You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेडात मराठे वीर दौडले सात : संभाजीराजेंचा सिनेमाला विरोध, कलाकार निवडीवरही आक्षेप
चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतेच 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. पण या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे.
मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2023 च्या दिवाळीला हा चित्रपट येईल असे निर्मात्यांनी सांगितले आहे.
वसीम कुरेशी यांच्या कुरेशी प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांचा चित्रपटाला विरोध
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठी वीर दौडले सात या चित्रपटाला विरोध दर्शवला.
ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. पण, पगडी काढलेली मावळे दाखवण्यात आली आहे तो शोकसंदेश असतो. इतिहासाची मोडतोड करून सिनेमा काढले गेले तर आम्ही अजिबात सहन करणार नाही."
यादरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्या पात्राचा फोटोही दाखवला, ते म्हणाले, "हे मावळे वाटतात का?"
"सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही," असंही संभाजीराजे म्हणाले.
"असे सिनेमा लोकांपुढे कसे घेऊन जायचे? शिवाजी महाराज, त्यांचे मावळे ही आपली प्रेरणा आहे. त्यात सिनेमॅटिक लिबर्टी कशी चालेल? इतिहासाचा गाभा का सोडत आहेत? असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "भालजी पेंढारकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा काढले होते. त्यांच्यावर कुणी आक्षेप घेतला का? सिनेमा बनवणाऱ्यांनी पेंढारकरांचा यांचा आदर्श घ्यावा. मात्र, अशा प्रकारचे सिनेमे काढले तर गाठ संभाजीराजेंशी आहे, हे मी सगळ्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना सांगू इच्छितो. चुकीचे सिनेमा आणलेत तर मी तुम्हाला आडवा येणारच हे लक्षात ठेवा."
"माझी सरकारला विनंती आहे की असे सिनेमा तयार होणार असतील तर सरकारने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमावी. माझी सगळ्या इतिहासकारांना आणि अभ्यासकांना विनंती आहे की त्यांनीही या मध्ये लक्ष घालावं. सरकारने यामध्ये लक्ष द्यावं नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे कुणी विसरू नये, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर यासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी टाकली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटन संतोष शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट करून चित्रपटाला विरोध दर्शवला.
"वेडात मराठी वीर दौडले सात चित्रपटात शेंबडी, बाईमाणसासारखी पोरं घेऊन ते मावळे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवत आहेत. हे सगळं थोतांड आहे. जाणीवपूर्वक इतिहासाचं विकृतीकरण करण्यात येत आहे," असा आरोप शिंदे यांनी केला.
अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
'वेडात मराठी वीर दौडले सात' चित्रपटात चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे.या चित्रपटाचा फर्स्ट लूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी अक्षय कुमारने मराठीत एक छोटेखानी भाषण केले.
अक्षय कुमार म्हणाला की, हा चित्रपट मला कसा मिळाला याची गोष्ट सांगणे आवश्यक आहे. राज ठाकरेंनी मला म्हटले की मी शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी याबद्दल विचार करावा.
या चित्रपटासाठी आणि भूमिकेसाठी मी योग्य वाटलो यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी माझी सर्व शक्ती पणाला लावून ही भूमिका साकारणार आहे असे अक्षय कुमारने म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व एका अभिनेत्यामध्ये हवे होते त्या सर्व गोष्टी अक्षय कुमारमध्ये मला आढळल्या म्हणून मी अक्षय कुमारची निवड केली असे महेश मांजरेकर यांनी म्हटले.
या चित्रपटामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अभिनेते प्रवीण तरडे आहेत.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम तसंच याच सीझनमध्ये स्पर्धक असलेले जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे हेसुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत.
विशाल निकम चंद्राजी कोठारांच्या भूमिकेत दिसेल. सूर्याजी दांडकरांच्या भूमिकेत उत्कर्ष शिंदे तर तुळजा जामकरांच्या भूमिकेत जय दुधाणे आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला हार्दिक जोशीही 'वेडात मराठे वीर दौडले सात'मध्ये आहे. हार्दिक मल्हारी लोखंडेंच्या भूमिकेत आहे.
तर महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा दत्ताजी पागे यांच्या भूमिकेत आहे.
प्रतापराव गुजर कोण होते?
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी बलिदानाने इतिहास अजरामर केला आहे. त्यांच्या शौर्याची आठवण करून देणारी नेसरी पावनखिंड.
प्रतापरावांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हाणे तर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी असे होते. शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्दीच्या जोरावर स्वराज्याचे सरनोबत झाले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना " प्रतापराव " किताब देऊन गौरवण्यात आलं.
विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर 1673 मध्ये आक्रमण केले. विजापूरच्या राज्यातील प्रमुख सरदार खवासखान, अब्दुल मुहम्मद, अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान इत्यादींनी आपापल्या मर्जीप्रमाणे विजापूर राज्यातील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली होती. खवासखानाकडे विजापूरचे मुख्यप्रधानपद आले होते. महाराजांचा डोळा पूर्वीपासूनच सातारा, कोल्हापूर भागांबर होता. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला (6 मार्च 1673). सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली.
बहलोलखानाशी झालेल्या युद्धात (मार्च 1673) उमरानी येथे सेनापती प्रतापराव गुजर यांनी खानाला कोंडले आणि नंतर मैदानातून जाऊ दिले. याचा बोल महाराजांनी लावला, तेव्हा 24 फेब्रुवारी 1674 रोजी नेसरी येथे प्रतापरावाने बहलोलखानावर हल्ला केला. या लढाईत प्रतापराव यांचा मृत्यू झाला.
शिवाजी महाराजांनी बागलाण आणि डांग वाटेने पुढे सुरतेवर हल्ला चढविला 3 ते 5 ऑक्टोबर 1670 सुरतेतील समृध्द व्यापारी, पेढीवाले आणि सावकार यांची संपत्ती हरण करण्यात आली. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, वेंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे आदी होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)