

युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर

फोटो स्रोत, HYDPolice

फोटो कॅप्शन, युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर

त्यानंतर नवजात बाळ जोडप्याकडं सोपवलं गेलं. डीएनए चाचणी न करता बाळाचं बाळंतपण झालं असल्यानं राजस्थानी जोडप्याच्या मनातील शंका आणखी दाट झाली.

बाळ त्यांच्याकडे आल्यानंतर डीएनए तपासणीसाठी त्याचे नमुनेही घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही केंद्राकडून चाचणी करणं टाळण्यात येत असल्याचं जोडप्याच्या लक्षात आलं.

नंतर या जोडप्याने दिल्लीला जाऊन आई, वडील आणि बाळ तिघांचीही डीएनए चाचणी करुन घेतली आणि सत्य समोर आलं. हे राजस्थानी जोडपं बाळाचे जैविक पालक नव्हते.

सरोगसीच्या नियमांचं उल्लंघन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"24 जूनला आम्ही या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी सिकंदराबादमधल्या सरोगसी केंद्रात गेलो. तेव्हा डॉ. नम्रता आम्हाला न भेटताच निघून गेल्या," असं या जोडप्याने तक्रारीत म्हटलं आहे.

त्यांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच जोडप्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीचा तपास करत असताना पोलीस उपायुक्त रश्मी पेरुमल यांना युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी केंद्राकडून सरोगसीच्या नियमांचं पालन होत नसल्याचं लक्षात आलं.

"मोहम्मद अली आदिक आणि नसरीन बेगम या आसामवरून हैदराबादमध्ये राहायला आलेल्या एका जोडप्याशी या फर्टिलिटी केंद्राने करार केला होता. त्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर पैसे देऊन ते विकत घेण्यात येईल, असं ठरवण्यात आलं होतं.

त्यांचंच बाळ या राजस्थानी जोडप्याला दिलं गेलं. ते त्यांचं स्त्रीबीज आणि शुक्राणू वापरून जन्माला आलं आहे असं सांगण्यात आलं," असं पोलीस उपायुक्तांनी माहिती देताना म्हटलं.

या बाळाच्या आईला हैदराबादवरून विशाखापट्टणमला विमानाद्वारे नेण्यात आलं होतं. तिथे बाळाला जन्म दिल्यानंतर साधारणपणे 80 ते 90 हजार रुपये तिच्या हातावर टेकवण्यात आले, असं तपासातून समोर आल्याचं रश्मी पेरूमल यांनी सांगितलं.

"सरोगसीच्या नावाखाली मूल विकल्याच्या आरोपाचा आधार घेऊन आसाममधील जोडप्याला आणि त्यांना मदत करणाऱ्या एजंटलाही अटक करण्यात आली आहे," अशी माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली.

सध्या बाळाला सरकारी बालगृहात ठेवण्यात आलं आहे.

पोलिसांनी कोणाकोणाला अटक केली?

1. अत्तालुरी नम्रता उर्फ पचिपाल नम्रता- युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च केंद्राच्या व्यवस्थापक.

2. पचिपाल जयंत कृष्णा- नम्रता यांचा मुलगा. आपण वकील असल्याचा दावा तो करतो आणि केंद्रातील सर्व आर्थिक व्यवहार सांभाळतो. पोलीस उपायुक्त सांगतात की, कोणी काही प्रश्न विचारले तर तो कायदेशीर कारवाईची धमकी देत असे.

3. कल्याणी- विशाखापट्मणमधील युनिव्हर्सल क्रिएशन सेंटरच्या व्यवस्थापक.

4. गोल्लमंडल चेन्ना राव- लॅब टेक्निशिअन.

संस्थेच्या व्यवस्थापका डॉ. नम्रता यांच्यासह पोलिसांनी 8 लोकांना अटक केली आहे.

फोटो स्रोत, HYDPolice

फोटो कॅप्शन, संस्थेच्या व्यवस्थापक डॉ. नम्रता यांच्यासह पोलिसांनी 8 लोकांना अटक केली आहे.

5. नार्गुला सदानंदम- युनिव्हर्सल सृष्टी केंद्रात भूलतज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉक्टर. ते सिकंदराबादमधल्या सरकारी रुग्णालयातही डॉक्टर म्हणून काम करतात.

6. धनश्री संतोषी- पोलिसांच्या म्हणण्यानुसार आसामी जोडप्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात यांचा एजंट म्हणून हात होता.

7. मोहम्मद अली आदिक आणि नसरीन बेगम- आसाममधील जोडपं. बाळाला जन्म देऊन त्यांनी ते केंद्राला विकलं, असं पोलीस सांगतात.

चार वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू होतं केंद्र

डॉ. नम्रता यांनी वैद्यकीय सेवा 1995 ला सुरू केली. 1998 पासून त्या आयव्हीएफ आणि वंध्यत्वावर उपचार करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणानंतर आरोग्य आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च केंद्राच्या सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम केंद्रावर छापा मारला.

आयव्हीएफ उपचारपद्धतींसह संपूर्ण केंद्र बेकायदेशीर पद्धतीने चालत असल्याचं समजताच, ते ताब्यात घेऊन त्यावर टाळं लावलं गेलं.

हैदराबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जे. वेंकटी सांगतात की, फर्टिलिटी केंद्राविरोधात तक्रारी आल्यानंतर 2021 मध्येच सिकंदराबादमधील केंद्र बंद करण्यात आलं होतं.

"डॉक्टर नम्रता यांचा परवानाही 2021मध्ये संपला होता. त्यानंतर त्यांना नवीन परवाना देण्यात आला नाही. पण त्या दुसऱ्या डॉक्टरच्या नावाखाली केंद्र चालवत होत्या असं आता केलेल्या तपासात समोर आलं आहे," असं वेंकटी म्हणाले.

हैदराबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जे वेंकटी सांगतात की, फर्टिलिटी केंद्राविरोधात तक्रारी आल्यानंतर 2021 मध्येच सिकंदराबादमधील केंद्र बंद करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, HYDPolice

फोटो कॅप्शन, हैदराबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जे. वेंकटी सांगतात की फर्टिलिटी केंद्राविरोधात तक्रारी आल्यानंतर 2021 मध्येच सिकंदराबादमधील केंद्र बंद करण्यात आलं होतं.

त्यांनी एका बिल्डिंगमध्ये एक फ्लॅटही भाड्याने घेतला होता. पीडित लोक संपर्क करू लागले की ते इथे येऊन रहात, असंही वेंकटींनी पुढे सांगितलं.

नियमांचं उल्लंघन करून गेली चार वर्ष केंद्राचा कारभार चालला होता. तरीही आरोग्य विभागाला ते लक्षात आलं नाही याबद्दल टीका केली जात आहे.

"आम्ही तपासणीसाठी गेलो असताना केंद्र बंद होतं. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात आलं नाही. त्याशिवाय या प्रकरणात कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही," वेंकटी म्हणाले.

सध्या हैदराबाद शहरात 158 आयव्हीएफ, आययुआय आणि सरोगसी केंद्र सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या सर्व केंद्रांची तपासणी केली जाईल, असं जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणालेत.

याआधी दाखल झाल्या आहेत 10 तक्रारी

विशाखापट्टणम, गुंटूर आणि गोपालपुरम या भागात या केंद्राविरोधात 10 पेक्षा जास्त तक्रारी आधीच दाखल झालेल्या आहेत असं पोलीस उपायुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितलं.

या संपूर्ण गुन्ह्यात 50 हून अधिक लोक सामील असल्याची कुणकुण पोलिसांना आहे. पोलीस छाप्यात गेल्या दोन-तीन वर्षातले दस्ताऐवज जप्त करण्यात आलेत.

"डझनभर लोकांवर उपचार आणि सरोगसी या केंद्राच्या माध्यमातून झाल्या असल्याचं समोर आलं आहे. तपास सुरू आहे. सरोगसीच्या नावाखाली नेमकी किती मुलांची विक्री झाली हे लवकरच समोर येईल," पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.

पोलिसांना आणि आरोग्य विभागाला युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी अँड रिसर्च केंद्रावर मारलेल्या छाप्यात गर्भलिंगनिदान चाचणी करणारी उपकरणंही सापडली आहेत.

"अनेक लोक सरोगसीद्वारे मूल जन्माला घालतात आणि नंतर डीएनए चाचणी करत नाहीत," पोलीस उपायुक्त सांगत होत्या.

सरोगसीचे नियम काय?

भारतात सरोगसीचे नियम अतिशय कडक आहेत. 2021 साली केंद्र सरकारने सरोगसी कायदा मंजूर केला. जानेवारी 2022 पासून तो लागू झाला आहे.

या नियमांप्रमाणे व्यावसायिक स्वरुपात सरोगसी करणं बेकायदेशीर आहे. सरोगसीसाठी पैशाची देवाणघेवाण होऊ शकत नाही. निस्वार्थ भावनेनं कोणाला सरोगसी करायची असेल तर फक्त त्यालाच कायद्याने परवानगी दिली आहे.

"सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर त्याची पोलीस स्टेशनमध्ये त्वरित तक्रार करायला हवी," असं आवाहन रश्मी पेरुमल यांनी केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)