शत्रुत्वातून झालेल्या 'या' संघर्षात 37 जणांना मारून खाल्लं गेलं?

फोटो स्रोत, Rick Schulting
- Author, जॉर्जियाना रनार्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इतिहासाबद्दल आजही आपल्याला सर्वकाही माहित नाही. विशेषकरून इतिहासपूर्व म्हणजे ताम्र युग, पाषाण युगातील मानवाबद्दल अनेक गोष्टींचं आकलन व्हायचं बाकी आहे. त्यातच पुरातत्वशास्त्रज्ञांना मिळणाऱ्या अवशेषांद्वारे अधूनमधून प्राचीन काळातील काही घटना किंवा माहिती समोर येत असते. त्यातून आपल्याला धक्कादेखील बसत असतो.
इग्लंडमधील एका गुहेत सापडलेल्या मानवी हाडांमुळे ताम्र युगातील अशीच एक धक्कादायक घटना किंवा लढाई समोर आली आहे.
ती लढाई का झाली होती, त्यावेळची परिस्थिती काय होती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं नवीन संशोधनातून समोर आली आहेत. त्या संशोधनाविषयी...
वैज्ञानिकांना वाटतं की, चार हजार वर्षांपूर्वी एक लढाई झाली होती. यात एका समुदायातील किंवा गटातील लोकांनी दुसऱ्या विरोधी समुदायातील लोकांवर हल्ला चढवला, त्यांची हत्या केली आणि त्यातील काही जणांना खाल्लं देखील.
या लढाईचे किंवा संघर्षाचे पुरावे ब्रिटनच्या सॉमरसेट प्रांतात सापडले आहेत.
वैज्ञानिकांना वाटतं आहे की या लढाईच्या वेळेस एका गट किंवा समुदायातील लोकांनी विरोधी गटातील लोकांवर फक्त हल्ला चढवून त्यांची हत्याच केली नाही, तर मारले गेलेल्यांपैकी 37 जणांना खाल्लं देखील होतं.
वैज्ञानिक या घटनेचं वर्णन ताम्र युगात (कांस्य युग) इंग्लंडमध्ये घडलेली सर्वाधिक हिंसक घटना असं करतात. विशेष म्हणजे या लढाईचा कालखंड, या प्रदेशाच्या इतिहासातील सर्वात शांततामय कालखंडांपैकी एक होता असं इतिहासकारांचं म्हणणं आहे.


वैज्ञानिकांना 1970 च्या दशकात या लढाईत मारले गेलेल्यांची हाडं सापडली होती. ही घटना इतिहासपूर्व काळातील आहे. असं मानलं जातं की या लढाईत विरोधी गटाच्या लोकांना 15 मीटर खोल घळीत किंवा खंदकात फेकण्यात आलं होतं.
"विरोधी समुदायाचा बदला घेण्यासाठी म्हणून हा हल्ला चढवण्यात आली असण्याची शक्यता आहे. या घटनेचे परिणाम बहुधा पुढील कित्येक पिढ्यांवर झाले असतील." असं रिक शल्टिंग म्हणाले. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
या घटनेबद्दल रिक शल्टिंग यांनी सांगितलं की विरोधकांचा संहार करण्याच्या योजनेचा भाग म्हणून त्यातील काही माणसांना खाण्यात आलं असेल आणि त्यांचे अवशेष नष्ट करून हल्ला करणाऱ्या समुदायानं त्यांच्या विरोधकांना एक प्रकारचा संदेश दिला असेल.
इंग्लंडमधील गुहेत सापडले ताम्रयुगीन मानवी अवशेष
सॉमरसेटमधील मेंडिप हिल्सच्या जवळ चार्टरहाऊस वॅरन नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुहांच्या समूहात या लढाईत मारले गेलेल्या माणसांच्या हाडांचे अवशेष मिळाले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका गटानं जवळपास 3,000 हाडांच्या तुकड्यांचं विश्लेषण केलं.
वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की या लढाईत 37 जण मारले गेले. यात पुरुष, महिला आणि मुलांचाही समावेश होता. वैज्ञानिकांना शंका आहे की यातील जवळपास निम्मे जण किशोरवयीन आणि तरुण होते.
ताम्र युगातील गावांमध्ये साधारणपणे 50 ते 100 लोक राहायचे. यावरून असं दिसतं की या लढाईत तो संपूर्ण समुदायच नष्ट झाला असावा.

फोटो स्रोत, Rick Schulting
ब्रिटनमधील ताम्र युग इसवीसनापूर्वी 2500 ते 2000 दरम्यान सुरू झालं होतं आणि ते इसवीसनापूर्वी 800 पर्यंत राहिलं होतं.
याच कालखंडात मानवानं दगड किंवा पाषाणांपासून तयार केलेली शस्त्रं सोडून काशाच्या किंवा तांब्याच्या शस्त्रांचा वापर सुरू केला होता. त्याचबरोबर याच कालखंडात मोठ्या स्वरुपात आणि कायमस्वरुपी शेतीव्यवस्था निर्माण होण्यास देखील सुरूवात झाली होती.
अचानक हल्ला करून समुदाय केला नष्ट
वैज्ञानिकांना वाटतं की या लढाईत बळी पडलेल्यांना कोणताही प्रतिकार केला नव्हता. त्यांच्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला होता.
मारले गेलेल्यांच्या हाडांच्या अवशेषाचा अभ्यास केला असता, त्यावर ओरखडे आणि चावल्याच्या खुणा सापडल्या. त्यातून दिसतं की विरोधी गटानं विविध शस्त्रांचा वापर करून या समुदायातील लोकांची हत्या केली आणि नंतर त्यांना खाऊन टाकलं.
"जर प्राण्यांच्या शरीरावर देखील अशाच खुणा आढळल्या, तर त्यातून हे सांगणं सोपं आहे की त्यांना मारून खाण्यात आलं होतं," असं प्राध्यापक शल्टिंग म्हणाले.

फोटो स्रोत, Rick Schulting
वैज्ञानिकांना वाटतं की प्राचीन मानव भूक भागवण्यासाठी त्यांच्याच प्रजातीतील म्हणजे इतर मानवांची हत्या करत नसत आणि त्यांना खात नसत. उलट त्यावेळेस मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध होतं असं मानवी हाडांच्या जवळ सापडलेल्या प्राण्यांच्या अवशेषातून दिसतं.
त्या कालखंडातील अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडले आहेत.
या लढाया किंवा संघर्ष साधनसंपत्ती किंवा स्त्रोतांसाठी झाल्या असाव्यात, असं सांगणारे फारसे पुरावे नाहीत.
अविश्वास किंवा शत्रुत्वाच्या भावनेनं झाला संघर्ष
तज्ज्ञांना वाटतं की दोन्ही गट किंवा समुदायांमधील परस्पर विश्वासाच्या अभावामुळे हा हिंसाचार झाला असावा.
"ही खूपच विलक्षण किंवा असाधारण गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे संपवण्यासाठी त्याचे तुकडे करण्यात आले होते. असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा विरोधी व्यक्ती खूपच संतापलेली, घाबरलेली किंवा नाराज झालेली असेल," असं प्राध्यापक शल्टिंग म्हणाले.
"हा काही फक्त नरसंहार नाही. एका गटानं किंवा समुदायानं दुसऱ्या समुदायाला पूर्णपणे संपवण्याचा केलेला तो प्रयत्न होता," असं प्राध्यापक शल्टिंग यांना वाटतं.
ते पुढे म्हणाले की एका समुदायाच्या संस्कृतीवर झालेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी किंवा त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला असावा.
"जेव्हा एका गटाला वाटतं की त्यांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं करण्यात आलं आहे, तेव्हा करण्यात आलेली ही कारवाई आहे. यात न्यायाधीशांकडे जाणं आणि न्याय मागणं ही मानसिकता दिसत नाही," असं प्राध्यापक शल्टिंग म्हणाले.
"ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. ती थांबवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतील," असं त्यांना वाटतं.
प्राचीन काळातील मानवी वर्तनाची नवी उकल
त्यांना असं वाटतं की एका व्यक्तीच्या स्वत:च्या एजेंड्यामुळे किंवा हेतूमुळे हे सर्व काही घडलं आहे किंवा शांततेत न जगण्याच्या त्याच्या मानसिकतेमुळे हे घडलं आहे.
प्राध्यापक शल्टिंग पुढे म्हणतात, "जेव्हा दोन्ही समुदायात या मानसिकतेचे लोक असतात, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते."
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ताम्र युगाच्या सुरुवातीच्या कालखंडात इंग्लंड हा तुलनात्मकरित्या शांततामय प्रदेश होता. तिथे फारशा लढाया किंवा संघर्ष झाल्याचे पुरावे आढळत नाहीत.
याशिवाय त्या प्रदेशातील समुदायांनी तलवारीचा वापर केल्याचे, शस्त्र बनवल्याचे किंवा स्वत:चं संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधल्याचा कोणताही पुरावा सापडत नाही.

फोटो स्रोत, Antony Audsley
प्राध्यापक शल्टिंग म्हणाले की या लढाईचा शोध लागण्यापूर्वी, त्या काळात या प्रदेशात झालेल्या हल्ल्यांमध्ये फक्त 10 जण मारले गेल्याची माहिती होती.
प्राध्यापक शल्टिंग पुढे सांगतात की या प्रकारचा हा काही एकमेव हल्ला नसून अशा प्रकारच्या अनेक घटना किंवा संघर्ष झाले असतील.
"मात्र असं असलं तरी केव्हातरी, शांतता हवी असणारे नेते या समुदायांमधून पुढे आले असतील. त्यामुळे ते लोक शांततेनं जगले असतील. लोकांचं आयुष्य सामान्य होत पूर्वपदावर आलं असेल," असं ते पुढे म्हणाले.
"ताम्र किंवा कांस्य युगात मानवी वर्तणूक कशी होती, मानवी स्वभाव कसा होता, हे समजून घेण्यासाठी या प्रकारच्या घटना उपयुक्त ठरतात," असं शल्टिंग यांना वाटतं.
हे संशोधन 'अँटिक्विटी' (Antiquity) या संशोधनविषयक नियतकालिकात प्रकाशित झालं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











