लमाण-गोरबंजारा समाजासाठी होळी जीव की प्राण, एक महिना चालणाऱ्या या होळीविषयी जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वीरा राठोड
- Role, बीबीसी मराठीसाठी
होळी हा सण भारतीय सणसमारंभात एक अतिशय महत्वाचा सण मानाला जातो. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळी म्हणजे सप्तरंगांची उधळण.
मौज मस्तीचा रंग उधळत येणारा हा सण भारतात विविध राज्यात विविध समाजात, जमातीत वेगवेगळ्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. होळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येणारा असतो.
होळीच्या दिवसी सर्व हेवे, दावे, राग, लोभ विसरून एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो. सारी दु:खे विसरून होळीच्या रंगात रंगून जातो.
असाच आयुष्यभर कष्टात राबून जीवन जगणारा बंजारा समाज आज देशभर विखुरला आहे. जीवन जगण्यासाठी फारशी व्यावसायिक साधने उपलब्ध नसणारा हा समाज भटक्या स्थितीतून हळुहळू स्थिरावत चाललेला, आजही पोटासाठी झगडतांना दिसतो.
कष्टावर असलेलं पोट घेऊन आजही वर्षातील सहा महिने निर्वासित अवस्थेत दिवस काढतो. पण त्यांनी आपली संस्कृती कधीच विसरली नाही.
या समाजाने आजही तंत्रज्ञान युगात आपली संस्कृती, चालीरीती, रुढी, परंपरा जपलेली आहे. होळी म्हणजे बंजारा समाजाचा जीव की प्राण. गोरबंजारा हा होळीला जिथे असो, जसा असो त्या अवस्थेतही आपली होळी साजरी करीत आलाय. यातच त्याची आयुष्याकडे बघण्याची डोळस दृष्टी व त्यांना जीवनाचं मर्म कळलेलं असावं म्हणून तो दुःखातही सुखी जीवन जगत असतो.
अशा बंजारा लोकांना सारं विसरून रंगात रंगवून नाचायला, गायला, लावणारी ही त्यांची होळी. बंजारा संस्कृतीप्रमाणेच त्यांची होळीसुद्धा वेगळ्या स्वरूपाची आहे. बंजारा समाजाची होळी म्हणजे अवघ्या जगातला आगळा वेगळा रंगोत्सव, नृत्योत्सव, गीतोत्सवच म्हणावा लागेल.
माघ अमावस्या ओलांडली की, डोंगर पठारांवर दूर रानोमाळी वसलेल्या लमाण तांड्यावर डफ-नंगाऱ्याचे पडघम वाजू लागतात. रात्रीच्या उत्तर प्रहरापर्यंत लेंगी गीतांचे सूर रात्रीच्या नीरव शांततेत आसमंतात घुमू लागतात. दूरवरून डोंगरातून कानी पडणारी गीते प्रत्येकाला सुखावून जातात. फाल्गुनी पौर्णिमा अर्थात 'फागण' येईपर्यंत जसजसा चंद्र फुलत जातो, तसतसा लमाणांच्या लेंगी गीतांना बहर येऊ लागतो.
या गीतांची शृंगारपूर्ण नशा अवघ्या परिसरातल्या पर्यावरणाला मदहोश करून आपल्या पायी, डोडपायी, फेरी, मोड, ठणको, घुमर, डंडा, गिरकी आदी नाच ठेक्यावर झुलायला नाही लावले तर ती लेंगीच कसली.

फोटो स्रोत, Getty Images
चांदण्यात चिंबून मद्याच्या धुंदीत, लेंगी गीतांची लय, डफडा-नंगाराच्या तालावर, लेंगीनृत्यावर थिरकणारे, ठेका धरणारे गेरीया-गेरणी (नाचणारे स्त्री-पुरुष) जणू सूरताल, लयीचा त्रिवेणी संगम चांदण्याच्या साक्षीने होऊ लागतो.
तो फाल्गुनी अमावस्या येईपर्यंत तब्बल एक महिना लमाण बंजारा गोर गणाचा होलिकोत्सव चालतो. आधुनिकेतेपासून शेकडो मैल दूर असून देखील आजच्या स्वार्थी जगातही त्यांनी भाऊबंदकी, प्रेम, माणुसकी आणि संस्कृती टिकवून ठेवली आहे.
आजही तांड्यात पूर्वीप्रमाणेच एकजूट असते. त्यांच्या एकतेचं प्रतीक म्हणजे त्यांचे सण, समारंभ, तीज, त्योहार, उत्सव त्यामधीलच एक होळी. होळी हे तांड्याच्या एकतेच प्रतीक.
सारी भांडणं, तंटे, राग, लोभ विसरून सगे सोयरे, भाऊबंध, हातात हात घालून होळीच्या पर्वात नाचतात-गातात. तांड्याच्या रुढी, परंपरेनुसार तांड्याच्या नववर्षाला सुरुवात होते ती होळीपासून आणि या नवीन वर्षात सर्वांनी हसत नाचत गात प्रवेश करावा हा या गोरगणातला संकेत आहे.
इतर सण समारंभाप्रमाणे लमाण बंजारांची होळी ही निराळीच असते. देशभर विखुरलेला बंजारा समाज आजही आपली होळी पूर्वीप्रमाणे तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहात साजरी करीत असतो.


तांड्याच्या होळीला खरी सुरुवात होते ती 'बोंबली पुनवे'पासून. बोंबली पुनव आली की होळी जवळ आल्याची एक खुण असते. बोंबली पुनवेला प्रत्येक तांड्यात खुटा गाडल्या जाऊन होळीचे वातावरण तयार होऊ लागते. आणि तांड्याला रंग चढू लागतो, पळस फुलल्याप्रमाणे बहर येऊ लागतो.
मोहफुलांची मदहोशी तांड्याच्या रोमारोमात भिनू लागते. बाया माणसं डफड्याच्या तालावर, पारंपरिक शैलीतील लेंगी गीते गाऊन दुःख विसरून जातात.
"होळी खेलो रे भाई-भाई" म्हणत एकमेकांविषयी बांधिलकीची भावना मनात ठेवून गीत गातांना दिसतात.
एक महिना साजरी केली जाणारी होळी रोज प्रत्येक रात्री तांड्यातल्या एका एका घरासमोर खेळली जाते आणि त्या घराच्या मालकाने सर्व 'गेरीया व गेरणी' यांना पाजलेल्या मोहाच्या पहिल्या धारेच्या दारुच्या नशेत तर्रर्र होऊन रात्र ओसरेपर्यंत लेंगी गीते गाईली जातात.
डफडा, नंगारा, थाळी इत्यादी वाद्यांच्या विशिष्ट संगीतातही एक वेगळा गोडवा आहे व तो प्रत्येकाला ठेका धरायला लावतो. "धूम मची धुमे मचीरे बणजारा...तारी लोवडीप धुमे मची रे बणजारा", अशा मस्तीत दंग करणारी लेंगी गीते गायली जातात.
धूम म्हणजे सर्वांना एकत्र येणं, ताल धरणं आणि उत्सव साजरा करणे. ही धूम आजच्या कर्णकर्कश धूम पेक्षा वेगळी आहे. आजची धूम फक्त भपकेबाज व एका विशिष्ट वयाच्या वर्गाची आहे. पण बंजाऱ्यांची धूम ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी, गीत संगीताचा गोडवा निर्माण करणारी, प्रत्येकाला ताल, ठेका धरायला लावणारी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फाल्गुनी पोर्णिमेला सर्व जण मिळून होलिका दहन करतात. लमाण बंजारा गोर गणाची होळी ही पहाटे चार वाजेच्या सुमारास पेटविली जाते. ज्याप्रमाणे होळीची पौराणिक कथा आहे त्याच प्रमाणे बंजारा होळीच्या संदर्भातही काहीशी तशीच कथा सांगितली जाते.
'दुण्डा' नावाची राक्षसीन लहान मुलांना घेऊन जाते म्हणून तिचे मानमर्दन करण्यासाठी 'घुण्ड' करतात व अश्लील शिव्या देतात. जेणेकरून ती पळून जावी म्हणून अशाप्रकारे लोककथा होळीमागे जोडलेली आहे.
होळी दहन केली त्यादिवशी फाग खेळली जाते व लेंगीगीते गाऊन गेर मागितल्या जाते. एकमेकांना नावे ठेवण्यापासून, शिवराळ, शृंगारिक भाषेत श्लील-अश्लील बोलणे, गीत गाणे देखील सर्वमान्यतेने चालते. (काकी ये दादी रिसमत करजो होळी बोलच ये भांड, वेंडी झाटेरी होळी बोलच ये भांड) अशा लेंगी गीतांपासून शृंगार, कामविश्व, जीवनशोध, निसर्ग, अध्यात्मापर्यंत विविध भावनांचे प्रकटीकरण होते.
गेर मागतांना विविध लेंगी गीते गायली जातात. या सर्व लेंगी गीतामध्ये त्यांचे जीवन, जीवन जगण्याची पद्धती, प्रथा, परंपरा, संस्कृती, देवी, देवता, वास्तव्याच्या आजूबाजूचा प्रदेश, वस्त्र, आभूषणे, निसर्ग, इतिहास, श्रृंगार प्रेमभाव इत्यादीची सावली पडलेली जाणवते. होळीच्या दिवशी गेरीया आणि गेरणी जेव्हा तांड्यात होळी खेळायला निघतात तेव्हा गातात.

फोटो स्रोत, Getty Images
"आज होळी केरे घरीयांग खेला / आज होळी नायकेरे घर खेला" गेर मागताना म्हणतात नायका तुझी कमाई दाखव अन्यथा त्याला मग टोळीने मारुन गेर वसूल करतात. जसा जसा दिवस चढत जातो तशी तशी फाग रंगत जाते. प्रत्येक घरची पहिल्या धारेची मोहाची दारू पिऊन जसजशी नशा चढत जाते तस तसे गेरीया आणि गेरणी जोशात येत जातात.
"डफ धिरोल धिरोल धिरोल / डफ धिरोलं धिरोल तारी जानी ढळजाव
डफ धिरोलर / डफडारो घोर सणेर पोळी पोवतू / उतो फैकदीनी लोया.
नाचेन लागीरे... डफ धिरोलर"
डफवाल्या हळू वाजव, तिने जर का डफड्याचा आवाज ऐकला तर ती सणाचा स्वयंपाक करायचं सोडून नाचायला येईल.
अशा प्रकारची लेंगी गीते पुढे श्रृंगारीकतेकडून अश्लीलतेकडे वळतात. अशी जगण्यातून जिवंत झालेली गीते म्हणजे बंजारा होळीचे खास आकर्षण आहे. रोजच्या जीवनातील जगणे, आत्मजाणिवा हा साहित्याचा मूळ गाभा असतो, तोच या लोकगीतातून व्यक्त होतांना दिसतो.
धुंड संस्कार म्हणजे बंजारा होळीचा आत्मा
लमाण बंजारांसाठी होळीतला धुंड संस्कारविधी हा त्यांच्यासाठी पवित्र आणि अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जातो.
'धुंड'चा सरळ अर्थ 'शोधणे' असा होतो, पण हा संस्कार आणि या संस्काराचा विधी होतो, 'धुंड गीत' गायले जाते तेव्हा. या 'धुंड'चा अर्थ इतका सरळ व वरवरचा निश्चितच असणार नाही. धुंड संस्कार गीताचा अर्थ पाहिला तर मानवी जगण्याच्या सर्वच रीतीभातींना ते कवेत घेते.
मानवी उत्पत्तीपासून विकासापर्यंतच्या अवस्थांचा पुनरावलोकन म्हणता येईल, एवढी प्रक्रिया अवस्थांतरण या धुंड गीताच्या संस्कारामध्ये दडलेली दिसते. यात बीजारोपणापासून त्याची वंशवेल वाढवण्यापर्यंतचे चित्र दृश्य पावते. तथा या विलक्षण स्वरूपाचा जीवनार्थ लपलेला आहे.
लमाणगणांच्या जगण्याचे तत्त्वज्ञान, आचारधर्म, जीवनविषयक धारणा यांचा खऱ्या अर्थाने इथे शोध सुरू आहे. नाहीतरी प्रत्येक जण आपापल्या परीने जगण्याचा अर्थ लावत असतो, शोधत असतो. होळीला दरवर्षी देशातल्या हर एक लमाण तांड्यांवर धुंड संस्काराचा नेम ठरलेला असतो.

फोटो स्रोत, Getty Images
वर्षभरात तांड्यात जन्मलेल्या मुलांचे धुंड करतात. जर त्या वर्षात तांड्यात कुणाच्याही घरी मुलगा जन्मला नाही तर अशा होळीला वांझ होळी म्हणून संबोधले जाते. अंगणात एक 'खिला' मेख गाडली जाते.
ती मेख पुरुषांनी उपटायची असते आणि पुरुषांना स्त्रिया मेख उपटू देत नाहीत, काठीने मारतात. असा खेळ रंगलेला असतो. नंतर मुलाला आणि मुलाच्या आईला (याडीला) मांडवाखाली बसवून तिच्या डोक्यावर एक आडवी काठी धरण्यात येते, तिच्यावर हातातल्या छोट्या टिपऱ्यांनी वाजवत धुंड गीत सात वेळेस म्हणण्याचा प्रघात आहे. हे काठीवर टिपरी मारणे म्हणजे समागमाचे प्रतीक आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे. या प्रसंगी शिरा-पुरी आणि बकऱ्याचा बळी दिला जातो.
निसर्ग, पूर्वजांची, आदिमातेची प्रार्थना केली जाते. या वेळी सर्व लहानथोर, स्त्री-पुरुष, मुले-मुली एकत्र जमतात. त्यांना शहाणे करण्यासाठी जाणते पुरुष जगण्याचा मार्ग, अंतिम उद्देश, जीवन निर्माणाची प्रक्रिया सांगून मानवी जीवनाचे अवलोकन करून देतात. या संस्कारातील जीवनार्थाचा शोध घेण्याची प्रक्रिया आदिम मानवाप्रमाणे सामूहिक आहे. तशी शिकण्या नि शिकवण्याचा शिक्षणाधिष्ठित विचार आहे.
निसर्गाचा आदर आहे. कुटुंबव्यवस्थेची भक्कम अशी घडण आहे. ('गणपतेनं गणपत आवं', 'गणवतणेनं गण शिकावं', 'शिकचं शिकावचं शिके हात घलावचं', शिकं जेरी साजं पोळी घियार पोळी ठोकर खाती आयी होळी'.) गुणवंताला गुण शिकवणे, जे शिकतात, शिकवतात तेच लोक हात घडवतात, अर्थात पिढ्या घडवतात.
शिकणाऱ्याची पोळी भाजते, साजते, हा विचार असेल वा कुठल्या मुलाने नायकी करावी, कुणी कारभार बघावा, कुणी गुरे राखायची, कुणी व्यापार करायचा, याचे व्यवस्थापनही व्यवस्थितरीत्या केलेले आढळते. निसर्ग, निसर्गाचे ऋतुमान, नक्षत्रे, त्यांचे विशेष, कोणत्या दिवसात बीजाची रोपण करायची याविषयीचे भान आहे. जन्म संगोपन, पालनपोषणापासून जीवनाचरणापर्यंत अनुमती देऊन पुढच्या पिढीचा वंशवेल वाढवणे, असा या गीताचा, संस्काराचा प्रवास आहे.

फोटो स्रोत, Getty Images
धुंड विधी गीताचे विशेष हे की, यातून व्यक्त होणारे कामजीवनविषयक, प्रजननासंबंधीचे विचार, कामजीवनविषयक शिक्षणाचाच एक भाग म्हणता येईल. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, आज आम्ही शिक्षणाच्या आणि जीवन विकासाच्या दृष्टीने प्रचंड पुढारलेले असतानासुद्धा लैंगिक जीवनाविषयी, लैंगिक शिक्षणाविषयी धाडसाने बोलूसुद्धा शकत नाहीत.
तेव्हा लमाण वा गोंड, माडिया गोंड, भिल आदी आदिम जमाती लैंगिक जागरुकता आणि शिकवणीसंबंधी रानटी न राहता कितीतरी समज असणाऱ्या होत्या, असे लक्षात येते.
मध्यप्रदेशातील 'भगोरीया उत्सव' असो', गोंड, माडीयांचे 'घोटुल' असो, वा लमाणांचे 'धुंड गीत' संस्कार विधी असो, यात सर्व अबालवृद्धांना समक्ष ठेवले जाते. सर्वांना याची पूर्ण जाण असते. स्त्री-पुरुषांचे सहजीवन व संततिनियमनाची या आदिवासी जमातींची कल्पना स्पष्ट आहे.
'नवसे कन्या पुत्र होती तर मग का करणे लागे पती' या तुकारामांच्या उक्तीप्रमाणेच स्त्री-पुरुष शारीरिक संबंधांशिवाय प्रजोत्पादन होत नाही, हे त्यांना माहीत आहे, म्हणून सर्वांच्या समक्ष हे गीत गातात, विधी करतात.

फोटो स्रोत, Getty Images
संपूर्ण मानवी जीवनाचे चक्र स्त्री-पुरुष संबंध आणि कामक्रियेवर चालते. पण या संततिनियमनाचे काही नियम घालून दिलेले आहेत, म्हणून इथे काही ओळी अतिशय अनुभवसंपन्नतेतून येतात. 'लाडीलाडा घरपतवाडा, सणभरतार, आसी जणीयं सपूती नार.' मुलगी शहाणी झाल्याशिवाय तिचे लग्न करू नये, नसता चांगली संतती जन्माला येणार नाही.
वा 'पिढी घडावं नेमेनुसार, नायेक नसावी किदे वचार.' शिवाय निसर्गचक्राचा, ऋतुमानांचाही विशेष विचार केलेला दिसेल ('जलमेर फागणं' आसी फागणेंमं गेरणी फळचं) फागण-होळीच्या काळात स्त्रियांमध्ये कामभावना उत्पन्न होतात. अर्थात या काळात निसर्गसुद्धा नवं रूप धारण करू लागतो.
पानगळ होऊन नवी पालवी येऊ लागते. वसंत ऋतू ऐन बहरात असतो. फुलण्याफळण्याचा हा काळ मानला असून लमाणांनी निसर्ग नियमांचाही अंगीकार केलेला दिसताे. अशाच प्रकारचा धुंड संस्कार विधी/गीत मारवाडी, राजस्थानी समाजातही अस्तित्वात आहे. तेही होळीलाच करतात.
शिवाय बोलीभाषा, पोशाख आदी बाबतीतही या जमातींमध्ये सारखेपणा दिसतो. यावरून असे निष्कर्ष काढायला जागा आहे की, कधीकाळी हे समाज एकमेकांचे अविभाज्य अंग राहिले असावेत.
धुंड गीत वा विधी, होळीचे लेंगी नृत्य, गीत आजच्या काळाशी किती सुसंगत आहे, याचा विचार जेव्हा आपण करू लागतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, लमाणांचे धुंड संस्कार-गीत हे काही श्रद्धा-अंधश्रद्धेतून घडले नसून निसर्ग नियम आणि जगण्याच्या अनुभवातून सिद्ध पावलेले आहे.
म्हणून लमाणांची धुंड परंपरा आजच्या काळातही उपयुक्त तसेच काळाशी सुसंगतच म्हणावी लागेल. इतक्यावरच त्याचा रंग उतरणार नाही, हेही तितकेच खरे आहे. गरज आहे आम्हाला हे पारखण्याची दृष्टी लाभण्याची.

फोटो स्रोत, Getty Images
दिवसभर गेर मागून जमलेल्या पैशातून एक बोकड घेऊन ओरी बकरी करतात. मिळून वाटून खातात . अशा प्रेममयी होळीत रंगून गेलेला बंजारा, दारिद्र्य पाचवीला पूजलेलं असताना सुद्धा हा होळीचा संपूर्ण महिना दुःख यातना, मोहाच्या दारूत घोळून पिऊन पूर्णतः आनंदी राहून मौज मस्तीत घालवीत असतो.
या समाजाचं एक वेगळेपण म्हणजे सुखात असो वा दुःखात, सण, समारंभ असो वा एखादी दुःखत घटना, सर्वकाळ गीत गातांना दिसतो. जीवनाचा गाडा ओढत जातो. कितीही दुःखे कोसळली तरी न डगमगता न डळमळता ताठर मानेने आपली होळी साजरी करीत असतो. केसुल्याच्या रंगात रंगून महिनाभर खेळलेली होळी ओसरताना त्याला म्हणावं लागतं,
"होळी आई रे होळी डगर चाली / तांडो सुनो रकाड घाली
गेरीयान गेरणी दे चाली / होळी आई रे होळी डगर चाली"
होळी जशी येते तशीच निघून जाते, पुन्हा एकदा तांड्याला सुनासुना करून जाते. अशी होळी जाण्याची हुरहुर सुद्धा तांडा गीतांतून व्यक्त करतो. खरंच होळीच्या दिवसात भुकेकंगालांचा तांडा केसुल्यावाणी (पळसफुल) मोहरून जातो. हा उत्सव साजरा करीत प्रत्येक वर्षाचा होळीचा महिना सर्व काही विसरून आनंदात काढीत असतो.
आणि म्हणत असतो "होळी दस दन दस मीना कानी रही रे होळी दस दन"
(डॉ. वीरा राठोड हे साहित्य अकादमीचे युवा पुरस्कारविजेते कवी आहेत. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत. )
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











