रतन टाटा: अपमान करणारी कंपनी खरेदी करुन असं उभारलं टाटा मोटर्सचं साम्राज्य

1998 साली पहिली टाटा इंडिका बनून तयार झाली त्यावेळी रतन टाटा

फोटो स्रोत, Tata Motors

फोटो कॅप्शन, 1998 साली पहिली टाटा इंडिका बनून तयार झाली त्यावेळी रतन टाटा
    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, नवी दिल्ली

1999 सालची गोष्ट. रतन टाटा त्यांच्या काही सहकाऱ्यांसह अमेरिकेल्या डेट्रॉईट शहरात गेले होते.

डेट्रॉईट म्हणजे फोर्ड, जनरल मोटर्ससारख्या जगातल्या अग्रगण्य कार कंपन्यांचं मुख्यालय असणारं शहर. आणि टाटा इथे ज्या मीटिंगसाठी गेले होते, ती होती फोर्ड कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत.

टाटांना त्यांचा पॅसेंजर कार्सचा बिझनेस अर्थात तेव्हाची टेल्को ही कंपनी विकायची होती, आणि फोर्ड कंपनीने ती विकत घेण्यात रस दाखवला होता.

या बैठकीच्या काही वर्षांपूर्वीच टाटांनी पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये एंट्री घेतली होती. तोवर टाटा कंपनी फक्त ट्रक आणि बसेस बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. आणि 1998 साली रतन टाटांचं पहिलं बाळ म्हणजे टाटा इंडिका बाजारात आली होती.

लहान, आधुनिक, मारुती 800 ला जोरदार टक्कर देणारी कार म्हणून इंडिका सुरुवातीला प्रचंड हिट ठरली होती, पण नंतर अनेक तक्रारींमुळे तिची क्रेझ मावळली, आणि उलट आपण हे उद्योग करून काही चूक तर केली नाही ना, असा विचार टाटांच्या मनात येऊ लागला.

म्हणूनच आपण हा पॅसेंजर कारचा व्यवसाय हातावेगळा करावा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी ते डेट्रॉईटला गेले होते.

पण त्या बैठकीदरम्यान फोर्डचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “तुम्ही कशाला या कारच्या उद्योगात आलात? तुम्हाला त्यातलं काही माहिती नाही. आम्ही तुमची कार डिव्हीजन विकत घेतली तर तुमच्यावर उपकारच होतील.”

ते शब्द रतन टाटांच्या जिव्हारी लागले. ते त्या मीटिंगमधून निघून गेले, आणि त्यानंतर फोर्डसोबतची ती बोलणी फिसकटली.

त्या मीटिंगमध्ये उपस्थित टाटांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलेला हा किस्सा खूप प्रसिद्ध आहे.

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई हल्ला, नॅनो लॉन्चबद्दल रतन टाटा म्हणाले होते...

त्याच्या बरोबर एका दशकानंतर डेट्रॉईटमधल्या उद्योगांना घरघर लागली.

2008च्या जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आर्थिक अडचणीत आलेल्या फोर्ड मोटर कंपनीने जॅग्वार आणि लँड रोव्हर या त्यांच्याकडच्या ब्रिटीश कंपन्या विकायला काढल्या. यावेळी रतन टाटांनी रस दाखवला, आणि टाटा मोटर्सकडे JLRची मालकी आली.

पण मधल्या दहा वर्षांमध्ये बरंच काही घडलं होतं, ज्यामुळे परिस्थितीनं असा यू टर्न घेतला.

इंडिका ते नॅनो

जेआरडी टाटांनी सर्वांत दीर्घ काळ टाटा सन्स आणि टाटा समूहाचं नेतृत्व केलं. त्यानंतर 1990मध्ये धुरा आली रतन टाटांकडे. देश तेव्हा जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर होता, त्यामुळं रतन टाटांचं लक्ष एका नवीन संधीकडे होतं.

त्यांनी 1962 साली टाटा समूहात काम सुरू केलं होतं. तेव्हा सहा महिन्यांसाठी तेव्हाच्या टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी (TELCO) मध्ये काम केलं होतं.

त्यांना वाहन उद्योगात काहीतरी नवीन करायचं होतंच, म्हणून त्यांनी इटलीच्या I.DE.A या डिझाईन कंपनीला एक छान छोटी कार बनवण्याचं कंत्राट दिलं.

त्यांची संकल्पना होती, “ही कार मारुती झेनच्या आकाराइतकी असायला हवी, पण तिच्या आत अँबेसेडरसारखी ऐसपैस जागा हवी. तिची किंमत मारुती 800 इतकी असावी, पण ती चालवायला डिझेल गाडीसारखी परवडणारी असावी.”

टाटा नॅनोवर रतन टाटांनी अखेरपर्यंत प्रेम केलं. त्यांनी नॅनो EV रूपातही वापरली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टाटा नॅनोवर रतन टाटांनी अखेरपर्यंत प्रेम केलं.

साधारण 1998च्या जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या प्रगती मैदानवर जेव्हा ऑटो एक्सपोमध्ये रतन टाटांनी पहिल्यांदा टाटा इंडिका जगाला दाखवली, तेव्हा सगळेच खुश झाले.

इंडिया पासून प्रेरित इंडिका हे नाव, ही कार पूर्णपणे भारतीय बनावटीची पहिली गाडी होती, हे ठामपणे सांगणारं होतं.

या कारची लाँचिंग किंमत होती 2.6 लाख रुपये.

ऑटोकार या कार मॅगझीनचे संपादक होर्माझ सोराबजी एका लेखात म्हणतात, इंडिकामुळे खरोखरंच भारतीय वाहन जगतात मोठा बदल घडला. यामुळं मारुती सुझुकीचे धाबे दणाणले, आणि त्यांनी थेट मारुती 800ची किंमत तीस हजारांपर्यंत कमी केली.

सुरुवातीला इंडिका कुठल्याही लोकप्रिय सिनेमासारखी हिट ठरली. पण नंतर लोकांच्या अभिप्रायातून आणि चर्चांमधून इंडिकाचं वास्तव ग्राहकांना कळू लागलं.

इंडिकामध्ये सुरुवातीला अनेक तांत्रिक तक्रारी आल्या. ग्राहकांना गाडी आवडली होती, पण ते संतुष्ट नव्हते. त्यातच सर्व्हिस सेंटर आणि मेंटेनन्सच्या तक्रारींमुळे इंडिकाची क्रेझ हळूहळू कमी होऊ लागली.

व्हीडिओ कॅप्शन, नॅनो बनवणारे मराठमोळ्या इंजिनियरने आता बनवली इलेक्ट्रिक बस

टाटांच्या लक्षात आलं की, आपला हा प्रयोग हवा तितका यशस्वी झालेला नाही, म्हणून ते डिट्रॉईटची वारी करायला गेले होते. पण तिथल्या अपमानामुळे टाटांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा भरली, आणि टाटांनी आव्हानांना तोंड द्यायचं ठरवलं.

सुरुवात केली, ट्रक आणि बस बनवणाऱ्या कमर्शियल व्हेईकल्स विभागाला पॅसेंजर व्हेईकल्स विभागापासून वेगळं करण्यापासून. तिथूनच टाटा मोटर्स नावाची वेगळी ओळख आणि कंपनी जन्मास आली.

टेल्को ते टाटा मोटर्स

कंपनीने नंतर टाटा सफारी, सिऍरा आणल्या, त्यातच इंडिकाचा नवीन अवतार इंडिका V2, त्याच्याच धर्तीवर इंडिगो ही सेडान गाडी आणि इतरही बऱ्याच वेगवेगळ्या आवृत्त्या आणल्या. त्यातून टाटांना पॅसेंजर मार्केटचा अनुभव मिळू लागला.

याच दरम्यान रतन टाटांनी कुठेतरी एका मुलाखतीत एक लाखाच्या गाडीची कल्पना मांडली, आणि ते जणूकाही त्यांनी दिलेलं एक आश्वासनच बनलं.

रतन टाटांनी नंतर अनेक तांत्रिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक आव्हांना तोंड देत त्यांच्या लाडक्या नॅनोला 2009 साली अखेर बाजारात आणलं, तेव्हा तिची किंमत मात्र एक लाखापर्यंत आणता आली नव्हती.

व्हीडिओ कॅप्शन, रतन टाटांनी कसं बदललं भारतीय कार विश्व?

तरीही टाटा नॅनो जगातली सर्वांत स्वस्त, पिटुकली गाडी म्हणून जगभरात कौतुकाचा विषय ठरली. ही भारतातली त्या काळची खरोखरंच सर्वांत स्वस्त कार होती. त्यामुळे अनेकांनी आपल्या पहिल्या कारचं स्वप्न यानिमित्ताने पूर्ण केलं, तर काहींनी कुतूहलापोटीही ही कार विकत घ्यायचं ठरवलं. लाँचच्या दोन महिन्यांतच 2 लाख नॅनोंचं बुकिंग झालं होतं.

पण सुरुवातीच्या उत्साहानंतर नॅनोची क्रेझ जरा मंदावू लागली. नॅनो कार अनेक ठिकाणी पेट घेतानाचे व्हीडिओ व्हायरल झाल्यामुळे, तिच्यावर Poor Man's car असा शिक्काही बसला. आणि नॅनोला मग जवळपास एका दशकानंतर ब्रेक लागला.

टाटा नेक्सॉन आणि त्यानंतर नेक्सॉन EVमुळे टाटा मोटर्सला नवीन झेप घेता आली. आज SUV सेग्मेंटमध्ये टाटा सर्वांत जास्त गाड्या विकणारी कंपनी आहे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, टाटा नेक्सॉन आणि त्यानंतर नेक्सॉन EVमुळे टाटा मोटर्सला नवीन झेप घेता आली. आज SUV सेग्मेंटमध्ये टाटा सर्वांत जास्त गाड्या विकणारी कंपनी आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2008मध्ये टाटा मोटर्सकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जॅग्वार लँडरोव्हरची मालकीसुद्धा आली. त्याचा फायदाही टाटा मोटर्सला गेल्या सुमारे 14 वर्षांमध्ये स्थिरस्थावर होण्यात झाला. आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्याही.

गेल्या दहा वर्षांत भारतात SUVचा बाजार तेजीत आहे, हे ओळखून टाटा मोटर्सने आधी नेक्सॉन, आणि मग हॅरिअर, सफारी सारख्या SUV बाजारात आणल्या.

या दणकट गाड्यांनी जागतिक कार सेफ्टी रेटिंग्समध्ये चांगले गुण मिळवणं कंपनीच्या पथ्यावरही पडलं. पण असं म्हणतात की, या गाड्यांमध्ये आजही तशाच तांत्रिक त्रुटी आढळतात, जशा पहिल्यांदा इंडिकाच्या वेळी आणि त्यानंतर 2008मध्ये आलेल्या नॅनोच्या बाबतीत आढळल्या होत्या.

पण याच तांत्रिक चुकांमधून शिकत-शिकत, बाजारातल्या गरजा ओळखून त्यानुसार योग्य स्ट्रॅटेजी आखत, आज टाटा मोटर्स देशातली तिसरी सर्वांत मोठी पॅसेंजर कार कंपनी आहे. जुलै 2024मध्ये पहिल्यांदाच मासिक आकडेवारीत टाटा मोटर्सच्या पंचने मारुती सुझुकीच्या कुठल्याही गाडीला मागे टाकत सर्वांत जास्त विक्रीचा विक्रम गाठला.

गेल्या तीन दशकात ही जागा कायम मारुती सुझुकीच्या 800, ऑल्टो किंवा वॅगन-आरने काबीज करून ठेवली होती, मात्र टाटा मोटर्सने उत्पादन क्षमतेत केलेल्या भरीव वाढीचा फायदा त्यांना आता होताना दिसत आहे.

इलेक्ट्रिकची स्वप्नं

गेल्या दहा वर्षांमध्ये टाटांनी दोन गोष्टींमध्ये खरोखरंच नाव कमावलं आहे. एक म्हणजे सुरक्षिततेचे रेटिंग्स आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांचं तंत्रज्ञान.

आज बाजारात सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक फोरव्हीलर्स या टाटाच्या आहेत. टाटांनी महिंद्रा, ह्युंदाई, एमजी मोटर्ससारख्या कंपन्यांना खूप मागे टाकत साधारणपणे 65 टक्के मार्केट काबीज केलं आहे.

यामुळेच, भारतात आता रस्त्यांवर मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्या दिसतात. अर्थात सरकारच्या आर्थिक सवलतींच्या धोरणांचाही त्यांना फायदा मिळाला आहे.

शिवाय, एक अस्सल भारतीय कंपनी म्हणून लोक अभिमनाने टाटा मोटर्सची गाडी घेऊ इच्छित आहेत, असंही बाजारातले जाणकार सांगतात.

आज बाजारात सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक फोरव्हीलर्स या टाटाच्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आज बाजारात सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक फोरव्हीलर्स या टाटाच्या आहेत.

आज देशातलीच नव्हे तर जगातल्या सर्वांत जास्त बाजारमूल्य असलेल्या दहा कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्स पहिली भारतीय कार कंपनी ठरली आहे. आज टाटा मोटर्सचं बाजारमूल्य 51 अब्ज डॉलर्स इतकं आहे.

एकेकाळी फसलेला प्रयोग म्हणून विकायला काढलेली टेल्को कंपनी आज भारतीय बाजारात टाटा मोटर्स म्हणून ताठ मानेने उभी आहे. या उत्क्रांतीचं, इमेज-बिल्डिंगचं मोठं श्रेय रतन टाटांना द्यावं लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)