You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र कसा होता?
आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असतो किंवा आपण तिथपासून पुढच्या इतिहासाचं वाचन करतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्र कसा होता? काय पार्श्वभूमी होती, कुणाचं राज्य होतं, महाराष्ट्र कुठल्या अवस्थेत होता? असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात.
'रिबेल्स सुल्तान्स' पुस्तकाचे लेखक मून. एस. पिल्लई यांनी याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी गणेश पोळ यांनी मनू. एस. पिल्लई यांच्याशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र कसा होता?
मनू एस. पिल्लई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या दख्खन प्रांतात सुलतानांचं राज्य होतं. तीन प्रमुख सल्तनती होत्या- विजापूरमध्ये आदिलशाही, गोवळकोंडामध्ये कुतुबशाही आणि अहमदनगरमध्ये निझामशाही. या तीनही राजसत्ता म्हणजे 1340 मध्ये स्थापन झालेल्या बहामनी साम्राज्याचे वारसदार होते. त्या काळचं राजकारण अतिशय गुंतागुंतीचं पण तितकंच रोचक होतं. प्रत्येक दरबारामध्ये वेगवेगळे गट होते. एक गट हबशींचा- हबशी हे आफ्रिकेतून लढण्यासाठी आणलेले गुलाम होते, पण दख्खनमध्ये आल्यावर त्यांची ताकद वाढली आणि ते महत्त्वाच्या पदांवर गेले. तसेच स्थानिक दख्खनी मुस्लीम होते, त्यांचा एक गट होता. त्या व्यतिरिक्त अफाकी- म्हणजे परदेशातून आलेले मुस्लीम होते, त्यांचा एक गट.
तसंच महाराष्ट्रात मराठा सामंतांचा एक गट होईल. गोवळकोंडामध्ये तेलुगू हिंदूंचा एक गट दरबारात असेल. आणि अखेरीस, दख्खनच्या या सुलतानांनी त्यांच्या नोकरशाहीत, म्हणजे दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या संख्येने ब्राह्मण अधिकारी सेवेत घेतले होते. अशा रितीने राजकीय पटावर अनेक खेळाडू कार्यरत होते. या सर्व खेळाडूंमध्ये समतोल साधणारा सुलतान सक्षम व समर्थ मानला जात असे. कारण, यातील एखाद्या गटाची शक्ती वाढली की इतर गटांना स्वाभाविकपणे ईर्षा वाटत असे आणि त्यांच्याकडून काही कारवाई होण्याची शक्यता निर्माण होत असे. त्यामुळे या गटांमध्ये समतोल राखून ठेवणं अतिशय महत्त्वाचं होतं.
दख्खनमधील आदिलशाही कशी होती?
मनू एस. पिल्लई : त्या वेळच्या सांस्कृतिक जीवनातसुद्धा वैविध्यपूर्ण प्रभाव दिसतात. उदाहरणार्थ, आदिलशाही सुलतान मुस्लीम असले, तरी हे तितकंच मर्यादित नव्हतं. पहिले आदिलशाही सुलतान युसुफ आदिल खान हे तत्कालीन इराणवरून आलेले परके मुसलमान होते, पण त्यांची पत्नी एका मराठा सामंताची बहीण होती. म्हणजे सुरुवातीपासूनच आदिलशाही सल्तनतीमध्ये फार्सी व मराठी समूहांची सरमिसळ झालेली होती. त्यातील काही सुलतान फार्सी वारशाला अधिक महत्त्व देत असत, तर काही सुलतान हिंदू किंवा मराठी वारशावर भर द्यायचे.
इस्माईल आदिल शाह फार्सीला जास्त पसंती देत असे- फार्सी भाषा आणि फार्सी पेहराव, आदींचा त्या वेळी प्रभाव होता. पण शिवाजी महाराजांच्या जन्माच्या तीन वर्षं आधी निधन पावलेले दुसरे इब्राहिम आदिलशाह यांच्या सत्ताकाळात मराठी भाषेला प्राधान्य होतं, त्या वेळी हिंदू प्रभाव दिसून आला, तसंच राज्यात सुफी संत होते, नाथपंथीसुद्धा होते. ब्राह्मणांशी त्यांच्या वादचर्चा होत असत. सुन्नी मुस्लीम असलेल्या या सुलतानाने एका लेखात स्वतःचं वर्णन सरस्वती व गणपती यांचा पुत्र असं केलं होतं. म्हणजे अनेकानेक धार्मिक व बौद्धिक प्रभाव आपल्याला या काळात दिसतात.
निझामशाही आणि कुतुबशाहीचा कारभार कसा सुरू होता?
मनू एस. पिल्लई : निझामशाहीमध्येसुद्धा असेच अनेक प्रभाव दिसतात. सगळे निझामशहा शिया मुस्लीम होते. त्यातील बहुतेकांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांचे मृतदेह इराकमधील कराबाला या शियांसाठी पवित्र असलेल्या शहरात नेऊन दफन केले जात. पण सर्व निझामशहा एका ब्राह्मणाचे वंशज आहेत. किंबहुना धर्मांतरानंतरसुद्धा त्यांचे आपल्या ब्राह्मण नातेवाईकांशी संबंध होते. निझामशाहीतील सुलतानांच्या काही पत्नी मराठी, तर काही फार्सी होत्या. किमान दोन सुलतानांच्या बेगम तर हबशी होत्या. असे निझामशाहीतसुद्धा अनेक प्रभाव दिसतात.
कुतुबशाहीचा विचार करायचा तर, अखेरच्या आदिलशाही सुलतानाच्या काळातील प्रधानमंत्री अकाण्णा व मदाण्णा ब्राह्मण होते. त्या सरकारच्या काळात खूप हिंदू प्रभाव होता. कुतुबशाही सुलतानांनी तेलुगू भाषेला मोठ्या प्रमाणात आश्रय दिला. क्षेत्रीयासारखा कवी त्यांच्या राजाश्रयाखाली होता. तर, कुतुबशाही दरबारातसुद्धा बहुविध प्रभाव दिसतात.
शिवाय, हे फक्त राजेशाही पातळीवरच होतं असं नाही. इतर पातळ्यांवरसुद्धा असेच अनेकवचनी प्रभाव दिसतात.
शिवाजी महाराजांचे आजोबा, मालोजी राजे भोसले- त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अनेक वर्षं मूल होत नव्हतं. त्यामुळे ते सल्ल्यासाठी एका साधूकडे गेले. त्या साधूने त्यांना दोन अपत्यं होतील, असा आशीर्वाद दिला. कालांतराने मालोजी राजांना दोन मुलगे झाले. या मुलांची नावं त्या साधूच्या नावावरून ठेवण्यात आली- त्यानुसार मोठा मुलगा होता शहाजी राजे, तर धाकट्याचं नाव होतं शरीफजी. तर, शहा शरीफ हे त्या साधूंचं नाव होतं- ते मुळात एक मुस्लीम सुफी संत होते. ही गोष्ट आपल्याला शिवाजी महाराजांच्या दरबारातील कविंद्र परमानंदांनी लिहिलेल्या 'शिवभारत' या ग्रंथातून कळते.
शिवभारत या पुस्तकात आणखी काय काय नोंदी आहेत?
मनू एस. पिल्लई : शिवभारत हा खूप रोचक स्त्रोतग्रंथ आहे. त्या महाकाव्यात शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून दख्खनचा तत्कालीन इतिहास सांगितला आहे. शिवाजी महाराज सर्वच सुलतानांना खलनायक ठरवत नाहीत, किंवा सगळ्या सुलतानांनी नकारात्मक कृत्यंच केली असंही ते म्हणत नाहीत. काही सुलतानांवर ते टीका करतात. त्यांच्या काळातील आदिलशाह व निझामशाह- तेव्हा निझामशाही लोप पावली होती, पण उत्तरकाळातील निझामशाह त्यात येतात- यांच्याबद्दल शिवभारतात नकारात्मक टिप्पणी आहे. पण आधीच्या काही सुलतानांबद्दल सकारात्मक टिप्पणीही केलेली आहे.
शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या काळातील सुलतानांचं वर्णन 'धर्मात्मा' असं केलेलं आहे. तसंच मलिक अंबर, जे मुळचे हबशी मुसलमान होते, त्यांनी मराठ्यांसोबत संयुक्त आघाडी उघडून जवळपास २५ वर्षं मुघलांचं दख्खनेवरील आक्रमण थोपवून धरलं. त्यांचीसुद्धा शिवाजी महाराजांनी खूप प्रशंसा केली आहे. किंबहुना, मलिक अंबरला एका ठिकाणी 'भगवान कार्तिकेया'सारखं संबोधलं आहे. कार्तिकेयाने असुरांचा विरोध केला, त्याप्रमाणे मलिक अंबरने मराठा सामंतांना सोबतीला घेऊन मुघलांना विरोध केला, असे उल्लेख शिवभारतात येतात.
शिवाजी महाराजांच्या आधीची दख्खनमधली परिस्थिती कशी होती?
मनू एस. पिल्लई : शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हाचा दख्खन प्रांत खूपच दुरावस्थेत होता. एका बाजूला, सर्वत्र दुष्काळ होता, बेसुमार दारिद्र्य होतं, लोकांची उपासमार होत होती, अनेक जण उपजीविकेसाठी मुलं विकत होती. दुसऱ्या बाजूला, मुघलांचं आक्रमण सुरू होतं. अत्यंत शक्तिशाली मुघल फौजांनी दख्खनेत शिरकाव केला होता. शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या काहीच वर्षं आधी, मुघलांचा एक प्रमुख विरोधक असणाऱ्या मलिक अंबरचा मृत्यू झाला होता. एक चांगले सुलतान राहिलेले इब्राहिम आदिलशाह यांचा मृत्यू झाला होता. शिवाजी महाराजांचे वडील, शहाजीराजे भोसले यांनी निझामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने ते यशस्वी झाले नाहीत.
अखेरीस निझामशाही पूर्णतः कोलमडून पडली. तर, हा अतिशय संकटाचा काळ होता. पण मुघलांचा विरोध करण्यासाठी संबंधित राजसत्तांना पैशाची गरज होती, पैशासाठी- म्हणजे महसुलासाठी- लोकांवर कर लावावा लागला असता, आणि तेव्हा लोक दुष्काळाला सामोरं जात असल्यामुळे त्यांना कर भरणं शक्य नव्हतं. तर, तेव्हाची एकंदर आर्थिक व राजकीय परिस्थिती खूपच वाईट होती.
स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हा...
आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन इतर सल्तनती टिकून असल्या तरी त्यांची परिस्थिती खूपच खालावली होती. खालून लोकांवर आर्थिक दबाव होतं, बाहेरून मुघलांचा दबाव होता. शिवाय, आधी सांगितल्याप्रमाणे, या राज्यसत्तांमध्ये अनेक गट कार्यरत होते. सर्वसामान्य परिस्थितीत एखादा सक्षम सुलतान या गटांना एकत्र आणून कारभार हाकत असे. पण संकटकाळात अंतर्गत समस्या आणि मतभेद वाढू लागले. त्यातून दख्खनच्या अवकाशात अंतर्गत अस्थैर्य व अनागोंदी निर्माण झाली. थोडक्यात, या इतर दोन सल्तनतींचीसुद्धा वेळ भरून चुकली होती. या काळात शिवाजी महाराजांनी काहीतरी नवीन निर्माण करण्याची संधी शोधली.
शिवाजी महाराजांच्या वडिलांनी सल्तनती राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी एक नवीन संधीचा अवकाश निर्माण केला, त्यातून अमूलाग्र परिवर्तनाच्या शक्यता खुल्या झाल्या. मुळात शिवाजी महाराज हे बुद्धिमान, सर्जनशील आणि अभिनव विचार करणारा माणूस व राज्यकर्ता होते. त्यामुळे मुघलांनी अखेरीस 1680 मध्ये कुतुबशाहीचा पाडाव केला, आदिलशहांचा वंशच संपवला, तरीसुद्धा त्यांचा विजय झाला नाही. त्यांना वाटलं की, सल्तनती संपुष्टात आल्यावर दख्खन आपल्या हातात येईल. पण दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्य स्थापन केलेलं असल्यामुळे मुघलांना नव्याने विरोध होऊ लागला. यातून भारतीय इतिहासाला वेगळं वळण मिळालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)