'अय्यर आणि अय्यर' जोडीने शाहरूखच्या KKR ला आयपीएलच्या फायनलपर्यंत कसं पोहोचवलं?

श्रेयस अय्यर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर
    • Author, विधांशु कुमार
    • Role, बीबीसी न्यूज

कोलकाता नाइट रायडर्सची टीम आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये पोहोचली आहे.

अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यात तक्त्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावरील सनरायझर्स हैदराबादच्या संघाला 8 गडी राखून हरवलं आहे. हा सामना एकतर्फीच झाला.

हैदराबादचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना संपूर्ण 20 षटकं देखील खेळू शकला नाही आणि त्यांचा डाव 20 व्या षटकात 159 धावांवर आटोपला.

मिचेल स्टार्कनं तीन गडी बाद करून हैदराबादच्या संघाची आघाडी फळी पॅव्हेलियनमध्ये परत पाठवत त्यांचं कंबरडं मोडलं. कोलकाता नाईटरायडर्सच्या इतर गोलंदाजींना देखील त्याला चांगली साथ दिली.

अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे. अशा खेळपट्टीवर हैदराबादनं उभं केलेल्या माफक धावसंख्येचं आव्हान कोलकाता नाईटरायडर्सच्या फलंदाजांनी अगदी सहजपणं पेललं. सामन्यात 38 चेंडू शिल्लक असतानाच त्यांनी धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि सामना दिमाखात जिंकला.

कोलकाता नाईट राडडर्सच्या संघाकडून वेंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच कोलकात्यानं हा सामना सहजपणे जिंकला.

दोघांनीही या सामन्यात अर्धशतकं झळकावत कोलकाता नाईट रायडर्सना आयपीएलच्या फायनलमध्ये चौथ्यांदा स्थान मिळवून दिलं.

मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू

आयपीएल 2024 च्या लिलाव फेरीत मिचेल स्टार्कला दुसऱ्या क्रमांकाची बोली मिळाली होती. मात्र यंदाच्या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला बळी मिळवण्यात फारसं यश आलं नव्हतं.

मागील काही सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म परतत असल्याचं दिसलं होतं. अखेर मंगळवारच्या (21 मे) या महत्त्वाच्या सामन्यात त्यानं दाखवून दिलं की त्याच्यावर एवढी मोठी बोली का लागते.

या मोसमात हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांच्या बाबतीतील एक वैशिष्ट्यं म्हणजे दोन्ही संघांना सलामीची जोरदार भागीदारी मिळाली.

कोलकाताकडून खेळताना फिल सॉल्ट आणि सुनील नारायण या दोघे तर हैदराबादकडून खेळताना अभिषेक शर्मा आणि ट्रैव्हिस हेड हे दोघे गोलदांजासाठी डोकेदुखी ठरले होते. या दोन्ही सलामीच्या जोड्यांनी दणकून गोलदांजाचा घाम आणि धावा काढल्या.

वेंकटेश अय्यर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेंकटेश अय्यर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

विशेषकरून ट्रॅव्हिस हेडने या सामन्याआधी 13 डावांमध्ये मिळून एकूण 533 धावा केल्या. यात त्याने एक शतक आणि चार अर्धशतकं ठोकली आहेत.

त्यामुळे त्याला लवकर बाद करणं कोलकाता नाईट रायडर्ससाठी महत्त्वाचं होतं. पहिल्याच षटकात हे काम स्टार्कनं केलं. स्टार्कनं हेडला भोपळाही फोडू न देता त्रिफळाचित (बोल्ड) केलं.

यानंतर स्टार्कनं धोकादायक समजल्या जाणाऱ्या नीतीश रेड्डी आणि शहबाज अहमद या दोघांनादेखील आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

स्टार्कने या सामन्यात 4 षटकांमध्ये मिळून 34 धावा देऊन 3 गडी बाद केले.

क्रिकेट तज्ज्ञ टॉम मूडी म्हणाले की, स्टार्कने दाखवून दिलं की तो एक मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे आणि मोठ्या सामन्याच्या खेळाडूला मोठी रक्कम का मिळते.

स्टार्कने बाद केलेल्या फलंदाजांव्यतिरिक्त हैदराबादचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज, अभिषेक शर्मा हा देखील दुसऱ्याच षटकात वैभव अरोराच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.

हैदराबादनं 39 धावा करेपर्यतच चार फलंदाज गमावले होते. या स्थितीतून सामन्यात पुनरागमन करणं अवघड होतं.

आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

त्रिपाठीच्या 50 उपयुक्त धावा

अशा नाजूक स्थितीत राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 62 धावांची दमदार भागीदारी केली.

क्लासेन 32 धावा करून बाद झाला तर त्रिपाठीने 35 चेंडूमध्ये 55 धावा ठोकल्या.

शेवटच्या षटकांमध्ये हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सने 30 धावा काढल्या आणि आपल्या संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र ही धावसंख्या गाठताना हैदराबादला बरीच मेहनत करावी लागली. त्यांचा संपूर्ण संघ 19.3 षटकांमध्ये 159 धावांवर बाद झाला.

राहुल त्रिपाठी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल त्रिपाठी

कोलकाताच्या सर्व गोलंदाजांनी या सामन्यात गडी बाद केले.

स्टार्कने 3, चक्रवर्तीला 2 आणि रसेल, नारायण, अरोरा आणि हर्षित राणाला प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

जवळपास 10 दिवसांनंतर पूर्ण सामना खेळणाऱ्या कोलकाताचा संघ नव्या उत्साहानं मैदानात उतरला होता. त्यांच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे सामन्याच्या पहिल्याच डावात त्यांचं पारडं जड झालं होतं.

'सॉल्ट नसला तरी हरकत नाही'

कोलकात्याला इतक्या कमी धावसंख्येत रोखणं हैदराबाद संघासाठी खूपच अवघड होतं. कारण दुसऱ्या डावात दवबिंदू दिसू लागले होते. मात्र ही आश्चर्यकारक बाब होती. कारण संपूर्ण भारताप्रमाणेच अहमदाबादमध्ये कमालीची उष्णता होती आणि धावपट्टीच्या अहवालातदेखील सांगण्यात आलं होतं की दव पडण्याची शक्यता नाही.

त्यातल्या त्यात हैदराबादच्या संघासाठी दिलाशाची बाब म्हणजे सॉल्ट हा कोलकाता संघाचा जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू सामन्यात नव्हता. कारण तो इंग्लंडच्या संघाबरोबर वर्ल्ड कपची तयारी करतो आहे.

सुनील नारायणबरोबर रहमतुल्लाह गुरबाज सलामीला आला.

वसीम जाफरसारखे तज्ज्ञ गुरबाज हा कोलकाता संघालातील कच्चा दुवा असल्याचं मानत होते. कारण या सामन्याआधी त्याला एकदाही फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे गुरबाज चांगली फलंदाजी करू शकेल की नाही याबाबत शंका होती. मात्र गुरबाजने या संधीचं सोनं करत सर्वांना चुकीचं ठरवलं.

आयपीएल प्रेक्षक

फोटो स्रोत, Getty Images

गुरबाज पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फ्रंट फुटवर खेळत होता आणि चांगले शॉट खेळत होता.

तिसऱ्या षटकात कोलकाताच्या संघानं कोणताही गडी न गमावता 40 धावा केल्या होत्या. यातील बहुतांश धावा गुरबाजने केल्या होत्या.

मात्र, चौथ्या षटकात हैदराबादच्या संघाला पहिलं यश मिळालं. नटराजनच्या गोलंदाजीवर गुरबाजनं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र कव्हरमध्ये वियसकांतने त्याचा झेल घेतला. त्याने 14 चेंडूमध्ये 2 चौके आणि 2 छक्के लगावत 23 धावा केल्या.

हैदराबाद तीन षटकांनंतर एक मोठं यश मिळालं. सुनील नारायण कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 21 धावा काढल्या.

हैदराबादने सोडले दोन कॅच

कोलकाताचा स्कोअर 67-2 असा होता आणि याच वेळेस हैदराबादचा संघ सामन्यात पुनरागमन करू शकत होता.

वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर दमदार फलंदाजी करत होते. ते दोघेही फलंदाजी करताना जोखीमदेखील पत्करत होते.

मात्र, कोलकात्याचा कॅप्टन श्रेयस अय्यरला बाद करण्याच्या दोन सोप्या संधी हैदराबादने वाया घालवल्या.

दहाव्या षटकात वियसकांतच्या गोलंदाजीवर चेंडू श्रेयसच्या बॅटला लागून शॉर्ट फाइन लेगकडे गेला. यष्टीरक्षक क्लासेनने डाइव्ह मारून झेल घेण्याचा प्रयत्नदेखील केला.

हैदराबाद सनरायझर्स

फोटो स्रोत, Getty Images

चेंडू क्लासेनच्या ग्लोव्हजमध्येदेखील आला होता, मात्र तीच कॅच पकडण्याच्या नादात राहुल त्रिपाठीची क्लासेनशी टक्कर झाली आणि क्लासेनच्या हातातून झेल सुटला.

पुढच्याच षटकात हेड सारख्या उत्तम क्षेत्ररक्षकानेदेखील श्रेयस अय्यरचा झेल सोडला. अशाप्रकारे कोलकाताच्या कॅप्टनला दोन वेळा जीवदान मिळालं.

अय्यर आणि अय्यरची जोडी

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला वेंकटेश अय्यर सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत होता. मात्र कोणत्याही चेंडूवर तो सहजपणे मिडविकेटवर 6 धावा ठोकत होता.

त्याने एक शानदार षटकार मारून 28 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

दुसऱ्या टोकाला कॅप्टनने पुढील षटकात दोन षटकार आणि दोन चौकार ठोकून फक्त अर्धशतकंच पूर्ण केलं नाही तर कोलकालादेखील सामना जिंकून दिला. कोलकाताने हा सामना 14 व्या षटकातच जिंकला होता.

वेंकटेशने 28 चेंडूमध्ये नाबाद 51 धावा केल्या. तर श्रेयसने 24 चेंडूमध्ये नाबाद 58 धावा केल्या.

कोलकाताने हा सामना सहजपणे जिंकला आणि अंतिम फेरी गाठली.

आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

या सामन्यानंतर रवि शास्त्रीने या भागीदारीकडे इशारा करत श्रेयसला विचारलं की क्रीझवर दोन्ही अय्यरना एकमेकांशी बोलण्यात अडचण आली नसेल.

तेव्हा श्रेयसने हसून उत्तर दिलं की, "तो तामिळमध्ये बोलत होता आणि मी हिंदीत उत्तर देत होतो. कारण मला तामिळ कळते मात्र मी तितकी चांगली तामिळ बोलू शकत नाही."

त्यांनी एकमेकांशी कोणत्याही भाषेत संवाद साधलेला असो, मंगळवारी त्यांची भाषा विजयाचीच होती.

इतर संघांसाठी संदेश

कोलकाता संघाच्या या विजयानंतर सुनील गावस्कर म्हणाले की हा फक्त मोठा विजय नाही तर इतर संघांसाठी एक संदेश देखील आहे.

"या सामन्याकडे कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी तो एक मोठा विजय मानला जाईल. टी20 सामान 14 व्या षटकातच जिंकणं आणि तेदेखील 8 गडी राखून, हा एक खूप मोठा विजय आहे. हा दुसऱ्या संघांसाठी एक संदेश आहे. जो कोणी फायनलमध्ये येणार आहे त्याने आमच्यापासून सांभाळून राहावं हा तो संदेश आहे."

मॅथ्यू हेडन यांनी कोलकाता नाईटरायडर्सच्या संघाचं कौतुक करताना म्हटलं की, "केकेआरच्या संघानं दाखवून दिलं आहे की तो मोठे सामने जिंकू शकतात. गोलंदाजीमध्ये स्टार्कव्यतिरिक्त वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. तर श्रेयस आणि वेंकटेशने दमदार फलंदाजी केली."

माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा म्हणाले की श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांच्या फॉर्ममुळे कोलकाताच्या संघाला आणखी बळकटी मिळते.

हैदराबाद सनरायझर्स

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "या दोन्ही खेळाडूंचं फॉर्ममध्ये असणं कोलकातासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कोलकाताचे सलामीवीर दणकून फलंदाजी करत आहेत आणि फलंदाजीत खालच्या बाजूला त्यांच्याकडे आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह सारखे फलंदाज आहेत. दोन्ही अय्यरची जोडी सलामीवीर आणि तळाचे फलंदाज यामधील असा दुवा आहे जो वेगाने धावादेखील काढतो आणि लयदेखील कायम ठेवतात."

दुसऱ्या क्वॉलीफायर सामन्यातून हैदराबादला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळेल.

त्यांचा सामना कोणत्या संघाची होणार ही गोष्ट राजस्थान विरुद्ध बेंगळूरू यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होईल.

हा सामना जिंकणारा संघ हैदराबादसमोर उभा ठाकेल. तर दुसऱ्या क्वॉलीफायर सामन्याचा विजेता संघ चेन्नईत कोलकाताविरुद्ध मैदानात उतरेल.