You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित शर्माला T-20च्या कर्णधारपदावरून हटवण्याची वेळ आली आहे?
- Author, विधांशू कुमार
- Role, बीबीसी हिंदीसाठी
तुमच्यावर कॅमेरा आहे आणि तुम्ही रडताय असं दृश्य दुर्मिळ असतं.
मात्र टी-20 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची अशीच परिस्थिती झाली होती.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये त्याची अवीट छाप सोडली आहे. त्याच्या नावावर वनडेमध्ये सर्वांत जास्त डबल सेंच्युरीज आहेत. त्याला हिटमॅन म्हणून ओळखलं जातं आणि तो आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.
त्याचं अशा पद्धतीने भावूक होण्याने भारतीय क्रिकेटचे कोट्यवधी चाहते हळहळले.
मात्र टी-20 चं कर्णधारपद स्वीकारून एक वर्षंच झालं आहे.
वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर टी-20 प्रकारात भारताचं भविष्य रोहित शर्मावर अवलंबून आहे की नाही याविषयावर टीका होत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताची कामगिरी
2021 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या फेरीत भारत बाहेर झाला होता. त्यानंतर कर्णधार बदलला गेला आणि विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा टीमचा नवीन कर्णधार झाला.
नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने द्विपक्षीय सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यांना विजय मिळाला.
मात्र काही मालिकांमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली तरी भारताचं पारडं जडच होतं.
यादरम्यान भारताने न्यूझीलंड, वेस्टइंडिज, आणि श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला. भारताने परदेश दौऱ्यात आयरलँड, इंग्लंड आणि वेस्टइंडिजवरही विजय मिळवलाय.
त्यानंतर टी-20 वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघाने ऑस्ट्रोलिया आणि साऊथ आफ्रिकेवर 2-1 ने मात केली.
या निकालांकडे पाहिलं तर असं वाटू शकतं की भारतीय टीम लागोपाठ जिंकते आहे आणि सगळं काही आलबेल आहे.
मात्र दिसते तशी परिस्थिती अजिबात नाही कारण भारत ICC च्या मोठ्या स्पर्धा जिंकण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे.
चूक कुठे झाली?
रोहित शर्मा कर्णधार झाला तेव्हा त्याच्यासमोर सगळ्यांत मोठं आव्हान होतं ते आशिया कपचं. तो UAE आणि ओमान मध्ये खेळला गेला.
ग्रुपच्या पहिल्या मॅचममध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट ने पराभव केला. मात्र त्यानंतर भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आणि फायनलमध्ये खेळण्याची संधी त्यांनी गमावली.
दुसरं आव्हान होतं ते टी -20 विश्वचषकाचं. तिथेही चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली.
भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विरुद्ध अंतिम टप्प्यात विजय मिळवला खरा. मात्र इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बॅटिंग पॉवरप्लेचा योग्य वापर न करणं हे या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण होतं.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनच्या मते भारतीय फलंदाज घाबरत घाबरत बॅटिंग करत होते.
तसंच भारतीय खेळाडू अजुनही जुन्या पद्धतीने टी-20 क्रिकेट खेळत आहे. आता अशा पद्धतीने कोणीही खेळत नाही, असंही मत नासिर हुसैन यांनी नोंदवलं.
आधी विकेट वाचवणं आणि मग फटकेबाजी करणं अशी भारताची व्यूहरचना होती. पण ती फारशी यशस्वी झाली नाही आणि त्याची जबाबदारी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघांनाही घ्यावी लागेल.
याआधीही झाले होते बदल
वर्ल्डकप सगळ्याच टीमसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी चार वर्षं आधीपासूनच तयार केली जाते.
तिथे जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर संघात मोठे बदल होतात.
आता खुद्द राहुल द्रविडचंच उदाहरण बघा ना. 1979 नंतर 2007 चा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी सगळ्यांत खराब होता. तेव्हा भारताला बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आणि फक्त बर्म्युडा संघाविरुद्ध भारताला विजय मिळवता आला.
भारत त्यावेळी पहिल्याच फेरीत बाहेर फेकला गेला होता.
त्यावेळी वनडेचा कॅप्टन राहुल द्रविड होता आणि ग्रेग चॅपेल कोच होता. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्यात आला. काही महिन्यात राहुल द्रविडला वनडेच्या संघातून काढून टाकण्यात आलं.
नवीन कर्णधार महेंद्र सिंग धोनीने संघाला दिशा दिली आणि चार वर्षानंतर धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला.
अनेक माजी कर्णधारांनी संघात बदल करण्याचा उपाय सुचवला आहे. याआधीही पराभूत झालेल्या कर्णधाराला हटवलं गेलं आहे तर मग आता का नाही?
पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्माचं वय 37 झालं असतं. अशा परिस्थितीत तो कर्णधार राहील की त्याची हकालपट्टी होईल? त्यांच्या मते बदल करायचे असतील तर ते लवकरात लवकर करावेत.
2021 मध्ये पराभूत झालेली टीमच खेळली 2022 चा वर्ल्ड कप
जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर भारतीय संघात बदल घडवण्याची वेळ मागच्या वर्षीच आली होती.
2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या भारतीय संघावर नजर टाकली तर तोच संघ यावेळी खेळला आहे.
फक्त रवींद्र जडेजाच्या जागी संघात अक्षर पटेल खेळत होता. कारण दुखापतीमुळे जडेजा संघाच्या बाहेर होता.
मग असा संघ ज्याला डॅडीज आर्मी म्हटलं तो कसा विश्वविजेता होणार?
टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रवी, अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वनर कुमार हे सगळे 30 वर्षांच्या वरच्या वयाचे आहे. त्यांचं वय 34-35 च्या आसपास आहे.
त्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये बदल करण्याची दाट शक्यता आहे.
अपेक्षेपेक्षा कमी यश
भारताला 10 विकेटने पराभव पत्करल्यावर भारतीय संघावर खूप टीका झाली. मात्र मायकेल वॉन यांनी जितकी टीका केली तितकी कोणीही केली नाही.
वॉन म्हणाले की भारतीय वर्ल्ड कपमध्ये अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या टीमपैकी एक आहे.
अशा लोकांबरोबर भारतीय टीम टी- 20 कसं खेळू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाले की त्यांच्याकडे खेळाडू आहेत. मात्र त्यांची पद्धत योग्य नाही. त्यांनी भारताच्या नियोजनावर टीका केली. पॉवरप्लेमध्ये रन न करणं ही फार मोठी दुर्बळता आहे ,असं त्यांचं मत होतं.
याचाच अर्थ रोहित शर्मा या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे.
याशिवाय युजवेंद्र चाहलला संघात न घेणं हीसुद्धा एक मोठी चूक होती. सेमी फायनलमध्ये त्याची उणीव संघाला जाणवली.
रवी शास्त्री म्हणाले की भारतीय संघाकडे स्पिनर आहेत. पण ते मैदानाऐवजी डग आऊटमध्ये बसले आहेत.
कर्णधार बदलावा की खेळण्याची पद्धतही?
कर्णधार बदलावा की नाही या वादात इरफान पठाणनेही उडी घेतली आहे.
तो म्हणाला की, कॅप्टन बदलण्याची गरज नाही. पण तीन उपाय करण्याची गरज नाही. त्यांच्या मते ओपनर्सने वेगवान सुरुवात करायला हवी. टीममध्ये एक लेग स्पिनर पाहिजे आणि एक अत्यंत वेगवान बॉलरची गरज आहे.
इरफानने सुचवलेले उपाय प्रत्यक्षात येऊ शकतात. मात्र 2024 मध्ये याच कर्णधाराच्या नेतृत्वाखाली टीम खेळेल की नाही, याबाबत शंका आहे.
काही तज्ज्ञांचं असंही मत आहे की भारताला वेगवेगळ्या टीमसाठी वेगवेगळे कर्णधार हवेत.
त्यांच्यामते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम न्यूझीलंडला जाणं ही एक चांगली सुरुवात आहे. एकूणच काय तर आता नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणाच बाकी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)