अन्न प्रक्रिया : एखादा पदार्थ दोन हजार वर्षांपर्यंत कसा टिकवता येतो?

अन्नपदार्थ

फोटो स्रोत, TARA MOORE

कोव्हिड-19 ची साथ आपल्या सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगावर ओढावलेली ही सर्वात वाईट परिस्थिती असल्याचं म्हटलं जात आहे.

ही साथ रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला गेला. लोक घरांमध्ये कैद झाले. बाहेरचं जग पूर्णपणे बंद झाल्याचं पाहायला मिळालं.

उत्पादन थांबल्यामुळे पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला. अन्नपदार्थांच्या पुरवठ्याची साखळी तर कोलमडून पडली होती. अशा स्थितीत आपल्या घरांपासून लांब, पेईंग गेस्ट किंवा हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या लोकांसाठी डबाबंद जेवण किंवा 'रेडी टू ईट' जेवण हाच एक पर्याय होता. याच्या मदतीनेच त्यांनी कठीण प्रसंगांवर मात केली. पण हे अन्नपदार्थही खराब झाले असते, तर काय घडलं असतं?

तज्ज्ञांच्या मते, अन्नपदार्थ चांगल्या पद्धतीने साठवण्यात आले, तर वर्षानुवर्षे ते चांगले आणि खाण्यायोग्य राहू शकतात. या काळात त्यांच्या पोषक घटकांवरही काही परिणाम होत नाही.

कोणतेही अन्नपदार्थ त्यामध्ये जीवजंतूंची वाढ झाल्यामुळे खराब होतात. जर अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया (जीवाणू) निर्माणच होऊ दिले नाहीत तर ते अगदी कधीही वापरता येऊ शकतं.

अन्नपदार्थ कसे सुरक्षित ठेवावेत?

मानव अनेक युगांपासून फूड प्रिझर्व्हेशन म्हणजेच खाण्यापिण्याचे पदार्थ बराच काळ साठवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आला आहे.

उदाहरणार्थ- अन्नपदार्थ सुकवून, त्याला मीठ किंवा साखर लावून ते ठेवले जातात. एखादं रसायन किंवा हवाबंद डब्यात त्यांचा साठा केला जातो.

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील फूड एक्सपर्ट मायकल सुलू यांच्या मते, अन्न पदार्थ साठवण्याची सर्वात उपयुक्त पद्धत म्हणजे ते सुकवून ठेवणं. पदार्थ सुकवून ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता नष्ट होते.

चीझ

फोटो स्रोत, Getty Images

हवाबंद डब्यात पदार्थ ठेवल्यानंतरही त्यामध्ये इतर अनेक बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. काही जीवाणू हे अत्यंत कमी हवेच्या परिस्थितीतही निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ- मांस एनोरोबिक गटातील जीवाणू खराब करतात. कमी ऑक्सिजनच्या स्थितीत या जीवाणूंची वाढ होऊ शकते.

अन्नपदार्थांना मीठ लावूनही त्यांचा साठा केला जातो. पण ही पद्धत सर्वच प्रकारच्या पदार्थांसाठी उपयोगी ठरत नाही.

मांसाच्या बाबतीत विचार केला तर मांस सुकवून त्याला मीठ लावून ठेवल्यास बराच काळ ते साठवून ठेवता येऊ शकतं.

साखरेचा जाड थर लावूनसुद्धा अन्नपदार्थ खराब होण्यापासून वाचवले जाऊ शकतात.

शुद्ध साखर कोणत्याही प्रकारच्या जीवाणूला निर्माण होऊ किंवा वाढू देत नाही. यामुळेच टॉफी, चॉकलेट किंवा जास्त गोड वस्तू बराच काळ टिकून राहतात.

मात्र, साखरेसोबत इतर काही गोष्टी म्हणजेच खवा, दूध, स्टार्च किंवा अंडी यांचा समावेश झाल्यास त्या पदार्थांचं आयुर्मान तितकंच कमी होत जातं, हे नाकारून चालणार नाही.

अजूनही हजारो वर्षे जुनी पद्धत

आईसलँडमध्ये मॅकडॉनल्डस कंपनीचा 'बिग मॅक बर्गर' हे संरक्षित अन्नपदार्थांचं सर्वात लोकप्रिय आणि एकमेव उदाहरण आहे, असं म्हणता येईल.

तिथं बर्गर हवाबंद काचेच्या डब्यात ठेवण्यात येतं. सोबतच जीवाणूंची वाढ होऊ न देण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह टाकले जातात. अशा पद्धतीने बर्गर बराच का सुपरमार्केटमध्ये ठेवता येऊ शकतं.

बर्गर

फोटो स्रोत, Getty Images

योग्य प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह वापरल्याने यातील अन्नपदार्थ खराब होत नाहीत.

साखरेपासून बनवण्यात येणारा ट्विंकी हा पदार्थ अत्यंत लोकप्रिय मानला जातो. बराच काळ तो साठवून ठेवता येऊ शकतो. साधारणपणे याचं आयुर्मान काही आठवड्यांचं असतं.

पण हा पदार्थ आवडणाऱ्या व्यक्तींनी याच्या साठ्यासाठी अनोखी पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीने ट्विंकी सुमारे 44 वर्षांपर्यंत साठवून ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.

यु-ट्यूबवर याबाबत एक व्हीडिओही आहे. यामध्ये एक व्यक्ती 27 वर्षांपूर्वीचं ट्विंकी कापताना दिसतो.

मधाबद्दल तर काय सांगायचं? मध आयुष्यात कधीच खराब होऊ शकत नाही. कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण शून्य असतं.

यामध्ये अनेक नैसर्गिक संरक्षक घटक उपस्थित असतात. त्यामुळे यात जीवाणूंची वाढ होत नाही.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

जगातील सर्वात जुना मध इजिप्तच्या तूतेखामन थडग्यात आणि जॉर्जियातील बडप्पन मकबऱ्यात मिळालं आहे.

हा मध 3 हजार वर्षं जुना आहे. अन्नपदार्थ साठवून ठेवण्याची पद्धत आजही तीच आहे, जी हजारो वर्षांपूर्वी वापरली जात होती.

जमिनीत पुरून बर्फात ठेवणं...

तेल, लोणी, तूप यांच्यासारखे पदार्थही बराच काळ साठवून ठेवता येऊ शकतात. बॉग बटर हे एका प्रकारचं लोणीच असतं.

आर्यलँड आणि स्कॉटलँडमध्ये या लोणीचे 4 हजार वर्षे जुने कंटेनर सापडले आहेत. हे कंटेनर दलदली जमिनीत पुरून ठेवण्यात आले होते.

प्राचीन लोक एखाद्या प्रथेमुळे किंवा इतर मान्यतांचा आधार घेऊन लोणी किंवा प्राण्यांची चरबी पुरून ठेवत होते. किंवा चोरांपासून वाचवण्यासाठीही असं केलं जात असेल, हेसुद्धा म्हणता येईल. तसंच वर्षानुवर्षे यांचा वापर करण्यासाठी दलदली जमिनीत हे पुरून ठेवण्यात येतं, असंही म्हटलं जाऊ शकतं.

दारूची तर गोष्टच न्यारी. दारू जितकी जुनी तितकी ती चांगली, असं म्हटलं जातं.

जर्मनीच्या स्पायरमधील एका प्राचीन रोमन थडग्यात जगातील सर्वात जुनी दारूची बाटली आढळली आहे. ही बाटली सुमारे 1700 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं.

पण या बाटलीतील दारूची चव अद्याप कुणीच घेतलेली नाही. याशिवाय दोनशे वर्षे जुन्या शँपेनच्या बाटल्याही उपलब्ध आहेत.

अन्नपदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

मांस जर अत्यंत कमी तापमानात बर्फात ठेवण्यात आलं तरी ते बराच काळ खाण्यायोग्य राहू शकतं.

पर्वतांवरील डोंगरांवर विशालकाय हत्ती, मॅमथ आणि इतर प्राण्यांचे मृतदेह अनेकवेळा सापडले आहेत.

हे मृतदेह सापडले त्यावेळी त्यांचं मांस अगदी नीट होतं. इतकंच नव्हे तर त्यांचा रंगही बदलला नव्हता. पण बर्फ वितळून हटलं, तेव्हा त्यांच्यात बदल होऊ लागला.

पण माशांच्या बाबतीत बर्फाचा नियम लागू होत नाही. मासे बर्फात बराच काळ साठवून ठेवणं थोडंसं अवघड आहे.

बर्फात जास्त काळ राहिल्याने माशांच्या मांसपेशीत अनेक रासायनिक बदल होऊ लागतात. यामुळे त्यांची चव निघून जाऊ शकते.

पण आज तंत्रज्ञान विविध प्रकारची प्रगती करत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापराने मासेही बराच काळ साठवून ठेवता येऊ शकतात.

सध्याचा काळ जगासाठी अत्यंत कठिण आहे. याला तोंड देत आपलं आयुष्य सुरू आहे.

पण भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली. जर ताज्या अन्नाचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला, अशा वेळी घरात साठवलेले सुके अन्नपदार्थ किंवा कोणत्याही सुपरमार्केटमधील डबाबंद अन्नपदार्थांचा वापर करून आपलं पोट भरता येऊ शकतं.

ते कितीही काळ साठवण्यात आलेलं असलं तरी त्यांचा उपयोग करता येऊ शकतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)