1992 मध्ये जन्माला येणारं बाळ 30 वर्षांनंतर कसं जन्माला आलं?

1992 मध्ये जन्माला येणारं बाळ 30 वर्षांनी कसं जन्माला आलं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, डॅनाई नेस्टा क्युपेम्बा
    • Role, बीबीसी न्यूज

विज्ञानपटांमध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे जन्म, उपचार किंवा विविध क्रिया पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण थक्क होत असतं. मात्र आता काहीसं तसंच प्रत्यक्षात घडलं आहे.

अमेरिकेतील ओहायोमधील एका जोडप्याला एक बाळ झालं आहे. मात्र हे काही साधं बाळ नाही. या बाळानं एक नवा विश्वविक्रम केला आहे. कारण या बाळाचा जन्म 30 वर्षांहून अधिक काळ गोठवलेल्या भ्रूणातून झाला आहे.

लिंडसे (35 वर्षे) आणि टिम पियर्स (34 वर्षे) या जोडप्याला शनिवारी (26 जुलै) मुलगा झाला. लिंडसे पियर्स यांनी एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूला सांगितलं की त्यांच्या कुटुंबाला वाटलं की एखाद्या विज्ञानपटातील (सायन्स फिक्शन मूव्ही) गोष्टीसारखं आहे.

एखाद्या बाळाला यशस्वीरित्या जन्म देण्यापूर्वी एखादा भ्रूण गोठवलं जाण्याचा हा सर्वाधिक कालावधी आहे. याआधीचा विक्रम जुळ्या मुलांच्या बाबतीतील होता. ते भ्रूण 1992 मध्ये गोठवण्यात आलं होतं आणि त्या जुळ्या बाळांचा जन्म 2022 मध्ये झाला होता.

भ्रूण दत्तक घेऊन गर्भधारणा

पियर्स कुटुंबानं मूल व्हावं यासाठी सात वर्षे प्रयत्न केले होते. मग त्यांनी एक भ्रूण दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. हे भ्रूण 1994 मध्ये लिंडा आर्चर्ड (62 वर्षे) यांनी त्यांच्या तत्कालीन पतीसोबत आयव्हीएफद्वारे तयार केलं होतं.

त्यावेळेस लिंडा आर्चर्ड यांनी चार भ्रूण तयार केले होते. त्यातील एका भ्रणातून त्यांच्या एका मुलीचा जन्म झाला होता. ती आता 30 वर्षांची आहे. तर उर्वरित तीन भ्रूण जतन करण्यात आले होते.

पियर्स कुटुंबानं मूल व्हावं यासाठी सात वर्षे प्रयत्न केले होते. मग त्यांनी एक भ्रूण दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पियर्स कुटुंबानं मूल व्हावं यासाठी सात वर्षे प्रयत्न केले होते. मग त्यांनी एक भ्रूण दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

लिंडा आर्चर्ड त्यांच्या पतीपासून विभक्त होऊन देखील त्यांना ते भ्रूण नष्ट करायचे नव्हते. तसंच त्यांना ते संशोधनासाठी द्यायचे नव्हते किंवा अनामिक राहून एखाद्या दुसऱ्या कुटुंबाला द्यायचे नव्हते.

त्या म्हणाल्या की त्या बाळाच्या जन्माशी त्यांचा संबंध आहे हे महत्त्वाचं आहे. कारण हे बाळ त्यांच्या आता प्रौढ झालेल्या मुलीशी संबंधित असणार आहे.

लिंडा आर्चर्ड यांनी हा भ्रूण जतन करण्यासाठी दरवर्षी हजारो डॉलर्स मोजले होते. मग त्यांना 'नाईटलाईट ख्रिश्चन ॲडॉप्शन्स' नावाची एक ख्रिश्चन भ्रूण दत्तक घेणारी संस्था सापडली.

ही संस्था 'स्नोफ्लेक्स' नावानं ओळखला जाणारा एक कार्यक्रम चालवते. यासारख्या अनेक संस्थांना त्यांचा हा कार्यक्रम जीव वाचवणारा वाटतो.

'भ्रूण अमेरिकेबाहेर जावं असं वाटत नव्हतं'

लिंडा आर्चर्ड यांनी ज्या कार्यक्रमाद्वारे हे भ्रूण जतन केले होते, त्यात भ्रूणदान करणाऱ्याला जोडपं निवडण्याची परवानगी असते. म्हणजेच ते धर्म, वंश आणि राष्ट्रीयत्वाबाबतची त्यांची पसंत सांगू शकतात.

लिंडा आर्चर्ड यांनी अमेरिकेत राहणाऱ्या विवाहित कॉकेशियन, ख्रिश्चन जोडप्याला पसंती दिली होती. कारण त्यांना "त्यांचं भ्रूण देशाबाहेर जावं असं वाटतं नव्हतं" असं त्यांनी एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूला सांगितलं.

एखाद्या बाळाला यशस्वीरित्या जन्म देण्यापूर्वी एखादा भ्रूण गोठवला जाण्याचा हा सर्वाधिक कालावधी आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एखाद्या बाळाला यशस्वीरित्या जन्म देण्यापूर्वी एखादं भ्रूण गोठवलं जाण्याचा हा सर्वाधिक कालावधी आहे.

त्यांच्या पसंतीशी पियर्स कुटुंबाचा मेळ झाला.

टेनेसीमधील 'रिजॉईस फर्टिलिटी' या आयव्हीएफ क्लिनिकमध्ये पियर्स जोडप्यावर गर्भधारणेची प्रक्रिया झाली. या क्लिनिकनं म्हटलं आहे की त्यांना मिळालेल्या गर्भाचं वय किंवा परिस्थिती काहीही असली तरी त्याचं हस्तांतरण करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे.

लिंडसे पियर्स म्हणाल्या की त्यांना आणि त्यांच्या पतीला "कोणताही विक्रम करायचा नव्हता", तर त्यांना फक्त "मूल हवं होतं."

लिंडा आर्चर्ड यांनी एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूला सांगितलं की त्यांनी अद्याप बाळाला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. मात्र त्यांच्या मुलीबरोबरचं बाळाचं साम्य त्यांना आधीच दिसून आलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)