टेस्ला भारतात लाँच झाली, पण ही कार भारतात आणण्यासाठी मस्क यांना एवढा वेळ का लागला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला अखेर भारतात दाखल झाली आहे. त्यांनी आपली मॉडेल Y ही गाडी सुमारे 60 लाख रुपयांना लॉन्च केली आहे.
या लॉन्चच्या काही तासांपूर्वीच मुंबईतल्या BKCमधल्या नवीन टेस्ला शोरूमचे फोटोही ऑनलाईन व्हायरल झाले होते. काही वृत्तांनुसार टेस्लाचे दिल्ली राजधानी क्षेत्रातही दोन शोरूम्स लवकरच उघडण्याची शक्यता आहे.
मात्र टेस्लाच्या या गाड्या भारतात बनणार नसून, सध्या त्या चीनमधून आयात केल्या जातील, असं वृत्त ब्लूमबर्गने दिलं आहे.
भारताच्या आजवरच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण गेल्या बऱ्याच काळापासून सातत्याने टेस्ला भारतात कशी आणि कधी लॉन्च होणार, याबद्दलची उत्सुक्ता शिगेला होती.
टेस्लाने भारतात कार लाँच केली असली तरी त्यातलं संपूर्ण ऑटोपायलट फीचर भारतात वापरता येणार नाही, कारण भारतामध्ये Full Self Driving म्हणजे ड्रायव्हरशिवाय कार चालण्याच्या तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या टेस्ला मॉडेल Y हे इलेक्ट्रिक कार म्हणूनच भारतात लाँच करण्यात आलेलं आहे. 6 लाख रुपये अतिरिक्त देऊन टेस्ला विकत घेताना हे फीचर विकत घेता येईल पण हे फीचर रस्त्यावर वापरायला परवानगी नसल्याचं टेस्लाच्या वेबसाईटवर म्हटलंय.
गेल्या दशकभरात टाटा, महिंद्रा, एथर, बजाज आणि ओला यांसारख्या देशी कंपन्यांमुळे सातत्याने इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढते आहे.
टेस्लासुद्धा जगातल्या तिसऱ्या सर्वांत मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपले पाय रोवू इच्छित आहे, हे स्पष्ट आहे. पण टेस्लाला भारतात यायला इतका वेळ का लागला? आणि इलॉन मस्क यांच्या कंपनीला भारतात यायला उशीर तर नाही ना झालाय?
इलॉन मस्क आणि भारत
एप्रिल 2024 मध्ये इलॉन मस्क यांनी घोषणा केली होती की ते लवकरच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. अनेकांना वाटलं होतं की हाच तो क्षण जेव्हा टेस्लाची भारतात एन्ट्री होईल. मात्र ही भेट तत्काळ रद्द झाली, आणि तेव्हापासून आजवर अमेरिका आणि भारतात बरंच काही बदललंय.
एक नजर टाका या संपूर्ण घटनाक्रमावर...
- सप्टेंबर 2014 – मोदी यांची 'मेक इन इंडिया' मोहिमेची घोषणा
- सप्टेंबर 2015 – मोदींची टेस्लाच्या पॅलो ऑल्टो मुख्यालयाला भेट
- जुलै 2016 – नितीन गडकरींची टेस्ला फॅक्टरीला भेट, भारतात उत्पादन सुरू करण्याचा प्रस्ताव
- 2019 – टेस्लाची चीनमध्ये मेगाफॅक्टरी सुरू
- 2022 – टेस्लाची जर्मनीत फॅक्टरी सुरू, उजव्या हाताच्या कार्सचं पहिल्यांदा उत्पादन सुरू, जशा गाड्या भारतात चालवल्या जातात.
- जून 2023 – मोदी आणि मस्क यांची अमेरिकेत भेट.
- नोव्हेंबर 2023 – पियूष गोयल यांची टेस्ला फॅक्टरीला भेट
- मार्च 2024 – भारत सरकारकडून ऑटोमोबाईल क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीच्या FDI धोरणात बदल
- एप्रिल 2024 – मस्क यांचा भारत दौरा जाहीर नंतर रद्द
- एप्रिल-मे 2024 – मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान
- नोव्हेंबर 2024- जानेवारी 2025 – डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, मस्क यांची प्रशासनात महत्त्वाची भूमिका
- जानेवारी 2025 – ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेच्या सर्व व्यापारी संबंध असलेल्या देशांवर टॅरिफ
- जून 2025 – ट्रम्प-मस्क संबंधांत तणाव, ट्रम्प काही देशांवरील टॅरिफ्स मागे घ्यायला तयार
- जुलै 2025 – मस्क नवीन राजकीय पक्षाची घोषणा करतात, टेस्लाचं भारतात पहिलं शोरूम उघडतं.
'धोरण खास तुमच्यासाठी?'
मार्च 2024 मध्ये भारत सरकारने काही महत्त्वाचे धोरण बदलले. त्यानुसार टेस्ला कंपनीला भारतात उत्पादन केंद्र सुरू करायला फक्त सुमारे 4,150 कोटींची गुंतवणूक करण्याची गरज होती. या ठिकाणी हे लक्षात घेण्यासारखे आहे की टेस्लाने चीनमधील शांघाय प्लांटसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर्स गुंतवले होते, आणि जर्मनीच्या बर्लिनसाठी त्याच्याही दुप्पट.
पण भारतात फॅक्टरी सुरू करण्या बाबतीत एका प्रश्नाला उत्तर देताना मस्क 2022 मध्ये म्हणाले होते, "जिथे आम्हाला आधी गाड्या विक्री करू देण्याची आणि त्यांची सेवा देण्याची परवानगी नसेल, तिथे टेस्ला कारखाना उभारणार नाही."
मोदी सरकारने आयात धोरणात बदल करून याची काळजी तर घेतली आहे. आता 35,000 USD (~30 लाख रुपये) किंवा त्याहून अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर फक्त 15 % आयात शुल्क लागेल. यापूर्वी 40,000 USD (~33-34 लाख रुपये) किंवा अधिक किंमतीच्या वाहनांवर 100 % शुल्क लागायचं.

फोटो स्रोत, Getty Images
भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स आणि यंत्रसामग्री उत्पादक कंपन्यांना तंत्रज्ञान भारतात हस्तांतरित करण्याची अट घातली आहे. त्यामुळे मार्च 2024 मध्ये आणखी एक बदल झाला – नवीन कंपन्यांना 3 वर्षात 25 टक्के आणि 5 वर्षात 50 टक्के स्थानिकीकरण, म्हणजे तंत्रज्ञान इथेच आणण्याची मुभा देण्यात आली.
हे एक प्रकारचे व्यवसायिक 'लिव-इन रिलेशनशिप' आहे – आधी एकमेकांना समजून घ्या, आजमावून पाहा, मग गुंतवणूक करा.
असंच धोरण चीनने मस्क यांना आकर्षित करायला वापरलं होतं, असं ICRAचे वरिष्ठ उपाध्यक्ष शमशेर दीवाण सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शांघाय गिगाफॅक्टरीपूर्वी कोणत्याही विदेशी ऑटो कंपनीला चीनमध्ये थेट उत्पादन केंद्र उभारण्याची परवानगी नव्हती – त्यांना स्थानिक कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करावा लागायचा.
"टेस्ला ही पहिली कंपनी होती जिने 100 टक्के थेट मालकी मिळवली. त्यामुळे टेस्ला भारताकडूनही अशाच विशेष धोरणाची अपेक्षा करत होती," असे दीवाण यांनी एप्रिल 2024 मध्ये बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
आणि आता जुलै 2025 मध्ये टेस्लाची भारतातील वेबसाईट सक्रिय झाली आहे आणि ग्राहक मॉडेल Y दोन व्हेरिएंट्समध्ये बुक करू शकतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की धोरणातील असे अडथळे आणि व्यवसायासाठी योग्य वातावरण मिळवण्याची वाट पाहणं, हे टेस्लाच्या भारतातील उशिरा लॉन्चमागचं कारण असू शकतं.
भारतातलं लक्झरी कार मार्केट कसं आहे?
भारतात लाँच करण्यात आलेलं टेस्ला मॉडेल Y हे जगभरात चांगली विक्री होणारं मॉडेल आहे. भारतातली त्याची किंमत 60 लाख आहे आणि टार्गेट आहे लक्झरी इलेक्टिक कार सेगमेंट.
भारतातल्या इलेक्ट्रिक लक्झरी कार सेगमेंटमध्ये टेस्लाला स्पर्धा असेल BMW आणि मर्सिडीझ बेन्झकडून. सध्या भारतीय मार्केटमध्ये लक्झरी इलेक्ट्रिक कार विक्रीचं प्रमाण फक्त 1% आहे. पण दरवर्षी याचं प्रमाण वाढतंय.
तरूण प्रोफेशनल्सची देशातली मोठी संख्या, स्टेटस सिम्बॉल किंवा Aspiration - स्वप्न म्हणून लक्झरी गाड्या घेणाऱ्यांचं वाढत प्रमाण आणि मेट्रो शहरांच्या बाहेर वाढत असलेली लक्झरी कार्सची विक्री या सगळ्या गोष्टी टेस्लासाठी महत्वाच्या ठरू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळेच लगेच टेस्लाच्या भरपूर कार्सची विक्री झाली नाही तरी येत्या काळात या सेगमेंटमध्ये होणारी वाढ टेस्लाने डोळ्यांसमोर ठेवलेली आहे. आणि म्हणूनच ग्राहकसंख्या वाढत असताना या बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करणं आणि जम बसवणं हे टेस्लाचं आताचं उद्दिष्टं असेल.
भारतातील EV चित्र
जगातील तिसऱ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ असली तरी, भारतात गेल्या 8-10 वर्षांत वाहन क्षेत्राची वाढ काहीशी मर्यादित राहिली आहे. यामागे डिझेल इंजिनबाबत नकारात्मक भावना, नोटबंदी आणि नवीन कर प्रणालीसारखे आर्थिक धक्के, NBFC आणि IL&FS सारख्या आर्थिक संस्थांतील संकटं, आणि कोव्हिड-19 आरोग्य संकट, यांसारखी अनेक कारणं आहेत.
या काळात जनरल मोटर्स आणि फोर्डसारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला, तर किया आणि MGसारख्या नव्या कंपन्यांनी जबरदस्त यश मिळवलं.
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही काही सकारात्मक संकेत दिसून आले आहेत. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी ग्राहकांना सवलती द्यायला सुरुवात केली, सोबतच दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जलदगतीने उभारून या क्षेत्राला गती दिली आहे.
याचा परिणाम म्हणजे EV रस्त्यांवर झपाट्याने दिसू लागल्या: 2023च्या केवळ 9 महिन्यांत 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनं विकली गेली होती, जी 2022च्या संपूर्ण वर्षातल्या विक्रीपेक्षाही जास्त आहे, असं Confederation of Indian Industry (CII) ची आकडेवारी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
एकूण वाहन विक्रीत ईव्हींचा वाटा 2023 मध्ये 6.4 टक्के होता, जो 2024 मध्ये 8 टक्के झाला – यामध्ये सिंहाचा वाटा इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा आहे. याच हिशोबाने भारताने 2030 पर्यंत एकूण वाहन विक्रीपैकी 30% ईव्ही करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारताकडे आधीपासूनच काही चांगले EV कंपन्या आहेत. देशी टाटा मोटर्स खासगी आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात वर्चस्व राखतेय. महिंद्रानेही गेल्या वर्षी त्यांची Born Electric SUV मालिका आणून दमदार क्षमता दखवली आहे.
MG, जी आता JSW इंडिया आणि SAIC मोटर (चीन) यांच्या संयुक्त मालकीची आहे, त्यांनी Battery-as-a-Service सारख्या अभिनव संकल्पनांमुळे ग्राहकांचे लक्ष वेधलं आहे, ज्यामुळे कमी पैशातही लोक इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करू शकतातच.
आणि त्यातच ज्या कंपनीने चीनमध्येच नव्हे तर जागतिक स्तरावरही टेस्लाला मागे टाकत आघाडी घेतली आहे, त्या BYD या चिनी कंपनीनेही भारतातही आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2024 मध्ये व्हिएतनामच्या कंपनी VinFast या कंपनीने तामिळनाडूमध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली, आणि 2025च्या दिल्लीतील भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये त्यांनी त्यांची काही अनोखी इलेक्ट्रिक वाहनांची झलकही दाखवली.
इलेक्ट्रिक वाहनांची रेंज आणि सुरक्षितता, याबद्दलच्या शंका अजूनही लोकांच्या मनात आहेतच. तरीही पारंपरिक ICE (Internal Combustion Engine) आणि EVमधील किंमतीतील फरक इतका कमी होत चाललाय की भारतीय ग्राहक आता स्वच्छ आणि पर्यायी वाहतूक पर्यायांकडे वळत आहेत.
अशात ग्राहकसंख्या वाढत असताना आणि अनेक मोठ्या कंपन्या EV क्षेत्रात गुंतवणूक करत असताना, भारत टेस्लासाठी पुढील मोठी बाजारपेठ ठरू शकते.
टेस्लाला भारताची गरज आहे की भारताला टेस्लाची?
भारत 'मेक इन इंडिया'सारख्या मोहिमांद्वारे जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र बनण्याचा प्रयत्न करत आहे. हे चीनला पर्याय शोधण्याच्या पाश्चिमात्य देशांच्या धोरणाशी सुसंगत आहे.
"भारतासाठी पीआरची ही एक उत्तम संधी आहे. सगळे देश जेव्हा 'चीन-वगळता' जगाचा विचार करतात तेव्हा भारत समोर येतो. त्यामुळे भारत अचानक अमेरिका आणि युकेसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतो. हे चांगलं 'ऑप्टिक्स' आहे, आणि जागतिक भू-राजकारणाचा भाग आहे," असं ऑटो उद्योग तज्ज्ञ आणि Expereal या ब्रँड स्ट्रॅटेजी फर्मचे सह-संस्थापक अविक चट्टोपाध्याय बीबीसीशी बोलताना सांगतात.
पण या सर्व धोरणात्मक बदलांनंतरही, टेस्ला ही कंपनी आत्ताच भारतात उत्पादन सुरू करण्यास फारशी उत्सुक नाही, असं भारताचे उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जून 2025 मध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादनाला चालना देण्यासाठी नवीन योजना जाहीर करताना ते म्हणाले, "टेस्लाला फक्त शोरूम सुरू करायचीच अधिक इच्छा आहे. उत्पादन सुरू करण्याची फारशी इच्छा नाही."
मग हे सगळं 'रेड कार्पेट' नक्की टाकण्यात आलं होतं?
भारत परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं दिसून आलं. त्या निवडणुकीत आर्थिक मंदी, महागाई आणि बेरोजगारीसारखे मुद्दे गाजले होते, ज्यांचा परिणाम मतांवर झाल्याचंही जाणकार सांगतात.
काही मोठ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुका आल्या असल्या तरी, अपेक्षित प्रमाणात रोजगारनिर्मिती झालेली नाही, असं सार्वजनिक आकडेवारीत दिसतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण हा क्षण इलॉन मस्क यांच्यासाठी मात्र एक अनोखी संधी घेऊन आला आहे.
टेस्ला, स्पेसएक्स, न्युरालिंक आणि द बोरिंग कंपनी यांसारख्या क्रांतिकारी स्टार्टअप्सचे संस्थापक असलेले मस्क ट्विटर विकत घेतल्यापासून खूप व्यग्र झाले आहेत. काहींनी तर त्यांना त्यांच्या इतर कंपन्यांसाठी "गैरहजर CEO" असंही म्हटलं आहे.
त्यानंतर त्यांच्याकडे ट्रम्प प्रशासनात Department of Government Efficiency (DOGE) ची जबाबदारी आली. आणि तिथे घेतलेल्या काही निर्णयांमुळे अमेरिकेत हजारो सरकारी आणि सार्वजनिक सेवेतील नोकर्या गेल्या.
या सगळ्याचा राग मग टेस्लाच्या शोरूम्सवर, तिथे ठेवलेल्या गाड्यांवर लोकांनी काढला. या सगळ्याच्या भीतीपोटी अनेकांनी त्यांची टेस्ला गाडीची ऑर्डर रद्द केली.
त्यातच ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भांडणानंतर टेस्लाचे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांनी पडले, कंपनीच्या मूल्यात 68 अब्ज डॉलर्सची घसरण झाली.
टेस्ला कंपनी आधीच आर्थिक अडचणीत आहे, कारण 2024 मध्ये अपेक्षेपेक्षा कमी विक्री झाली होती, आणि 2025 च्या पहिल्या तिमाहीतही विक्री घसरली आहे.
किमान अमेरिकेत तरी चीनकडे अजूनही टॅरिफ युद्धातील 'खलनायक' म्हणून पाहिलं जातं. अशात इलॉन मस्क यांना आपल्या ईव्ही व्यवसायासाठी तातडीचा उपाय हवा असेल, ज्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही पूर्ण होतील, तर भारत त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










