इलॉन मस्क यांची लोकप्रियता ढासळून त्याचा टेस्लावर परिणाम होतोय का?

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, थिओ लेगेट
    • Role, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिनिधी

"मागच्या तीन वर्षांपासून ही आमची फॅमिली कार आहे. टेस्लाची कार वापरावी हे आमच्या कुटुंबाचं स्वप्न होतं. या गाडीमुळे आमचा प्रवास अगदी जलद आणि सुकर झालेला आहे," टेस्लाची चकाकती पांढरीशुभ्र मॉडेल वाय ही कार वापरणारा बेन किल्बे मला सांगत होता.

बेन हा इलेक्ट्रिक गाड्यांचा खंदा पुरस्कर्ता आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्व तो चांगलंच जाणून आहे‌. युकेमध्ये पर्यावरणस्नेही अशा शाश्वत विकासाच्या उद्योगांना चालना देण्याचं काम करणारी त्याची स्वतःची कंपनी आहे. तरीही आता ही मॉडेल वाय कार वापरणं मी बंद करणार असल्याचं तो म्हणतो.

कारण? टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी चालवलेले अनाठायी उद्योग. विशेषतः नुकतंच सक्रिय राजकारणात प्रवेश करत अमेरिकन सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांप्रती इलॉन मस्कनं चालवलेली तुसडेपणाची वागणूक बेन किल्बेला पटलेली नाही.

इलॉन मस्क यांच्या याच अतातायीपणाचा प्रतीकात्मक निषेध म्हणून बेन किल्बेनं टेस्लाची गाडी वापरणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

"दोन समूहांमध्ये वितुष्ट निर्माण करेल, अशा कुठल्याही विभाजनवादी वृत्तीचा मी विरोधक आहे. माणसाने प्रत्येक गोष्ट प्रेम आणि करुणेच्या भावनेनं करायला हवी. किमान तसा प्रयत्न तरी करायला हवा, या मताचा मी आहे."

"कुठलंही काम हे इतरांना कमी न लेखताही केलं जाऊ शकतं. इतरांना कमी लेखण्याचा उद्दामपणा मला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच इलॉन मस्क यांची गेल्या काही दिवसातील वागणूक मला खटकत आहे," असं बेन किल्बेनं सांगितलं.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्यावर अशी उघड नाराजी व्यक्त करणारे बेन किल्बे हे एकटे नाहीत. मागच्या काही आठवड्यांत इलॉन मस्क यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे.

विशेषतः अमेरिकन सरकारमधील डिपार्टमेंट फॉर गव्हर्नमेंट इफिशिअन्सी (DOGE) या नव्या मंत्रालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली इलॉन मस्क अतिशय निर्दयी आणि असंवेदनशील वागणूक देत असल्याचा अनेकांचा दावा आहे. त्यातून ही वाढती नाराजी आकाराला येत आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

फक्त अमेरिकन राजकारणातच नव्हे तर बाहेरच्या राष्ट्रांच्या राज्यकारभारात देखील नाक खुपसायला मस्क यांनी सुरुवात केलेली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जर्मनीच्या संसदीय निवडणुकीत अति उजव्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाच्या प्रचारसभेलाही त्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय पंतप्रधान केर स्टार्मरसह ब्रिटनमधील विविध नेत्यांवर एक्सवरून मस्क यांनी वेळोवेळी निशाणा साधला आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या राजकीय शेरेबाजीतून मस्क अनेकदा सभ्यतेचे निकष मोडत अर्वाच्य भाषा देखील वापरताना दिसतात. त्यामुळे विरोधी मताच्या लोकांना मस्क यांची ही वागणूक बेमुर्तखोरपणाची वाटते.

त्यामुळे जगभरात विविध ठिकाणी टेस्लाच्या कार विक्री केंद्र व कार्यालयाबाहेर विरोध प्रदर्शनं भरवली जात आहेत. अमेरिकेसह कॅनडा, ब्रिटन, जर्मनी आणि पोर्तुगालमध्येही मस्क यांचा निषेध करणारी अशी आंदोलनं झालेली पाहायला मिळाली.

अर्थात यातली बहुतांश आंदोलनं शांततापूर्ण मार्गाने पार पडली असली तरी काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याचं पाहायला मिळालं. यात टेस्लाचे शोरूम्स, चार्जिंग स्टेशन्स आणि गाड्यांचं नुकसान झालं. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये तर चिडलेल्या आंदोलकांनी टेस्लाच्या गाड्यांना आग लावून टाकल्याच्या घटना देखील पाहायला मिळाल्या.

अमेरिकेतील मस्क यांचे विरोधक विशेषतः टेस्लाच्या सायबर ट्रकला आपलं लक्ष्य बनवत आहेत. जर्मनीतील एएफडीसह इतर अनेक वेळा अति उजव्या फॅसिस्ट पक्षांना व विचारसरणीला इलॉन मस्क यांनी वेळोवेळी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

मस्क यांच्या याच फॅसिस्टवादाच्या पुरस्कारावर बोट ठेवत हे आंदोलक टेस्लाच्या गाड्यांवर 'स्वस्तिक' कोरून त्यांची तोडफोड करत आहेत.

व्हाईट हाऊससमोर आपल्या टेस्ला गाडीसोबत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हाईट हाऊससमोर आपल्या टेस्ला गाडीसोबत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

या धर्तीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांची बाजू घेत त्यांना आपला उघड पाठिंबा दर्शवला‌. व्हाईट हाऊसमध्ये मुद्दाम टेस्लाच्या कारमधून येत असतानाचा त्यांचा फोटो यासाठीच प्रसिद्ध केला गेला. यासोबतच जास्तीत जास्त लोकांनी टेस्लाच्या गाड्या विकत घ्या आणि वापरा, अशी जाहिरातही व्हाईट हाऊसने आयतीच करून टाकली.

आपल्या निषेधार्थ चाललेल्या या विरोध प्रदर्शनावर फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीतून प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क म्हणाले की, "अशा प्रकारची हिंसा हा शुद्ध वेडेपणा असून कुठल्याही प्रकारे याचं समर्थन करताच येणार नाही. टेस्ला कंपनी ही इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचं उदात्त कार्य करते. त्यामुळे टेस्लावर असे पाशवी हल्ले व हिंसक विरोध हा दुर्दैवी आहे."

या सगळ्याचा टेस्ला कंपनीच्या कारभारावर कितपत परिणाम होतोय, हा प्रश्न यानिमित्तानं उभा राहणं साहजिक आहे. ट्रम्प प्रशासनात मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर इलॉन मस्क यांनी घेतलेले राजकीय निर्णय व वैचारिक भूमिकांमुळे टेस्ला या ब्रॅन्डला झळ तर नक्कीच पोहचलेली आहे. पण ती नेमकी किती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण इलॉन मस्क यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे टेस्लाचे पारंपरिक ग्राहक कंपनीपासून दुरावत चालले आहेत, हे मात्र यानिमित्तानं स्पष्ट होतंय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली टेस्ला पुन्हा एकदा भरारी घेऊ शकेल काय? की या धक्क्यातून सावरण्यासाठी कंपनी नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यास प्राधान्य देईल, हे येणारा काळच ठरवेल.

मस्क यांची विक्षिप्त पण तितकीच प्रभावी प्रतिमा

दोन दशकांपूर्वी टेस्ला ही अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीमधील एक छोटी स्टार्ट-अप कंपनी होती. पण अगदी काही वर्षांत या कंपनीनं मोठी झेप घेत वाहन निर्मिती उद्योगात अक्षरशः क्रांती घडवून आणली. आज टेस्ला ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगातील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

जगभरात टेस्लाचे भव्य वाहन निर्मिती प्रकल्प विखुरलेले आहेत. इलेक्ट्रिक गाड्या हा फक्त एक पर्यावरणस्नेही पर्याय नव्हे तर रोजच्या वापरासाठीही पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनाइतक्याच सुलभ, सुकर आणि जलद असू शकतात, याचा प्रत्यय पहिल्यांदा टेस्लाने जगाला दिला.

इलॉन मस्क हाच टेस्लाचा प्रमुख चेहरा राहिलेला आहे. 2004 साली सुरू झालेल्या टेस्ला कंपनीचे ते संस्थापक आणि प्रमुख आहेत. 2008 पासून ते टेस्लाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

तेव्हापासून आजतागायत टेस्लाला एका छोट्या स्टार्ट अप पासून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतील जगातील सर्वात बलाढ्य कंपनी बनवण्यासाठी इलॉन मस्क यांचं योगदान वादातीत आहेत. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली टेस्लानं इतक्या वेगानं ही प्रगती केलेली आहे.

"टेस्ला ही खऱ्या अर्थानं वाहन उद्योगात नवा पायंडा पाडणारी कंपनी आहे. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागरूकता पसरवली. वेगवेगळ्या गुंतवणूकादारांना इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत आपलं भांडवल गुंतवायला लावलं. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत त्यांना मुख्यधारेत आणलं. त्यामुळेच आज इलेक्ट्रिक वाहनांकडे पेट्रोल - डिझेलवर चालणाऱ्या पारंपारिक वाहनांचा सक्षम पर्याय म्हणून पाहिलं जातंय," अशा शब्दात कॉक्स ऑटोमोटिव्ह या वाहन उद्योगातील सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रमुख स्टेफनी वाल्डेझ स्ट्रीटी यांनी टेस्लाचं महत्व अधोरेखित केलं‌.

आपल्या टेस्ला गाडीसमोर उभा असलेला बेन किल्बे. इलॉन मस्कची वागणूक पटत नसल्यानं ही गाडी आता विकणार असल्याचं त्याने सांगितलं.
फोटो कॅप्शन, आपल्या टेस्ला गाडीसमोर उभा असलेला बेन किल्बे. इलॉन मस्कची वागणूक पटत नसल्यानं ही गाडी आता विकणार असल्याचं त्याने सांगितलं.

काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांकडे फक्त फॅशन म्हणून पाहिलं जायचं. इलेक्ट्रिक वाहनं ही अतिशय संथ आणि वापरायला किचकट असल्यामुळे ती अव्यवहारिक आहेत, असा लोकांचा समज होता. शिवाय सतत थोड्या अंतराने चार्जिंग करणंही लांबच्या प्रवासात शक्य होत नसे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरायला लोक कचरत असत. 2012 साली टेस्लानं मॉडेल एस ही नवीन कार बाजारात आणत इलेक्ट्रिक वाहनांबाबतच्या या सगळ्या आक्षेपांना सडेतोड उत्तर दिलं‌.

ही कार पेट्रोल - डिझेलचं इंजिन असणाऱ्या पारंपरिक कारपेक्षा कुठल्याच निकषावर कमी नव्हती. एकदा चार्जिंग केल्यावर ही कार 400 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर सहज कापत असे. त्यामुळे वारंवार चार्जिंग करण्याची इलेक्ट्रिक वाहनांची जुनी समस्याही दूर झाली. टेस्लाच्या या वापरायला सहज, वेगवान आणि अलिशान कारमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला. फक्त पर्यावरणस्नेही किंवा फॅशन म्हणून नव्हे तर रोजच्या वाहतूकीसाठी उपयुक्त म्हणून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन वापरण्याची सुरूवात टेस्लाच्या मॉडेल एस पासून झाली.

इलेक्ट्रिक कारपासून सुरूवात झालेली ही कंपनी आज प्रचंड विस्तारली आहे. टेस्लानं कालांतरानं विविध क्षेत्रात आपले पाय पसरायला सुरुवात केली. स्वयंचलित वाहक/चालक असलेली गाडी बनवण्यासाठी टेस्लानं मोठी गुंतवणूक केली.

चालकांची गरज नसलेल्या, लोकांना वाहून नेतील अशा रोबोटॅक्सीज आणण्याचं इलॉन मस्क यांचं स्वप्न होतं. याशिवाय उर्जेचा साठा करणारं तंत्रज्ञान व यंत्र विकसित करण्याचाही नवा उद्योग टेस्लानं सुरू केला. माणसाची सगळी कामं करू शकेल असा माणसाच्याच आकाराचा ऑप्टिमस नावाच्या रोबोटची निर्मिती आम्ही करणार असल्याची घोषणाही 2021 ला टेस्लाने केली आणि पुढच्याच वर्षी ती प्रत्यक्षातही आणली.

टेस्ला कार

ॲपल म्हटल्यावर ज्याप्रमाणे आपसूक स्टीव्ह जॉब्स यांचा चेहरा आपल्यासमोर येतो. तसंच इलॉन मस्क हे टेस्ला या ब्रॅन्डची ओळख बनले आहेत. टेस्ला कंपनीच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि नवं उत्पादन सादर करण्याच्या सोहळ्याला इलॉन मस्क यांची उपस्थिती प्रकर्षानं उठून दिसायची‌.

त्यामुळे इलॉन मस्क इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या जगभरात लाखांच्या घरात आहे. क्वचित कुठल्या उद्योजकाला एखाद्या सेलिब्रिटीसारखी इतकी लोकप्रियता आधी मिळाली असेल.

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करुन पर्यावरण जतन आणि शाश्वत विकासाचा चेहरा बनलेले इलॉन मस्क आता त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. त्यांच्या चाहत्यांप्रमाणेच आता त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. फक्त उद्योजक असताना त्यांना अशा विखारी टीकेचा कधी सामना करावा लागला नाही‌.

पण एक्सवर (ट्विटवर) आपली वादग्रस्त राजकीय मतं बेदरकारपणे मांडायला त्यांनी सुरुवात केली तेव्हापासून आपल्या वाहन निर्मिती उद्योगापेक्षा या इतर उद्योगांमुळेच ते जास्त चर्चेत राहू लागले.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटर विकत घेत त्याचं एक्स असं नामांतरण केलं. या सगळ्या उद्योगांमध्ये व्यस्त झाल्यावर टेस्लाकडे अर्थातच इलॉन मस्क यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. याचा विपरीत परिणाम टेस्लाच्या कामगिरीवर झाला. अर्थात टेस्लाच्या या घसरणीमागे इलॉन मस्कच्या या करामतींशिवाय इतरही अनेक कारणं आहेत.

मस्क यांच्या कारनाम्यांमुळेच टेस्ला ब्रॅन्डला बसली झळ

टेस्लाची मॉडेल वाय ही मागच्या वर्षी सुद्धा जगात सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली. मात्र मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीचा खप वाढण्याऐवजी कमी होण्याची ही गेल्या दशकातील पहिलीच वेळ आहे. मागच्या वर्षी 18.1 लाख मॉडेल वाय कार विकल्या गेल्या होत्या. यावर्षी ही संख्या घटून 17.9 लाख झाली आहे.

अर्थात ही घसरण अगदी नगण्य असली तरी गेल्या काही वर्षांतील टेस्लाचा वाढत जाणारा आलेख बघता ही घसरण लक्षवेधी ठरते. टेस्ला अजूनही जगातील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन विक्री करणारी कंपनी आहे. पण खप वाढण्याऐवजी कमी होत जाणं हे या कंपनीला खचितच परवडणारं नाही. विक्री बरोबरच यावर्षी कंपनीनं कमावलेल्या एकूण नफ्यातही मागच्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचं पाहायला मिळालं.

टेस्लासाठी या वर्षाची सुरुवातच अतिशय खराब झाली. युरोपमध्ये यावर्षीच्या जानेवारी महिन्यात टेस्लाच्या वाहन खरेदीसाठीच्या नोंदणीत मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत 45 टक्क्यांची घट झालेली पाहायला मिळाली.

फेब्रुवारी महिन्यातही ही घसरण अशीच चालू राहिली. ब्रिटन वगळता युरोपातील इतर सगळ्याच देशांमध्ये टेस्लाच्या वाहनांची मागणी थंडावलेली दिसते‌. फक्त ब्रिटनमध्ये या काळात टेस्लाच्या वाहन विक्रीत 21 टक्क्यांची वाढ झालेली दिसली. ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया या देशात टेस्लाच्या कामगिरीत तेवढा सुधार झालेला पाहायला मिळाला. हे मोजके अपवाद वगळता जगभरातील इतर देशांत यावर्षी टेस्लाची लोकप्रियता घसरताना दिसते.

चीनमध्ये उभारलेल्या टेस्लाच्या वाहन निर्मिती प्रकल्पांनाही उतरती कळा लागली असून इथली मागणी व उत्पादन एका वर्षात तब्बल 49 टक्क्यांनी घसरलं आहे. चीनमध्ये बनणारी हे टेस्ला वाहनं चीनसह इतर देशांमध्येही निर्यात केली जातात. त्यामुळे चीनमधील टेस्लाच्या वाहन निर्मिती प्रकल्पांना लागलेली ही घसरण टेस्लासाठी मोठा धक्का आहे.

टेस्लाची मॉडेल वाय ही कार मागच्या वर्षी जगात सर्वाधिक खपाची कार ठरली होती.

फोटो स्रोत, Getty Images

वॉल स्ट्रीट वरील स्विस बँक यूएसबीचे आर्थिक विश्लेषक जोसेफ स्पॅक यांनी काही दिवसांपूर्वीच एक संशोधन प्रसिद्ध केलं. या संशोधनात टेस्लाच्या उत्पादनांच्या विक्रीत 2025 साली मागच्या वर्षीच्या तुलनेत किमान 5 टक्क्यांनी घट होणार असल्याचा दावा जोसेफ स्पॅक यांनी केला आहे.

एका बाजूला 2025 मध्ये आमच्या कंपनीची उलाढाल तब्बल 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा या वर्षाच्या सुरुवातीला टेस्लाने केला होता. पण आता मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या नवीन संशोधनामुळे टेस्लाच्या समभाग धारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गेल्या काही दिवसांपासून टेस्लाच्या शेअर्सचे पडणारे भाव याचेच निर्देशक आहेत. 2025 या वर्षात आत्तापर्यंत तीन महिन्यात टेस्लाचे समभाग 40 टक्क्यांनी घसरले असून एका दिवसात शेअर्सचे भाव 15 टक्क्यांनी कोसळण्याचा नकोसा विक्रमही टेस्लाने साध्य केलाय.

टेल्साच्या उत्पादनांच्या विक्रीत इतकी घसरण होण्यामागे अनेक कारणं आहेत. वेगवेगळ्या कंपन्या आणि ब्रॅन्ड्सच्या कामगिरीवर देखरेख ठेवणाऱ्या मॉर्निंग कन्सल्ट इंटेलिजन्स या संस्थेचं म्हणणं की इलॉन मस्क यांचा व्यवहार यामागचं एक कारण असलं तरी हा काही टेस्लाच्या घसरणीमागचा प्रमुख घटक नाही.

इलॉन मस्क यांची लोकप्रियता युरोप, कॅनडा इत्यादी प्रदेशात मागच्या काही काळात घसरली आहे. पण चीनमध्ये तर इलॉन मस्क अजूनही तितकेच लोकप्रिय आहेत. तरी सुद्धा चीनमध्ये देखील टेस्लाची पत घसरण्याला काय कारण असू शकेल? चीन ही टेस्लाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे टेस्लाची चीनमधील पिछेहाट हा कंपनीसाठी मोठा चिंतेचा विषय ठरू शकतो.

अमेरिकेत इलॉन मस्क यांच्याविषयी टोकाची मतं पाहायला मिळतात. आपल्या DOGE मंत्रालयातून सरकारी खर्चात कपात करण्याचा इलॉन मस्क यांनी लावलेला सपाटा अमेरिकेत अनेकांना मंजूर नसला तरी इलॉन मस्क यांच्या याच निर्णयाचं समर्थन करणाऱ्यांची संख्याही अमेरिकेत तितकीच मोठी आहे.

यावरून टेस्लाच्या घसरणीमागे इलॉन मस्क यांची नकारात्मक प्रतिमा आणि घसरती लोकप्रियता हे एकमेव कारण असू शकत नाही, हे स्पष्ट होतं. "उच्च मध्यम वर्ग आणि अति श्रीमंतांमध्ये इलेक्ट्रिक वाहन वापरण्याची उत्सुकता अजूनही कायम आहे. पण आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात टेस्लाशिवाय इतर कंपन्या देखील आक्रमकपणे उतरत असून यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगात टेस्लाच्या एकाधिकारशाहीला धक्का बसायला एव्हाना सुरूवात झालेली आहे. टेस्लाशिवाय इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना हे ग्राहक देत असलेली पसंती या बदलत्या प्राधान्यक्रमाचंच द्योतक आहे," असं विश्लेषण मॉर्निंग कन्सल्ट इंटेलिजन्सनं आपल्या अहवालात केलं आहे.

टेस्ला उत्पादनांच्या विक्रीत सातत्याने होणाऱ्या घसरणीबद्दल कंपनीकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा बीबीसीने प्रयत्न केला असता यावर स्पष्टीकरण द्यायला टेस्लानं नकार दिला.

वाहन उद्योगातील तज्ज्ञांचं मत लक्षात घेता टेस्लाची पडझड होण्यामागे इलॉन मस्क यांच्या बिघडत चाललेल्या सार्वजनिक प्रतिमेशिवाय इतर घटकांचा अधिक मोठा वाटा आहे.

नाविन्याचा अभाव आणि परदेशी स्पर्धकांचं आव्हान

टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्या या कधीकाळी अत्याधुनिक व अलिशान मानल्या जायच्या. पण आता तसा दावा करता येणं अवघड आहे. कारण मागच्या काही काळात नव्या तंत्रज्ञानानी सज्ज अशी नवी वाहनं विकसित करण्यात टेस्लाला येत असलेलं अपयश.

मॉडेल एस ही आपली इलेक्ट्रिक कार टेस्लाने 2012 साली बाजारपेठेत आणली. तर मॉडेल एक्स 2015 साली बाजारपेठेत आली. त्यानंतर मॉडेल 3 आणि मॉडेल वाय या तुलनेनं स्वस्त गाड्या देखील टेस्लानं विक्रीला काढल्या. पण त्यालाही आता बराच काळा लोटून गेलाय.

या तुलनेत इतर स्पर्धक कंपन्या सातत्यानं नवनव्या तंत्रज्ञानानी सज्ज अशी नवी वाहनं बाजारपेठेत आणत आहेत. टेस्लाच्या जुन्या मॉडेल्सपेक्षा इतर कंपन्यांची ही नवी मॉडेल्स ग्राहकांना अधिक आकर्षक वाटणं मग साहजिकच म्हणावं लागेल.

वाल्टेझ स्टीटीसुद्धा याच मुद्यावर बोट ठेवताना म्हणतात की, "सायबर ट्रक वगळता टेस्लानं मागच्या काही काळात कुठलंच नवीन उत्पादन बाजारपेठेत आणलेलं नाही. सायबर ट्रकची संकल्पना सुद्धा जुनाटच होती. त्यामुळे या नवीन उत्पादनातही काही नावीन्य नव्हतं‌. नाही म्हणायला त्यांनी आपल्या जुन्या मॉडेल वाय या उत्पादनात काही सुधारणा केल्या आहेत. पण बाहेरील वाढती स्पर्धा आणि सतत येणारी नवी उत्पादने बघता टेस्लाचा हा प्रयत्न अगदीच तोकडा म्हणावा लागेल."

कार्डिफ विद्यापीठाच्या सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री रिसर्च या संशोधन केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक पीटर वेल्स यांनी सुद्धा वाल्टेझ स्टीटी यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. "ज्या प्रकारची नवनवी उत्पादने आणि आविष्कार टेस्लाकडून अपेक्षित होते त्यांची पूर्तात इलॉन मस्क यांना करता आलेली नाही. यामुळेच टेस्लाला उतरती कळा लागलेली आहे," वेल्स सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

टेस्लाला चहूबाजूंनी वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला पारंपरिक इंधनावर चालणारी वाहने बनवणाऱ्या जुन्या कंपन्यादेखील आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. कोरियातील किया आणि ह्युनडाय या कंपन्यांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचा दर्जा आणि उपयुक्तता बरीच वाढली आहे‌.

याशिवाय चीनमधू़न इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या ब्रँड्सचादेखील उदय होताना पाहायला मिळतो. बीवायडी हा चीनी ब्रॅन्ड तुलनेनी अगदी कमी किमतीत ग्राहकांना दर्जेदार इलेक्ट्रिक वाहन पुरवतो आहे. तर शीपेंग आणि निओ या चीनी कंपन्यांनी अलिशान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीवर लक्ष्य केंद्रित केलं आहे.

"आपल्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगाला चीनच्या सरकारनं अनुदान आणि विविध योजनांच्या माध्यमातून मोठं पाठबळ पुरवलेलं आहे. याचा मोठा फायदा या कंपंन्यांना होत आहे. बीवायडी सारख्या नवख्या कंपन्यांनी इतक्या कमी कालावधीत जम बसवला आहे. या चिनी कंपन्या फक्त चीनमध्येच नव्हे जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवत आहेत. कमी किंमतीत सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी ते पुरवत असलेले उत्पादनं फक्त टेस्ला साठीच नव्हे तर इतर सर्व इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांसाठीही आव्हान म्हणून उभे राहत आहेत," असं मत वाल्डेझ स्ट्रीटी यांनी व्यक्त केलं.

टेस्लासमोर किती तगडे प्रतिस्पर्धी उभे राहत आहेत याचं एक उदाहरण काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा समोर आलं. टेस्लाची वाहनं ही त्यांच्या चार्जिंगच्या क्षमतेमुळे नावाजलेली आहेत.

याला प्रत्युत्तर म्हणून बीवायडीने नुकतीच 400 किलोमीटर अंतर पार करून शकेल इतकी चार्जिंग फक्त 5 मिनीटात करू शकेल, असे चार्जिंग स्टेशन्स आम्ही उभारले असल्याची घोषणा केली. याचा वेग आणि क्षमता टेस्लाच्या नावाजलेल्या सुपरचार्जर नेटवर्कपेक्षाही वरचढ आहे.

रोबोटॅक्सीज टेस्लाला वाचवू शकतील काय?

मागच्या काही काळात इलॉन मस्क यांनी कंपनीच्या धोरणासंबंधी केलेली वक्तव्ये लक्षात घेता टेस्लाचं प्राधान्य आपल्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा चालक विरहीत स्वयंचलित वाहन बनवण्याकडे जास्त असल्याचं लक्षात येतं.

जून महिन्यापर्यंत अमेरिकेतील टेक्सासमध्ये टेस्लाच्या रोबोटॅक्सी सुविधा सुरू झालेल्या असतील, अशी घोषणा जानेवारी महिन्यात इलॉन मस्क यांनी केली होती. मात्र इलॉन मस्क यांच्या या घोषणेला लोक फारसे गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत. कारण अशा अवाजवी घोषणा आणि दावे इलॉन मस्क यांनी याआधीसुद्धा वेळोवेळी केले होते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी केली नाही.

उदाहरणार्थ 2019 साली पुढच्या वर्षभरात टेस्लाच्या 10 लाख रोबोटॅक्सीज रस्त्यांवर धावताना दिसतील, अशी घोषणा इलॉन मस्क यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. याला आता सहा वर्ष होऊन गेली मात्र रोबोटॅक्सी अजून काही रस्त्यांवर येऊ शकली नाही.

चालकाची गरज नसलेली पूर्णतः स्वयंचलित अशी गाडी टेस्लानं मोठी दवंडी पिटत बाजारपेठेत आणली. प्रत्यक्षात ही गाडी चालवताना चालकाला या स्वयंचलित यंत्रावर लक्ष ठेवण्यासाठी सतत दक्ष राहावं लागतं, असा निराशाजनक अनुभव नंतर ग्राहकांना आला.

"स्वयंचलित वाहनासंबंधी इलॉन मस्क दरवर्षी काही ना काही नवीन घोषणा देतात. गेल्या अनेक वर्षांपासून चालकाची गरज नसलेलं स्वयंचलित वाहन लवकरच आणणार असल्याचा दावा ते करत आहेत. पण अजून काही हे वाहन ग्राहकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही. त्यामुळे इलॉन मस्क यांचे हे दावे म्हणचे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशातला प्रकार झाला आहे," अशी खरमरीत टीका रेडप्सी या ऑटोमोटिव्ह कन्सल्टन्सीचे अधिकारी जे नेग्ले यांनी टेस्लावर केली.

'आपल्या इतर उद्योगां'मुळे टेस्लाकडे मस्क यांचं दुर्लक्ष होतंय का?

अशा कठीण समयी टेस्लाला खरंतर एका कणखर नेतृत्वाची गरज आहे. इलॉन मस्क यांच्याकडे असं कणखर नेतृत्व पुरवण्याची क्षमता कदाचित असेलही पण टेस्लाव्यतिरिक्त इतर अनेक भानगडीत (ज्यात राजकारणाचाही समावेश होतो) त्यांचे हात गुंतलेले असल्यामुळे टेस्लाचे प्रमुख म्हणून पूर्णवेळ काम करणं त्यांना सध्या शक्य होत नाही. टेस्लाशिवाय इतर अनेक उद्योगांमध्ये ते व्यस्त दिसतात.

पूर्वाश्रमीचं ट्विटर आणि आताचं एक्स हा सोशल मीडिया प्लॉटफॉर्म ते चालवतात. एक्स एआय नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपनीचे देखील तेच प्रमुख आहेत. स्पेस एक्स या खासगी अवकाश मोहिमा चालवणाऱ्या कंपनीचं नेतृत्व देखील तेच करतात.

टेस्ला प्रमाणेच स्पेस एक्स ही त्यांच्या कंपनीमागे देखील मागच्या काही काळात अनेक अडचणींचा ससेमिरा लागला आहे. सलग दोनदा आपल्या स्टारशिप रॉकेटचं अवकाशात प्रक्षेपण करण्यात स्पेस एक्सला अपयश आलं. पृथ्वीवरून प्रक्षेपण झाल्यावर कक्षेत पोहचण्याआधीच विस्फोट होऊन हे रॉकेट 6 मार्च रोजी सलग दुसऱ्यांदा धुळीला मिळालं.

काही दिवसांपूर्वीच इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आधीच खांद्यावर असताना सरकारचं एक नवीन मंत्रालय चालवणं तुम्हाला कितपत सोप्पं अथवा अवघड जातंय, असा प्रश्न फॉक्स बिझनेसने घेतलेल्या मुलाखतीत इलॉन मस्क यांना विचारण्यात आला होता. तेव्हा इतर कामांच्या व्यापात ही अधिकची जबाबदारी पार पाडणं अवघड जात असल्याची कबुली त्यांनी दिली होती.

2019 साली टेस्लाच्या नवीन सायबरट्रकचं अनावरण करताना इलॉन मस्क.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2019 साली टेस्लाच्या नवीन सायबरट्रकचं अनावरण करताना इलॉन मस्क.

"इतर अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर असल्याने इलॉन मस्क सध्या टेस्लाचं व्यवस्थापन करण्यासाठी किती वेळ देत आहेत हे सांगणं अवघड आहे. कोणतं नवीन उत्पादन कधी आणायचं, कारखाना अथवा उत्पादन कुठे करायचं असे कंपनीचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात इलॉन मस्क यांचं योगदान किती आहे, हे सांगणं कठीण आहे. पण इतक्या मोठ्या कंपनीचे प्रमुख या नात्यानं या पदावरील कुठल्याही व्यक्तीने या कामासाठी आपला शंभर टक्के वेळ आणि उर्जा दिली पाहिजे. त्याला वाहन उद्योगाची इत्यंभूत माहिती आणि बाजारपेठेची जाण असली पाहिजे. तरच योग्य निर्णय घेतले जातील आणि कंपनी टिकाव धरू शकेल," अशा शब्दात प्राध्यापक वेल्स यांनी आपला या विषयावरील रोख व्यक्त केला.

2004 पासून इलॉन मस्क हे टेस्लाचे सर्वेसर्वा म्हणून कार्यरत आहेत. टेस्लाचे सीईओ या पदावरून ते बाजूला होतील, अशी कुठलीही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. इलॉन मस्क हे टेस्लाचे सर्वात मोठे भागधारक देखील आहेत. टेस्लाचे एकूण 13 टक्के शेअर्स त्यांच्या नावावर आहेत ज्यांची एकूण किंमत आज 95 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भरेल.

याशिवाय व्हॅनगार्ड, ब्लॅकरॉक, स्टेट स्ट्रीट आणि मॉर्गन स्टॅनली अशा खासगी वित्तीय संस्था आणि बँकांनीही मोठ्या प्रमाणात टेस्लाचे समभाग विकत घेतलेले आहेत.

टेस्लाच्या शेअर्सची घसरती किंमत या सगळ्या गुंतवणूकदारांसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे. पण शेअर्सच्या किंमतीत इतकी घसरण होऊन देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत टेस्लाच्या समभागाची किंमत अजूनही 30 टक्क्यांनी जास्त आहे. कारण ही घसरण होण्याआधी टेस्लाच्या शेअर्सने वर्षभर मोठी मजल मारली होती.

विशेषतः अमेरिकेच्या निवडणूक निकालात डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर टेस्लाच्या शेअर्सनी मोठी मुसंडी मारली होती. निवडणूक निकालानंतर अगदी काही दिवसांत टेस्लाच्या समभागाची किंमत तब्बल दुप्पट झाली होती. त्यामुळे या आताच्या घसरणीनंतरही टेस्लाचे गुंतवणूकदार अद्यापही फायद्यातच आहेत. पण ही घसरण अशीच चालू राहिल्यास ते कधीपर्यंत फायद्यात राहतील, हा प्रश्नच आहे.

टेस्लामध्ये नेतृत्व बदलाची हाक

आज टेस्लाची एकूण उलाढाल तिच्या एकूण नफ्याच्या 100 पटीने अधिक आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचा अजूनही टेस्लावर भक्कम विश्वास आहे. याबाबतीत टेस्लानं फोर्ड, जनरल मोटर्स आणि टोयाटोसारख्या आपल्या प्रतिस्पर्धी वाहन निर्मिती कंपन्यांंना फार पिछाडीवर टाकलेलं आहे.

समभाग धारकांनी शेअर्स कोसळत असतानाही आपली गुंतवणूक कायम ठेवलेली आहे. यातून नवीन तांत्रिक शोध व अविष्काराच्या जोरावर टेस्ला पुन्हा मुसंडी मारेल, हा गुंतवणूकदारांचा विश्वासच अधोरेखित होतो‌.

नॅग्ले यांनी बाजारपेठेत टेस्ला कंपनीचं मूल्य इतकं जास्त असण्यामागची कारणमीमांसा बीबीसीशी बोलताना स्पष्ट केली. "एकतर टेस्ला इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत एकाधिकारशाही गाजवेल असा गुंतवणूकदांचा अंदाज होता. पण चीनी कंपन्यांच्या उदयामुळे तो मोडित निघाला. आता रोबोटॅक्सीज किंवा स्वयंचलित वाहनांच्या क्षेत्रात टेस्ला वर्चस्व गाजवेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. ही आशा आता कितपत टिकून राहील हे येणारा काळच सांगेल," असं नॅग्ले म्हणतात.

टेस्लामधील बहुतांश गुंतवणूकदार अजूनही या घसरणीबाबत फारसे बोलताना दिसत नाहीत. मात्र मागच्याच आठवड्यात रॉस गार्बर या प्रसिद्ध गुंतवणूक निधी व्यवस्थापकाने 'इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा', अशी उघड मागणी केली.

दीर्घ काळापासून टेस्लामध्ये गुंतवणूक आणि कधीकाळी मस्क यांचे कट्टर समर्थक असूनही आता मस्क यांच्या कार्यक्षमतेवर सवाल उठवणारे गार्बर हे एकटेच नाहीत. जसजसे टेस्लाचे शेअर्स कोसळत आहेत तसतशी इलॉन मस्क यांच्यावरील नाराजी वरचेवर समोर येत आहे.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क

तज्ज्ञांनी सुद्धा टेस्लाला नेतृत्वात बदल करण्याची गरज असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. स्मिड ऑटोमोटिव्ह रिसर्च संस्थेचे प्रमुख मॅथिअस स्मिड म्हणाले की, "इलॉन मस्क यांना सोडचिठ्ठी देत कंपनीच्या प्रमुखपदी नव्या व्यक्तीची निवड करणं हेच या घडीला टेस्लासाठी लाभदायक ठरू शकतं. एकतर मस्क यांची वेडीवाकडी वागणूक आणि नकारात्मक प्रतिमा टेस्लाचं नुकसान करते आहे. त्यात सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून त्यांच्यावर आणि टेस्लावर हितसंबंध जपण्याचे आरोप होत आहेत, जे साहजिकच म्हणावे लागतील. शिवाय एकाच वेळी इलॉन मस्क या दोन मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत.

"टेस्लाच्या सीईओचं संपूर्ण लक्ष आणि वेळ हे टेस्लाच्या वाढीवरच केंद्रीत असायला हवं. या घडीला आपला पूर्ण वेळ टेस्लाला देणं इलॉन मस्क यांना अर्थातच शक्य होणार नाही. त्यामुळे टेस्लाला नव्या सीईओची गरज आहे."

प्राध्यापक वेल्स यांनी सुद्धा मॅथिअस स्मिड यांच्या मताला दुजोरा दिला. "या संकटातून मार्ग काढण्यासाठी टेस्लानं नवी दिशा आणि नवा चेहरा शोधायला हवा. या नव्या चेहऱ्याला वाहन निर्मिती क्षेत्राचा अनुभव आणि उद्योगाची जाण असायला हवी. अशा नव्या नेतृत्वाखाली कंपनीला योग्य दिशेनं वाटचाल करता येईल. ही पडझड रोखायची असेल तर त्यादृष्टीने आत्ताच टेस्लानं पावलं उचलायला हवीत," असा काळजीवाहू सल्ला जाताजाता प्राध्यापक वेल्स यांनी दिला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)