अभिजित सावंत : ‘मी छोट्या कुटुंबातून असल्यामुळे मला तिथं जागा मिळवणं खूप अवघड होतं’

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसीसाठी

2004 साली भारतात टेलिव्हिजनवर एक सिंगिंग रिअॅलिटी शो आला होता. त्या शोचं नाव होतं इंडियन आयडॉल.

अमेरिकन टीव्ही शो अमेरिकन आयडॉलच्या धर्तीवरच या शो ची निर्मिती करण्यात आली होती. आणि या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता होता महाराष्ट्राचा अभिजीत सावंत.

या शोच्या माध्यमातून मुंबईच्या अभिजीतचा आवाज देशभरात पोहोचला. हा टीव्ही शो तर अख्या भारतभर तुफान हिट ठरला होता.

त्या शोमध्ये कंटेस्टंटला जिंकवण्यासाठी मॅसेज करावे लागायचे. आणि अभिजीतसाठी संपूर्ण देशभरातून मॅसेज करण्यात आले. आणि सरतेशेवटी तो फर्स्ट सिझनचा विजेता ठरला.

तो विजेता झाला आणि लगेचच काही दिवसांत त्याचा 'मोहब्बतें लुटाऊँगा' नावाचा नवीन अल्बम आला. लोकांनी तो अल्बमही अक्षरशः डोक्यावर घेतला.

त्याच्या गाण्याने त्याला केवळ प्रसिद्धीच नाही तर अनेक संधी सुद्धा मिळवून दिल्या.

त्याला रिअॅलिटी शो नच बलियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. एकेकाळचा हा आयडॉल आता मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून खूपच दूर आहे. तो नक्की आहे कुठे आणि आजकाल करतो काय? 

अभिजीत आणि त्याचं कुटुंब

अभिजीत सावंत हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत मुंबईतील गोरेगाव परिसरात राहतो. 

त्याने गाण्यालाच आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलंय. त्याने आणि त्याच्या पत्नीने शिल्पा सावंतने नच बलिए या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. 

शिल्पा होम बेकर आहे आणि ती घरी केक बनवते. अभिजीत त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याची नवनवीन गाणी लाँच करत असतो.

याव्यतिरिक्त अभिजीत सावंत बऱ्याच इंटरनॅशनल इव्हेंट्स आणि कॉन्सर्ट्समध्ये लाईव्ह शो परफॉर्म करत असतो.

त्याचा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओदेखील आहे. तिथंच तो त्याच्या गाण्यांचा रियाज करतो, स्वतःची गाणी कंपोज करतो.

गाण्याव्यतिरिक्त अभिजीत सावंतने लॉटरी या चित्रपटात काम केलंय. त्याचसोबत तो अक्षय कुमारच्या तीस मार खान या चित्रपटातही दिसला होता. 

बीबीसीबरोबर बोलताना अभिजीत सावंत संगतो, "ज्या उत्साहाने लोक आजही मला भेटतात ते बघून मला खूप आश्चर्य वाटतं."

तो पुढं सांगतो की, फरक फक्त इतकाच आहे की, जेव्हा तरुण मुलंमुली येतात आणि सांगतात की, आमचे मम्मी पप्पा तुमचे खूप मोठे फॅन आहेत ,तेव्हा बदल झालाय असं जाणवतं. पूर्वीचे यंगस्टर्स मला म्हणायचे की मी तुमचा फॅन आहे. आता त्यांचं वय वाढलंय. पण आजही त्यांना मी आवडतोय हे ऐकून आनंद वाटतो."

गणेश उत्सव आणि नवरात्रीमध्ये गाणी म्हणायचा...

आपल्या जुन्या आठवणींविषयी अभिजित सांगतो, "मी तेव्हा 21 वर्षांचा असेन आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं. सोबतच गाणं ही सुरू होतं."

"मला तेव्हा म्युजिकमध्ये करिअर करायचं होतं, पण ते तितकंच अवघड देखील होतं. खूप मोठ्या उंचीवर जाऊ हे अजिबातच वाटत नव्हतं.

कदाचित माझे आई वडील संगीत क्षेत्रातील नसल्यामुळे मला तसं वाटत असेल. मग मी गणपती , नवरात्रीमध्ये गाणी म्हणायला सुरुवात केली. छोट्या छोट्या सोसायटीज मध्ये जाऊन मी माझे शो करायचो. त्यातून माझी थोडीफार कमाई व्हायची आणि गाणं शिकण्यासाठी जी फी लागायची त्याचीही सोय व्हायची."

अभिजीत पुढं सांगतो, "मला आजही आठवतंय मुंबईतील दादरमध्ये इंडियन आयडॉलच्या ऑडिशन्स सुरू होत्या. तिथं खूप कमी लोक आले होते.

कारण हा नेमका कसला शो आहे त्यांना माहीतच नव्हतं. मग टाईमपास करावा म्हणून माझे बरेच मित्र लाईनमध्ये उभे राहिले आणि निघूनही गेले"

तो पुढं सांगतो, "पण मी तिथंच थांबलो, मी ऑडिशन दिली. हळूहळू याचं प्रमोशन सुरू झालं, तेव्हा सगळ्यांना समजलं की हा खूप मोठा शो आहे. अशाप्रकारे छोट्या स्टेजवरून मी इंडियन आयडॉलच्या मोठ्या स्टेजवर आलो. त्यांच्या माध्यमातून मी जगासमोर आलो."

...आणि आयुष्य असं बदललं

तो सांगतो की, इंडियन आयडॉलचा पहिला शो इतका लोकप्रिय होईल असं कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं.

अभिजीत सांगतो, "मी शो जिंकल्यावर घरी आलो तेव्हा आमच्या छोट्याश्या बीएमसी क्वार्टरच्या बाहेर खूप गर्दी जमली होती. जणू काही भारताने पाकिस्तानला हरवलंय आणि कोणीतरी क्रिकेटर तिथे येऊन बसलाय. लोकांनी ढोल ताशे आणि बँड आणला होता." 

 तो सांगतो, "माझ्या घराबाहेर एक छोटं ग्राऊंड आहे तिथं लोकांनी गर्दी केली होती. कॉलनी, सोसायटीच्या लोकांना सोडून बाहेरून बरेचसे लोक आले आले होते. एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं, ती एक वेगळीच क्रेझ होती." 

अभिजीत सांगतो, "तेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हतं. त्यामुळे कोणतेही ऍक्टर अप्रोचेबल नव्हते. पण अशाहीवेळी लोकांकडून खूप सारं प्रेम मिळालं."

'मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं'

इंडियन आयडॉलचा विजेता झाल्यावर आयुष्य सोपं झालं का? 

या प्रश्नावर अभिजीत सावंत सांगतो, "अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनी जी स्तुती केली ती ऐकून भारावून गेलो. लोकांकडून मिळालेलं प्रेम आंनद यातून काही दिवसांनी सावरणं गरजेचं होतं."

मी या इंडस्ट्रीतून नव्हतो, त्यामुळे मी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही. जसा शो संपला तसं दुसऱ्या दिवशी एका मासिकाने त्यांच्या फ्रंट पेजवर मी शोमध्ये हेराफेरी केल्याची बातमी छापली.

अभिजीत पुढे सांगतो, "हे वाचल्याबरोबर माझी ट्रेनिंग सुरू झाली होती. या इंडस्ट्रीत कसं राहायचं आहे, निगेटिव्हिटीपासून स्वतःला लांब कसं करायचं हे मी शिकलो.

त्यानंतर आणखीन एक बातमी आली ज्याचं हेडिंग होतं, अभिजीत सावंत झाला बेघर. दुसरी आणखीन एक बातमी होती, ज्यात म्हटलं होतं की, मला मुंबईच्या नव्हे तर दिल्लीच्या मुली आवडतात."

"अजून एक विचित्र बातमी छापून आली होती. खरं तर मी मुंबईत एका कार्यक्रमाला गेलो होतो. आणि सतत ट्रॅव्हलिंग करून मी जाड झालो होतो आणि त्यात मी घट्ट असा टीशर्ट घातला होता. त्यात माझं पोट दिसत होतं.

तिथंच कोणीतरी माझा फोटो काढून पेपरमध्ये छापला आणि त्याखाली लिहिलं होतं की, याला यश पचलेलं दिसत नाहीये. आज पण रोज माझ्या वाचनात येतं की मी कुठंतरी गायब झालोय."

शो संपल्यानंतरचे अनुभव 

अभिजीत त्याच्या वाईट अनुभवांविषयी सांगतो की, "शो मोठा असल्याने लोकांनी स्वतःचं स्वतःची मतं बनवली होती. जेव्हा शो सुरू होता तेव्हा आमच्यासोबत एक पीआर एजंट होता. तेव्हा आमच्याबद्दल चांगले लेख, बातम्या छापल्या जायच्या."

पण जसं शो संपला आणि तो खऱ्या जगात आला तसा मीडिया, लोक सगळेच बदलले.

मी एकदिवस माझ्या पीआर एजंटला फोन केला. शो दरम्यान खरंतर आमची मैत्री झाली होती. पण फोनवर तो माझ्याशी नीट बोललाच नाही. त्याने मला अमुक एकाशी बोल तमुक एकाशी बोल असं सांगितलं.

थोडक्यात तुझं तू बघ असं त्याला म्हणायचं होतं. तेव्हा मला समजलं की आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्यापद्धतीने जग चालत नाही. आणि मी छोट्या कुटुंबातून असल्यामुळे मला तिथं जागा मिळवणं खूप अवघड होतं.

पण अभिजीत सावंतने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आणि आजही त्याच्याकडे कामाची कमतरता नाहीये. 

तो राजकारणातही सक्रिय होता, त्याने काही काळापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2010 मध्ये, त्याला हिट-अँड-रन प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र आपण कोणतीही नशा केली असल्याचं त्याने नाकारलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)