हा शेतकरी नर्सरीतून लाखो रुपये कसे कमावतोय?

शेतकरी वशिष्ट पिसाळ

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, शेतकरी वशिष्ट पिसाळ
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, बीडहून

“1 लाख 85 हजार रोपटं पाठवून दिलंत आपण सूरजपूर छत्तीसगडला. त्यांनी सगळं पेमेंट ऑनलाईन केलं.”

वशिष्ट वासुदेव पिसाळ त्यांच्या शेतातील तुतीच्या बागेत फिरताना सांगत होते. ते बीड जिल्ह्यातल्या कांबी गावात राहतात.

वशिष्ट त्यांच्याकडे तुतीची नर्सरी आहे.

2014-15 पासून त्यांनी नर्सरी सुरू केली आहे. त्यांनी गेल्यावर्षी तुतीची तब्बल 22 लाख कलमं विकली.

यामुळे त्यांचा नागपूर येथे महाराष्ट्र सरकारच्या रेशीम संचालनालयानं रेशीमरत्न पुरस्कार देऊन गौरव केला.

आता यंदा 50 लाख रोपं विकण्याचं वशिष्ट यांचं टार्गेट आहे.

काडीपासून लागवडीपर्यंत

पिसाळ यांनी बाहेर ठिकाणी काही जमिनी भाड्याने करून त्याठिकाणी तुतीची रोपं तयार केली आहेत. नंतर ती रोपं कट करुन कांबी इथं त्यांच्या घरी आणली जातात.

काडी घरी आणली की त्याची कटिंग केली जाते. नंतर त्याचं जर्मिनेशन केलं जातं आणि मग ते लागवडीसाठी तयार होतं.

कटिंग

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

“सगळं बेनं जागेवर येऊन पडलं तर आपण एका दिवसात 80 हजार ते 1 लाख कलम तयार करतो,” वशिष्ट सांगतात.

आडव्या पद्धतीची लागवड

वशिष्ट यांच्या शेतात सध्या तुतीच्या रोपाची लागवड चालू आहे. आतापर्यंत ते उभ्या पद्धतीनं लागवड करायचे. पण, यंदा मात्र त्यांनी लागवडीसाठी आडवी पद्धत अवलंबली आहे.

वशिष्ट सांगतात, “तुतीची लागवडीसाठी यंदा आडवी पद्धत चालू केली. कारण उभ्या पद्धतीनं लागवडीसाठी मेंटेनन्स जास्ती लागतो. एकरी जी लागवड 4 लाखात होत असेल, तिथं उभ्या काडीसाठी 6 ते 7 लाख रुपये लागतात. काडीसुद्धा जास्त प्रमाणात लागते.”

आडव्या पद्धतीनं लागवड करताना दोन काड्यांमध्ये थोडा गॅप द्यायचा. जेणेकरून काडीला बुरशी लागणार नाही, असं ते सांगतात.

लागवड करताना महिला.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, लागवड करताना महिला.

काड्यांची लागवड केली की, 8-10 दिवसात त्याचे कोंब वर येतात. तिथून पुढे 3 महिन्यांनी ते रोप काढणीला येतं. त्यानंतर मग शेतकऱ्यांना त्याची विक्री केली जाते.

“जमीन मेंटेन ठेवण्यासाठी पूर्ण शेतात पाचरटाची मल्चिंग केलीय. त्यामुळे दिवसभर आणि रात्रीही जमीन थंड राहायला लागली. नाहीतर रोप उगवलं की जळून जातं. वरती रेन पाईप आणि खाली ड्रिप टाकलंय,” तुती लागवडीसाठी जमिनीची कशी काळजी घेतली याबद्दल वशिष्ट सांगतात.

आम्ही ज्यादिवशी वशिष्ट यांच्याकडे पोहोचलो त्यादिवशी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी तुतीचे रोप विकत घेण्यासाठी आले होते.

प्रत्येकी साडेतीन रुपये कलमानं या शेतकऱ्यानं 6 हजार रोपं विकत घेतली.

इतर राज्यातूनही मागणी

वशिष्ट यांच्याकडील रोपांना इतर राज्यांतूनही मागणी आहे. नुकतंच त्यांनी छत्तीसगडला 1 लाख 85 हजार रोपं पाठवलीय.

ते सांगतात, “मी गेल्या जूनपासून ते आजपर्यंत जवळपास 26 लाख कलमं विकली आहेत. यातून मला 50 ते 55 लाख रुपये मिळाले. सगळा खर्च जाता 40 लाखांच्या जवळपास शिल्लक राहिले आहेत.”

शेतकऱ्यांना विक्री करण्यात आलेली रोपं.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, शेतकऱ्यांना विक्री करण्यात आलेली रोपं.

वशिष्ट आता नर्सरीच्या बिझनेसचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत.

यंदा बीडमध्ये 12 ते 15 एकरवर नर्सरी असल्याचं ते सांगतात. याशिवाय त्यांनी हिंगोलीलाही एक प्लांट टाकलाय. अहमदनगरलाही नर्सरी सुरू करण्याचा ते विचार करताहेत.

"एका जणाला एवढं आवरत नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवगळे ग्रूप तयार केलेत," असं ते सांगतात.

नर्सरीमुळे आयुष्य बदललं

नर्सरी टाकल्यापासून वशिष्ट यांच्याकडे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी ती पाहण्यासाठी येतात.

नर्सरीमुळे आयुष्य कसं बदललं, याविषयी वशिष्ट सांगतात, “मुलाचं शिक्षण झालं, विहीरी झाल्या, बोअर घेतले. पहिली छोटी नर्सरी होती, 2 लाख रोपांची. आत वाढवत नेली. गेल्या वर्षी 22 लाखाची होती, यंदा 50 लाख रोपटं तयार करायची आहेत. मी हा बिझनेस वाढवत चाललोय."

याशिवाय मला 2022 साली नागपूरला रेशीमरत्न पुरस्कारही मिळाला, वशिष्ट अभिमानानं पुरस्काराचं प्रमाणपत्र दाखवतात.

वशिष्ट यांनी बांधलेली नवीन विहीर

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, वशिष्ट यांनी बांधलेली नवीन विहीर

2018 साली नुकझान झालं

2018-19 सालच्या दुष्काळात मात्र वशिष्ट यांना फटका सहन करावा लागला.

ते सांगतात, “2018-19 च्या दुष्काळात मी यात अंदर गेलो होतो. मी 45 लाखाला अंदर गेलो होतो. कारण मी खूप मोठी नर्सरी केली होती. अहमदनगरला केली होती आणि इथं बीड जिल्ह्यात पण केली होती. पण निसर्गानं साथ न दिल्यामुळे त्यात अंदर गेलो. माझं नुकसान झालं होतं.

वशिष्ट यांना मिळालेलं प्रमाणपत्र

“आज समजा 2023 या वर्षात निसर्गानं साथ नाही दिली तर शेतकरी रोपं उचलत नाहीत आणि नुकसान होतं.”

अशापद्धतीनं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नर्सरीधारक शेतकऱ्यांना सरकारनं मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा वशिष्ट व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)