स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्यासाठी पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये शर्यत लागते हे कितपत खरं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लॉरा प्लिट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आपण सर्वांनीच बीजफलन किंवा फर्टिलायझेशन प्रक्रियेबद्दलच्या गोष्टी जाणून घेतलेल्या असतात. काही गोष्टी आपण विज्ञानातून शिकतो, तर काही गोष्टी या सांगोवांगीच्या असतात.
पुरुषाच्या शरीरातील हजारो शुक्राणू स्त्रीच्या बीजांडापर्यंत पोहण्यासाठी जलद पोहतात. शुक्राणूसोबतच्या संयोगासाठी बीजांड हे मात्र संयमाने वाट पाहात असतं, ही गोष्ट आपण सर्वांनीच ऐकली आहे.
या मॅरेथॉनमध्ये सर्वांत जलद-पोहणारा, सर्वांत चपळ शुक्राणू प्रथम स्थान मिळवतो, स्त्रीबीजासोबत संयोग होतो आणि मग गर्भ रुजतो.
फर्टिलायझेशन प्रक्रियेबद्दल ही बेसिक माहिती असते. आता याच माहितीनुसार या सगळ्या प्रक्रियेत शुक्राणू हे सक्रीय भूमिका बजावतात, तर बीजांडांची भूमिका ही पॅसिव्ह असते.
हे सामान्यतः फर्टिलायझेशन प्रक्रियेबद्दल ज्ञात आहे. आपला समज असा आहे की, यामध्ये शुक्राणू सक्रिय भूमिका बजावतात, तर स्त्रीबीज निष्क्रिय भूमिका बजावते.
मात्र, हे खरं नाहीये. प्रत्यक्षात प्रजनन प्रक्रिया अशी होत नाही. प्रजनन प्रक्रियेत शुक्राणू आणि स्त्रीबीज दोन्हीही महत्त्वाची भूमिका बजावतात.
पार करावे लागतात अनेक अडथळे
प्रजनन प्रक्रिया पुरुषाच्या स्खलनाने सुरू होते. वीर्यपतनाच्या वेळी लाखो शुक्राणू स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतात.
तिथून शुक्राणू थेट स्त्रीबीजापर्यंत पोहोचत नाहीत. या प्रवासात अनेक 'चेक पोस्ट' आहेत. ते सर्व पार करावे लागतात.
पहिला अडथळा गर्भाशय मुखाचा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"स्त्रियांच्या शरीराचा विचार करता प्रजननाच्या मार्गात अनेक 'चेक पॉईंट' आहेत. शुक्राणूंना गर्भधारणेच्या ठिकाणी जाण्यासाठी त्या सर्वांमधून जाणं आवश्यक आहे, जे प्रवेशाच्या ठिकाणापासून खूप लांब आहे," उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ क्रिस्टीन स्पष्ट करतात.
क्रिस्टीन हूक अमेरिकेतील Government Accountability Officeच्या विज्ञान-तंत्रज्ञान, मूल्यांकन आणि विश्लेषण पथकातील जीवशास्त्रज्ञ आहेत.
शुक्राणूंच्या पेशींमध्ये दोष नसल्यास हा अडथळा पार करणं सोपं आहे. परंतु, बहुतेक शुक्राणूंच्या पेशींमध्ये डीएनएमधील किंवा इतर दोष असतात.
"ही एक अतिशय महत्त्वाची निवड प्रक्रिया आहे. वीर्यपतनामुळे तयार होणाऱ्या अब्जावधी शुक्राणूंपैकी फक्त काहीशे बीजांडापर्यंत पोहोचू शकतात," असं ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन विभागाचे संचालक डॅनियल ब्रिसन स्पष्ट करतात.
गर्भाशयाच्या स्नायूंचं आकुंचन आणि स्राव
तथापि, शुक्राणू स्वतःहून फॅलोपियन ट्यूबच्या टोकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते इतके बलवान नसतात. फॅलोपियन ट्यूबच्या टोकाल फलन होतं.
शुक्राणूंच्या पेशीची शेपटी पुढे-मागे फिरत असते. त्यांची शक्ती शुक्राणूंच्या पुढे जाण्याच्या शक्तीपेक्षा दहापट जास्त आहे.
"शुक्राणू पेशी पोहत नाहीत. गर्भाशयाच्या आकुंचनाने ते पुढे ढकलले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत थोडंसं पोहणं असतं. ते जसे पोहतात तसतसे ते बीजांडाच्या जवळ जातात," ब्रिसन यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, गर्भाशयात फॅलोपियन ट्यूबमधील स्राव शुक्राणूंच्या पेशींच्या हालचालींचं नियमन करतात. ते त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात किंवा रोखू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
"थोडक्यात, फर्टिलायझेशनची प्रक्रिया फॅलोपियन ट्यूबची रचना, तिचं रसायनशास्त्र यावर अवलंबून असते. रसायनशास्त्र म्हणजे स्राव खारट किंवा चिकट आहेत किंवा pH पातळी काय आहे इत्यादी. हे घटक ठरवतात की शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचेल की नाही," यूएस मधील स्मिथ कॉलेजमधील जीवशास्त्राच्या प्राध्यापक व्हर्जिनिया हेसेन म्हणतात
"योनीच्या वातावरणाची pH पातळी शुक्राणूंसाठी आवश्यकतेपेक्षा कमी असते. परंतु शुक्राणूंच्या पडद्यामध्ये आणि एन्झाइममध्ये होणाऱ्या बदलांसाठी ही आम्लता आवश्यक असते. यामुळे त्यांची हालचाल, चयापचय गती आणि अंड्यामध्ये प्रवेश करण्याची क्षमता वाढते," स्पेनमधील यूजीन ग्रुपचे संशोधक फिलिपो झांबेली यांनी स्पष्ट केलं.
काही संशोधकांचा असा विश्वास आहे की, स्त्रीच्या कामोत्तेजनामुळे अंतर्गत स्नायूंमधील आकुंचन देखील शुक्राणूंना वेगाने वरच्या दिशेने जाण्यास मदत करतं. परंतु इतर शास्त्रज्ञ म्हणतात की या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.
बीजांडांचा छोटासा प्रवास
स्त्रीबीज हे सर्व घडण्याची धीराने वाट पाहत आहे, असा विचार करणं चुकीचं ठरेल.त्यात स्वतःहून फिरण्याची क्षमता नाही. परंतु, नलिकांमधील सिलिया (केसासारखे) त्यांना खाली जाण्यास मदत करतात.

फोटो स्रोत, Getty Images
"बीजांडं फॅलोपियन ट्यूबच्या बाजूने गर्भाशयाकडे जाते, तसे ते केमोअॅट्रॅक्टंट्स नावाचे रासायनिक द्रव्य स्रावित करते. ते शुक्राणू पेशींना आकर्षित करतात आणि बीजांडाकडे सक्रियपणे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात," झांबेली स्पष्ट करतात.म्हणजेच, स्त्रीबीजात शुक्राणूंच्या प्रवेशाच्या प्रक्रियेत दोन्ही बाजू सक्रिय भूमिका बजावतात. दोन्हीमध्ये उपस्थित रसायनं आणि रिसेप्टर्स यामध्ये योगदान देतात.
वीर्यासाठी खराब परिस्थिती?
हे खरं आहे की वीर्य योनीत प्रवेश करण्याच्या क्षणापासून प्रतिकूल वातावरणास सामोरं जातं?हा गैरसमज आहे, असे हेसेन म्हणतात. पुरुषी दृष्टिकोनातून असं स्पष्टीकरण दिले जात असल्याचे त्यांचे मत आहे."जर आपण या प्रक्रियेकडे सहकार्याऐवजी शुक्राणूंमधील स्पर्धा म्हणून पाहिलं तर ते प्रतिकूल वातावरणासारखं दिसतं," ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"या संपूर्ण प्रक्रियेचं उद्दिष्ट आपल्याला एक चांगलं बाळ देणं हे आहे. हे शुक्राणूंसाठी नकारात्मक वातावरण नाही. हे असं वातावरण आहे जे सर्वोत्तम संतती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्रीच्या दृष्टीकोनातून, गर्भाशयाला जे करणं आवश्यक आहे तेच करतं," हेसेन स्पष्ट करतात.
नवीन तंत्रज्ञान, जुन्या कल्पना
जरी अलीकडील वैज्ञानिक संशोधनानं गर्भधारणेच्या प्रक्रियेसंबंधी नवीन माहिती समोर आणली असली तरी, आम्हाला अनेक दशकांपासून माहिती आहे की, शुक्राणूंची हालचाल तितकी महत्त्वाची नाही.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ एमिली मार्टिन यांनी प्रजनन प्रक्रियेबद्दल बोलण्यासाठी वापरल्या जाणार्या भाषेवर लक्ष केंद्रित केलं. विज्ञान समजावून सांगण्याच्या प्रक्रियेत संस्कृती आणि परंपरा कशा प्रवेश करतात याचं त्या समीक्षण करतात.
1990 च्या दशकातील तिच्या शोधनिबंधांमध्ये त्यांनी वैज्ञानिक साहित्यात जेंडर स्टिरिओटाइप कसे लपलेले आहेत हे स्पष्ट केलं. हा स्त्रीवादाचा ठळक मुद्दा ठरला.
बीबीसीशी बोललेल्या काही तज्ज्ञांनीही मान्य केलं की, विज्ञान आणि शिक्षणात महिलांचं प्रतिनिधित्व कमी आहे.
"विविध दृष्टीकोन असलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व नसल्याने विज्ञानात विचारले जाणारे प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरं यामध्ये विविधता नाही," क्रिस्टीन हूक म्हणाल्या.
आपण वापरत असलेल्या भाषा आणि शब्दसंग्रहावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरज आहे, यावर हेसेन जोर देते.
"वैज्ञानिक गोष्टींबद्दल बोलताना आपण तटस्थ भाषा वापरली पाहिजे. उदाहरणार्थ-आपण फर्टिलायझेशन या शब्दाऐवजी कन्सेप्शन हा शब्द वापरू शकतो," हेसेन सांगतात.
तज्ञांचे म्हणणं आहे की स्टिरियोटाइप आणि जेंडर असमानता दूर केल्याने केवळ जैविक प्रक्रिया योग्य आणि अचूकपणे स्पष्ट होणार नाहीत, तर प्रजनन उपचारांमध्ये सुधारणा करण्याचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








