इलॉन मस्क: 'टेलीपथी' प्रत्यक्षात उतरणार? मेंदूतच वायरलेस चिप बसवल्याने काय घडू शकेल?

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूरालिंक ही एक न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी आहे जी मेंदू-संगणक इंटरफेसच्या विकासासाठी काम करते
    • Author, पॅट्रिक जॅक्सन
    • Role, बीबीसी न्यूज

मोबाईल, कम्प्युटर किंवा इतर कोणतंही डिजिटल डिव्हाईस फक्त विचारांच्या मदतीने नियंत्रित करता आलं तर?

माणसाच्या मेंदूत एक चिप बसवून शरीराच्या हालचाली नियंत्रित करता आल्या तर? काही वर्षांपूर्वी फक्त सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये दिसणारा हा प्रकार आता प्रत्यक्षात उतरला आहे.

उद्योगपती इलॉन मस्क यांनी माणसाच्या मेंदूत एक वायरलेस चिप बसवल्याचा दावा केलाय. इलॉन मस्क यांनी 29 जानेवारीला ट्विटरवर पोस्ट करून या नवीन प्रयोगाची माहिती दिली आहे.

इलॉन मस्क यांच्या कंपनीने केलेला हा प्रयोग नेमका काय आहे?

मेंदूत एखादी चिप बसवून कम्प्युटर चालवता येऊ शकतो का? इलॉन मस्क यांनी केलेल्या प्रयोगाचे परिणाम काय होतील? याचाच हा आढावा.

इलॉन मस्क यांनी कोणती घोषणा केली आहे?

इलॉन मस्क यांनी असा दावा केलाय की त्यांच्या न्यूरालिंक कंपनीने माणसाच्या मेंदूत एक कृत्रिम चिप बसवली आहे. आजवरच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडल्याचा दावा त्यांनी केलाय.

व्हीडिओ कॅप्शन, इलॉन मस्क यांची न्युरालिंक कंपनी मानवी मेंदूत चिप बसवून काय करणार? सोपी गोष्ट

रुग्णांच्या मेंदूत ही चिप बसवल्यानंतर सकारात्मक परिणाम बघायला मिळाले असल्याचं ते म्हणाले आहेत. न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार माणसाच्या मेंदूला कम्प्युटरसोबत जोडून मेंदूशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी हा प्रयोग केला जातोय.

 मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वायरलेस ब्रेन चिप्सच्या शर्यतीत मस्क यांची कंपनी एकमेव नाही.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने बीबीसीला अशी माहिती दिलीय की, 2023 च्या मे महिन्यात त्यांनी मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीला माणसावर या चिपचा प्रयोग करण्याची परवानगी दिली होती.

इलॉन मस्क यांनी ट्विटरवर अशी माहिती दिलीय की, "न्यूरालिंकच्या या पहिल्या उत्पादनाचं नाव 'टेलीपथी' असं आहे आणि तुम्ही या चिपच्या साहाय्याने फक्त विचार करून मोबाईल, कम्प्युटर किंवा कोणतंही डिजिटल डिव्हाईस वापरू शकता. ज्या रुग्णांचे अवयव काम करत नाहीत असे लोक हे डिव्हाईस सगळ्यात पहिल्यांदा वापरतील."

टेलीपथी (Telepathy) कसं काम करेल?

न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार या प्रयोगात एका रोबोटचा वापर करून माणसाची हालचाल नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागात 1,024 छोट्या इलेक्ट्रोड्सच्या मदतीने एक चिप बसवलं जाईल.

हे इलेक्ट्रोड माणसाच्या केसांपेक्षाही पातळ असतील. हे चिप वायरलेस पद्धतीने चार्ज होऊ शकेल. मेंदूतून निघणारे सिग्नल रेकॉर्ड करून ते सिग्नल एका अ‍ॅप्लिकेशनमध्ये पाठवले जातील आणि त्यानुसार मोबाईल किंवा कम्प्युटर चालू लागेल.

न्यूरालिंक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2016ला न्यूरालिंकची स्थापना झाली होती

इलॉन मस्क यांनी याबाबत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं उदाहरण दिलं. स्टीफन हॉकिंग यांना मोटार न्यूरॉन डिसीज होता.

या आजारामुळे ते त्यांच्या हातापायांची हालचाल करू शकत नव्हते. इलॉन मस्क म्हणतात की, "कल्पना करा की स्टीफन हॉकिंग यांना एखाद्या टायपिस्टपेक्षा वेगाने टाईप करता आलं असतं तर काय झालं असतं? आमच्या या प्रयोगाचं अंतिम उद्दिष्ट तेच आहे."

न्यूरालिंकच्या या प्रयोगाचे धोके काय आहेत?

मेंदूची शस्त्रक्रिया करून त्यात चिप बसवण्याच्या या प्रयोगाबाबत प्रामुख्याने तीन गोष्टी अभ्यासकांना सतावत आहेत.

शरीरावर होणारे अल्पकालीन परिणाम, वैद्यकीय परिणाम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी शस्त्रक्रिया करणं कितपत नैतिक असेल हा एक प्रश्न आहे.

मुळात मेंदूची कोणतीही शस्त्रक्रिया जोखमीची असते. डिसेंबर 2022 मध्ये रॉयटर्सने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार न्यूरालिंकच्या या प्रयोगामुळे आजवर 1,500 प्राण्यांचा मृत्यू झालाय. ज्यामध्ये काही माकडं, मेंढ्या आणि डुकरांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

पण जुलै 2023 मध्ये, यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरने मस्क यांच्या कंपनीत जाऊन तपासणी केली आणि त्यात त्यांनी प्राणी संशोधन कायद्यांचं कोणतंही उल्लंघन केल्याचं आढळलं नाही पण अजूनही या प्रकरणात एक स्वतंत्र तपास सुरु आहे.

त्यानंतर याच विभागाने माणसांवर प्रयोग करण्याची परवानगी दिली होती.

मेंदूतली चिप चार्ज करण्याचा प्रयोग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक कंपन्यांनी मेंदूतील चिपबाबत असे प्रयोग केले आहेत.

आणखीन एक बाब म्हणजे मेंदूसारख्या अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या अवयवामध्ये अशी कृत्रिम चिप बसवल्यामुळे नेमके काय परिणाम होऊ शकतात याबाबत पूर्ण स्पष्टता नाहीये. अजूनही हा प्रयोग प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे पुरेशी आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही.

यासोबतच अशी चिप बसवल्यामुळे मेंदूचा वापर करून काय काय होऊ शकतं? त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो का? आणि एकूणच माणसाचं आयुष्य बदलून जाईल का? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातायत.

असेच प्रयोग आणखीन कोण करतंय ?

अमेरिकेतल्या ब्लॅकरॉक न्यूरोटेक आणि प्रिसिजन न्यूरोसायन्ससारख्या कंपन्यांनी मेंदूशी निगडित असे प्रयोग केले आहेत.

अर्थात मस्क यांनी केलेल्या घोषणेमुळे सध्या या विषयावर चर्चा होत असली तरी मागील दोन दशकांपासून असे प्रयोग केले जात आहेत.

ब्लॅकरॉक न्यूरोटेक (Blackrock Neurotech) ही कंपनी अमेरिकेतल्या युटाह राज्यात काम करते. त्यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग केला होता.

प्रिसिजन न्यूरोसायन्स (Precision Neuroscience) ही कंपनी न्यूरालिंक कंपनीच्याच एका सहसंस्थापकाने सुरू केली. अर्धांगवायू असलेल्या लोकांना मदत करण्याच्या हेतूने ही कंपनी काम करते.

त्यांनी केलेल्या संशोधनात त्याचे एका टेपला मेंदूच्या पृष्ठभागावर ठेवलं जातं आणि 'क्रॅनियल मायक्रोस्लिट' नावाच्या शस्त्रक्रियेचा वापर केला जातो.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)