सोयाबीनमुळे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाची शक्यता वाढते का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेसिका ब्राऊन
- Role, बीबीसी फ्युचर
सोयाबीनला हल्ली सुपरफूड म्हटलं जातं. भारतासह आशियाई देशांमध्ये सोयाबीन हजारो वर्षांपासून खाल्लं जातं. मात्र, पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र सोयाबीन खाण्याचा इतिहास उणेपुरे साठ वर्षे पाठीमागे जातो.
आजच्या घडीला पाश्चिमात्य देशांमध्ये सुपरमार्केट सोयाबीनच्या उत्पादनांनी भरून गेलाय. सोया मिल्क, सोया बर्गर, सोया सॉस आणि टोफू यांसारख्या गोष्टींची मागणी खूप आहे. सोयाबीनला प्रथिनांचा उत्तम स्रोत मानलं जातं. विशेषत: रेड मीटचं. रेड मीटला कर्करोगासह अनेक आजारांचं कारण मानलं जातं. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये हल्ली सोया उत्पादनांनाच प्रथिनांसाठी चांगलं स्रोत मानलं जातंय. कारण यात फॅटही कमी असतं.
त्यामुळेच सोया खाणाऱ्यांना हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी आहे. यात प्रथिने, अनसॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन बी, फायबर, आयर्न, कॅलन्शियम आणि झिंक यांसारखे मानवी आरोग्याला हितकारक घटक असतात.
हल्ली अनेक लोक सोया उत्पादनांना निरोगी आयुष्याशी जोडू लागले आहेत. काही लोक याबाबत शंकाही व्यक्त करत आहेत. सोयाबीन आपल्या हार्मोन्सवर परिणाम करतं असा काहीजण दावा करत आहेत.
हा सगळा वाद होतोय, कारण सोयामध्ये आयसोफ्लेवन्स आढळतात. यात महिलांचे हार्मोन्स ऑस्ट्रोजेन यांसारखे गुण असतात. सोयामध्ये आढळणारे आयसोफ्लेवन्स ओस्ट्रोजेनसारखं काम करतात. हे शरीरातील ओस्ट्रोजेनशी संबंधित घटकांशी जुळू पाहतात. त्यामुळे अनेक लोकांना शंका वाटते की, अधिक सोया खाल्ल्यानं महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
मात्र, शास्त्रज्ञांनी गेल्या दशकात आयसोफ्लेवन्सबाबत बरंच संशोधन केलंय. तरीही या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर सापडू शकलं नाहीय की, सोया खाल्ल्यानं महिलांना स्तनांच्या कर्करोगाची शक्यता खरंच वाढते का?
काही संशोधनांमध्ये हे समोर आलंय की, सोयामध्ये कर्करोगाचं कारण दडलं नहीय. याउलट सोया कर्करोगापासून बचाव करतो. मात्र, हा दावा जाणकार ठामपणे मांडत नाहीत.
ब्रेस्ट कॅन्सरची शंका
आशियाई देशांमध्ये अनेक शतकांपासून सोया खाल्ला जात आहे. या देशातील स्तनांच्या कर्करोगाची शक्यता अमेरिकन महिलांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी आहे. जपानमध्ये प्रत्येक महिला सरासरी 30 ते 50 मिलीग्रॅमपर्यंत आयसोफ्लेवन्स सोयाद्वारे सेवन करतात, तर युरोपियन देश आणि अमेरिकेत महिला सरासरी 3 मिलीग्रॅम आयसोफ्लेवन्सच सोयाच्या माध्यमातून खातात.

फोटो स्रोत, Getty Images
सोया महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाची शक्यता कमी करतं, असंही म्हटलं जातं. अमेरिकेच्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीचे असोशिएट प्रोफेसर फँग फँग झँग यांनी ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या 6 हजार महिलांवर संशोधन केलं.
त्यांना असं आढळलं की, स्तनांचं कर्करोग झालेल्या महिला आपल्या खाण्यापिण्यात सोयाचा अधिक समावेश करतात. त्यामुळे स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यूची त्यांची शक्यता 21 टक्क्यांनी कमी होते.
सोयाबाबत निश्चित मत बनवणं कठीण
सोयाच्या फायद्यांबाबत जाणकार ठाम दावे करत नाहीत. सोयाला रेड मीटचा पर्याय म्हणून खाल्लं जातं. कारण रेड मिटला हृदयाचे विकार आणि कर्करोगापासून बचावण्याचं कारण मानलं जातं.
जर सोयामुळे स्तनांचा कर्करोग कमी होत असेल, तर त्याचं कारण त्यात आढळणारं आयसोफ्लेवन्स असू शकतं. कारण ते शरीराच्या पेशींमध्ये एपॉप्टोसिसच्या प्रक्रियेला चालना देतं. असं तेव्हा होतं, जेव्हा एखाद्या पेशीचा डीएनए कर्करोगामुळे खराब होतो, तेव्हा पेशी स्वत:ला संपवतात. जेणेकरून दुखापतग्रस्त पेशींमुळे कर्करोग होऊ नये.
मग सोयामुळे कर्करोग होतो, ही चर्चा कुठून सुरू झाली?
प्रयोगशाळांमध्ये सोयामुळे कर्करोगग्रस्त पेशींची वाढ होताना दिसलीय. जेव्हा आपण सोया खातो, तेव्हा त्यातील आयसोफ्लेवन्स एकतर अल्फा ओस्ट्रोजेन रिसेप्टरशी जोडले जातात किंवा बिटाशी. अल्पाशी जोडणारं आयसोफ्लेवन्स कर्करोगाला वाढण्यास कारणीभूत ठरतं. मात्र, असंही दिसून आलंय की, आयसोफ्लेवन्स नेहमी ओस्ट्रोजेनच्या बीटा रिसेप्टरशीच जोडला जातो. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते.

फोटो स्रोत, Getty Images
आशियाई देशांमध्ये महिलांच्या गर्भातूनच आयसोफ्लेवन्स मिळू लागतात. तर पाश्चिमात्या देशांमध्ये सोया खाण्याची सुरुवात कालांतरानं होते. हेसुद्धा आयसोफ्लेवन्सच्या वेगवेगळ्या वर्तनाचं कारण असू शकतं.
लहानपणापासून सोया खाण्याचा एक फायदा म्हणजे हृदयाशी संबंधित विकार होण्याची शक्यता कमी होतात. आशियाई आणि पाश्चिमात्य देशांमधील महिलांबाबत झालेल्या संशोधनात समोर आलं की, सोयामध्ये लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल कमी असतं. हे कोलेस्ट्रॉल हृदयच्या विकाराची शक्यता वाढवतं.
सोया कसं खातात?
सोया खाल्ल्यानं असायही फायदा आहे की, यात खराब फॅट म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट कमी असतात. त्यामुळे नुकसानही कमी होतं. एका संशोधनात हेही आढळलं की, सोया पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या शक्यतही कमी करतात. अमेरिकेच्या इलिनॉय यूनिव्हिर्सिटीया कॅथरीन एपलगेटचं म्हणणं आहे की, सोया प्रोस्टेट कॅन्सरची वाढ रोखण्यासाठी मदत करतं.

फोटो स्रोत, Getty Images
सोया तुम्ही कशा पद्धतीने खाता, हेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सरळ सोयाबीन खात असाल, तर त्यात आयसोफ्लेवन्सचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही सोया मिल्क पित असाल, तर त्यात आयसोफ्लेवन्स खूप कमी असतं.
एकूणच, आपण हे म्हणून शकतो की, सोयामुळे नुकसान होतं, हे ठामपणे म्हणणं बरोबर ठरणार नाही. गेल्या काही दशकात सोयावर बरंचसं संशोधन झालंय. सोयामुळे काही फायदे आहेत, तर काही नुकसानही आहेत, असं संशोधन सांगतं.
मात्र, शास्त्रज्ञांमध्ये सर्वसामान्य मत हेच आहे की, सोया खाल्ल्यानं आरोग्याला फायदा अधिक आहे, आणि नुकसान कमी.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








