राडिया टेप्ससह 4 वाद ज्यामुळं रतन टाटा यांच्या प्रतिमेला बसला धक्का

रतन टाटा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रतन टाटा
    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर) 86 व्या वर्षी निधन झालं. औद्योगिक नैतिकता आणि सामाजिक कामाद्वारे ते घराघरात पोहोचले आणि लोकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यामुळंच त्यांच्या निधनानं सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

रतन टाटांचं नाव हे कायम कौतुकानं आणि आदरानं घेतलं जातं. पण तसं असलं तरी तेही वादांपासून पूर्णपणे दूर राहू शकले नाहीत.

कायम चांगल्या कामांसाठी ओळखले जाणारे रतन टाटा 4 प्रकरणांत वादात सापडले होते. त्यात सिंगूर नॅनो प्रकल्पाला झालेला शेतकऱ्यांचा विरोध, लॉबिस्ट नीरा राडिया फोन टॅपिंग, तनिष्क जाहिरात आणि सायरस मिस्त्रींच्या नियुक्तीच्या प्रकरणांचा यात समावेश आहे.

ही प्रकरणं नेमकी काय? त्यात काय घडलं की, कायम चांगल्या कामासाठी ओळखले जाणारे रतन टाटा वादात सापडले? त्यावेळी टाटांकडून काय भूमिका घेण्यात आली याबाबत जाणून घेऊयात.

सिंगूर नॅनो प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध

सर्वात स्वस्त कारचं स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी टाटांनी नॅनो प्रकल्पाची घोषणा केली.

2006 मध्ये पश्चिम बंगाल सरकारमधील तत्कालीन कम्युनिस्ट सरकारनं शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करून टाटांना दिली. मात्र, जमीन अधिग्रहणाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केला.

'नॅनो कार' हा रतन टाटांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'नॅनो कार' हा रतन टाटांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

पश्चिम बंगालमधील तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व करत उपोषण केलं. पुढं या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. अखेर या वादानंतर टाटांनी नॅनो प्रकल्प गुजरातला हलवला, मात्र जमीन कंपनीच्या ताब्यात ठेवली.

2011 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचा दारुण पराभव झाला आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी मंत्रिमंडळाचा पहिलाच निर्णय म्हणून टाटांच्या ताब्यातील जमीन घेतली आणि शेतकऱ्यांना परत दिली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नीरा राडिया टेप प्रकरण आणि लॉबिंगचे आरोप

2010 मध्ये रतन टाटा एका मोठ्या वादात अडकले होते. सीबीआयने लॉबिस्ट नीरा राडिया यांचे 100 हून अधिक कॉल टॅप केले. यात आघाडीचे नेते, उद्योजक, पत्रकार यांच्यासोबत राडिया यांनी केलेल्या संभाषणाचा समावेश होता.

त्यात रतन टाटांचाही समावेश होता. रतन टाटांनी राडिया यांच्याशी केलेलं संभाषण लीक झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. लॉबिस्ट राडिया उद्योगपती मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्यासाठी काम करत होत्या.

तपास संस्था मोबाईल टेलिफोन लायसन्सच्या विक्रीप्रकरणी होत असलेल्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करत होत्या. त्याचाच भाग म्हणून तपास संस्थांकडून अधिकृतपणे लॉबिस्ट राडिया यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते.

रतन टाटा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रतन टाटा

यानंतर टाटांनी हे खासगी संभाषण असल्याचं आणि ते सार्वजनिक होणं आपल्या खासगीपणाचा भंग असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

या प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चौकशीचेही आदेश दिले होते. फोन टॅपिंगवरून उद्योग जगतात अस्वस्थता निर्माण झाल्याच्या मुद्द्यावर मनमोहन सिंग म्हणाले होते, "फोन टॅपिंगने उद्योग जगताच्या काही भागात निर्माण झालेली अस्वस्थता मला माहिती आहे. मात्र आपण ज्या जगात राहतो आहोत तेथे सरकारी संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा, करचोरी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार या प्रकरणी फोन टॅपिंगच्या अधिकाराची गरज आहे."

"तपास संस्थांनी या अधिकारांचा वापर अधिक काळजीने केला पाहिजे. यासाठी सुस्पष्ट नियम, प्रक्रिया आणि कार्यपद्धतीची गरज आहे. त्यामुळे या अधिकारांचा गैरवापर होणार नाही," असंही सिंग यांनी त्यावेळी नमूद केलं होतं.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

तनिष्क जाहिरातीचा वाद

ऑक्टोबर 2020 मध्ये टाटा समुहानं 'तनिष्क' या त्यांच्या ज्वेलरी ब्रँडची एक जाहिरात घाईघाईनं मागे घेतल्यामुळे देखील रतन टाटा यांच्यावर मोठी टीका झाली होती.

'एकात्वम' (एकता) नावाच्या या दागिण्याच्या जाहिरातीत आंतरधर्मीय लग्न झालेल्या जोडप्याच्या घरात नववधू असलेल्या हिंदू सुनेच्या मुस्लीम सासूने तिच्यासाठी हिंदू पद्धतीच्या डोहाळे जेवणाचे आयोजन केल्याचे दाखवण्यात आले होते.

यातून सर्व धर्मांचा आदर करणाऱ्या सहिष्णू भारतीयांचं आणि राष्ट्रीय एकतेचं चित्रण करण्यात आलं होतं.

मात्र, या जाहिरातीला उजव्या विचारसरणीच्या ट्रोल्सचा सामना करावा लागला होता. याच गटाने तनिष्कवर बॉयकॉट करण्याचं आवाहनही केलं होतं.

शेवटी या दबावामुळे 'तनिष्क'ला ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. काही लोकांचं म्हणणं होतं की जर जेआरडी टाटा जिवंत असते तर ते अशा दबावाला बळी पडले नसते.

सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप आणि वाद

नंतरच्या काळात रतन टाटा आणि सायरस मिस्त्रींसंदर्भातील वादाची चर्चा झाली.

टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन मिस्त्री यांनी टाटा बोर्डाला लिहिलेल्या पत्रात रतन टाटा यांच्यावर कंपनीच्या कारभारात ढवळाढवळ केल्याचा आणि त्यांचे निर्णय लादल्याचा आरोप केला. यामुळे रतन टाटा पुन्हा वादात सापडले होते.

सायरस मिस्त्री

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सायरस मिस्त्री

24 ऑक्टोबर 2016 ला सायरस मिस्त्री यांना एक तासापेक्षा कमी कालावधीची नोटिस देऊन टाटा समुहाच्या चेअरमन पदावरून हटवण्यात आले. या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

मिस्त्री यांचे सर्व दावे टाटा सन्सने फेटाळले. तसेच मिस्त्री यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आल्याचे म्हटले. मात्र स्वतः रतन टाटांनी ज्या व्यक्तीला टाटा समुहाच्या प्रमुखपदी नियुक्त केलं त्याच्याकडूनच हे आरोप झाल्याने अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)