पार्वती फुंदे : ‘एकेकाळी 22 बँकांनी कर्ज नाकारलं, आता 5 कोटींच्या जागेत 51 उद्योग उभारणार’

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, औरंगाबाद
“22 ते 23 बँका फिरले. तरी मला लोन भेटलं नाही शिक्षण कमी असल्यामुळे. तुम्ही हा उद्योग चालू शकणार नाही. पापड उद्योग सुरू करा, आम्ही 50 लाख देऊ. हा इंजिनियरिंग झोन आहे, तुम्ही पाईप उद्योग चालवू शकणार नाही.”
नववी पास पार्वतीबाई फुंदे यांना नव्वदच्या दशकात मिळालेले हे सल्ले. पण त्याच पार्वतीबाईंची आज औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीत पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनीची आहे.
चारचाकीतून पार्वतीबाई खाली उतरतात, तेव्हा त्यांच्या हातात पर्स असते आणि त्यामध्ये मोबाईल ठेवलेला असतो.
त्यांचा हा मोबाईल सतत वाजत असतो. कुणी त्यांना बिझनेस संदर्भातल्या माहितीसाठी फोन करत असतं तर कुणी मीटिंगची वेळ ठरवण्यासाठी.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पार्वतीबाईंची कंपनी ज्या ठिकाणी आहे, तिथलं प्रवेशद्वार उघडल्यावर त्यावर मोठ्या अक्षरात किसन पीव्हीसी पाईप कंपनी लिहिलेलं दिसून येतं. यासोबत पार्वतीबाईंना 2000 साल लख्खं आठवतं.
काहीतरी करायला पाहिजे, हे आमच्या डोक्यात होतं. मी बरेच उद्योग करून पाहिले. कापड दुकान टाकलं, पापड-लोणच्याचा उद्योग केला. पण, मग 2005 मध्ये पाईपच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं.
आपण एक शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि आपलं पुरेसं शिक्षणही झालेलं नाही, त्यामुळे मग पार्वतीबाईंनी पाईपचा व्यवसाय निवडला.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
त्यासाठी त्यांनी 2000 मध्ये एमआयडीसीचा फॉर्म भरला. 2005 मध्ये त्यांना उद्योगासाठी जागा मिळाली. पुढे एका बँकेचं कर्ज आणि पतीच्या आर्थिक मदतीनं त्यांनी पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनी टाकली. त्यासाठीची मशिनरी आणली आणि पाईप निर्मिती सुरू केली.
पार्वतीबाई सांगतात, “आम्ही कंपनीचं उद्घाटन केलं. पण दोन महिने एकही पाईप विकला गेला नाही. मग मार्केटिंग करायचं ठरवलं. त्यासाठी एखाद्या शेतात शेतकरी दिसला की आम्ही त्या शेतात जायचो, तिथं थांबायचो. तिथं पाईपबद्दल सांगायचो, आमचा ब्रँड कसा आहे, ते त्यांना समजून सांगायचो. आठवडी बाजार असला, की तिथं जायचो आणि पाईपची माहिती सांगायचो.”
पुढे व्यवसायाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी पार्वतीबाईंनी ठरवलं. 2000 मध्ये पार्वतीबाईंनी महाराष्ट्र सरकारच्या एमसीईडी म्हणजेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणामुळे त्यांचा उद्योजक होण्याचा आत्मविश्वास बळावला.
एमसीईडी बद्दल त्या कौतुकाने सांगतात, “पापड, लोणचं मसाल्यापासून ते इंजिनियरिंगपर्यंत बँक कशी निवडायची, बँकेचं लोन कसं काढायचं, सबसिड्या कशा मिळतात, कोणत्या पद्धतीनं मिळत्यात. कोणत्या स्कीम राबवल्या जातात, ही सगळी माहिती मला या प्रशिक्षणात मिळाली. शाळेत जसं शिक्षक असतो, तर एमसीडी हे उद्योगासाठीचं शिक्षक म्हटलं तरी चालेल.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
पार्वतीबाईंच्या शेंद्रा येथील कंपनीत वेगवेगळ्या आकाराच्या पीव्हीसी पाईप्सची निर्मिती केली जाते. यातून त्यांनी 10 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील या 10 जणांच्या निवासाची सोयही तिथंच मागच्या बाजूला करण्यात आली आहे.
त्या सांगतात, “रॉ मटेरियल आम्ही जळगावहून आणतो. कधी सुरतहून आणतो. आमच्या कंपनीत, अर्धा, एक, दीड, दोन, अडीच, तीन आणि चार इंची पाईप बनतेत. अर्धा इंचीचे 500 ते 700 निघतेत 12 तासाचे. 1 इंचीचे 450. 2 इंचीचे 350. अडीच इंचीचे 200. 4 इंचीचे पावणे दोनशे, जशी साईज वाढेल तसा पाईप कमी होतो.”
कंपनीतील वेगवेगळ्या तीन ते चार ठिकाणी पाईप साठवल्याचं दिसून येतं. अख्ख्या महाराष्ट्रात या पाईप्सची विक्री होते. शेतकरी आणि छोटे दुकानदार हे त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. पार्वतीबाईंच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर एक ते दीड कोटी रुपये आहे. यासोबतच पार्वतीबाईंनी इतर अनेक महिलांना बिझनेस सुरू करण्यासाठी मदत केलीय. आता त्यांचं स्वप्न मोठं आहे.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
त्या सांगतात, “आतापर्यंत मी जवळजवळ 30 ते 35 महिलांना पायावर उभं केलं. लोणचं हो, पापड हो, पीठाची गिरणी हो. कोणताही छोटा उद्योग असो आपण तिला सहकार्य करायचं. टाक तू, चालण म्हणायचं. आता आम्ही सार्थक महिला उद्योगी सहकारी संस्था काढलेली आहे, आता आम्ही 51 महिला पायावर उभं राहणार आहे एका वर्षाच्या आत.”
“आम्ही सार्थक महिला उद्योगी संस्था 51 महिलांनी मिळून ही 5 एकर जागा घेतलीय. त्यासाठी 5 कोटी एमआयडीसीला भरले. जागा अलोटमेंट करून घेतली. या टोकापासून त्या टोकापर्यंत आपली जागा आहे 5 एकर. तर आम्ही 51 उद्योग चालू करणार आहोत महिला.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
या उद्योगांमध्ये पीव्हीसी पाईपचे 3 उद्योग, ठिबकचे 4 ते 5, मोल्डिंग मशीन, बॉटल आहेत. चटयाचे 4 ते 5 उद्योग असणार आहेत. पार्वतीबाईंनी इंजिनियरिंगचं शिक्षण झालेल्या 6 मुलींना यात सहभागी करून घेतलं आहे.
एमआयडीसीची ही जागा मंजूर करून घेण्यासाठी पार्वतीबाईंना 2011 पासून मंत्रालयात चकरा माराव्या लागल्या. शेवटी 11 वर्षांनंतर आता 2022 मध्ये त्यांना ही जागा मिळाली. बिझनेस सक्सेस करण्याचा त्यांचा हा मंत्रा त्यांच्या याच चिकाटीतूनच आलाय.
“सक्सेस व्हायला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची. राग आला तर तो काही कामाचा नाहीये. नम्रता पाहिजे. गडबड नाही करायची. थोडं कर्ज झालं की आपण गव्हर्मेंटला शिव्या घालतो, आत्मह्यापर्यंत जातो. पण आपला पर्याय नाही ना आत्महत्या, संघर्ष करा ना तुम्ही. संघर्ष केल्यावर ऑटोमॅटिक सक्सेस होतो.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
पार्वतीबाई यांचा उद्योग पाहण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी महिलाच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थीही येतात.
आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळालेत.
52 वर्षांच्या पार्वतीबाई आता पुन्हा एक मोठा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न बाळगून आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








