राजस्थान खेळणार क्वालिफायर-2, कोहलीच्या RCBचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 विकेटनं पराभव करत स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवलं आहे. त्यामुळं बंगळुरूचं 17 वर्षांपासून बाळगलेलं आयपीएल विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं.
बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवत, स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं.
बंगळुरूच्या संघाला त्या तुलनेत तुलनेनं चमकदार कामगिरी करण्यात अपयश आल्यानं त्यांना यावेळीही विजेतेपदापर्यंत पोहोचता आलं नाही.
या विजयामुळं क्वालिफायर दोनसाठी राजस्थान रॉयल्स यांचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाबरोबर होणार आहे. चेन्नईमध्ये अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ आमनेसामेन असतील.
शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं यापूर्वीच क्वालिफायर एकमध्ये हैदराबाचा पराभव करत अंतिम सामन्यात मजल मारलेली आहे.
अश्विनसह गोलंदाजांनी रचला पाया
आयपीएलमधील या विजयाचा पाया आर अश्विनसह राजस्थान रॉयल्सच्या संघातील सर्व गोलंदांनी केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर रचला गेल्याचं दिसून आलं.
यंदाची आयपीएल स्पर्धा प्रामुख्यानं ही मोठ्या किंवा 200 आणि त्याहीपेक्षा अधिक धावसंख्येच्या सामन्यांसाठी ओळखली गेली. अगदी 250 पेक्षा जास्त धावा संघांनी केल्या आणि त्याचा यशस्वी पाठलागही काही सामन्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळं या महत्त्वाच्या सामन्यात आरसीबीसारख्या स्टार फलंदाज असलेल्या संघाला फक्त 172 धावांमध्ये बांधून ठेवण्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाला यश आलं. त्यातच त्यांची अर्धी कामगिरी फत्ते झाली होती.

फोटो स्रोत, ANI
प्रामुख्यानं अश्विन आणि बोल्ट यांनी धावांवर ब्रेक लावत फलंदाजांवरचा दबाव वाढवला. अश्विननं 4 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर बोल्टनं 16 धावा देत एक फलंदाज बाद केला.
या दोघांशिवाय आवेश खाननं तीन विकेट घेत आरसीबीला खिंडार पाडलं. युझवेंद्र चहलनं सर्वांच्या नजरा असलेल्या विराट कोहलीला बाद करत सामना आपल्या बाजूनं फिरवला.
ठराविक अंतरानं घेतलेल्या विकेटमुळं आरसीबीला धावांची गती वाढवण्याची संधी मिळाली नाही आणि त्यामुळं राजस्थानच्या फलंदाजांचं काम सोपं झालं.
मधल्या षटकामध्ये अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आरसीबीच्या फलंदाजांना अडचणीत आणून धावांची गती रोखणारा अश्विन या सामन्यात सामनावीरही ठरला.
यशस्वी-परागने पार पाडली कामगिरी
173 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघानं सुरुवातीलापासून सामन्यावर पकड कायम ठेवली.
यशस्वी जैस्वाल आणि टॉम कोहलर-कॅडमोर या सलामीच्या जोडीनं 46 धावांची भागिदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
कोहलर 20 धावांवर बाद झाल्यानंतर जैस्वालनं एका बाजूनं चांगली फलंदाजी केली. त्यानं 30 चेंडूमध्ये 45 धावा करत संघाला विजयाच्या दिशेनं पुढं नेलं.

फोटो स्रोत, ANI
संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर मात्र, या स्पर्धेत संघाच्या फलंदाजीतील महत्त्वाचा चेहरा राहिलेल्या रियान परागनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. रियान परागनं विकेट टिकवून ठेवत जबाबदारीनं फलंदाजी केली. त्यानं 26 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या.
त्याचबरोबर शिमरॉन हेटमायर आणि रोमन पॉवेल यांनी फिनिशर म्हणून अचूक कामगिरी करत संघाला अखेर विजयापर्यंत पोहोचवलं. हेटमायरनं 14 चेंडूंमध्ये 26 तर पॉवेलनं 8 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या.
आरआरच्या कामगिरीत परागचा मोठा वाटा
राजस्थान रॉयल्सच्या संघाच्या यंदाच्या कामगिरीमध्ये रियान परागचा मोलाचा वाटा राहिला आहे. रियान परागनं स्पर्धेत आतापर्यंत 567 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
गेल्या काही हंगामांमधल्या कामगिरीवरून त्याला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. खराब फटके खेळून बाद होत असल्यामुळं त्याच्यावर क्रीडा समीक्षकांनी अनेकदा टीका केली.

फोटो स्रोत, ANI
पण रियान परागनं त्याच्या फलंदाजीवर घेतलेली मेहनत आयपीएलच्या या हंगामात दिसून आली. आयपीएलपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्येही गेल्या वर्षभरात त्याची कामगिरी चांगली झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबरोबरच आयपीएलमधील त्याच्या कामगिरीमुळं भविष्यात रियान परागला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते, अशा चर्चाही त्यामुळं सुरू झाल्या आहेत.
कोहलीच्या आयपीएलमध्ये 800 धावा
आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं आयपीएलमध्ये 8000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 8004 धावांसह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.
या यादीत विराच्या नंतर दुसऱ्या स्थानी 6769 धावांसह शिखर धवन तर 6628 धावांसह रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांवर आहेत.

फोटो स्रोत, ANI
विराट कोहलीनं यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा सर्वाधिक 741 धावा करत ऑरेंज कॅपची दावेदारी कायम ठेवली आहे. या हंगामात त्यानं एक शतक तर पाच अर्धशतकं केली आहेत.
यंदाच्या सर्वाधिक धावांच्या यादीतील इतर खेळाडू पाहता, ऑरेंज कॅप विराटच्याच डोक्यावर कायम राहणार हे जवळपास स्पष्ट आहे.
विराटनं आयपीएलमध्ये 700 धावांचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी त्यानं 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या.
26 मे ( रविवार) रोजी IPL चा अंतिम सामना होणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरोधात कोणता संघ येईल याची उत्सुकता आता क्रिकेट रसिकांना लागली आहे.











