पाच गायी घेतल्या आणि दहावीत शिकत असलेला हा पठ्ठ्या लखपती झाला..

दुग्धपालन
    • Author, सरफराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, सांगलीहून

दहावीत शिकणारा संतोष माने अवघ्या सोळाव्या वर्षी एका गायीपासून सुरूवात करत दूध विक्री व्यवसायातून लखपती बनलाय. सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुल्लाळवाडी तो राहतो. संतोष मानेची कमी वयातली ही प्रगती थक्क करणारी आहे.

जत हा सांगली जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जतसारख्या तालुक्यातली अनेक कुटुंब ऊस तोडणी मजुरीसाठी दरवर्षी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन स्थलांतर करतात. दसऱ्यानंतर म्हणजे ऑक्टोबरच्या आसपास ऊसाचा गाळप हंगाम सुरू होतो. कंत्राटदारांकडून उचल घेऊन घेऊन ऊस तोड मजूर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. पोटासाठी घराला कुलप लावून गावाबाहेर निघतात.

अशाच कुटुंबापैकी एक असेल्या माने कुटुंबात संतोषसह त्याची आई, वडील, भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी आहेत.

संतोष सातवीत असताना कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागलं. आई-वडील ऊसतोड मजुरीला बाहेर जात होते. तेव्हा काय करायचं हा प्रश्न होता. आई-वडिलांना घर चालवण्यासाठी हातभार लावावा म्हणून वडिलांकडे संतोष माने याने एका गायीसाठी हट्ट धरला.

वडिलांनी सुरुवातीला नकार दिला पण नंतर पैसे दिले. त्यातून संतोषने एक गाय घेतली.

दुग्धपालन
फोटो कॅप्शन, संतोष माने

"शिक्षणाबरोबर गायपालन करणं ही तशी सोपी गोष्ट होती. गायीला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी चारा घातल्यावर मिळणाऱ्या दुधाची विक्री करणं देखील सोपं जातं. हे मी पाहिलं होतं. म्हणून पप्पांकडे गाईसाठी हट्ट धरला. आधी ते नाही म्हणत होते. इतर मुलांसारख्या असलेल्या गायी तू विकून टाकशील ते म्हणायचे. पण मी इतका हट्ट केला की शेवटी त्यांनी ऊस तोडणीसाठी घेतलेली 65 हजार रुपयांची उचल म्हणजेच आगाऊ रक्कम मला दिली. त्यातून मी एक जर्सी गाय विकत घेतली. या गायीतून सुरुवातीला रोजचं 24 लीटर इतकं दूध मिळायचं. त्यावेळी दुधाला कमी दर होता. साधारण 22 रुपये इतका दर मिळायचा, तरी देखील महिन्याला मला पाच हजार खर्च वजा होत 9 हजार रुपये मिळू लागले.''

महिन्याला 80 हजार रूपये नफा?

संतोषला या दुग्धपालनाच्या व्यवसायात आता अख्ख कुटुंब साथ देतंय. एका गायीपाठोपाठ त्याने आणखी 4 गायी विकत घेतल्या आहेत. पाच गायी दररोज सरासरी 105 लीटर दूध देतात असं तो सांगतो. 35 रूपये लीटर दराने दररोज माने कुटुंबाकडे साधारण 3 हजार 600 रूपये येतात. त्यातील 1 हजार रूपये इतका खर्च वजा करून त्यांच्या हातात अडीच हजार रूपये येतात. संतोष सांगतो, "गावातल्याच डेअरीमध्ये मी रोज हे दूध घालतो. महिन्याला माझ्या खात्यात या दुधाचे पैसे जमा होतात. आता एक लाखाच्या आसपास इतके उत्पन्न मिळतं, त्यातून खर्च वजा केल्यावर 70 ते 80 हजार इतका नफा मिळतोय.''

दूग्धपालन
फोटो कॅप्शन, संतोष माने आई-वडिलांसोबत

दुग्धपालनाचा हा व्यवसाय करताना संतोषचं शिक्षणही सुरू आहे. व्यवसायाचा परिणाम त्याने अभ्यासावर होऊ दिलेला नाही. त्याचा दिनक्रम ठरलेला असतो, संतोष सांगत होता. "रोज सकाळी पाच वाजता उठून गोठ्याची साफसफाई करून गायींना चारा पाणी घालतो. त्यानंतर शाळेसाठी अभ्यास करून अकरा वाजता शाळेला जातो. दुपारी घरातलं कोणीही गायींना चारा देतात. संध्याकाळी घरी परतल्यानंतर आम्ही गायींना चारा घालून गोठ्याची साफसफाई करतो आणि दुधाच्या धारा काढतो. त्यानंतर दूध डेअरीमध्ये देऊन येतो. असा माझा रोजचा कार्यक्रम. शाळा मी फारशी कधी बुडवली नाही''

सोन्याचे दिवस आले...

दूग्धव्यवसायातून फायदा झाल्याने त्याचा उपयोग शेतीतल्या पिकावरही झालाय. संतोषच्या वडिलांना आता त्यांच्या शेतामध्ये दोन लाख रुपये खर्च करून दोन विहिरी पाडल्या आहेत. दोन्ही विहिरींना पाणी लागलंय. ऊस, मका आणि तूर या पिकांचं उत्पादन घेतायत. त्यामुळे गेल्या वर्षी संतोषच्या आईची, मंगल माने यांचं ऊस तोडणीसाठी गावोगावी फिरणं पूर्णपणे थांबलंय. त्या व्यवसायात संतोषसोबत काम करतात.

मंगल माने यांना ऊसतोडणीसाठी खूप खस्ता खाल्यायत. त्यांना वाटलंही नव्हतं की कधी असे सोन्याचे दिवस येतील.

ऊसतोडीसाठी स्थलांतर

फोटो स्रोत, Prajakta Dhulap/BBC

"यंदा आईची ऊसतोडणी थांबवली आहे आणि पुढल्या हंगामात पप्पांचीही थांबेल. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय." संतोषच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

संतोषचे वडील दादासो माने सांगतात, मुलांचं शिक्षण, लग्न यासाठीचा खर्च इतका वाढता आहे की गेले 35 वर्षं ऊसतोडणीला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

व्हीडिओ कॅप्शन, दहावीत शिकणाऱ्या संतोषने गायी घेतल्या आणि कुटुंबाचं स्थलांतर कसं थांबवलं?

"आम्ही लहान असल्यापासून ऊस तोडणीचं काम करतो, आणि मुलं जगवण्यासाठीही गरजेचं होतं. आमचा हा सगळा दुष्काळी भाग आहे. मोठ्या मुलाला आश्रम शाळेत ठेवलं. लहान मुलगा आणि मुली कधी आमच्या सोबत असायच्या तर कधी आजी सोबत घरी गावातच असायच्या. स्वतःचं घरदेखील सरकारच्या इंदिरा घरकुल आवास योजनेतून बांधून मिळालं. त्याआधी आम्ही एका झोपडीत आपण राहायचो."

'आमच्या कमाईपेक्षा संतोषची कमाई जास्त'

"35 वर्षांपासून असलेली ऊसतोड आता आम्ही बंद करू आणि हे केवळ संतोषमुळे शक्य झालंय. दुधाच्या विक्रीतून एका महिन्यात जेवढे पैसे मिळतात, तेवढे आम्हाला सहा महिन्यात उसाचा पट्टा पाडूनही मिळत नाहीत. आमच्या कमाईपेक्षा संतोषची कमाई जास्त आहे. सहा महिन्याचा उसाचा पट्टा पडण्यासाठी आम्हाला नवरा-बायकोला मिळुन 50 ते 70 हजार रूपये मिळतात. त्याच्या एका महिन्याच्या कमाईत आम्ही सहा महिने राबतोय, हे ध्यानात येतंय."

संतोष जर या दूध विक्री व्यवसायात आला नसता, तर ऊस तोडणी मरेपर्यंत कधी सुटली नसती, हे सांगताना दादासो यांना गहिवरून आलं.

दुग्धपालन
फोटो कॅप्शन, माने कुटुंबाचं स्थलांतर थांबलं

लहानपणापासून संतोष आई-वडिलांसोबत ऊसतोडीसाठी जायचा. त्यामुळे तो पहिलीला शाळेत जाऊ शकला नाही. पण गावातल्या जिल्हा परिषद शिक्षकांना शाळाबाह्य मुलांचा शोध घेताना संतोष सापडला आणि त्यांनी दुसरीनंतर त्याचं नाव शाळेत नोंदवलं.

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भक्तराज गर्जे यांच्याकडून शाळाबाह्य मुलगा म्हणून संतोषला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. संतोषबद्दल ते सांगत होते, "2015मध्ये गावात फिरताना संतोष शाळाबाह्य आढळून आला. आई-वडिलांशी संवाद साधून, त्यांचं समुपदेशन करून संतोषला शिक्षण हक्क कायद्यानुसार दुसरीत प्रवेश दिला. पण त्यांची परिस्थिती बेताची असल्याचं समोर आलं. दर वर्षी कुटुंब स्थलांतर करत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं होतं.''

30 गायींचा फिरता गोठा

संतोषला शाळेची गोडी निर्माण करणं हे मोठं आव्हान होतं, असं गर्जे म्हणाले. "शिक्षणाचा मूळ उद्देश एखाद्या विद्यार्थ्यांचे सुप्तगुण ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायचं हा असतो. संतोषला शिक्षणाबरोबर आम्ही पुस्तकाबाहेरचे धडे दिले आहेत, जे आता त्याला उपयोगी पडतात. उदाहरणार्थ- कमी पाण्यात मूरघास किंवा इतर पिकं कशी घ्यावीत. त्याच्या मदतीने संतोष आता जनावरांच्या साठी स्वतः चारा पिकवतो. आणि आता त्याने दूध विक्री व्यवसायातले बारकावे समजून घेण्यासाठी त्याने पुढे पशुसंवर्धनाचं या शिक्षण घ्यावं असं वाटतं.

दुग्धपालन

फोटो स्रोत, Tiby Cherian

"अगदी कमी वयात मुलांच्या हातात पैसे आले तर मुलं वाईट मार्गाला लागतात. पण संतोषकडे असणारी चांगलं मूल्यं यातून दिसतात की, त्याने आलेल्या पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी केलाय. हे करताना त्याने अभ्यासही सुरू ठेवलाय. बऱ्याचदा आपला असा समज असतो की स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर परीक्षांमध्ये जे नंबर मिळवतात तेच गुणवंत. पण मला संतोषसारखे विद्यार्थीही गुणवंत वाटतात. त्यामुळे यश मोठं असून त्याचा आपल्याला अभिमान वाटतो'',अशा भावना गर्जे व्यक्त करतात.

खूप कमी वयात शिक्षणासोबत एका यशस्वी उद्योजक बनण्याकडे सुरू केलेला प्रवास संतोषल आणखी वाढवायचाय. भविष्यात 30 गायींचा एक फिरता गोठा करणं हे त्याचं ध्येय आहे.

संतोषच्या हातात आज लाखो रुपयांची उलाढाल आहे. पण संतोषच्या चेहऱ्यावर याचा कुठेही तसूभर गर्व नाही. संतोषचा हा प्रवास गावातल्याच नाही तर आजूबाजूच्या गावांनाही प्रेरणा देणारा ठरतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)