नेपोलियनची तुलना हिटलर आणि स्टॅलीनशी करता येऊ शकते का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, निल आर्म्सस्ट्राँग
- Role, बीबीसी कल्चर
प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रिडली स्कॉट यांनी 19 व्या शतकातील फ्रान्सचा सम्राट असलेल्या नेपोलियनच्या जीवनावर एक चित्रपट बनवला असून तो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
चित्रपट दिग्दर्शकाने नेपोलियनची तुलना हिटलर आणि स्टॅलिनशी केल्यामुळे लोक चांगलेच संतापले आहेत.
येत्या नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात प्रसिद्ध अभिनेता वॉकिन फिनिक्सने नेपोलियनची भूमिका साकारली आहे.
चित्रपट दिग्दर्शक सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
या चित्रपटात एका सम्राटाच्या उदयाची कथा सांगितली आहे. शिवाय चित्रपटात नेपोलियनचे त्याच्या पत्नी जोसेफिनसोबत असलेले संबंधही चित्रित करण्यात आले आहेत. व्हेनेसा किर्बी जोसेफिनच्या भूमिकेत आहे.
हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी अद्याप वेळ असला तरी या बायोपिकची चर्चा सुरू झाली आहे.
त्याची सुरुवात झाली ती रिडली स्कॉटच्या एका वक्तव्यामुळे. त्यांनी असं म्हटलं होतं की, "मी नेपोलियनची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, अॅडॉल्फ हिटलर आणि स्टॅलिन यांच्याशी करतो. नेपोलियनमध्येही बऱ्याच वाईट गोष्टी होत्या."
रिडली स्कॉट हे नेपोलियनचं पात्र समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण फ्रान्समधील लोकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला अजिबात वेळ दवडला नाही.
तुलनेशी असहमत
या तुलनेशी असहमत असलेल्या फ्रेंचांनी पलटवार करण्यास अजिबात विलंब केला नाही.
फाउंडेशन नेपोलियनशी संबंधित पिअर ब्रँडा यांनी ब्रिटीश वृत्तपत्र टेलिग्राफशी बोलताना सांगितलं की, "हिटलर आणि स्टॅलिनने कशाचीही निर्मिती केलेली नाही, त्यांनी नुसता उच्छाद मांडला."

फोटो स्रोत, ALAMY
नेपोलियन फाउंडेशनशी संबंधित थियरी लेंट्स म्हणतात की, "नेपोलियनने फ्रान्स किंवा युरोपचा विनाश केला नाही. त्याचा वारसा जपला गेला आणि नंतर त्याचा विस्तार झाला."
पण सत्य काय आहे? रिडली स्कॉटने नेपोलियनची हिटलर आणि स्टॅलिनशी तुलना करणं योग्य आहे का?
नेपोलियन हा एक प्रतिभावंत सैनिक होता. 1799 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाल्यावर फ्रान्स मध्ये राजकीय अस्थिरता वाढली. याच काळात तो सत्तेवर आला.
नेपोलियनने क्रांतीपूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा फ्रान्समध्ये समानतेचा पाया रचला असं त्याचे प्रशंसक म्हणतात.
त्याने सरकारचं केंद्रीकरण केलं, बँकांची पुनर्रचना केली, शिक्षणात सुधारणा केली आणि नेपोलियन संहिता आणली. या संहितेमुळे कायदेशीर व्यवस्था बदलली गेली.
ही संहिता नंतर इतर अनेक देशांसाठी आदर्श ठरली.
ब्रिटिश संस्कृती आणि साहित्यात नेपोलियनचं चित्रण
पण त्याने युरोपभर अनेक रक्तरंजित लढाया लढल्या. नेपोलियनचं साम्राज्य स्पेनपासून मॉस्कोपर्यंत विस्तारलं होतं.
1812 येईपर्यंत फक्त ब्रिटन, पोर्तुगाल, स्वीडन आणि ऑटोमन साम्राज्य हेच देश स्वतंत्र होते. उर्वरित युरोप त्याच्या ताब्यात होता.

फोटो स्रोत, Getty Images
पण 1815 मध्ये नेपोलियनला पराभवाला सामोरं जावं लागलं. नेपोलियनच्या विरोधात ब्रिटिशांच्या नेतृत्वाखालील एक आघाडी तयार झाली. आणि वॉटरलूच्या प्रसिद्ध लढाईत नेपोलियनचा पराभव झाला.
ब्रिटनच्या लोकांच्या मनात आजही त्या युद्धाच्या आठवणी कायम आहेत. ब्रिटनमधील व्यंगचित्रकारही नेपोलियनच्या विरोधात होते.
प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेन ऑस्टन यांच्या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी देखील नेपोलियन युगाशी संबंधित आहे.
1843 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्राइड अँड प्रिज्युडिस या कादंबरीत नेपोलियनच्या संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्थापन केलेल्या नागरी सेनेचा उल्लेख आहे.
शार्लट ब्रॉन्टे यांच्याकडे नेपोलियनच्या शवपेटीचा एका तुकडा होता, तो ब्रसेल्समधील एका शिक्षिकाने त्यांना दिला होता.
शेरलॉक होम्ससारखी पात्रं निर्माण करणारे आर्थर कॉनन डॉयल त्यांच्या कादंबरीतील खलनायक पात्राला म्हणजेच प्राध्यापक मोरियार्टीला 'गुन्हेगारीचा नेपोलियन' म्हणत असत.
1945 साली प्रकाशित झालेल्या जॉर्ज ऑर्वेलच्या 'अॅनिमल फार्म' या पुस्तकात हुकूमशहा असलेल्या डुकरालाही नेपोलियन असं नाव दिलं गेलंय.
त्यामुळे नेपोलियनला हुकूमशहा म्हणणं आणि त्याची तुलना कुप्रसिद्ध हुकूमशहांशी करणं योग्य आहे का?
तसं तर नेपोलियन विषयी लोकांची वेगवेगळी मतं आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक फिलिप डायर यांनी नेपोलियनचं चरित्र तीन खंडांमध्ये लिहिलंय.

फोटो स्रोत, JACQUES LUIS DAVID
त्यांना ही तुलना योग्य वाटत नाही. प्राध्यापक डायर म्हणतात, "नेपोलियन क्रूर होता की नाही यावर तुम्ही वादविवाद करू शकता. मी पण कदाचित त्याला क्रूरच म्हणेन. पण तो हिटलर किंवा स्टॅलिन सारखा अजिबात नव्हता. या दोन्ही हुकूमशहांनी आपल्याच लोकांचं क्रूरपणे दमन केलं. आणि यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला."
प्रोफेसर डायर सांगतात की अनेकांनी नेपोलियनच्या राजवटीला पोलीसी राज्य म्हटलंय कारण त्याने गुप्तहेरांचं एक जाळं उभं केलं होतं.
हे गुप्तहेर नेपोलियनला लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची माहिती द्यायचे.
ते सांगतात, "पण काही उच्चभ्रू वर्गातील लोक किंवा पत्रकार सोडले तर त्याने कोणालाही फाशी दिली नाही. ज्यांना फाशीची शिक्षा झाली, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हेही दाखल झाले. जर मला नेपोलियनची तुलना एखाद्याशी करायची असेल तर मी फ्रान्सच्या 14 व्या सम्राट लुईशी करेन. तो असा सम्राट होता ज्याने अनावश्यक युद्ध केली ज्यात हजारो लोक मारले गेले."
"नेपोलियननेही तेच केलं. त्याने केलेली युद्ध आवश्यक होती की नव्हती हा विषय वादातीत आहे. पण त्याच्या लढाईत लाखो जीव गेले. प्रत्यक्षात यात किती नागरिकांचा बळी गेला याचा योग्य अंदाज लावणं कठीण आहे."
अर्थहीन तुलना
फ्रेंच पत्रकार आणि टेलिग्राफ स्तंभलेखिका अॅन-एलिझाबेथ मूते यांच्या म्हणण्यानुसार, नेपोलियनची हिटलर किंवा स्टॅलिनशी तुलना करणं अर्थहीन आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणतात, "नेपोलियनने छळ छावण्या उभारल्या नाहीत. त्याने अल्पसंख्याकांची कत्तल केली नाही. मला मान्य आहे की पोलिसांचा हस्तक्षेप जास्त होता, पण सामान्य लोकांना त्यांचं जीवन अगदी मनमोकळेपणाने जगता येत होतं."
त्या सांगतात, फ्रान्समध्ये नेपोलियनला सुधारक मानतात.
"नेपोलियन अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. त्याने तयार केलेले कायदे आणि संस्था आजही फ्रान्समध्ये अस्तित्वात आहेत."
"फ्रान्सचे लोक सरंजामशाही व्यवस्थेपेक्षा नेपोलियनच्या राजवटीत जास्त समाधानी होते असं मानलं जातं."
नेपोलियन जवळ दूरदृष्टी होती
पण नेपोलियनवर अनेक पुस्तकं लिहिणाऱ्या लिव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक चार्ल्स एसडेल यांचं मत अगदीच वेगळं आहे.
ते म्हणतात की, "मी नेपोलियनला एखाद्या वॉर लॉर्ड प्रमाणे पाहतो. तो वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित असा माणूस होता. अतिशय निर्दयी होता. शिवाय त्याच्याकडे फ्रान्स आणि युरोपसाठी दूरदृष्टी होती.
त्याला या दूरदृष्टीच्या माध्यमातून आपल्या युद्धयंत्राचं पालनपोषण करायचं होतं. त्याला भविष्याविषयी काळजी होती असं म्हणणं चुकीचं आहे. नेपोलियनला महापुरुष बनवण्यासाठी ही सर्व कसरत केली जाते."

फोटो स्रोत, ALAMY
ते म्हणतात, "नेपोलियनने आपल्या साम्राज्यात आणि युद्धांमध्ये प्रचाराच्या सहाय्याने आपली बाजू खंबीरपणे मांडली. ही फ्रेंच बाजू नव्हती. फ्रान्समधला प्रत्येकजण युद्धात लढत होता. तोच प्रचार आजही सुरू आहे. नेपोलियन संपला तरी आजही त्याचे समर्थक आहेत."
पण नेपोलियनची तुलना हिटलर आणि स्टॅलिनशी करणं प्राध्यापक एसडेल यांना देखील मान्य नाही.
"नेपोलियनमध्ये अनेक वाईट गोष्टी होत्या. पण नाझी युगाची व्याख्या करणारी वर्णद्वेषी विचारसरणी नेपोलियनमध्ये अजिबात नव्हती. नेपोलियनने नरसंहार केला नव्हता. नेपोलियनच्या संपूर्ण कारकिर्दीत राजकीय कैद्यांची संख्या खूपच मर्यादित होती. त्यामुळे त्याची तुलना हिटलर किंवा स्टॅलिनशी करणं मूर्खपणाचं आहे."
ब्लेड रनर, ग्लॅडिएटर, थेल्मा आणि लुईस यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक रिडली स्कॉट यांना चित्रपटांचं प्रमोशन कसं करायचं हे चांगलंच ठाऊक आहे.
नेपोलियनची तुलना स्टॅलिन किंवा हिटलरशी करून बरीच प्रसिद्धी मिळू शकेल असा अंदाज त्यांनी बांधला असावा. त्यामुळेच स्कॉट यांनी हा मुद्दा उपस्थित केला असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता प्राध्यापक एसडेल नेपोलियनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहायला जाणार का?
या प्रश्नावर एसडेल म्हणतात, "मला चित्रपट बघायला तर जावं लागेल, पण रॉड स्टायगर यांनी यात नेपोलियनची भूमिका वठवलेली नाही, त्यामुळे कदाचित हा चित्रपट म्हणावा तितका खास नसेल."
1970 मध्ये आलेल्या वॉटरलू चित्रपटात रॉड स्टायगर यांनी नेपोलियनची भूमिका केली होती.
प्राध्यापक एसडेल हसत सांगतात, "स्टायगरने नेपोलियनचं पात्र अगदी उत्तमरित्या वठवलं होतं."
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








