अमेरिकेला भारतात जे 'नॉनव्हेज मिल्क' विकायचंय, ते नेमकं काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याची मुदत वाढवली असून आता 1 ऑगस्टपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. याआधी 9 जुलै ही अंतिम तारीख होती.
भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापाराबद्दल चर्चा सुरू आहे. दोन्ही देश एक अंतरिम व्यापार करार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून या कराराची लवकरच घोषणा होऊ शकते.
अमेरिकी कृषी आणि डेअरी उत्पादनासाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याची मागणी अमेरिका सातत्यानं करत आहे. पण, आपल्या या उत्पादनाच्या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आपण अमेरिकेसमोर झुकणार नसल्याचे संकेत भारतानं दिले आहेत.
भारतानं 'नॉनव्हेज दूध'बद्दल काही कारणं देत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. या करारामुळे 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कृषी क्षेत्र आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मुद्द्यावर कोणत्याही वाटाघाटी स्विकारू शकत नाही, असं भारतानं स्पष्टपणे सांगितलं आहे.
अमेरिकेतून आयात होणारं दूध हे जनावरांचं मांस किंवा रक्त असलेला चारा खाल्ला नसेल अशा गायींचं असावं, याची पडताळणी करण्यासाठी अमेरिकेच्या डेअरी उत्पादनासाठी भारत कठोर नियम लागू करण्याची शक्यता आहे.
भारतातील अनेक लोक दुग्धव्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. यामध्ये अनेक लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे दुग्धव्यवसायाबद्दल भारतानं सावध भूमिका घेतली आहे. पण, भारताची ही भूमिका म्हणजे व्यापारातील अनावश्यक अडथळा असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि अमेरिकेतील चर्चा अपयशी ठरली, तर ट्रम्प भारतावर 26 टक्के टॅरिफ पुन्हा लादण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.
खरंतर अमेरिका भारतासोबतची 45 अब्ज डॉलरची व्यापारी तूट कमी करण्यासाठी शेती आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी बाजारपेठ खुली करण्याची मागणी करत आहे.
दरम्यान, ट्रम्प सरकारनं 23 देशांना पत्र पाठवून टॅरिफची अंतिम मुदत 1 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
भारतानं डेअरी क्षेत्रातील बाजारपेठ खुली केली तर काय नुकसान होऊ शकतं?
ग्रामीण अर्थव्यवस्थेत भारताच्या डेअरी क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे. सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनुसार, वर्ष 2022-23 मध्ये देशात 23.92 कोटी टन दुधाचं उत्पादन झालं होतं. एकूण दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
तसेच 2023-24 मध्ये भारतानं 27.26 कोटी डॉलर किमतीच्या 63 हजार 738 टन दुग्धजन्य उत्पादनाची निर्यात केली होती. यापैकी सर्वाधिक निर्यात ही यूएई, सौदी अरब, अमेरिका, भूतान आणि सिंगापूरला होते.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात आयात होणाऱ्या डेअरी उत्पादनावर अधिक टॅरीफ आहे. चीजवर 30 टक्के, लोण्यावर 40 टक्के आणि दूध पावडरवर 60 टक्के टॅरीफ आकारलं जातं. यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये ही उत्पादनं स्वस्त असून सुद्धा तिथून आयात करणं फायद्याचं ठरत नाही.
अशा परिस्थितीत अमेरिकेच्या डेअरी उत्पादनासाठी भारतानं बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला, तर भारताला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
भारतीय स्टेट बँकेनं नुकताच एक रिपोर्ट प्रकाशित केला असून त्यानुसार अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांना भारतात आयात केलं, तर भारतीय दुग्धजन्य उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांनी कमी होतील. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 1.03 लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.
तसेच ही बाजारपेठ खुली केली, तर भारत दुध उत्पादक देशावरून दुध उपभोक्ता देश बनेल, असाही इशारा या रिपोर्टमधून देण्यात आला आहे.
नॉनव्हेज मिल्क नेमकं काय आहे?
भारतानं अधिक दुग्धजन्य पदार्थांची आपल्याकडून खरेदी करावी असं अमेरिकेला वाटते. पण, भारत संस्कृती आणि श्रद्धेपोटी या पदार्थांची खरेदी करायला तयार नाही.

भारतात मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोक आहेत. त्यामुळे चारा म्हणून प्राण्यांचं मांस खाणाऱ्या गायींचं दूध चांगलं नसल्याचं ते मानतात. यामागे धार्मिक श्रद्धेचं कारण सांगितलं जातं.
अशा गायींच्या दूधाला नॉव्हेज मिल्क म्हणजेच मांसाहारी दूध म्हणतात.
अमेरिकेतील दूग्धव्यवसायात गायींचं वजन वाढवण्यासाठी जनावरांचं मांस किंवा रक्त मिश्रित चारा गायींना दिला जातो. त्यामुळे या दुधाला 'ब्लड मील'सुद्धा म्हटलं जातं.
सिएटल टाइम्सच्या एका लेखानुसार, "डुक्कर, मासे, चिकन, घोडे, मांजरी, कुत्रे यांचं मांस असलेला चारा गायींना दिला जातो. तसेच म्हशींना प्रोटीन मिळावं यासाठी डुक्कर आणि घोड्याचं रक्त दिलं जातं. तसेच गायींचं वजन वाढवण्यासाठी या जनावरांची चरबीही चारा म्हणून खायला दिली जाते."
'ब्लड मील' कशाला म्हणतात?
बीबीसी हिंदीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 'ब्लड मील' हे मांस पॅकींग व्यवसायातून निघणारं बाय प्रोडक्ट असून ते इतर प्राण्यांना खायला दिलं जातं.
जनावरांना कापल्यानंतर त्यांचं रक्त जमा करून त्याला वाळवून एक विशेष प्रकारचा चारा तयार केला जातो. त्यालाच ब्लड मील म्हणतात.

हे ब्लड मिल लायसिन नावाच्या अमिनो असिडचा चांगला स्रोत असल्याचं बोललं जातं. त्याचा वापर पशुपालन व्यवसायात केला जातो.
गायींच्या शरीरात आढळणाऱ्या प्रोटीनमध्ये 10 प्रकारचे अमिनो असिड आढळतात. त्यापैकी लायसिन आणि मेथिओनिन हे 2 अतिशय महत्वाचे आहेत.
गायी प्रोटीनऐवजी अमिनो अॅसिड पचवू शकतात. त्यामुळे त्यांना ब्लड मील आणि मका दिला जातो. ब्लड मिल हे लायसिनचा स्रोत आहे, तर मका हे मेथिओनाइनचा स्रोत आहे.
मिनेसोटा विद्यापीठानं केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं की, चारा खाल्ल्यानं रक्तातील लायसिनच्या प्रमाणावर परिणाम होतो. त्याऐवजी सोयाबीन देखील लायसिनचा चांगला स्रोत मानला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
दूध देणाऱ्या गायींना निरोगी ठेवण्यासाठी आणि अधिक दूध देण्यासाठी या गायींना नियमितपणे चारा म्हणून ब्लड मिल दिलं जातं.
याशिवाय पशुपालन उद्योगातही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नायट्रोजन वाढवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो.
भारतातील अनेक ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर शेतीसाठी 'ब्लड मील' विकले जाते.
फीडिपीडिया नावाच्या वेबसाईटनुसार, 'ब्लड मील' बनवल्यानं कत्तलखान्यातील कचरा आणि प्रदूषण कमी होतं. पण, रक्त वाळवण्याच्या प्रक्रियेत खूप वीज खर्च होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











