कोल्डप्ले कॉन्सर्टमधील व्हायरल फोटोनंतर, एचआर असलेल्या महिलेचाही राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

- Author, आना फागुय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेतील 'अॅस्ट्रोनॉमर' या टेक कंपनीने त्यांच्या सीईओवर कारवाई केली आहे. या सीईओला निलंबित करण्यात आलं आहे. तर कंपनीत एचआर असलेल्या महिला कर्मचारी असलेल्या क्रिस्टिन यांनीही राजीनामा दिला आहे.
त्यामागचं कारण आहे ते त्यांच्या सीईओचा एका कॉन्सर्टमधील व्हीडिओ व्हायरल होणं.
व्हायरल व्हीडिओमध्ये असं दिसतंय की, हा सीईओ कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये एका महिलेला पाठीमागून बिलगलेला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा मिठी मारलेल्या अवस्थेत संगीतावर झुलतानाचा हा क्षण या कॉन्सर्टमध्येच एका मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला.
मॅसॅच्युसेट्समधील जिलेट स्टेडियममध्ये ही कॉन्सर्ट सुरू होती. हा व्हीडिओदेखील तिथलाच आहे. हा व्हीडिओ आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून हे दोघेही एकाच कंपनीचे कर्मचारी होते, असंही या व्हायरल झालेल्या व्हीडिओसोबत म्हटलं जातंय.
अर्थातच, जेव्हा या दोघांचेही चेहरे कॉन्सर्टमधील एका मोठ्या स्क्रीनवर मिठी मारलेल्या अवस्थेत झळकले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी त्यांना पाहिलं.
हे लक्षात येताच, ते दोघेही कॅमेऱ्यापासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
कंपनीनं काय केला खुलासा?
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, हे दोघेही अॅस्ट्रोनॉमर नावाच्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या अफवा आहेत. या कॉन्सर्टमधील मुख्य गायकाने त्यांच्यावर केलेल्या एका कमेंटनंतर या अफवा सुरू झाल्या आणि त्या ऑनलाईन माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरल्या.
दरम्यान शुक्रवारी (18 जुलै) रात्री, कंपनीने एक्सवर (पूर्वी ट्विटर) एक पोस्ट करत खुलासा केला की, त्यांचे सीईओ अँडी बायरन यांना निलंबित करण्यात आलं आहे.
खरं तर या व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दिसतंय की, कॉन्सर्टच्या मोठाल्या स्क्रीनवर झळकण्यापूर्वी हे दोघेही सुरू असलेल्या संगीतावर मनमुरादपणे झुलत होते.

मात्र, अगदी काही क्षणातच त्यांचं एकमेकांच्या बाहुपाशात येऊन संगीतावर झुलणं मोठ्या स्क्रीनवर झळकू लागतं आणि ते दोघेही ओशाळतात. या ओशाळलेल्या अवस्थतेतच ते दोघेही कसेबसे आपला चेहरा लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसतात.
त्यांचा 'ऑकवर्ड मोमेंट' म्हणता येईल असा व्हीडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. बुधवारी (16 जुलै) रात्रीच्या म्यूझिक कॉन्सर्टमध्ये ही घटना घडली आहे.
या कोल्डप्ले कॉन्सर्टचा मुख्य गायक क्रिस मार्टिन होता. त्यानं ही संगीताच्या तालावर झुलणारी जोडी एकाएकी स्क्रीनवर आल्यानंतर लपताना पाहिली आणि एक कमेंट केली. तो म्हणाला, "एकतर त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत."
कंपनीने लावली चौकशी
हा व्हीडिओ पहिल्यांदा टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. त्यानंतर, तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होऊ लागला. या व्हीडिओवर अनेक मीम्सदेखील येऊ लागले. अगदी काही टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्येही या व्हीडिओवरुन खिल्ली उडवण्यात आली.
अगदी या व्हीडिओच्या दोन दिवसांनंतरही लोक त्यांच्या त्या मिठीबद्दल बरीच चर्चा करत होते. त्यानंतर अॅस्ट्रोनॉमर कंपनीनं एक निवेदन प्रसिद्ध केलं.
कंपनीने या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीने त्यांच्या या निवेदनात व्हीडिओचा थेट उल्लेख केलेला नाही.
'अॅस्ट्रोनॉमर स्थापनेपासूनच आपल्या मूल्यांप्रती तसेच संस्कृतीप्रती वचनबद्ध आहे,' असं कंपनीने या निवेदनात म्हटलंय.
"आमच्या कंपनीच्या लीडर्सनी विवेकी वर्तन आणि जबाबदारीनं वागणं, या दोन्हीबाबतचा उच्च दर्जा पाळणं आवश्यक आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं या प्रकरणाची औपचारिक चौकशी सुरू केली असून लवकरच आम्हाला याबाबतचे अतिरिक्त तपशील प्राप्त होतील," असंही कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, X/Astronomer
सध्या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव अँडी बायरन असं असून ते या कंपनीचे सीईओ आहेत, असा दावा अनेक वृत्तांमध्ये केला जातोय.
ते जुलै 2023 पासून कंपनीत आहेत. अँडी बायरन यांनी स्वत: तरी त्या व्हीडिओमधील व्यक्ती आपण असल्याची पुष्टी केलेली नाही.
व्हीडिओमध्ये दिसणारी महिला ही क्रिस्टिन कॅबोट असल्याचं ऑनलाईन माध्यमांवरील चर्चांमधून समजतंय. ही महिलादेखील अॅस्ट्रोनॉमर कंपनीमध्ये 'चीफ पीपल ऑफिसर' आहे.
क्रिस्टिन कॅबोट नोव्हेंबर 2024 पासून कंपनीत असून त्यांनीही व्हीडिओत दिसणारी महिला आपणच असण्याबबात दुजोरा दिलेला नाही.
व्हीडिओमधील लोकांची नेमकी ओळख पटवण्यात बीबीसीला यश आलेलं नाही.
गुरुवारी (17 जुलै) ब्रायन यांच्या नावे एक निवेदन व्हायरल झालं होतं. मात्र, ते खोटं होतं.
त्यामुळे, अॅस्ट्रोनॉमर कंपनीने खुलासा करत आपल्या निवेदनात म्हटलं, "बायरन यांनी स्वत:चं असं कोणतंही वैयक्तिक निवेदन प्रसिद्ध केलेलं नाही. त्यामुळे, त्यांच्या नावे पसरणारी इतर कोणतीही माहिती ही अफवा आहे. तसेच, या व्हीडिओमध्ये इतर कोणतेही कर्मचारी सामील नव्हते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











