सेक्स स्कँडल, ज्यामुळे जगजीवन राम, इंदिरा गांधी आणि चरणसिंग यांना राजकीय धक्के बसले

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1977 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर अवघ्या चारच महिन्यातच इंदिरा गांधी या धक्क्यातून सावरल्या. दुसरीकडे जनता सरकारला मोठी संधी मिळूनही त्यांनी ती वाया घालवण्याची कोणतीही कसर सोडली नाही.
मोरारजी देसाई, जगजीवन राम आणि चरणसिंग या तिघांनीही सरकारला वेगवेगळ्या वाटेने नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे इंदिरा गांधींना सत्तेत परतण्याची आयती संधी चालून आली.
इंदिरा गांधींना राजकीय पुनरागमन करण्यासाठी पहिली संधी मिळाली ती मे 1977 मध्ये. बिहारच्या बेलछी गावात उच्चवर्णीय जमीनदारांनी दहाहून अधिक दलित लोकांची हत्या केली होती.
ही घटना घडली तेव्हा फार कमी लोकांनी याकडे लक्ष दिलं. पण इंदिरा गांधींनी मात्र तिथल्या दलितांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतला.
हल्लीच प्रकाशित झालेल्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड' या पुस्तकाच्या लेखिका नीरजा चौधरी सांगतात, "त्यावेळी संपूर्ण बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. बेलछीच्या रस्त्यावर चिखल आणि पुराचं पाणी भरलं होतं."
इंदिरा गांधींना अर्ध्या रस्त्यातच त्यांची गाडी सोडावी लागली. पण त्यांनी आपला प्रवास थांबवला नाही. त्या हत्तीवर स्वार होऊन पूरग्रस्त बेलछी गावात पोहोचल्या. वृत्तपत्रांमध्ये हत्तीवर बसलेल्या इंदिरा गांधींचा फोटो छापून आला. यातून असा संदेश मिळत होता की त्या अजूनही लढत आहेत."
हत्तीच्या पाठीवरून साडेतीन तासांचा प्रवास
बेलछीच्या दलितांनी इंदिरा गांधींचा हात हातात घेतला. इंदिरा गांधींनी तिथेच बसून त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि त्यांना धीर देत म्हणाल्या, "मी तुमच्या सोबत आहे."
प्रसिद्ध पत्रकार जनार्दन ठाकूर यांनीही त्यांच्या 'इंदिरा गांधी अँड द पॉवर गेम' या पुस्तकात इंदिरा गांधींच्या बेलछी यात्रेचा उल्लेख केला आहे.
ठाकूर लिहितात, "केदार पांडे, प्रतिभा सिंह, सरोज खापर्डे आणि जगन्नाथ मिश्रा हे देखील इंदिरा गांधींसोबत गेले होते."
काँग्रेस नेते केदार पांडे म्हणाले की, बेलछीपर्यंत कोणतीही गाडी पोहोचू शकत नाही. यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, रात्रभर चालावं लागलं तरी चालेल, आपण पायी जाऊ.
अपेक्षेप्रमाणे इंदिरा गांधींची जीप चिखलात अडकली. ती चिखलातून बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर आणण्यात आला. तोही चिखलात अडकला.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
इंदिरा गांधींनी आपल्या पिंडऱ्यांपर्यंत साडी वर केली आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून चालू लागल्या. त्यावेळी तिथल्याच कोणत्यातरी व्यक्तीने त्यांच्यासाठी हत्ती तिथे पाठवला.
इंदिरा गांधी त्या हत्तीवर चढल्या. भीतीने प्रतिभासिंहही त्यांच्या मागे चढल्या. त्यांनी इंदिराजींची पाठ घट्ट धरली.
इंदिरा गांधींनी तिथून साडेतीन तास बेलछीपर्यंत प्रवास केला. मध्यरात्री तेथून परतताना इंदिरा गांधींनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेत भाषणही केलं.
पाटण्यात जेपींची भेट
दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधी जेपींना भेटण्यासाठी त्यांच्या पाटणा येथील कदमकुआ येथील निवासस्थानी गेल्या. इंदिराजींनी पांढरी साडी नेसलेली होती.
त्यांच्यासोबत सर्वोदय नेत्या निर्मला देशपांडे होत्या. जेपी त्यांना त्यांच्या छोट्या खोलीत घेऊन गेले, तिथे एक पलंग आणि दोन खुर्च्या होत्या. या भेटीत इंदिराजींनी जेपींसोबत राजकारणावर चर्चा केली नाही, ना त्या काळात त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला.
इंदिरा गांधींनी जेपींची भेट घेण्यापूर्वी संजय गांधी यांच्या पत्नी मनेका यांनी जेपींची भेट घेतली होती. त्यांनी जेपींकडे तक्रार केली होती की त्यांचे फोन टॅप केले जातात, त्यांची पत्रं उघडून वाचली जातात.

फोटो स्रोत, BBC/GANESH POL
हे ऐकून जेपी खूप संतापले. मनेका गेल्यानंतर तिथेच बसलेले जेपींचे सहकारी म्हणाले, इंदिराजींनी तर त्यांच्या विरोधकांसोबत सुद्धा हे केलं होतं. यावर जेपी म्हणाले, 'पण आता देशात लोकशाही आहे.'
इंदिरा गांधी आणि जेपींची बैठक जवळपास 50 मिनिटं चालली. नीरजा चौधरी सांगतात, "जेपी इंदिरा गांधींना सोडण्यासाठी पायऱ्यांपर्यंत आले."
बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांनी नेमकी कसली चर्चा झाली याविषयी विचारलं असता इंदिराजींनी हसतमुखाने उत्तर दिलं की ही खाजगी भेट होती.
पत्रकारांनी जेपी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, "मी इंदिराजींना सांगितलंय की तुमचा भूतकाळ जितका उज्ज्वल होता तितकंच तुमचं भविष्यही उज्ज्वल असेल."

फोटो स्रोत, Getty Images
ही बातमी बाहेर पडताच जनता पक्षातील अनेक नेते अस्वस्थ झाले. संतप्त झालेल्या कुलदीप नय्यर यांनी जेपींचे सहकारी असलेल्या कुमार प्रशांत यांना विचारलं की, "जेपी इंदिरांबद्दल असं कसं म्हणाले? त्यांचा भूतकाळ एक काळा अध्याय होता, आणि उज्ज्वल तर त्याहून नाही."
जेव्हा कुमार प्रशांत यांनी जेपींना हा संदेश दिला तेव्हा त्यांनी विचारलं की, "घरी येणाऱ्या पाहुण्या माणसाला आशीर्वाद द्यावेत की शिव्या शाप?"
नीरजा चौधरी सांगतात, "तोपर्यंत जनता पक्षाच्या नेत्यांनी जेपींचा भ्रमनिरास केला होता आणि ते इंदिरा गांधींपेक्षा जास्त त्यांच्यावर नाराज होते. या संदर्भातून हे वाक्य पाहिलं पाहिजे."
राजनारायण आणि संजय गांधी यांच्यातील भेट सत्र
इंदिरा गांधींना पुनरागमन करण्यासाठी तिसरी संधी मिळाली त्यांचाच पराभव करणाऱ्या राजनारायण यांच्याकडून. राजनारायण यांना वाटत होतं की जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांना त्यांच्या योग्यतेचं स्थान मिळालं नाही.
त्यांना पदावरून काढून टाकणाऱ्या मोरारजी देसाई यांना त्यांनी कधीही माफ केलं नाही.
त्यांनी इंदिरा गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. इंदिराजी स्वतः त्यांना भेटल्या नाहीत पण त्यांनी त्यांचा मुलगा संजय गांधी यांना भेटायला पाठवलं.
त्या दोघांची भेट मोहन मीकेन्सचे मालक कपिल मोहन यांच्या पुसा रोडवरील घरी झाली.
कमलनाथ किंवा अकबर अहमद डम्पी यांच्या गाडीत बसून संजय गांधी राजनारायण यांना भेटण्यासाठी जात असत.

फोटो स्रोत, Getty Images
या भेटींमध्ये मोरारजी देसाई यांचं सरकार पाडून चौधरी चरणसिंग यांना पंतप्रधान करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली.
चरणसिंग यांना पंतप्रधान करण्यासाठी जनता पक्ष फोडावा लागेल हे त्या दोघांनाही माहीत होतं.
नीरजा चौधरी लिहितात, "एकदा राजनारायण यांना खूश करण्यासाठी संजय गांधींनी त्यांना सांगितलं, तुम्हीही पंतप्रधान होऊ शकता. राजनारायण यांनी होकार दिला पण ते संजय गांधींच्या शब्दांना बळी पडले नाहीत. ते म्हणाले, हे बरोबर आहे पण तूर्तास चौधरी साहेबांनाच पंतप्रधान बनू द्या."
जगजीवन राम यांच्या मुलाचं सेक्स स्कँडल
1978 च्या अखेरीस नशिबाने इंदिरा गांधींना पुन्हा साथ दिली. 1978 च्या ऑगस्ट महिन्यात 21 तारखेला गाझियाबाद येथील मोहन नगर मध्ये मोहन मीकेन्सच्या कारखान्याबाहेर एका गाडीचा अपघात झाला.
एका मर्सिडीज कारने एका व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
लोक मारहाण करतील या भीतीने गाडीत बसलेल्या व्यक्तीने मोहन मीकेन्सच्या गेटमधून गाडी आत आणली. गेटवर उपस्थित सुरक्षा रक्षकाने आत फोन करून अपघाताची माहिती दिली.
कपिल मोहन यांचा भाचा अनिल बाली बाहेर आले. त्यांनी गाडीत बसलेल्या व्यक्तीला ओळखलं.
ते संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचे पुत्र सुरेश राम होते. सुरेश राम यांनी अनिलला सांगितलं की त्यांच्या गाडीचा पाठलाग केला जातोय.
या गाडीचा पाठलाग करत होते राजनारायण यांचे दोन कार्यकर्ते केसी त्यागी आणि ओमपाल सिंग.
अनिल बाली यांनी सुरेश राम यांना त्यांच्या कंपनीच्या गाडीतून त्यांच्या घरी पाठवलं.

फोटो स्रोत, BABU JAGJIVANRAM FOUNDATION
दुसऱ्या दिवशी सुरेश राम यांनी कश्मीरी गेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. इथे त्यांनी अनिलला सांगितलेल्या गोष्टीपेक्षा अगदी वेगळी गोष्ट सांगितली.
त्यांनी सांगितलं की, 20 ऑगस्ट रोजी सुमारे डझनभर लोकांनी त्यांचं अपहरण केलं.
त्यांनी जबरदस्तीने मला मोदीनगरला नेलं आणि तिथे काही कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडलं. आणि तसं करणार नाही म्हटल्यावर मारहाण करण्यात आली आणि बेशुद्ध पाडलं.
जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, मी ज्या महिलेसोबत कारमध्ये बसलो होतो तिच्यासोबत माझे आक्षेपार्ह स्थितीतले फोटो काढण्यात आले आहेत.
हे फोटो राजनारायण यांच्या हाती लागले
नीरजा चौधरी सांगतात, "ओमपाल सिंग आणि केसी त्यागी अनेक दिवसांपासून सुरेश रामचा पाठलाग करत होते कारण ते विविध कामांमध्ये गुंतले होते. दिल्लीतील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुरेश रामची मैत्रीण असल्याचं त्यांना माहीत होतं."
"ते पोलरॉइड कॅमेर्यातून त्यांचे नग्न फोटो काढायचे. सुरेश राम आणि त्याच्या मैत्रिणीचे फोटो मिळावे म्हणून या दोघांनीही पुरेपूर प्रयत्न केला."
हे फोटो त्यांना सुरेश राम चालवत असलेल्या गाडीत सापडले.
फोटो मिळताच ते दोघेही त्यांचे नेते राजनारायण यांच्याकडे गेले. त्याच रात्री राजनारायण यांना भेटण्यासाठी जगजीवन राम कपिल मोहन यांच्या घरी आले. दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली.
संभाषणातून काहीच परिणाम निघाला नाही आणि जगजीवन राम रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी त्यांच्या घरी परतले. ते गेल्यानंतर राजनारायण कपिल मोहन यांना म्हणाले, 'आता ते नियंत्रणात आले आहेत.'

फोटो स्रोत, DHARMENDRA SINGH
दुसऱ्या दिवशी राजनारायण यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण घटनेची माहिती दिली.
पत्रकार फर्जंद अहमद आणि अरुल लुईस यांनी इंडिया टुडेच्या 15 सप्टेंबर 1978 च्या अंकात लिहिलंय की, "राजनारायण यांना विचारण्यात आलं की ओमपाल सिंगला हे फोटो कसे मिळाले."
"त्यावेळी राजनारायण म्हणाले की, ओमपाल सिंगने सुरेश राम यांच्याकडे सिगारेट मागितली. त्यांनी सिगारेट देण्यासाठी त्यांच्या कारचा ग्लोव्ह बॉक्स उघडला, तेव्हा ते फोटो सिगारेटच्या पाकिटासह खाली पडले."
"ओमपाल सिंग यांनी ते फोटो घेतले आणि सुरेश राम यांना परत केले नाहीत. ते फोटो परत मिळवण्यासाठी सुरेश रामने त्यांना पैशाचं प्रलोभनही दिलं."
फोटो संजय गांधींजवळ पोहोचले
राजनारायण यांच्याकडे सुरेश राम आणि त्यांच्या मैत्रिणीचे सुमारे 40-50 फोटो होते. त्यांनी कपिल मोहनला जवळपास 15 फोटो दिले आणि बाकीचे स्वतःकडे ठेवले.
नीरजा चौधरी पुढे सांगतात, "राजनारायण घरी जाण्यासाठी निघताच कपिल मोहनने त्यांचा भाचा अनिल बालीला हे फोटो संजय गांधींकडे घेऊन जाण्यास सांगितलं. बाली रात्री 1 वाजता संजय गांधींच्या 12 विलिंग्टन क्रिसेंट रोडवरील निवासस्थानी पोहोचले. संजय गांधी झोपले होते, त्यांना उठवण्यात आलं."
संजय गांधी म्हणाले, "ही वेळ आहे का येण्याची? यावर बाली यांनी सुरेश रामचे फोटो त्यांच्याकडे दिले. संजय गांधी एक शब्दही न बोलता घरात गेले आणि इंदिरा गांधींना उठवलं."

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जनता पक्षाचे खासदार कृष्णकांत यांच्या टेलिग्राफ लेनमधील घरात फोन वाजला.
दुसऱ्या बाजूला जगजीवन राम होते. फोन ठेवताच त्यांनी घरच्यांना सांगितलं की, 'आणखीन एका मुलाने आपल्या बापाला बुडवलं'
मनेका गांधींनी त्यांच्या मासिकात हे फोटो छापले
दहा मिनिटांनी संरक्षणमंत्र्यांची अधिकृत गाडी कृष्णकांत यांच्या घराजवळ येऊन थांबली.
त्या गाडीत बसून कृष्णकांत जगजीवन राम यांच्या घरी गेले. जगजीवन राम यांनी सर्वांना खोलीतून बाहेर जायला सांगितलं.
नीरजा चौधरी लिहितात, "जेव्हा दोघेही खोलीत एकटेच राहिले तेव्हा जगजीवन राम त्यांच्या जागेवरून उठले आणि कृष्णकांतच्या पायावर टोपी ठेवत म्हणाले, 'आता माझी अब्रू तुमच्या हातात आहे.'
कृष्णकांत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये असलेल्या आपल्या ओळखीतून जगजीवन राम यांची मदत करण्याचा प्रयत्न केला.
इंडियन एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर सईद नक्वी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये सुरेश राम यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
भारतातील प्रत्येक वृत्तपत्राने या बातमीवर मौन बाळगलं होतं. पण संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी 46 वर्षीय सुरेश राम आणि त्यांच्या मैत्रिणीचे ते नग्न फोटो सूर्या या मासिकात प्रसिद्ध केले.
त्या बातमीचं शीर्षक होतं 'रिअल स्टोरी'. सूर्याचा तो अंक ब्लॅक मध्येही विकला गेला आणि जगजीवन राम यांची भारताचे पंतप्रधान होण्याची इच्छा संपुष्टात आली.
ते फोटो खुशवंत सिंग यांच्यापर्यंतही पोहोचले होते
प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी त्यांच्या 'ट्रुथ, लव्ह अँड लिटिल मॅलिस' या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केलाय. ते लिहितात, की एके दिवशी दुपारी माझ्या डेस्कवर एक पाकीट आलं. यात जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश राम आणि एका महाविद्यालयीन मुलीचे खाजगी फोटो होते.
खुशवंत सिंग लिहितात, "त्याच दिवशी संध्याकाळी एक माणूस माझ्याकडे आला. तो जगजीवन राम यांच्याकडून आल्याचा दावा त्याने केला."
"तो म्हणाला की, जर हे फोटो नॅशनल हेराल्ड आणि सूर्यामध्ये प्रकाशित झाले नाहीत, तर बाबूजी मोरारजी देसाईंची साथ सोडून इंदिरा गांधींच्या बाजूने येतील. मी ते फोटो घेऊन इंदिरा गांधींकडे गेलो."
खुशवंत सिंग पुढे लिहितात, "जेव्हा मी त्यांना जगजीवन राम यांचा प्रस्ताव सांगितला तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या, माझा त्या व्यक्तीवर अजिबात विश्वास नाही."

फोटो स्रोत, PENGUIN INDIA
"इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जगजीवन रामने मला आणि माझ्या कुटुंबाला मोठं नुकसान पोहोचवलंय. त्यांना सांगा आधी बाजू बदला, मगच मी मनेकाला ते फोटो प्रकाशित करू नको असं सांगेन."
सूर्या आणि नॅशनल हेराल्ड या दोघांनी ठराविक ठिकाणी काळ्या पट्ट्या लावून ते सर्व फोटो प्रकाशित केले.
मोरारजी देसाईंच्या राजीनाम्यानंतर जगजीवन राम हेच पंतप्रधानपदाचे सर्वात मोठे दावेदार असू शकतात हे इंदिरा गांधी आणि चरणसिंग या दोघांनाही माहीत होतं. पण हे प्रकरण बाहेर येताच ते आपल्याच कोषात गुरफटले आणि त्यातून कधीच बाहेर येऊ शकले नाहीत.
इंदिरा गांधी जेव्हा चरण सिंग यांच्या भेटीला गेल्या
सभागृहाचा अवमान केल्याच्या आरोपावरून इंदिरा गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. आणि सभागृहाचं अधिवेशन होईपर्यंत त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं.
इंदिरा गांधींनी चरणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त 23 डिसेंबरला तिहार तुरुंगातूनच पुष्पगुच्छ पाठवला. 27 डिसेंबर रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
सुटका होत असताना तिहार तुरुंगातील अधिकारी आणि जवानांनी त्यांना आदरपूर्वक अभिवादन केलं. याच दिवशी चरणसिंग यांचा मुलगा अजित सिंगला जयंत नामक मुलगा झाला.
चरणसिंग यांनी सत्यपाल मलिक यांच्यामार्फत इंदिरा गांधींना संदेश पाठवला की, "श्रीमती गांधी आमच्या घरी चहा प्यायला आल्या तर मोरारजींचा बंदोबस्त होईल."
इंदिरा गांधी चरणसिंग यांच्या घरी पोहोचल्या. यावेळी गेटवरच त्यांचं स्वागत करण्यात आलं.
दुसरीकडे, इंदिरा गांधींनाही असं दाखवायचं होतं की, जनता पक्षाच्या असंतुष्ट नेत्यांना भेटून त्या उपद्रव तयार करू शकतात.
इंदिराजींनी पाठिंबा काढून घेतला
या सगळ्याची परिणीती अशी झाली की मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि चरणसिंग पंतप्रधान झाले. शपथ घेतल्यानंतर चरणसिंग यांनी इंदिरा गांधींना फोन करून सांगितलं की, ते त्यांच्या निवासस्थानी विलिंग्टन क्रिसेंट येथे येऊन त्यांचे आभार मानतील.

फोटो स्रोत, Getty Images
नीरजा चौधरी सांगतात, "चरण सिंह बिजू पटनायक यांना भेटण्यासाठी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथून परतत असताना ते इंदिरा गांधींच्या निवासस्थानी थांबणार होते, पण त्याचवेळी त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सल्ला दिला की तुम्ही का त्यांच्या घरी जाताय? आता तुम्ही पंतप्रधान आहात, त्यांनी तुम्हाला भेटायला यायला पाहिजे. मग चरणसिंग यांनी इंदिरा गांधींच्या निवासस्थानी न जाण्याचा निर्णय घेतला."
एखाद्या चित्रपटाचंही दृश्य फिकं पडेल असं ते दृश्य होतं.
नीरजा सांगतात, "इंदिरा गांधी हातात पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या घराच्या पोर्टिकोमध्ये चरणसिंगची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधींच्या निवासस्थानी सत्यपाल मलिकही उपस्थित होते. जवळपास 25 काँग्रेस नेते चरणसिंग यांना भेटण्यासाठी थांबले होते."
"चरणसिंगांच्या गाड्यांचा ताफा त्यांच्या निवासस्थानी येण्याऐवजी इंदिराजींच्या डोळ्यांसमोरून भरकन निघून गेला. इंदिरा गांधींचा चेहरा रागाने लालबुंद झाला."
इंदिरा गांधींनी तो पुष्पगुच्छ जमिनीवर फेकून दिला आणि घरात निघून गेल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांनी हे पाहिलं होतं.
सत्यपाल मलिक म्हणतात, "चरणसिंग यांचं सरकार आता काही दिवसांचंच पाहुणे असल्याचं मला त्याच वेळी वाटलं."
नंतर चरणसिंग यांनी आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. इंदिराजींनी त्यांना 'आता नाही' असा संदेश पाठवला.
चरणसिंग पंतप्रधान झाल्यानंतर 22 दिवसांनी इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








