योनीमार्गात कोरडेपणा कशामुळे येतो? त्याचा काय त्रास होतो?

सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा कधी ना कधीतरी दिसून येतो. महिलांमधील याचं प्रमाण आकड्यांच्या हिशोबात बघायला गेलं तर ते 50 ते 90 टक्क्यांपर्यंत दिसून येतं.

पण या आकड्यांमध्ये अचूकता आढळत नाही. यामागे कोणतं कारण असावं? तर प्रत्येक स्त्री याविषयी उघडपणे बोलतेच असं नाही. बऱ्याचदा स्त्रियांच्या योनीमार्गात कोरडेपणा असल्यामुळे संभोग करताना त्रास होतो. याविषयी त्या डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळतात.

सेक्सोलॉजिस्ट असणाऱ्या लॉरा कमेरा म्हणतात, "पूर्वी मोजक्याच महिलांना हा त्रास होतो असं आम्हाला वाटत होतं. पण हा त्रास हा खूप सामान्य झाला असून अनेक स्त्रियांमध्ये याची लक्षणं दिसून येतात."

योनीमार्गाच्या कोरडेपणाला ‘योनी शोष’ असं देखील म्हटलं जातं. हा शारीरिक आजार असला तर तो मानसिकतेवरही आधारित आहे.

पण याची लक्षणं जाणवायला लागली असतील तर यातून बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे.

इस्ट्रोजेन समस्या

याला सामान्य भाषेत योनीमार्गातील कोरडेपणा असं जरी म्हटलं जात असेल तरी वैद्यकीय भाषेत याला ‘जेनेटिक मेनोपॉजल सिंड्रोम’ (जीएमएस) असं म्हटलं जातं. कारण यामुळे जननेंद्रिय, मूत्रनलिका आणि मूत्राशय या भागात बदल घडत असतात.

स्त्रियांना हा कोरडेपणा त्यांच्या आयुष्यात बऱ्याचदा जाणवतो.

रजोनिवृत्तीदरम्यान इस्ट्रोजेन पातळी खालावते आणि त्यामुळे योनीमार्गावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. हृदय, हाडे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्त्रियांच्या प्रजनानासाठी इस्ट्रोजेन हा एक महत्त्वाचा घटक आहे.

लॉरा कमेरा सांगतात, "स्तनपान सुरू असेल किंवा गर्भनिरोधक गोळ्या सुरू असतील तर इस्ट्रोजेन पातळी खालावते. शिवाय स्त्रियांमधील गर्भाशयाचा कर्करोग किंवा गर्भाशयातल्या गाठींवर उपचार करताना दिली जाणारी औषधं यामुळे इस्ट्रोजेन कमी होण्याची शक्यता असते."

तणाव, चिंता अशा काही घटकांमुळे योनीमार्गात कोरडेपणा येऊ शकतो.

लक्षणं

सेक्सोलॉजिस्ट असलेल्या लॉरा सांगतात शारीरिक संबंधांदरम्यान योनिमार्गात कोरडेपणा आणि वेदना जाणवणं सामान्य लक्षणं आहेत.

त्या पुढे सांगतात, “90% स्त्रिया जेव्हा वैद्यकीय सल्ला घेतात त्याचवेळी त्या योनीमार्गातील कोरडेपणाविषयी बोलतात. पण शारीरिक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदना लपविल्या जातात. अनेक स्त्रियांना संभोगादरम्यान अती वेदना होतात पण त्या मदत मागत नाहीत. कारण या विषयावर बोलणं निषिद्ध मानलं गेलंय."

शारीरिक संबंधांदरम्यान जर योनीमार्ग कोरडा असेल तर त्या भागात खाज सुटते, चिडचिड होते किंवा रक्तस्त्राव होतो. इतर लक्षणांमध्ये अतिसार, वेदना आणि अपूर्ण लघवी आदी लक्षणं दिसून येतात.

शिवाय यामुळे स्त्रियांमधील लैंगिक इच्छा देखील कमी होते.

लॉरा सांगतात "यामुळे स्त्रियांमध्ये निराशा, चिंता दिसून येते आणि जोडप्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. शारीरिक संबंध ठेवताना मला वेदना होतील या भीतीने स्त्रिया चिंताग्रस्त होतात."

महिलांनी या विषयावर बोलण्याचं प्रमाण कमी असल्याने त्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी बराच अवधी जावा लागेल, असं लॉरा सांगतात.

त्या पुढे सांगतात, "बऱ्याच स्त्रियांनी समुपदेशनासाठी आल्यावर सांगितलं की, त्यांना वर्षानुवर्षे हा त्रास होतोय."

स्त्रियांमधील एस्ट्रोजेनच्या पातळीतील वाढ आणि घट होतच राहते. पण योनीमार्गातील कोरडेपणा दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपचारांची शिफारस केली आहे.

हा कोरडेपणा रोखण्यासाठी इतरही गोष्टी करता येतील, जेणेकरून जननेंद्रियांमध्ये रक्त प्रवाह वाढवता येऊ शकतो.

यावर उपचार काय?

शारीरिक संबंधांमुळे या समस्येचा त्रास कमी होऊ शकतो. आत्म-उत्तेजना, शारीरिक संबंध, लैंगिक साधनं (सेक्स टॉय) यांचा वापर करून या कोरडेपणावर उपचार करता येत असल्याचं लॉरा स्पष्ट करतात.

यामुळे जननेंद्रियातील रक्त प्रवाह वाढतो. या भागातील ओलसरपणा वाढून लवचिकता सुधारते.

एक सेक्सोलॉजिस्ट म्हणून लॉरा कमेरा स्त्रियांना त्यांच्या शारीरिक संबंधांवर पुनर्विचार करायला सांगतात.

त्या म्हणतात, "नात्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल वेदनेबद्दल बोलता आलं पाहिजे."

लॉरा म्हणतात, “आम्ही यापूर्वीही सांगितलंय, काही स्त्रिया याबद्दल बोलतात. आणि त्यांच्यात लक्षणं आढळू लागली की त्वरित उपचार केले जातात.”

हा भाग ओलसर, लवचिक आणि निरोगी राहण्यासाठी काही विशेष ल्युब्रिकंट्स, मॉइश्चरायझर्सचा वापर करण्यास सांगितला जातो. त्यामुळे योनीच्या भागातील कोरडेपणा आणि अस्वस्थता कमी होण्यासाठी मदत होते.

लॉरा सांगतात, "योनीमार्गाच्या कोरडेपणाचा सामना करण्यासाठी तुम्ही लगेचच मॉइश्चरायझर्सचा वापर करू शकता."

शिवाय या कोरडेपणावर उपचार करण्यासाठी हायल्युरॉनिक अॅसिड, लेसर तंत्रज्ञान, कार्बन डायऑक्साइड ऍप्लिकेशन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी थेरपी वापरली जाऊ शकते.

पण व्हल्व्हो-व्हजायनल लेसर आणि रेडिओफ्रिक्वेंसी हे दोन्ही उपचार परिणामकारक आणि सुरक्षित असल्याबद्दल साशंकता आहे. म्हणूनच लॉरा सांगतात की, या उपचारांची शिफारस करण्यापूर्वी ते सुरक्षित असल्याची खात्री केली पाहिजे.

या उपचारांना पर्यायी उपचार म्हणून शारीरिक संबंध मानसिक आधाराचं काम करतात, असं लॉरा यांना वाटतं.

लॉरा म्हणतात, "स्त्रियांना रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचायला बराच अवधी असतो आणि त्याकाळात हा त्रास झाल्यास त्या याचा सामना ही करू शकतात. पण शारीरिक संबंध ठेवताना त्यांना हा त्रास होऊ लागला तर त्यांना समजून घेण्यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक आहे. पण या शिक्षणाचा आजही अभाव आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)