You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराजांचा पुतळा माऊंट एव्हरेस्टजवळ उभारला तेव्हा...
- Author, उमेश झिरपे
- Role, ज्येष्ठ गिर्यारोहक, पुणे ,बीबीसी मराठीसाठी
गोरक्षेप, 17 हजार फूट उंचीवर वसलेले ठिकाण. हा एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या आधीचा थांबा. येथे जेव्हा ट्रेकर्स येतात, तेव्हा येथून दिसणाऱ्या विलोभनीय सुंदरतेने भारावून जातात. माऊंट एव्हरेस्ट, माउंट ल्होत्से व इतर अनेक शिखरांचे मनमोहक दृश्य येथे पाहायला मिळते.
दरवर्षी जगभरातून लाखाहून अधिक ट्रेकर्स एव्हरेस्टच्या 'याची देही याची डोळा' दर्शनासाठी ट्रेकला येत असतात, ते या गोरक्षेपला आवर्जून थांबतात व येथील नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात.
बरं हे गोरक्षेप काही फार मोठे गाव नाही, येथे आहेत फक्त 5-6 'हट'वजा हॉटेल्स. येथे येणाऱ्या पर्यटक- ट्रेकर्सला सोयी सुविधा पुरवून येथील लोक गुजराण करतात.
गिरिप्रेमी संस्थेने जेव्हा 'पुणे- एव्हरेस्ट 2012' ही मोहीम जाहीर केली होती. भारतातून एव्हरेस्ट शिखरावर आयोजित केलेली ही सर्वांत मोठी नागरी मोहीम होती.
या मोहिमेच्या सर्वंकष तयारीसाठी मोहिमेच्या एक वर्ष आधी, म्हणजे 2011 साली मी व माझा सहकारी भूषण हर्षे एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो होतो.
एव्हरेस्ट मोहिमा कशा चालतात, तेथील आव्हाने, पूर्वतयारी याची कल्पना घेणे, हा उद्देश होता. या बेस कॅम्प ट्रेक दरम्यान आम्ही जेव्हा गोरक्षेपला गेलो, तेव्हा येथील नितांत सुंदर व भव्य रूपाने आम्हाला देखील भुरळ घातली.
आम्ही हा परिसर जेव्हा न्याहाळत होतो, तेव्हा एका ठिकाणी काहीशी गर्दी दिसली. येथे काही मंडळी एका 'मेमोरियल' लिहिलेल्या पाटीचे फोटो काढत होते.
ही पाटी म्हणजे काही वर्षांपूर्वी नेपाळ सरकारच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळाने काठमांडूहून थेट गोरक्षेपला हेलिकॉप्टरने येत, ऑक्सिजन मास्क लावून या ठिकाणी चक्क कॅबिनेट बैठक भरविली होती. या बैठकीत 'क्लीन हिमालय, क्लीन एव्हरेस्ट'चा ठराव मान्य करण्यात आला.
नेपाळ सरकारच्या या ठरावाला जगभरात भरपूर प्रसिद्धी मिळाली. यातून एव्हरेस्ट व हिमालयातील स्वच्छतेचे महत्त्व देखील अधोरेखित झाले. यातून नेपाळ सरकारला सदर मोहिमेसाठी भरपूर निधी मिळाला, ज्याचा उपयोग पुढील अनेक वर्षे नेपाळ सरकारद्वारे केला गेला.
अशी सुचली महाराजांच्या स्मारकाची कल्पना
या संपूर्ण ठरावाची, बैठकीची माहिती एका पाटीवर लिहिण्यात आली होती व ट्रेकर्स या पाटीचा फोटो काढण्यात व्यग्र होते. मला यात एव्हरेस्टचं, गोरक्षेपचं वलय गवसलं.
हे बघता बघता माझ्या मनात पहिला विचार आला की, या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असायला हवे.
छत्रपती शिवाजी महाराज ऋषितुल्य आहेतच, त्यांच्या कर्तृत्वाची, शौर्याची गाथा एव्हरेस्टच्या सान्निध्यात हवी, असे मला मनोमन वाटले व हा विचार मी भूषणजवळ बोलून दाखवला. पण असे स्मारक उभे करणे मोठे काम होते.
मनात इच्छा तीव्र होती, मात्र हे सत्यात उतरविण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागणार होता.
लगेच जरी शक्य झाले नाही तरी कधी ना कधी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचेच, असे मनाशी पक्के करून आम्ही पुण्यात परतलो व मोहिमेच्या कामाला लागलो.
'गिरिप्रेमी'च्या 'पुणे- एव्हरेस्ट 2012' मोहिमेची अधिकृत घोषणा करण्याचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. तेव्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलत असताना मी ओघानेच गोरक्षेप येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या मोहिमेच्या निमित्ताने उभे राहिले, तर ते जगातील सर्वोच्च ठिकाणी असलेले स्मारक असेल, असा विचार मी बोलून दाखवत होतो, माझे वाक्य संपण्याआधीच बाबासाहेबांनी माझ्याकडून माईक घेत घोषणा केली, "जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट परिसरात समुद्र सपाटीपासून सर्वांत उंच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी जे काही लागेल, ते मी देणार!"
छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही जगप्रसिद्ध आहेच, तरीही अशा स्मारकाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य नव्याने पोहोचवता येतील, हाच विचार त्यामागे होता.
बाबासाहेबांनी स्वतः जातीने स्मारक बनविण्यासाठी लक्ष घातल्याने आमच्यावरील जबाबदारी आणखी वाढली. यासाठी मी सर्वांत प्रथम नेपाळमधील आमचा मित्र वांगचू शेर्पाशी बोललो. त्याला या स्मारकाबद्दल सांगितले. काहीही झाले तरी हे स्मारक आपण उभारणारच, असा शब्द त्याने मला दिला. सोबतीला छत्रपतींची मूर्ती काठमांडूपर्यंत पोहोचावा, बाकी पुढचे काम व्यवस्थितच होईल, असे आश्वासन दिले.
मी, इकडे पुण्यात कामाला लागलो. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार थोपटे पितापुत्रांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली जशी मूर्ती आहे अगदी हुबेहूब तसेच शिल्प घडविण्याची जबाबदारी घेतली.
या शिल्पाच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांनी अगदी बारकाईने लक्ष दिले. थोपटे यांच्या धायरी येथील स्टुडिओला 4-5 वेळा भेट देऊन अनेक बारकावे समजावून सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वांत उंच ठिकाणी असलेले स्मारक हे अव्वल दर्जाचेच हवे, यासाठी बाबासाहेब आग्रही होते.
थोपटे पितापुत्रांनी देखील जीव ओतून शिल्प घडविले. गोरक्षेपला वर्षातील सहा महिने हिमवृष्टी आणि सहा महिने ऊन असते. अशा वातावरणात कमीतकमी 75 वर्षं टिकेल एवढी दणकट, वजनाने हलकी आणि रायगडावर असलेल्या मूर्तीच्या तंतोतंत असलेली मूर्ती आम्हाला प्रदान केली.
आम्ही अक्षरशः गनिमी काव्याने ही मूर्ती काठमांडूला पोहोचवली. पुढे गोरक्षेपला, एव्हरेस्टच्या साथीने हे स्मारक डौलाने उभे राहिले. या स्मारकाच्या ठिकाणी माहिती स्वरूपात काय असावे, हे देखील बाबासाहेबांनीच लिहून दिले. इंग्रजी, फ्रेंच, नेपाळी व जपानी अशा चार भाषांमध्ये हा मजकूर स्मारकाजवळ लिहिलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रदान सोहळा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. गोरक्षेप येथे असा पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी बातमी जेव्हा स्थानिक नेपाळी- शेर्पा लोकांना समजली तेव्हा त्यांचा काहीसा विरोधाचा सूर होता.
एकतर गोरक्षेप हे 'सगरमाथा नॅशनल पार्क'चा भाग आहे, त्यात तिथे स्थानिकांची प्रतीके फारच तुरळक प्रमाणात उभी केलेली आहेत. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कशाला, असा प्रश्न साहजिक होता.
आम्ही स्थानिक शेर्पांशी बोललो. गोरक्षेपला हा पुतळा जिथे उभा करणार होतो, ते हिमालयन लॉज पसांग शेर्पा या माझ्या मित्राचा आहे. त्याला विश्वासात घेऊन त्याच्या कडून काही फुटांची जागा अक्षरशः विकत घेऊन स्मारक उभारले. त्याला या स्मारकाचे विश्वस्त देखील केले.
तसेच स्थानिकांना हे आम्ही पटवून दिले की, "शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी देवच आहेत. आम्ही त्यांना भगवान शंकराचे अंश मानतो, त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असेल तर आमची मोहीम सुखरूप होईल. श्रद्धाळू शेर्पा समाज भगवान शंकराला मानणारा आहे. आमचे म्हणणे त्यांना पटले व त्यांचा काहीसा विरोधाचा सूर आपसूकच मावळला अन छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा डौलाने एव्हरेस्टजवळ उभा राहिला.
फक्त स्मारक करून आम्ही थांबलो नाही. खुम्बू खोऱ्यातील स्थानिक गरीब शेर्पा लोकांच्या शाश्वत विकासासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेर्पा सोशल प्रोजेक्ट' देखील या निमित्ताने गिरिप्रेमी हाती घेतला. याअंतर्गत स्थानिक शेर्पा लोकांसाठी विविध उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात.
याच भागातील दोन होतकरू व हुशार मुलींना पुण्यात शिक्षणासाठी घेऊन येऊन त्यांची संपूर्ण जबाबदारी गिरिप्रेमी व असीम फाऊंडेशन यांनी उचलली आहे.
त्याठिकाणी गेली 10 वर्षे जे काम चालू आहे, त्यामुळे स्थानिकांच्या मनात छत्रपतींच्या स्मारकाविषयी अतिशय आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
आज जेव्हा भारतातील, महाराष्ट्रातील ट्रेकर्स दीड- दोन आठवडे 75 किलोमीटर्सचा ट्रेक करत जेव्हा गोरक्षेपाला पोहोचतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्मारक एव्हरेस्टजवळ बघून हरखून जातात.
आपल्या महाराजांचा पुतळा एव्हरेस्टजवळ बघून उर अभिमानाने भरून आल्याशिवाय रहात नाही, असेच अनेकांनी आम्हाला सांगितले आहे.
जेव्हा हीच मंडळी आम्हाला उत्साहाने या स्मारकाविषयी सांगतात, तेव्हा आम्ही मनोमन सुखावतो व आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात… छत्रपती शिवाजी महाराज की…. जयssssss!
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)