You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झीनत अमानचं 'दम मारो दम' पाहायला जेव्हा सगळं काठमांडू गोळा झालं होतं...
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, बीबीसी इंडिया
- Reporting from, दिल्ली
नेपाळ आणि बॉलिवूड कनेक्शन तसं बघायला गेलं तर फार जुनं आहे. म्हणजे 1966 मध्ये नेपाळमध्ये पहिलावाहिला खाजगी प्रॉडक्शन असलेला चित्रपट 'माइतीघर' रिलीज झाला होता. यात भारताची माला सिन्हा ही अभिनेत्री होती.
या चित्रपटातल एक गाणं त्याकाळी खूप गाजलं होतं.
हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं होतं, तर गाणं लिहिलं होतं नेपाळचे तत्कालीन राजे ज्ञानेंद्र यांनी.
या नेपाळी चित्रपटाला भारताच्या जयदेव यांनी संगीत दिलं होतं. उषा मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे आणि गीता दत्त यांनी त्यात गाणी गायली होती.
माला सिन्हाचे नायक होते सीपी लोहानी. पुढं जाऊन याच नेपाळी अभिनेत्यासोबत माला सिन्हा यांनी लग्न केलं.
त्या चित्रपटापासून आजपर्यंत नेपाळ आणि बॉलिवूडचं कनेक्शन एकदम खास राहिलंय. बॉलिवूडचे अनेक सिनेमे नेपाळमध्ये शूट झाले.
पण हे कनेक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल.
'जॉनी मेरा नाम' ते अलीकडच्या 'बेबी' पर्यंत
1971 मध्ये ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचा सुरुवातीचा सीन आहे.
देव आनंद पायलट असतात. त्यांची फ्लाईट नेपाळच्या काठमांडू शहरावरून चाललेली असते. काठमांडूचं सौंदर्य पाहून मोहित झालेले देव आनंद आपल्या सहवैमानिकाला म्हणतात, “उंचावरून तर ही व्हॅली चांगली दिसते आहे, काठमांडू शहर कसं असेल?"
त्यांचा सहवैमानिक म्हणतो, "लँडिंग सिग्नल मिळत नाहीये. तोपर्यंत प्रवाशांना काठमांडूच्या सैर घडवून आणूया. ते स्वयंभू मंदिर पहा. आणि ते सोल्टी, इथलं सर्वात फॅशनेबल हॉटेल."
देव आनंद आणि झीनत अमान यांच्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटाचं जवळपास संपूर्ण शूटिंग नेपाळमध्ये झालंय.
'जॉनी मेरा नाम', 'इश्क इश्क, इश्क', 'महान', 'खुदा गवाह' आणि 'बेबी' यांसारखे बरेच बॉलिवूड चित्रपट नेपाळमध्ये शूट झाले आहेत. या चित्रपटांचे काही खास किस्सेही आहेत.
'दम मारो दम' बघायला अख्खं शहर लोटलं होतं...
बिकास रौनियार हे नेपाळमधील ज्येष्ठ फोटो जर्नलिस्ट आहेत आणि त्यांचं कुटुंब चित्रपट उद्योगाशी संबंधित आहे.
ते सांगतात, "झीनत अमानच्या ‘दम मारो दम’ या गाण्याचं शूटिंग रात्रीच्या वेळेस नेपाळच्या काष्ठ मंडप मंदिराजवळ सुरू होतं. या गाण्याचं शूटिंग बघायला मोठी गर्दी जमली होती."
ते पुढं सांगतात, "हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटात 'कांची रे कांची रे' हे गाणं मुमताज आणि देव आनंद यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. याचं शूटिंग तिबेटी निर्वासितांच्या छावणीत लावण्यात आलं होतं. उर्वरित चित्रपटाचं शूटिंग नेपाळमधील प्रसिद्ध स्वयंभू मंदिर आणि भक्तपूरमध्ये करण्यात आलं."
या चित्रपटाचं शूटिंग जेव्हा सुरू होतं तेव्हा अख्ख्या काठमांडू शहराने यात सहभाग घेतला होता. बऱ्याच नेपाळी कलाकारांनी सुद्धा यात काम केलं होतं.
"आज जेव्हा आपण 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटाची जागा पाहायला जातो, तर तिथं टोलेजंग इमारती उभ्या आहेत. आम्ही लोक चेष्टा करायचो की, तेव्हाच जर ही जमीन घेतली असती तर आज जास्त किंमत मिळाली असती त्याची."
बिकास सांगतात की, 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपट येऊन गेल्यानंतर भारतीय पर्यटकांचा लोंढा नेपाळमध्ये वाढू लागला. जिथं जिथं हिंदी चित्रपटाचं शूटिंग व्हायचं, त्या-त्या ठिकाणी गाईड पर्यटकांना घेऊन जायचे. जिथं 'दम मारो दम' चं शूटिंग झालं होतं त्या भागात 2015 मध्ये भूकंप आला आणि तो भाग उद्ध्वस्त झाला.
पण आता त्या भागाची पुन्हा निर्मिती करण्यात आली. त्यामुळे 'हरे कृष्णा हरे राम' चा वारसा नेपाळमध्ये आजही अस्तित्वात आहे.
नेपाळच्या राजघराण्याशी संबंध
देव आनंद यांचे नेपाळच्या राजघराण्याशी चांगले संबंध होते. त्या दरम्यान राजे महेंद्र हे नेपाळचे राजा होते. जेव्हा देव आनंद यांच्या डोक्यात 'हरे रामा हरे कृष्णा'ची आयडिया आली तेव्हा त्यांनी थेट नेपाळ गाठून महेंद्र यांची भेट घेतली. त्यांना चित्रपटाची कथा देखील ऐकवली. त्यांना असंही सांगितलं की, हा चित्रपट फक्त नेपाळमध्येच बनू शकतो. पुढे देव आनंद यांनी चित्रपटाचं शूटिंग करता येईल अशी नेपाळमधली ठिकाणं सांगून परवानगी मागितली. मात्र बदल्यात देव आनंद यांना आणखीन काही दिवस नेपाळमध्ये राहावं लागेल असं राजा महेंद्र यांनी सांगितलं. त्यांना अन्नपूर्णा टेकडीच्या मध्यभागी असलेल्या एका हॉटेलमध्ये राहण्यास पाठवलं. हे हॉटेल त्यांच्या भावाचं प्रिन्स बसुंधरा यांचं होतं. तिथं जाऊन चित्रपटाची कथा शांतपणे लिहा, असंही सांगायला ते विसरले नाहीत. आणि तिथूनच नेपाळ आणि देव आनंद यांचा रोमान्स सुरू झाला. देव आनंद यांनी 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटात नेपाळची सुंदर मंदिरं, वेगवेगळी ठिकाणं दाखवली.
नेपाळमध्ये सापडली 'हरे रामा हरे कृष्णा'ची कथा
या चित्रपटाच्या निर्मितीमागे एक रंजक कथा दडलीय.
हा किस्सा 70 च्या दशकातील आहे.
1970 दशकात देव आनंद यांचा 'प्रेम पुजारी' नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. पण हा चित्रपट आपटला आणि देव आनंद यांनी निराश होऊन नेपाळ गाठलं.
पण तिथं असा काही योगायोग घडला की देव आनंद परतले ते थेट 'हरे रामा हरे कृष्णा'ची स्क्रिप्ट घेऊनच. या चित्रपटाचं शूटिंग त्यांना लंडन, पॅरिसमध्ये नाही तर काठमांडूमध्ये करायचं होतं.
'रोमान्सिंग विथ लाइफ' या पुस्तकात देव आनंद लिहितात की, "मी काठमांडूला गेलो होतो, तिथं एके रात्री मी माझ्या मित्रासोबत 'द बेकरी' नावाच्या एका विचित्र ठिकाणी गेलो. तिथं बऱ्याचदा हिप्पी लोक हँग आउट करायला यायचे."
"त्या काळात तरुणांमध्ये हिप्पी बनण्याची क्रेझ होती. गांजा, अफिम, मजामस्ती, सिगरेटचा धूर या नशेत तरुणाई बेधुंद झालेली होती. कपाळावर टीका लावून, गळ्यात फुलांची माळ घालून, एका हाताने चिलीम ओढणारे तरुण आकाशाकडे बघून जणू ध्यानच लावत आहेत असं वाटायचं. हे एकदम चित्रपटाला शोभेल असं दृश्य होतं."
"या सगळ्यात माझं लक्ष एका सावळ्या वर्णाच्या मुलीकडे गेलं. तिचा चष्मा जमीनीवर पडला होता आणि तिनं म्हटलं की बॉबी, माझा चष्मा. यावरून तरी समजलं ती भारतीय होती. या हिप्पी लोकांमध्ये ही कशी आली असा प्रश्न मला पडला. मला ते जाणून घ्यायची प्रचंड ओढ लागली होती..."
पुढे देव आनंद लिहितात, "दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत त्या मुलीची भेट झाली. त्यावेळी तिने सांगितलं की, तिची आई कॅनडामध्ये असते आणि ती काठमांडू फिरायला आली आहे. तीच नाव जसबीर होतं, मात्र ती आता स्वतःची ओळख जेनिस अशी करून देऊ लागली होती.
तिने सांगितलं की, ती तिच्या आईपासून पळून इथं काठमांडूला आली आहे. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. तिचे वडील पंजबामध्येच कुठे तरी राहत होते. तिला वाटायचं तिचे आईवडील तिची काळजी घेत नाहीयेत म्हणून घरातले काही पैसे चोरून ती पळून आली आणि हिप्पी बनली."
ज्यांनी 'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपट बघितला आहे, ज्यांनी झीनत अमानचं ‘दम मारो दम गाणं’ पाहिलं आहे त्यांना समजेल की हा चित्रपट प्रत्यक्षात जेनिस उर्फ जसबीरवर आधारित आहे.
अमिताभच्या गाडीला घेराव
फक्त देव आनंदच नाही तर अमिताभ बच्चन यांच्या दोन चित्रपटातील काही सीन्स नेपाळमध्ये शूट करण्यात आलेत. 1983 मध्ये अमिताभ बच्चन यांचा 'महान' चित्रपट आला होता. यात अमिताभ बच्चन यांनी एक नाही तर तीन भूमिका वठवल्या होत्या. अर्थात, या चित्रपटात त्यांचा ट्रिपल रोल होता.
‘दम मारो दम’ नंतर झीनत अमान अमिताभ बच्चन यांच्या 'प्यार में दिल पे मार दे गोली' या गाण्यात दिसणार होती. या गाण्याचं शूटिंग नेपाळमध्ये होणार होतं.
नेपाळच्या भक्तपूर दरबार चौकात या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.
त्यानंतर अमिताभ बच्चन त्यांच्या 'खुदा गवाह' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नेपाळमध्ये आले होते.
या चित्रपटाचा काही भाग अफगाणिस्तानमध्ये चित्रित करण्यात आला होता. पण नंतर तिथं गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने चित्रपटाचं शूटिंग पुढे चालू ठेवणं धोक्याचं होतं.
त्यामुळेच 'खुदा गवाह'चे काही सीन नेपाळमध्ये शूट करण्यात आले.
अमिताभ बच्चन यांची नेपाळमध्ये जबरदस्त क्रेझ होती. त्यांच्यासोबत डॅनीही तिथे आला होता.
फिल्मफेअरशी बोलताना डॅनीने नेपाळमध्ये घडलेला किस्सा सांगितला होता, "आम्ही नेपाळमध्ये 'खुदा गवाह'चं शूटिंग करत होतो आणि शेकडो लोकांनी आमच्या कारला घेराव घातला होता. कार अक्षरशः हलत होती. मला खूप राग आला होता. मागच्या सीटवर अमिताभ बच्चन पगडी आणि दाढी अशा फुल गेटअप मध्ये बसले होते."
"कारमध्ये एसी सुद्धा सुरू नव्हता, पण यातही अमितजींचा पारा शांत होता. ते संयम राखून होते. त्यांनी माझा हात पकडला आणि मला म्हटलं की, शांतपणे बसून राहा ही गर्मी सुद्धा सहन कर. जर तू कारच्या बाहेर गेलास तर परिस्थिती आणखीनच गंभीर होईल."
अमिताभच्या खोलीत राहण्यासाठी चढाओढ
मनीषा कोईरालाचा नेपाळी चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी नेपाळमध्ये मुस्तांगमध्ये ज्या भागात राहत होते तो परिसर म्हणजे लोकांसाठी जणू काही पर्यटन स्थळच बनला होता.
बिकास रौनियार हसत हसत सांगतात की, "खुदा गवाहचं शूटिंग मुस्तांग परिसरात करण्यात आली होती. अमिताभ बच्चन, श्रीदेवी आणि डॅनी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलमध्ये मी आणि माझा मित्र थांबलो होतो.
बच्चनजी ज्या रूममध्ये राहिले होते त्याच रूममध्ये आम्हा सर्वांना राहायचं होतं. आमच्यात एकप्रकारे कॉम्पिटिशनचं सुरू झालं. शेवटी एकेक करून आपण त्या रूममध्ये राहावं असं ठरलं."
पण अमिताभ बच्चन यांच्या आठवणी शूटिंग करण्यापुरत्याच नव्हत्या. तर अमिताभ बच्चन यांनी लहानपणी सुद्धा नेपाळचा दौरा केला होता आणि हा त्यांनी केलेला पहिलाच विदेश दौरा होता. अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहितात, "मी 1954 मध्ये नेपाळला गेलो होतो. तेव्हा आम्ही अलाहाबादला राहायचो. बाबूजींना त्यांच्या साहित्यिक मित्रांना भेटाचं होतं म्हणून आम्ही ट्विन इंजिन असलेल्या डकोटा विमानाने पाटण्याहून काठमांडूकडे निघालो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेच डकोटा विमान वापरण्यात आलं होतं. विमानात बसण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता, आणि माझ्यातला उत्साह ओसंडून वाहत होता."
नेपाळ मध्ये शूट झालेले बॉलिवूड चित्रपट जॉनी मेरा नाम हरे कृष्णा हरे राम महान खुदा गवाह घरवाली बाहरवाली बेबी ऊँचाई फक्त शूटिंगच नाही तर नेपाळी फिल्म इंडस्ट्री आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे विशेष असे संबंध आहेत. लता मंगेशकर यांनी ‘माइतीघर’ व्यतिरिक्त आणखीन दोन नेपाळी गाणी गायली जी त्याकाळात खूप हिट झाली होती. बिकास आणि त्यांच्या पत्नीने मनीषा कोईराला सोबत काम केलंय. बिकास सांगतात, "मनीषाने आपल्या कारकीर्दची सुरुवात एका नेपाळी जाहिरातीतून केली होती. पुढं ही जाहिरात खूपच हिट झाली. नंतर 1989 मध्ये 'फेरी भेटोला' नावाच्या नेपाळी चित्रपटात तिने काम केलं. तिने भारतात बनारस आणि दिल्लीत शिक्षण घेतलं." त्याच दरम्यान तिला बॉलिवूडची भुरळ पडली आणि तिने तिच्या आईला हिंदी चित्रपटात काम करायचं आहे असं सांगून टाकलं. बर्थ डे गिफ्ट म्हणून मनीषाची आई तिला मुंबईला घेऊन आली. त्या मीना अय्यर नावाच्या एका चित्रपट पत्रकाराला ओळखायच्या.
मनीषाच्या डोक्यात जे चित्रपटाच भूत आहे ते उतरावं असा त्यांचा उद्देश होता म्हणून त्यांनी मनीषाला मुंबईला आणलं होतं. पण घडलं नेमकं याच्या उलट. मीना अय्यर यांनी त्यांची भेट एका चित्रपट दिग्दर्शकाशी करून दिली. पुढे सुभाष घई यांनी मनीषाला साइनचं केलं. त्यानंतर मनीषाने बॉम्बे, दिल से अशा हिंदी चित्रपटात काम केलं. मनीषा कोईराला सोडून बरेचसे नेपाळी किंवा नेपाळी वंशाचे लोक पडद्यामागे काम करत आहेत.
अनुपम खेर यांच्या ' ऊँचाई' चं शूटिंग देखील नेपाळमध्येच पार पडलं आहे.
नेपाळ अनुभवाचं कथन करताना अनुपम खेर सांगतात, "तिथल्या काही भागात पोहोचणं खूप अवघड आहे पण तिथले लोक भलतेच चांगले आहेत आणि खूप मदत करतात.
चित्रपटांपासून तिथल्या पर्यटनाला फायदा व्हावा. माऊंट एव्हरेस्ट पाहिल्यावर तुम्हाला तुम्ही किती लहान आहात याची जाणीव होते. आपण त्या मोठ्या पर्वतासमोर काहीच नाही असं जाणवतं. आयुष्य बदलवणारा अनुभव होता.”
‘ऊँचाई’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सूरज बडजात्या भारतातील संपूर्ण क्रू नेपाळला सोबत घेऊन गेले होते.
ते म्हणतात की, जर तुमचं पर्वतांवर प्रेम आहे तर नेपाळ तुमच्यासाठी स्वर्ग आहे.
जॉनी मेरा नाम ते 'इश्क, इश्क इश्क' पर्यंत
आता आपण परत जर देव आनंद यांच्या काळात गेलो तर 'हरे रामा हरे कृष्णा'नंतर झीनत अमान आणि देव आनंद 'इश्क इश्क इश्क' चित्रपटासाठी नेपाळला गेले होते. या चित्रपटाचं शूटिंग नेपाळमधील दुर्गम ठिकाणांवर करण्यात आलं. या ठिकाणी लोक सहसा जायचे नाहीत. टेंगबोचे मोनेस्ट्री एक तिबेटी बौद्ध मठ आहे. हा मठ 3867 मीटर उंचीवर वसलेला असून एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वाटेवर हा मठ लागतो. या चित्रपटात माउंट एव्हरेस्टचं सौंदर्य टिपण्यात आलं. पण चित्रपट फ्लॉप ठरला. त्यांनी 1970 मध्ये आलेल्या 'जॉनी मेरा नाम' या सुपरहिट थ्रिलर चित्रपटचं काही शूटिंग भक्तपूर आणि नेपाळमधील गोदावरी बोटॅनिकल गार्डन मध्ये करण्यात आलं होतं. 1951 मध्ये नेपाळमध्ये सर्वात पहिला चित्रपट बनवण्यात आला. भारतात ज्याप्रमाणे ‘राजा हरिश्चंद्र’ची निर्मिती झाली त्याच धर्तीवर या चित्रपटाची देखील निर्मिती झाली होती. नेपाळच्या काठमांडू पोस्टच्या एका विशेष लेखात, नेपाळच्या या पहिल्या चित्रपटाची निर्मिती बॉम्बेमध्ये करण्यात आली आहे असं म्हटलंय. तेव्हापासून आजतागायत हिंदी चित्रपट सृष्टी आणि नेपाळी सिनेसृष्टी यांचं खास असं नातं आहे.
भारत आवडत नसला तरी बॉलिवूडची क्रेझ कायम
भारत आवडत नसला तरी बॉलिवूडची क्रेझ कायम बिकास रनौरिया सांगतात की, भारत आणि नेपाळमधील संबंध हे नेहमीच दुतर्फा राहिले आहेत. ते सांगतात, "नेपाळमध्ये बॉलिवूडची क्रेझ कायम आहे. आमच्या इथल्या लोकांची हिंदी चांगली असण्यामागे सुद्धा हिंदी चित्रपट हे एक मोठं कारण आहे. पूर्वी नेपाळी चित्रपटांच्या मिक्सिंग आणि एडिटिंगसाठी मुंबईला यावं लागायचं." "तिथं काम करून अनुभव घेऊन लोकांनी पुन्हा नेपाळमध्ये येऊन नव्या कामांना सुरुवात केली. पण जेव्हा केव्हा एखादा मोठा हिंदी चित्रपट येतो तेव्हा त्याचा परिणाम नेपाळी चित्रपटांच्या गल्ल्यावर होत असल्याचं अनेकांचं मत असतं." कधी कधी तर वाद निर्माण होतात. अनिल कपूरच्या 'घरवाली बाहरवाली' चित्रपटात नेपाळ चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप झाला होता. माझ्या अनेक मित्रांना भारत आवडत नाही, कारण भारत नेहमीच ‘बिग ब्रदर’ सारखा वागतो. पण हिंदी चित्रपटांवर आजही त्यांचं तितकंच प्रेम आहे. बिकास पुढं सांगतात की, भारतातले बरेच दिग्दर्शक वारेमाप पैसा खर्च करून स्वित्झर्लंड, युरोप मध्ये शूटिंग करायला जातात. पण नेपाळचं सौंदर्य पण काही कमी नाहीये. 'हरे कृष्णा हरे राम' सारखे हिंदी चित्रपट नेपाळमध्ये शूट झाले, आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच मिळाला. 'हरे कृष्णा हरे राम' मध्ये दाखवलेले स्वयंभू मंदिर, भक्तपूरची यात्रा, महानचा दरबार स्क्वेअर, तुकचीच्या बर्फाळ दऱ्या आणि देव आनंद यांनी सांगितलेलं सोल्टी हॉटेल सगळं काही अप्रतिम आहे. देव आनंद सांगतात, "सोल्टीमध्ये एक कॅसिनो आहे. जसजसं तुम्ही पायऱ्या उतराल, तुमच्या उजव्या हाताला डिस्कोथेकमध्ये लागेल. तिथं एन्ट्री करताच काय सांगावं तुम्हाला जेनिस उर्फ झीनत अमान दिसेल." हा तोच सीन आहे ज्यात सिनेमाप्रेमींनी पहिल्यांदाच झीनत अमानला हिप्पी सारखं नाचताना पाहिलं होतं. हिंदी सिनेसृष्टीला अशी एक अभिनेत्री मिळाली होती जिने हिरॉइनच्या सगळ्या व्याख्याच बदलून टाकल्या...स्टारडम व्हाया नेपाळ...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)