केएल राहुलवर लखनौ सुपर जायंट्सचे मालक भडकले? व्हीडिओवर चाहत्यांची नाराजी

फोटो स्रोत, UGC
बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सवर मोठा विजय मिळवला.
हैदराबादने 166 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि हा सामना केवळ 9.4 षटकांत एकही विकेट न गमावता गुंडाळला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजीसमोर केएल राहुलचा संघ असहाय्य दिसत होता.
पण त्याच दरम्यान मैदानावर घडलेली एक गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सामना संपल्यानंतर लखनौ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका टीमच्या डग आऊटजवळ कर्णधार केएल राहुलशी बराच वेळ बोलताना दिसले.
यादरम्यान संजीव गोयंका खूप रागावलेले होते, केएल राहुलला ते काहीतरी समजावून सांगत होते. दुसरीकडे केएल राहुल शांतपणे ऐकत होता.
इतकंच नाही तर समालोचकांनीही या दृश्याचा उल्लेख केला. असं संभाषण कॅमेऱ्यासमोर नाही, तर बंद खोलीत लोकांच्या नजरेपासून दूर व्हायला हवं असं समालोचकानं म्हटलं.
संजीव गोएंका आणि केएल राहुल यांच्यातील संभाषणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं? हे जरी ऐकू आलं नसलं, तरी संजीव गोयंका यांच्या हावभावांविषयी लोक सोशल मीडियावर बरंच काही लिहित आहेत.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील काही युजर्सच्या मते पराभवानंतर संजीव गोयंका केएल राहुलला ओरडत आहेत. तरी या घटनेबाबत लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर संतापले लोक
गब्बर सिंग नावाच्या युजरने लिहिलंय की, "कोणत्याही खेळाडूला अशा वर्तनाला सामोरे जावं लागू नये. तुम्ही तुमच्या कर्णधाराचा मीडियासमोर अपमान करत आहात. जरा सभ्यता दाखवा. कठीण प्रसंग माणसाने शांततेने हाताळला पाहिजे. फ्रँचायझी मालक असला तरीही हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे."
शेखर नावाच्या युजरने लिहिलं की, "केएल राहुलसारख्या खेळाडूला संघ मालकाकडून टीका सहन करावी लागते हे पाहणं निराशाजनक आहे."

फोटो स्रोत, ANI
अल्फा नावाच्या युजरने लिहिलंय, "जेव्हा तुम्ही पैशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला अशीच वागणूक दिली जाते."
रिचर्ड केटलबरो नावाच्या युजरने लिहिलंय की, "केएल राहुल हा 9 ते 6 या वेळातला कर्मचारी दिसतोय."
समीरा नावाच्या युजरने लिहिलं आहे की, "मी केएल राहुलची फॅन नाही, तरीही हे मान्य नाही. मिस्टर गोयंका, तुम्ही कोट्यावधी रुपये गुंतवले आहेत हे आम्हाला माहीत आहे पण भारतातील अव्वल दर्जाच्या खेळाडूशी वागण्याची ही पद्धत नाही. हे संभाषण खाजगी ठिकाणी व्हायला हवं होतं."
जॅकी यादव नावाच्या युजरने लिहिले की, "आमचे शहर लखनौ सुसंस्कृत शहर आहे, इथे अशा लोकांसाठी जागा नाही. केएल राहुलने त्याचे कर्णधारपद तोंडावर फेकून निघून जावं."
अभिषेक लिहितात, “केएल राहुलच्या धैर्याचं कौतुक करायला हवं. संजीव गोयंका यांच्या वागण्याचा निषेध करायला हवा. IPL च्या इतिहासात पंजाब आणि आरसीबी सारखी अवस्था कुणाचीही झाली नसेल, पण त्यांच्या टीम ओनर्सनी कधी असल्या वागल्याचं दिसलं नाही.”
विवेकानंद सिंह कुशवाहा म्हणतात “केएल राहुल आमचा स्टार आहे. त्यानं भारताला अनेक सामनेे जिंकून दिले आहेत. एखाद्या टीम ओनरनं केएल राहुलला असं वागवणं दुःखदच नाही तर क्रिकेटसाठी लाजिरवाणा क्षण आहे.”
पराभवानंतर केएल राहुल काय म्हणाला?
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यानंतर त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, ANI
केएल राहुल म्हणाला, "मला शब्दही सुचत नाही. टीव्हीवर असली बॅटिंग पाहिली आहे, आम्हाला ते अशक्यप्रायच वाटलं."
तो म्हणाला की, सनरायझर्सचे फलंदाज ज्या प्रकारे चेंडू फटकावत होते, सगलं काही त्यांच्या मनासरखं होऊ लागलं. त्यांच्या खेळाची प्रशंसा केली पाहिजे.
दुसऱ्या डावात खेळपट्टी बघण्याचीही संधी मिळाली नाही, त्यांना रोखणं खूपच अवघड काम होतं असं राहुलने सांगितले.
कर्णधार म्हणाला, "ते पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजीच्य मूडमध्ये होते."
तो म्हणाला, "एकदा तुम्ही पराभूत झालात, तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्हं निर्माण केले जातात. प्रथम फलंदाजी करताना आम्हाला मोठी धावसंख्या करायची होती, पण आम्हाला 40-50 धावा कमी पडल्या. जेव्हा आमचे खेळाडू पॉवरप्लेमध्ये आऊट झाले तेव्हा आमचा वेग कमी झाला."
आयुष बडोनी आणि निकोलस पूरनचे कौतुक करताना केएल राहुल म्हणाला की, दोन्ही खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली ज्यामुळे आम्ही 166 धावांपर्यंत पोहोचलो.
तो म्हणाला, "आम्ही 250 धावा केल्या असत्या तरी त्यांनी त्याही धावांचा डोंगर उभारला असता.











