एलॉन मस्क : टेस्लामध्ये भरमसाठ गुंतवणूक का होतेय?

फोटो स्रोत, REUTERS/HANNIBAL HANSCHKE
या आठवड्यातील महत्त्वाच्या अर्थविषयक बातम्यांपैकी एक म्हणजे एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी 5 लाख कोटी डॉलर्सची झाली आणि त्याचबरोबर एलॉन मस्क जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
पहिल्या क्रमांकावर अर्थातच अजूनही बिल गेट्स आहेत.
इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या या कंपनीत गुंतवणूकदारांनी असं काय बघितलं जे वर्षभरापूर्वी त्यांना दिसलं नाही, हा तंत्रज्ञान जगताचा धांडोळा घेणाऱ्या बीबीसी टेक टेंट पॉडकास्टचा प्रश्न आहे.
2020 च्या सुरुवातीला स्टॉक मार्केटमध्ये टेस्ला 80 अब्ज डॉलर्सची असल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळीही अशी कंपनी जी फार नफा देणारी नाही तिच्यासाठी ही किंमत जास्त असल्याचं बोललं गेलं. असं असूनही संपूर्ण वर्ष या कंपनीची किंमत वाढत गेली आणि ती आता 5 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे.
नफ्याच्या मार्गावर
S&P 500 इंडेक्स टेस्ला कंपनीला आघाडीच्या कंपन्यांमध्ये सामील करेल, अशा बातम्या होत्या.
टेस्लाची किंमत आता टोयोटो, फोक्सवॅगन, ह्युंदाई, जीएम आणि फोर्ड यांच्या एकूण किंमतीपेक्षाही जास्त आहे.
टेक टेंटने हिशोब लावला तेव्हा कळलं की, गेल्या वर्षभरात या सर्व कंपन्यांनी एकूण 50 अब्ज डॉलर्स नफा कमावला. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यातल्या काही कंपन्यांना आर्थिक फटकाही बसला.

फोटो स्रोत, REUTERS/ALY SONG
याउलट टेस्लाला या वर्षी 1 अब्ज डॉलर्सचा नफा झाला. टेक टेंटने केलेलं मूल्यांकन बघता गुंतवणूकदारांना निकट भविष्यात 50 पट फायदा होण्याची शक्यता आहे का?
ऑटो इंडस्ट्री
पॅशन कॅपिटलचे एलन बरबीज यांचं म्हणणं आहे, "याचा केवळ एकच अर्थ आहे की, जे गुंतवणूकदार या किंमतीला शेअर्स विकत घेत आहेत. त्यांना यापेक्षा चढ्या किंमतीला ते विकले जातील, अशी अपेक्षा आहे."

फोटो स्रोत, REUTERS/STEPHEN LAM
बरबीज टेस्लापेक्षाही सुरुवातीच्या टप्प्यात असणाऱ्या नव्या कंपन्यांचं मूल्यांकन करतात. मात्र, विश्लेषकांच्या मते बरेचदा ही प्रक्रिया अतार्किकही असते. याचं कारण म्हणजे कंपनीचं मूल्यांकन केवळ कंपनीच्या क्वालिटीवर नाही तर बाजाराच्या मूडवरही अवलंबून असतं.
टेस्लाने ऑटो इंडस्ट्रीला नवी दिशा दिल्याचं कंपनीच्या चाहत्यांचं म्हणणं आहे, असं असेल तर 2020 च्या सुरुवातीला जेव्हा कंपनी 80 अब्ज डॉलर्सची होती त्यावेळीही ही गोष्ट खरीच होती.
यावर बरबीज म्हणतात, "वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला पाच-सहा पट फायदा होईल, असं म्हणण्याचा कुठलाच आधार नव्हता."
शेअर बाजार
मात्र, विश्लेषकांच्या मते गुंतवणूकदार काही काळापुरता जुगार खेळत आहेत.
बरबीज म्हणतात, "माझ्या मते बाजार मुळात तार्किकच आहे. यावेळी खरेदी करणाऱ्यांना जास्त किंमतीला शेअर्स विकता येतील, अशी आशा वाटतेय आणि त्यासाठी कारणही आहे."

फोटो स्रोत, REUTERS/ALY SONG
विश्लेषकांच्या मते थोड्या काळासाठी शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी जास्त तर्क लावण्याची गरज नाही.
एकदा फ्लीट स्ट्रीट स्टॉकच्या एका वार्ताहराला त्याच्या एडिटरने विचारलं, "बाजार का वाढतोय?" त्यावर वार्ताहराचं उत्तर होतं, "विकणाऱ्यांपेक्षा विकत घेणारे जास्त आहेत."
बाजार आपटायचा तेव्हा वार्ताहर याच्या उलट सांगायचा.
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला
फ्रेंच वाईन बरगंडीची 1945 ची बॉटल, पिकासोची पेंटिंग, लंडन किंवा सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये फ्लॅट याप्रमाणेच टेस्ला कंपनीबाबतही घडतंय. मूल्यांकन करताना खरेदीदारासाठी वस्तूच्या किंमतीपेक्षा वस्तू अधिक महत्त्वाची ठरतीये. मग तिची किंमत कितीही अतार्किक असली तरीही.
याविषयाच्याच एका जाणकाराने काही महिन्यांपूर्वी टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीची अधिक किंमत लावली जात असल्याचं म्हटलं होतं. 1 मे रोजी केलेल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "टेस्लाच्या शेअर्सची किंमत खूप जास्त आहे."

फोटो स्रोत, EPA/ALEXANDER BECHER
हे ट्वीट करणारे कोण होते? ते स्वतः एलॉन मस्क होते. टेस्ला कंपनीचे मालक. या ट्वीटनंतर कंपनीचं मूल्यांकन 14 अब्ज डॉलर्सने घसरलं होतं.
पुढे शेअर्सची किंमत चारपट वाढली. मात्र, भविष्यात काय होईल, हे कुणालाच सांगता येणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








