छत्रपती शिवाजी महाराजांची सतराव्या शतकातील चित्रं कशी सापडली?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे पुण्यातील इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी शोधली आहेत. या नव्या चित्रामुळे इतिहासात मोलाची भर पडल्याचं इतिहासकारांनी म्हटलं आहे.

जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालय, पॅरिस येथील एक खासगी वस्तुसंग्रहालय आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात महाराजांची चित्रे सापडली आहेत. ही चित्रं दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली आहेत.

प्रसाद तारे हे पुण्यातील इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य आहेत. इतिहास संशोधनानिमित्त ते युरोपातील अनेक संग्रहालयांना त्यांनी भेट दिलेली आहे.

तेथील संशोधकांशी त्यांनी चर्चा केली आहे. शिवाजी महाराजांची ही नव्याने समोर आलेली चित्रे जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेतील संग्रहालयात आढळून आली. यातील एक चित्र तारे यांनी स्वतः संग्रहालयात पाहिलं होतं.

इतर दोन चित्रं त्यांनी त्यांच्या मित्रांच्या तसेच संशोधकांच्या मदतीने शोधली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे हे संशोधन सुरू होतं.

ही कुठल्या शतकातील चित्रं आहेत?

ही नव्याने समोर आलेली चित्रं सतराव्या शतकातील शेवटच्या काळातील असावीत असे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

बलकवडे म्हणाले, ''मध्ययुगातील फार कमी ऐतिहासिक मराठा व्यक्तींची लघुचित्रे आहेत. आदिलशाहीतील, निजामशाहीतील, कुतुबशाहीतील आणि मुघलशाहीतील चित्रे सापडतात. परंतु शिवकाळातील चित्रं आपल्याकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे ही नव्याने समोर आलेली चित्रे दुर्मिळ आहेत.''

''ही जी उभी चित्रं आहेत ती दख्खनी चित्रं आहेत. शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेले होते. त्यावेळी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारातील चित्रकाराने एखादे चित्र काढले असावे.

"त्या चित्राच्या अनुषंगाने इतर चित्र काढली गेली असावीत. युरोपियन लोकांमध्ये जिज्ञासा असायची. ते चित्रांचा संग्रह करायचे. त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांबाबत देखील कुतूहल असायचे. त्यामुळे या महाराजांच्या चित्राच्या प्रती ईस्ट इंडिया कंपनी, डच इंडिया कंपनी, पोर्तुगाल इंडिया कंपनी अशा कंपन्यांच्या व्यापाऱ्यांनी केल्या असाव्यात,'' बलकवडे सांगतात.

तर या चित्रांबाबत माहिती देताना तारे सांगतात, ''युरोपमधील व्यापारी भारतात व्यापारासाठी येत असत. त्यांचा भारतातील राजधान्यांशी संबंध होता. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारात देखील ते जात असत.

तारे पुढे सांगतात, "17 व्या शतकात काढल्या गेलेल्या चित्रांना राजाश्रय मिळाला. गोवळकोंड्याला अनेक कलाकार होते. त्यांनी अनेक राजांची चित्रे काढली. महाराज दक्षिणेच्या दौऱ्यावर होते, तेव्हा कुठल्यातरी कलाकाराने महाराजांचे चित्र काढले असावे."

"त्या चित्राच्या आधारे इतर चित्रकारांनी चित्रं काढली असावीत. ज्या संग्रहालायत ही चित्रं मिळाली तेथेही शिवाजी महाराजांची चित्रे असल्याचा उल्लेख आहे,'' असं तारे सांगतात.

या चित्रांमध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन कसं आहे?

जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालायत मिळालेल्या चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार दाखवण्यात आली आहे. तर पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा शस्त्र दाखविण्यात आले आहे.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा या शस्त्राबरोबरच कमरेला कट्यार लावल्याचे दिसून येत आहे.

शिवाजी महाराज कसे दिसायचे ?

शिवाजी महाराजांची आत्तापर्यंत 27 चित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यातील बहुतांश चित्रं ही परदेशात आहेत. शिवाजी महाराजांच्या दिसण्याबाबत माहिती देताना बलकवडे म्हणाले, ''शिवाजी महाराज पाच फूट चार इंच उंचीचे होते. त्यांचं नाक बाकदार होतं. भव्य कपाळ होतं. त्यांचे डोळे बाणेदार होते. चेहऱ्याची उभी ठेवण होती.''

''या तिन्ही चित्रांमध्ये शिवाजी महाराजांची ही वैशिष्ट्ये दिसतात. या चित्रांमध्ये शिवाजी महाराजांचं वय साधारण 40 ते 50 असेल. राजस्थानी शैलीचा मोठी व्यक्ती ज्या पद्धतीचा पेहराव करत तसा तो या चित्रांमध्ये देखील दिसून येत आहे. एका चित्रात दांडपट्टा, एकात तलवार दिसतायेत. मोजडी जिरोटोप सुद्धा या चित्रांमध्ये दिसून येत आहे.''

संशोधकांनी पुढे येण्याची गरज

प्रसाद तारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही चित्रं शोधण्यासाठी बरीच वर्षे लागली. जगभरातील विविध संग्रहालयांना दिलेल्या भेटीतून ही चित्रं मिळू शकली. या तीन चित्रांमुळे शिवाजी महाराजांच्या चित्रांमध्ये आणखी भर पडली आहे.

शिवाजी महाराज नेमके दिसायचे कसे, हे यामाध्यमातून कळण्यास मदत होणार आहे. शिवाजी महाराजांची जगभरातील चित्रे शोधण्यासाठी इतिहास संशोधकांनी पुढे येण्याची गरज असेही तारे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)