रश्मिका म्हणते, प्रत्येकाने माझ्यावर प्रेम करावंच असं नाही

‘मला माहीत आहे की प्रत्येकजण मला आवडत नाही... प्रत्येकाने माझ्यावर प्रेम करावे असे मला वाटत नाही...'

एखादया सेलिब्रिटीसाठी ट्रोल होणं काही नवी गोष्ट नाही. काहीजण याला प्रत्युत्तर देतात, तर काहीजण शांत राहतात.

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिलंय.

मंगळवारी (8 नोव्हेंबर) रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

या पोस्टमध्ये तिनं म्हटलं की, बऱ्याच दिवसांपासून माझ्याबद्दल अपप्रचार केला जातोय, द्वेष पसरवला जातोय.

तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं, ‘या ट्रोल्सवर मी बरेच दिवस शांत राहिले. पण मला आता यावर उत्तर देण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये.’

'काही गोष्टींमुळे मला काही वर्षं...कित्येक महिने ..कित्येक आठवडे त्रास सहन करावा लागला. आणि आता याबद्दल बोलण्याची वेळ आलीय.'

रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं...

मी जेव्हापासून माझं करिअर सुरू केलंय तेव्हापासूनच मला हा द्वेष दिसतोय. खूप सारे ट्रोल्स, खूप जास्त निगेटिव्हिटी.

मला माहितीय की, मी जो मार्ग निवडलाय तो खाचखळग्यांनी भरलाय. मला हेही माहितीय की प्रत्येकालाच मी आवडते असं नाही. प्रत्येकाने माझ्यावर प्रेम करावं असाही माझा अट्टहास नाहीये.

मी जे बोललेच नाही त्या गोष्टींना मला जबाबदार धरून ट्रोल करण्यात आलंय याचं मला दुःख झालंय.

मी बऱ्याच मुलाखती दिल्या आहेत. त्याच्या वेगवेगळ्या बाईट्स लावून तो व्हीडिओ टाकून माझ्याविषयी चुकीचं पसरवलं जातंय. या सगळ्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यातील आणि मी काम करत असलेल्या चित्रपटसृष्टीतील नातेसंबंध धोक्यात आलेत.

एखाद्यावर चांगल्या हेतूने टीका करणं वेगळी गोष्ट असते. जेणेकरून मी माझ्यात बदल करीन. पण अशाप्रकारे द्वेष पसरवून काय मिळणार?

बऱ्याच दिवसांपासून हे सगळं सुरू आहे. पण मी दुर्लक्ष केलं, पण आता हे दिवसेंदिवस वाढतंच चाललंय.

रश्मिकाच्या पोस्टवर काय प्रतिक्रिया?

तिच्या या पोस्टवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वेंकी कुडूमुलाने रश्मिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "तुझ्या ओळखीचे लोक जर तुझा द्वेष करत असतील तर तुला वाईट वाटायला हवं. पण जे लोक तुला ओळखतच नाहीत, त्यांना तुझ्याबद्दल काय वाटतं याची काळजी तू करायला हवीस असं गरजेचं नाही. "

तुला ओळखणारा कोणताही व्यक्ती तुझा द्वेष करणार नाही, असंही त्यांनी कमेंटमध्ये म्हटलंय. प्रसिद्ध फोटोग्राफर रवी के चंद्रन म्हणतात की, 'जे कोणी तुझा तिरस्कार करतात त्यांना तुझ्यासारखं जगायचंय. तू खूप चांगली व्यक्ती आहेस. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. तुला अजून बरंच मोठं काहीतरी करायचंय.'

काही लोकांनी तर ट्विटरवरही रश्मिकाला पाठिंबा दिलाय.

बऱ्याचदा फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेकदा अभिनेत्री ट्रोल्सच्या निशाण्यावर असतात.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण समांथाही भीड न बाळगता बऱ्याचदा ट्रोल्सना फैलावर घेत असते.

जेव्हा गायिका सुनीताने दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांना ही वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदींनी एकत्र फोटो पोस्ट केले, तेव्हा त्यांनाही ट्रोल करण्यात आलं.

अशाच ट्रोलिंगला बळी पडलेल्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 2020 मध्ये तिचं अकाऊंट बंद केलं होतं.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरनेही ट्विटरचं अकाऊंट बंद केलं होतं. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानही सोशल मीडियापासून चार हात लांब असतो.