ब्रा घातली नाही तर स्तन सैल होतात का? ब्रा मुळे स्तनांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात?

फोटो स्रोत, Getty Images
महिलांमध्ये स्तनांच्या आरोग्याबाबत खूप गोंधळ आणि शंका असतात. विशेषत: 'ब्रा' घालण्याबाबत तर अनेक समज-गैरसमज आहेत.
ब्रेसिअरमुळे महिलांना त्यांचे कपडे योग्य आणि आरामदायक पद्धतीने घालण्यासाठी मदत होते.
अगदी शाळा-महाविद्यालयीन मुलींपासून ते नोकरदार महिलांपर्यंत बहुतेक जणी रोज ब्रा घालतात. पण तरीही ब्रा वापरण्याबद्दल त्यांच्या मनात अनेक शंका आहेत.
दरवर्षी 13 ऑक्टोबर हा ‘नो ब्रा डे’ म्हणून साजरा केला जातो. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या स्तनांची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
त्या दिवशी महिला ब्रा घालत नाहीत आणि स्तनांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी मोहिमा राबवल्या जातात.
पण ब्रामुळे स्तनाचा कर्करोग होतो, याविषयी ठोस वैद्यकीय पुरावा नाहीये. अर्थात, आता ‘नो ब्रा डे’ हा केवळ आरोग्यविषयक संकल्पनांपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो लैंगिक समानतेशीही जोडला गेला आहे.
पण काही महिला अशाही आहेत, ज्या केवळ त्यांना अस्वस्थ वाटतं, आरामदायक वाटत नाही म्हणून ब्रा घालत नाहीत.
ब्रा वापरण्याची किंवा न वापरण्याची कारणं वेगवेगळी असली, तरी एक शंका अनेक जणींच्या मनात डोकावून जाते. ती म्हणजे दीर्घकाळ ब्रा घातली नाही तर शरीराच्या रचनेत बदल होतील का आणि स्तन सैल होतील का?
खरंच ब्रा घातल्याने किंवा न घालण्याने स्त्रीच्या शरीररचनेत बदल होतो का? स्त्रियांना त्यांच्या स्तनांबद्दल कोणत्या गोष्टी माहीत असाव्यात? डॉक्टर काय म्हणतात?
'आपलं शरीर समजून घेणं गरजेचं'

फोटो स्रोत, Getty Images
"असे अनेक गोंधळ टाळण्यासाठी आपल्याला प्रथम आपले शरीर समजून घेणे आवश्यक आहे. विशेषत: स्त्रियांना त्यांच्या स्तनांबद्दल माहिती असायला हवी,” असं स्त्रीरोगज्ज्ञ बालकुमारी सांगतात.
"महिलांचे स्तन चरबी आणि ऊतींनी बनलेले असतात ज्यामध्ये स्तन ग्रंथी असतात. ज्याप्रमाणे तोंडाच्या भागात लाळ शोषण्यासाठी काही ग्रंथी असतात, त्याचप्रमाणे स्तनांमध्ये दूध स्रवण्यासाठी ग्रंथी असतात.
काही जणींच्या स्तनांमध्ये ऊतींचे प्रमाण जास्त आणि फॅटी टिश्यू कमी असू शकतात. इतरांमध्ये जास्त फॅटी टिश्यू आणि स्तन ग्रंथी असलेल्या ऊती कमी असू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या रचनेनुसार ते बदलते.”
या ऊती नैसर्गिकरित्या वयानुसार कमी होतात. याचा अर्थ वयोमानानुसार स्तनांची झीज होणे स्वाभाविक आहे.
"त्यामुळे तुम्ही ब्रा घातली नाही, तर तुमचे स्तन सैल होतील हे म्हणणं योग्य नाही," असं बालकुमारी सांगतात.
ब्रा घातल्यामुळे स्तनांचा कर्करोग होतो?
“त्याचप्रमाणे घट्ट ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हे म्हणणंही खरं नाही. जेव्हा खूप घट्ट अंतर्वस्त्रं घातली जातात तेव्हा त्यांचं त्वचेसोबत घर्षण होतं. घामामुळे त्या भागात खाज सुटणे आणि चिडचिड होऊ शकते. सतत खूप घट्ट ब्रेसिअर घातल्याने स्तनांमध्ये भागात वेदना होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी योग्य आकाराच्या ब्रा निवडून त्या परिधान कराव्यात. यामुळे स्तनाचा कर्करोग होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही,” तो म्हणतो.
योग्य मापाची ब्रा कशी निवडायची, चुकीच्या मापाची ब्रा वापरल्याने काय परिणाम होतात?- याबद्दल इथे वाचा.
“मोठे स्तन असलेल्या स्त्रियांसाठी स्तन ओघळणे नैसर्गिकरित्या घडणे सामान्य आहे. त्यांना त्यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेव्हा ब्रा घातल्या जातात तेव्हा त्यांना आधार मिळतो. यामुळे पाठदुखीसारख्या समस्या टाळता येतात. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की ब्रा घालणे हे सहसा तात्पुरत्या आरामासाठी असते. जर तुम्हाला त्यात अस्वस्थ वाटत असेल तर त्या घालण्याची गरज नाही.
त्यामुळे ब्रा घातल्याने स्तनांवर कोणताही परिणाम होत नाही. यात कोणताही फायदा किंवा हानी नाही,” डॉ बालकुमारी सांगतात.

"सर्वांत आधी हे समजून घ्यायला हवं की, स्तन सैल पडणं किंवा ते ओघळणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. विशेषत: पुरुषांनी याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. पुरुषांच्या स्त्रियांच्या शरीराबद्दल असलेल्या अपेक्षांमुळे स्त्रियांमध्ये एक विशिष्ट मानसिक दडपण निर्माण होतं,” डॉ. काव्या कृष्णन नमूद करतात.
त्या पुढे सांगतात, “आजकाल स्तनांची झीज रोखण्यासाठी, त्यांचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाइन विकल्या जाणार्या क्रीम्स आहेत. पण त्यात अर्थ नाही. अशा क्रीममुळे निश्चितपणे स्तनांची झीज टाळता येत नाही. वैद्यकीयदृष्ट्या तसं सिद्ध झालेलं नाही. अशा जाहिरातींनी लोकांना फसवू नये. शरीरात नैसर्गिकरित्या होणारे बदल स्वीकारण्याइतपत लोक प्रौढ झाले पाहिजेत.”
"ज्याप्रमाणे वयोमानाप्रमाणे स्त्रियांमध्ये स्तनांचा सैलपणा जाणवायला लागतो, त्याचप्रमाणे स्तनदा मातांनाही स्तन सैल पडतात. जगातील सर्व महिलांच्या बाबतीत असे घडू शकते. याला कोणीही अपवाद नाही. त्यामुळे याबाबत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. एक गैरसमज हाही आहे की स्तनपान हेच केवळ स्तन सैल होण्याचं कारण आहे. पण ते खरे नाही हे आपण समजून घेतले पाहिजे,” तो म्हणाला.

फोटो स्रोत, Getty Images
“उदाहरणार्थ- ज्या महिलांचे स्तन मोठे आहेत; त्यामुळे त्यांना पाठदुखी किंवा खांदेदुखीचा त्रास होत असेल, त्यांच्या स्तनाचा आकार शस्त्रक्रियेने कमी केला जाऊ शकतो. याला 'ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी' म्हणू या.
त्याचप्रमाणे लहान स्तन असलेल्या लोकांमध्ये अति न्यूनगंड किंवा मानसिक ताण असतील, तर स्तनांचा आकार वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया करता येते. परंतु यापैकी काहीही आम्हाला डॉक्टरांना सुचवायला आवडत नाही. हे पूर्णपणे वैयक्तिक पसंती आणि त्यांच्या गरजांवर अवलंबून असतं.”
लहान स्तन असलेल्या स्त्रियांना कमी दूध येतं आणि मोठ्या स्तन असलेल्या स्त्रियांना अधिक दूध येतं असा एक समज आहे आणि तो प्रचंड चुकीचा आहे, असंही डॉक्टर आवर्जून नमूद करतात.
प्रत्येक स्त्रीच्या स्तनांमध्ये आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी पुरेशा ग्रंथी असतात. स्तनाच्या आकाराचा स्तनपानाशी काहीही संबंध नाही," डॉ. काव्या सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




