हिंदू लोकांची मनं जिंकण्यासाठी ब्रिटिश अधिकारी होळी कशी खेळायचे?

हिंदुंची मनं जिंकण्यासाठी ब्रिटिश अधिकारी होळी कशी खेळायचे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेटकाफ हाऊस
    • Author, आर वी स्मिथ
    • Role, बीबीसी

होळी म्हणजे रंगांचा सण. वर्षानुवर्षं देशातल्या अनेक भागांमध्ये होळीचे रंग खेळले जातात. त्याचाच वापर करत इंग्रजांनीही आपली मनं जिंकून घेतली.

मुघल साम्राज्य शेवटच्या घटका मोजत होतं तेव्हा आपली सत्ता वाढवण्यासाठी ब्रिटिश अधिकारी प्रजेसोबत होळीच्या मैफिलीत सहभागी होत असतं.

दिल्लीत ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे सर थॉमस मेटकाफही उत्साहानं होळी खेळत असत. यावर आज क्वचितच कोणाचा विश्वास बसेल?

कारण, सर मेटकाफ कुणी साधेसुधे अधिकारी नव्हते. कंपनीत ते मोठ्या पदावर होते. त्यांचा जन्म एका मोठ्या ब्रिटिश सावकारी खानदानात झाला होता.

मुघलांच्या दरबारात ते भारताच्या गव्हर्नरचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असायचे.

त्यामुळे ते होळी खेळत असल्याचा सांगितलं तर विश्वास ठेवणं अवघड जाणारच.

पण दिवंगत श्रीमती एवरेज यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर सर थॉमस मेटकाफ यांना रंगांच्या या सणाची फार आवड होती.

पण घराच्या आतमध्ये रंग खेळायचे नाहीत अशी त्यांची सक्त ताकीद होती. दिल्लीतल्या त्यांच्या मेटकाफ महालात त्यांनी त्यांचा हिरो नेपोलियनचे पुतळे ठेवले होते. या पुतळ्यांना रंग लागण्यापासून मेटकाफ जपत असत.

ब्रिटिशांना भारतातला उन्हाळा सहन होत नसे. त्यामुळे फाल्गुन महिन्याचं आणि वसंत ऋतूचं स्वागत सर मेटकाफ यांनी केल्याचा उल्लेख कुठे आढळत नाही.

पण हिंदूंचं मन जिंकण्यासाठी ते होळी खेळत असत, असं आजी-आजोबांच्या गोष्टींमधून नातवंडांना सांगितलं जाई.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

रंग खेळण्यामागे मेटकाफ यांची राजकीय रणनिती होती. मुघलांच्या दरबारात येणं जाणं असल्यानं त्यांना मुस्लीम संस्कृतीविषयी जवळीक निर्माण झाली होती.

मात्र, आपण हिंदू संस्कृतीच्याही प्रेमात आहोत हे दाखवण्यासाठी मेटकाफ कडक उन्हाळ्यातही दिल्ली सोडत नव्हते.

मेटकाफ हाऊस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेटकाफ हाऊस

हिवाळ्याचे दिवस ते त्यांनी बांधलेल्या मेटकाफ हाऊसमध्ये घालवत. त्यांच्या घराला मटका कोठी असंही म्हटलं जाई.

शिवाय, मोहम्मद कुली खान यांची कबर बांधली होती ती जागा बळकावून त्यांनी त्याचंही घर केलं होतं. तिथे ते उन्हाळ्याचे दिवस घालवत.

होळी कशी साजरी केली जाई?

उत्तर दिल्लीतल्या त्यांच्या महालात राजे, नवाब, जमीनदार आणि बड्या लोकांचं नेहमी येणं- जाणं सुरू असे. चांदनी चौक भागात राहणारे श्रीमंत तर अनेकदा त्यांच्या घरी गुलाल घेऊन येत असत.

आपल्या गोऱ्या-लाल साहेबावर त्यांना तो उधळायचा असे. होळीच्या दिवशी त्यांचा हा साहेब म्हणजे सर मेटकाफही छान कुर्ता पायजमा घालून तयार होत.

पण 1857 च्या उठावानंतर मेटकाफ हाऊसचं वारं बदललं. या उठावादरम्यान परिसरातल्या गुर्जर या भटक्या समुदायातल्या लोकांनी मेटकाफ हाऊस संपूर्ण लुटलं.

त्यात घराचं खूप नुकसानही झालं होतं. मेटकाफ हाऊस त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर उभारलं गेलं आहे असं गुर्जर समुदायाचं म्हणणं होतं.

या जमिनी अत्यंत कवडीमोल भावानं विकत घेतल्या होत्या.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चांदनी चौक भागात राहणारे श्रीमंत तर अनेकदा त्यांच्या घरी गुलाल घेऊन येत असत.

त्याआधीच म्हणजे 1853 लाच सर मेटकाफ यांचं निधन झालं होतं. मुघल बादशाह बहादुरशाह जफर यांच्या सगळ्यात आवडत्या राणीनं, जीनत महल हिनं त्यांच्यावर विषप्रयोग केला, असं म्हटलं जातं.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा मुलगा थियोफिलस मेटकाफ याने घेतली. 1857 च्या उठावाचा मोठा रोष त्याला सहन करावा लागला.

अर्धनग्न अवस्थेत दिल्लीच्या रस्त्यावरून त्याची धिंड काढली गेली होती.

बंडखोरी केलेल्या सैनिकांनी त्यांना खूप त्रास दिला. शेवटी, पहाडगंजचे तेव्हाचे पोलीस अधीक्षक यांना थियोफिलस मेटकाफ यांची दया आली. त्यांच्या मदतीनं एक घोडा घेऊन थियोफिलस राजस्थानला पळून गेले.

त्यानंतर दिल्लीचे रहिवासी आणि थियोफिलस यांच्यात वैरच निर्माण झालं. अशात त्यांच्या वडिलांसारखे ते होळी खेळतील, असा कुणी विचारही करू शकत नव्हते.

आग्राच्या हॅलिंगर हॉलमधली होली

पण त्यांचे वडील, सर थॉमस मेटकाफ, होळी खेळल्यानंतर अंगावरचे कपडे काढून हिंदू नोकरांना दान करत. त्यांच्या घरातले नोकर गोऱ्या साहेबानं दिलेली ही भेट आनंदानं घेत. त्यांचे कपडे संपूर्ण उन्हाळाभर नोकर वापरत असत.

श्रीमती एवरेट तेव्हा सिविल लाइन्स भागात रहात होत्या. हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यात अतिशोयोक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पण त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत, असंही म्हणता येणार नाही. त्यांचं लिखाण त्या काळातल्या अशा अनेक मसालेदार गप्पांनी भरलेलं असे.

आज मटका कोठीच्या जागी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आहे. वैज्ञानिक आणि त्यांचे कुटुंबीय आता तिथे होळी खेळतात.

दिल्लीत मेटकाफ हाऊसमध्ये खेळली जाई तशी आग्र्याच्या हॅलिंगर हॉलमध्येही ब्रिटिश अधिकारी उत्साहानं होळी साजरी करत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हॅलिंगर हॉलमध्ये होळी आणि दिवाळीही साजरी केली जाई. त्यात स्थानिक सावकारही सामील होत.

हॅलिंगर हॉल म्हणजे थॉमस मेटकाफ यांचे मोठे बंधू सर चार्ल्स मेटकाफ यांचं अलिशान घर. त्याकाळी तिथं दिल्लीतल्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी महिन्यातून एकदा तरी कॉकटेल आणि डान्स पार्टी आयोजित केली जात असे.

त्याशिवाय, हॅलिंगर हॉलमध्ये होळी आणि दिवाळीही साजरी केली जाई. त्यात स्थानिक सावकारही सामील होत.

हा हॅलिंगर हॉल चार्ल्स यांच्याच मेटकाफ टेस्टिमोनियल या घराची प्रतिकृती होता. पुढे 1890 मध्ये टेस्टिमोनियल हे घर रहस्यमय पद्धतीने लागलेल्या आगीत जळून खाक झालं.

पण हॅलिंगर हॉलचे अवशेष आजही जुन्या आठवणी सांगतात.

हॅलिंगर हॉल नंतर टी.बी.सी. मार्टिन यांच्या मालकीचा झाला. ते तिथेच रहात होते. त्यांना स्थानिक मुन्ना बाबा म्हणत, असं आमचे वडील सांगायचे.

काही इतर पुरावे

आता आग्र्यात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या मागे हॅलिंगर हॉल आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला अकबराच्या काळातली शहीदांची स्मशानभूमी आहे. त्याशेजारी लेडी डॉ. ऊलरीक यांनी बांधलेलं लॉज आहे.

याच रस्त्यावरून पुढं चालत गेलं की रस्त्यावरच्या जनावरांसाठी बांधलेलं निवारा केंद्र आहे. त्यानंतर एक अलिशान बंगला लागतो. बॉल नावाचे दंडाधिकारी तिथं रहात. पुढे त्या बंगल्यात टवाकले वकील राहू लागले.

जुन्या मध्यवर्ती कारागृहासमोर असलेल्या एका टेकडीवर गवताचं छत असलेल्या बंगल्यात बॉल यांचा मुलगा रहात असे.

आता ती टेकडी खोदून तिथं कॉलनी बनवली गेली आहे आणि जुन्या मध्यवर्ती कारागृहाच्या जागी संजय प्लेस कॉम्प्लेक्स उभारलंय.

श्रीमती उलरिक यांचा दवाखाना पीपलमंडीमध्ये होता. त्यांना दीर्घायुष्य लाभलं होतं. अलिकडे म्हणजे 70 वर्षांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पण त्या एक रसरशीत प्रसंग सांगत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, होळी सुरू असताना दंगल होऊ नये म्हणून सैनिक तैनात केले जात असत.

होळी सुरू असताना दंगल होऊ नये म्हणून सैनिक तैनात केले जात असत. त्या सैनिकांना उलरिक यांनी एकदा जेवणासाठी आमंत्रित केलं.

जेवायला बेसनाच्या जाड रोट्या आणि भोपळ्याची भाजी होती.

जेवण वाढून श्रीमती उलरिक बाहेर गेल्या. त्या परत आल्या तेव्हा त्यांना बेसनाच्या रोट्या ओळीनं भिंतीशेजारी ठेवलेल्या दिसल्या.

त्या रोट्या म्हणजे ताट आहे असं समजून सैनिकांनी फक्त भाजीच खाल्ली होती.

खरंतर गेल्या शतकाच्या सुरूवातीला घडलेला हा प्रसंग आहे. पण लोकांच्या गप्पांमध्ये तो अजूनही ताजा आहे.

तसंच, आग्र्याचे दंडाधिकारी बॉल यांचही वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं. 1857 चा उठाव झाला तेव्हाही तेच आग्र्याचे दंडाधिकारी होते. नंतर त्यांचा मुलगाही दंडाधिकारी झाला. त्यांची नात प्रसिद्ध नृत्यांगना होती. ती फार सुंदर आणि हुशारही होती.

होळीची भरमसाठ खरेदी

बाबूदीन या भागात खाटीक म्हणून काम करत. ते सांगतात की होळीच्या पार्टीत नाचण्यासाठी ही मिस बाबा म्हणजे बॉल ज्युनिअर यांची मुलगी, तिच्या बग्गीत बसून निघाली की रस्त्याच्या दोन्ही बाजुला तिला बघण्यासाठी लोक जमा होत.

नंतर बॉल ज्युनिअर यांचं कुटुंब दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालं. पण त्यांचे मदतनीस अमीरउद्दीन म्हणजेच भाई साहेब यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार होत असे.

दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यात नंतर रहायला आलेले वकील टवाकले यांची अंगकाठी अतिशय बारीक होती. त्यांना चष्मा होता. 1940 मध्ये जॉन मिल्स यांच्याकडे ते अधिकारी म्हणून काम करत असत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, होळीच्या पार्टीत नाचण्यासाठी ही मिस बाबा म्हणजे बॉल ज्युनिअर यांची मुलगी, तिच्या बग्गीत बसून निघाली की रस्त्याच्या दोन्ही बाजुला तिला बघण्यासाठी लोक जमा होत.

टवाकले यांच्या विरुद्ध त्यांची पत्नी अतिशय धष्टपुष्ट होती. आधी कारने आणि मग रिक्षा करून त्या खरेदीसाठी जात. दुकानदार, खासकरून बाबूदीन खाटीकाचा मुलगा त्यांना फार भीत असे.

पण त्या मोकळ्या हाताने खरेदी करत. विशेषतः होळी आणि दिवाळीच्या दिवसांत.

त्यामुळे त्यांनी दमदाटी केली तरी दुकानदार त्याचं वाईट वाटून घेत नसत.

टवाकले यांचा तारुण्यातच मृत्यू झाला. आज त्यांचा हा बंगला सरकारी कामकाजासाठी वापरला जातो.

हॅलिंगर हॉलचे आणखी काही प्रसंग

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता पुन्हा हॅलिंगर हॉलकडे वळुया. तिथे राहणाऱ्या टी.बी.सी. मार्टिन यांचं कुटुंब दंडाधिकारी बॉल यांच्या परिवाराच्या अनेक वर्ष आधी आग्र्यात रहात होतं.

1857 चा उठाव झाला तेव्हा मार्टिन तरूण होते. त्यांनी झाशीच्या राणीविरोधातही युद्ध केलं होतं, असं म्हटलं जातं. राणीचा पाठलाग करत ते एका धान्याच्या कोठारात जाऊन पोहोचले.

अचानक राणी थांबली आणि पलटून मार्टिन यांच्याशी बोलू लागली. झाशीच्या राणीनं त्यांना पाठलाग थांबवायला सांगितलं. त्याबदल्यात बक्षीस म्हणून एक गाडलेला मोठा खजिना शोधायची परवानगी दिली जाईल, असं आश्वासन राणीने दिलं.

हा प्रसंग व्हर्जिनिया मॅग्युआयर नंतरच्या दिवसांत अनेकदा रंगवून सांगत असत. झाशीच्या राणीचं मार्टिन यांनी ऐकलं आणि पाठलाग सोडला.

त्यांचा मुलगा मार्टिन ज्युनिअर जकात कर विभागात आयुक्त होता. ते राज्यासारखे जगत. मोठं सैन्य घेऊन ते जाताना दिसत.

ओल्ड टॉम नावाची एक प्रसिद्ध दारू ते पीत. प्रसिद्ध शायर गालिब यांचीही ती आवडती दारू होती.

मार्टिन ज्युनिअर यांच्या बंगल्यात, म्हणजे हॅलिंगर हॉलमध्ये, होळीचं जेवण असे तेव्हा ते शामी कबाब मिटक्या मारत खात. संध्याकाळी उत्सवावेळी महिलांनाही सरबत दिलं जाई.

हॅलिंगर हॉल एक अलिशान इमारत होती. मार्टिन ज्युनिअरच्या वडिलांनी त्याची डागडुजी करून त्याला देखणं रूप दिलं होतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मार्टिन ज्युनिअर यांच्या बंगल्यात, म्हणजे हॅलिंगर हॉलमध्ये, होळीचं जेवण असे तेव्हा ते शामी कबाब मिटक्या मारत खात.

एका प्राचीन इंग्रजी महाकाव्यातल्या होथगर साम्राज्यातल्या हियोरोट हॉलशी अनेक लोक यांची तुलना करत.

बियोवुल्फ हा योद्धा त्याच्या सैनिकांसोबत हियोरोट हॉलमध्ये रात्र घालवत असे असं वर्णन आहे. ग्रँडेल या राक्षसानं समुद्रमार्गे हल्ला केला आणि बियोवुल्फच्या एका सैनिकाला ठार मारलं.

मग बियोवुल्फने राक्षसाचा वध केला.

हॅलिंगर हॉलबाबत असं काहीही घडलं नाही. पण उत्तर भारतातला इंग्रजी नाटकाचा पहिला प्रयोग तिथं झाला होता.

त्यावेळी झाडावर टांगायच्या कंदीलांनी संपूर्ण व्यासपीठावर प्रकाश आणला जात होता. जणू काही तो रोमांचक प्रकाश तरुण मनांना एकमेकांच्या जवळ येण्याची आणि चुंबन घेण्याची हिंमत देत होता.

असंच होळीच्या पार्टीतही केलं जाई. हॅलिंगर हॉलच्या या जुन्या आठवणी वयस्कर महिलांच्या गप्पांमध्ये नेहमी येतात.

इथं कधीकाळी अशा रसरशीत मैफिली सजवल्या जात होत्या असं आत्ता त्या इमारतीकडे बघून कधीही वाटत नाही.

कबरीत दफन केलेल्या हॉलिंगर हॉलच्या मालकांना त्यांच्या या शानदार घराचे आजचे वाईट हाल पाहून नक्कीच वाईट वाटत असेल.

आज हॅलिंगर हॉलकडे कोणी ढुंकूनही पहात नाही. पण मालकांना त्याकाळी सजणाऱ्या मैफिली, जेवणावळ्या आणि पार्ट्या त्यांना आठवत असतील.

मेटकाफ हाऊसमध्ये होणाऱ्या उत्सावापेक्षा यात काही तसूभरही कमी नव्हतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.