Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहन विकत घ्यायचंय? या 4 गोष्टी विचारात घ्या

टाटा टियागा

फोटो स्रोत, Tata Motors

    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी

( 2022 मध्ये बीबीसी मराठीने हा लेख प्रकाशित केला होता. तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. )

इलेक्ट्रिक कार्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. टेसलाची मॉडेल 3 काही दिवसात बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतातही इलेक्ट्रिक कार्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा इलेक्ट्रिक कार घेण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

टाटा मोटर्सने आपली आजवरची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टियागो EV ही देशातली पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे, आणि हिची किंमत 8.5 लाखांपासून 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे. ही गाडी नक्कीच अनेकांचं इलेक्ट्रिक वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते.

विविध दुचाक्या, तीनचाकी रिक्षा आणि चार-चाकी कार्स, अशा सर्वच इलेक्ट्रिक वाहनांची (EV) ही बाजारपेठ झपाट्याने वाढतेय. 2020-2021 या आर्थिक वर्षात एकूण 1,34,463 EV विकल्या गेल्या होत्या. हा आकडा 2021-2022 मध्ये तिपटीने वाढून 428,213 वाहनांवर गेला आहे.

या आकड्यांमध्ये मोठा वाटा हा दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा असला, तरी इलेक्ट्रिक कार्सचा खासगी वापरही वाढू लागला आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत असाल तर या चार प्रश्नांचा आधी विचार करा -

1. माझी गरज काय आहे?

कुठलंही वाहन घेणं एक तर आपलं स्वप्न असतं किंवा आपली गरज. मात्र EVचं स्वप्न पाहताना गरज काय आहे, यावरही तितकाच विचार व्हायला हवा. कारण कुठलीही EV ही तिच्या तत्सम पेट्रोल वा डिझेल गाडीपेक्षा सुमारे 30-50 टक्क्यांपर्यंत महाग आहे.

उदा. TVS कंपनीची ज्युपिटर दुचाकी साधारण 75 हजारांपासून सुरू होते, तर त्याच धाटणीची इलेक्ट्रिक दुचाकी TVS iQube ही 96 हजारांपासून सुरू होते.

टाटा मोटर्सची टिगॉर ही पेट्रोल आणि CNGवर चालणारी गाडी 6 लाखांपासून 9 लाखांपर्यंत जाते, मात्र याच गाडीचा इलेक्ट्रिक अवतार 13 लाख ते 13.7 लाखांमध्ये आहे.

टाटा टियागा

फोटो स्रोत, ANI

त्यामुळे आपल्या गाडीचा वापर किती होणार आहे, दररोज किंवा आठवड्याला किती चालवली जाणार आहे, हे पाहून तुम्ही एक तुलनात्मक बजेट बनवू शकता.

जर तुमचा दररोज कामाच्या ठिकाणी वा कॉलेजला जाणे-येणे, इतकाच प्रवास सामान्यतः असेल तर त्यासाठी हे वरचे 30-50 टक्के पैसे सुरुवातीला मोजावेत की नाही, हे तुम्ही ठरवू शकता.

व्हीडिओ कॅप्शन, पेट्रोल महागाईच्या कचाट्यातून फ्लेक्स फ्युएल इंजिन सोडवतील का? सोपी गोष्ट 454

तुमचा लांबचा प्रवास होतो का, की क्वचितच वर्षातून एकदा तुम्ही शहराबाहेर गाडीने जाणार आहात, अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील. अनेक कुटुंबामध्ये इलेक्ट्रिक ही दुसरी गाडी असू शकते, ज्यामुळे अडीअडचणीला पर्याय उपलब्ध असतो.

2. वाहनाची रेंज किती असते?

EVच्या बाबतीत विचारला जाणारा आणि ध्यानात घेतला जाणारा हा सर्वांत मोठा प्रश्न आहे - रेंज किती आहे?

रेंज म्हणजे एकदा वाहन बॅटरी फुल चार्ज केल्यावर किती लांबवर प्रवास करू शकते. हीच सामान्य माणसाची सर्वांत मोठी चिंता असते, जी त्याला इलेक्ट्रिक वाहन घेण्यापासून परावृत्त करू शकते.

इलेक्ट्रिक कार

फोटो स्रोत, Ani

सुमारे दशकभरापासून इलेक्ट्रिक दुचाक्या भारतात उपलब्ध आहेत, मात्र तेव्हा त्यांची रेंज अगदीच कमी म्हणजे एका चार्जवर 50-70 किमी असायची.

आज बहुतांश इलेक्ट्रिक दुचाक्यांची रेंज ही 100-150च्या घरात आहे, तर EV कार्सची रेंजसुद्धा आता 200 ते 450 किमी प्रती चार्ज एवढी वाढली आहे. अर्थात हे प्रत्येक गाडीच्या बॅटरी क्षमतेवर अवलंबून आहे. तसंच त्या गाडीसोबत कुठलं चार्जर दिलं जातंय, त्यावरूनही किती वेळ तुम्हाला गाडी पूर्ण चार्ज करून चालवायला लागतो, हे ठरतं.

3. चार्जिंगची सोय काय?

सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणजे, हे इलेक्ट्रिक वाहन चार्ज कसं करणार? कुठे करणार? कारण आपला मोबाईल तुलनेने पिटुकला असतो, त्यामुळे तो अगदी स्विचबोर्डच्या वरही ठेवला जाऊ शकतो. पण इलेक्ट्रिक गाड्यांचं तसं नाही.

त्यासाठी एक वेगळी जागा पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहे.

चार्जिंगची सोय काय?

फोटो स्रोत, Getty Images

तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही याची सोय सहज करू शकता. जिथे गाडी पार्क करता तिथवर एक हाय व्होल्टेज लाईन किंवा किमान एक वेगळा स्विचबोर्ड तुम्ही लावून घेऊ शकता.

जर तुम्ही कुठे भाड्याने राहता किंवा अपार्टमेंटमध्ये राहता तर तिथेसुद्धा सोय करता येईल का, याचा विचार करून तुम्ही ठरवू शकता.

याशिवाय, तुम्ही कुठे काम करता, तिथे याची काही सोय आहे का, याचीही विचारपूस करू शकता. अनेक मोठ्या शहरांमध्ये पार्किंग लॉटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेगळे पार्किंग स्पॉट हिरव्या रंगाने अंकित केलेल असतात, जिथे जवळच एक चार्जिंग पोर्ट लावलेला असतो.

मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिस, मेट्रो वा बस स्थानक तसंच सार्वजनिक पार्किंगमध्ये अशा सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

चार्जिंगची सोय काय?

फोटो स्रोत, Getty Images

आणि हो, आता पुणे महानगर पालिका नवीन बांधकामासाठी परवानगी देताना, तिथे EV चार्जिंगची सोय असेल तसंच 20 टक्के जागा EV पार्किंगसाठी राखीव असेल, अशी अटसुद्धा बिल्डरकडे ठेवत आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्या शहरात राहता, यावरूनही या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.

4. पेट्रोल-डिझेलची गाडी घ्यावी की इलेक्ट्रिक?

वरच्या तीन प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरच तुम्ही अंततः या प्रश्नावर विचार करू शकता - की इलेक्ट्रिक गाडी खरंच घ्यावी की आपल्या नॉर्मल पेट्रोल-डिझेलच्या वाहनाचा पर्याय निवडावा?

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायला सुरुवातीला अतिरिक्त 30-50 टक्के लागत असले तरीही त्यानंतर ती गाडी चालवायला येणारा खर्च तुलनेने कमी असतो.

तुमच्या घरच्या इलेक्ट्रिक बिलात थोडा बदल असू शकतो, पण सध्याचे इंधनाचे दर पाहता, तुमच्या एकूण गाडी चालवण्याच्या खर्चात फार मोठा फरक पडू शकतो.

डिझेलचे वाहन

अर्थात हे सगळं पहिल्या मुद्द्यातल्या एका उपप्रश्नावर अवलंबून आहे - तुमची गाडी दररोज किंवा आठवड्याला किती किमी चालवली जाणार आहे?

शिवाय EVमध्ये इंजन नसतं, त्यासोबतच अनेक हलणारे पार्ट्स गाडीतून नाहीसे होतात. त्यामुळे गाडीच्या देखरेखीचा, मेन्टेनन्सचा खर्च कमी होतो.

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारांकडून EV खरेदीला चालना देण्यासाठी अनुदान किंवा सबसिडीसुद्धा दिली जाते. तसंच गाडी जुनी झाल्यावर ती विकायची असल्यास, तिथेही वेगळ्याने अनुदान दिलं जातं.

याची माहिती तुम्ही प्रत्यक्ष गाडी खरेदी करताना त्या-त्या मॉडेलनुसार डीलरकडूनही मिळवू शकता.

पेट्रोल-डिझेलची गाडी घ्यावी की इलेक्ट्रिक?

फोटो स्रोत, Getty Images

इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेविषयी तुमच्या मनात अनेक शंका असतील, कारण अधूनमधून सातत्याने अशा वाहनांनी पेट घेतल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत.

मात्र सर्वच कंपन्यांचं म्हणणं आहे की या बाबतीत त्यांचं काम सुरू आहे, आणि भविष्यात अशा आगीच्या घटना आटोक्यात आणता येतील.

पण हो, तांत्रिक त्रुटी वगळता यापैकी बहुतांश गाड्या त्यांच्या मोटरवर दबाव आल्याने किंवा उन्हाळ्यात उष्णतेमुळेसुद्धा पेटल्याचं कळतंय. आणि एकूण विकल्या गेलेल्या वाहनांच्या तुलनेत हा आकडा फार छोटा आहे.

त्यामुळे तुम्ही विचार तर नक्कीच करू शकता, अर्थात वरील सर्व प्रश्न ध्यानात घेऊन.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)