नेहरूंशी मतभेद असतानाही राजेंद्र प्रसाद सर्वाधिक काळ राष्ट्रपती कसे राहिले?

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी हिंदी

राजेंद्र प्रसाद यांनी कोलकाताच्या (तेव्हाचं कलकत्ता) प्रसिद्ध प्रेसीडेन्सी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. 1904 मध्ये ते कलकत्ता विद्यापीठातून 'एफए'ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर तिथूनच त्यांनी बीएमध्ये पहिला वर्ग मिळवला होता.

त्याच काळात एक परीक्षक राजेंद्र प्रसाद यांच्या क्षमतेनं इतके प्रभावित झाले की त्यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या उत्तर पत्रिकेत लिहिलं होतं, 'परीक्षा देणारा परीक्षकापेक्षा उत्तम आहे.'

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "परीक्षेत दहा प्रश्न विचारण्यात आले होते आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरं लिहावीत. मी सर्व 10 प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि त्यानंतर लिहिलं की, यापैकी कोणतेही पाच प्रश्न तपासावेत."

राजेंद्र प्रसाद यांच्या महात्मा गांधींबरोबरच्या पहिल्या भेटीची गोष्टदेखील रंजक आहे.

वकिलीची पदवी घेतल्यानंतर राजेंद्र प्रसाद पटनामधील सर्वात मोठे वकील झाले होते. ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी कोलकात्याला (त्यावेळचं कलकत्ता) गेले होते.

राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "मी गांधीजींच्या शेजारी बसलो होतो. मात्र, मी त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. कारण मी थोडासा लाजाळू स्वभावाचा होतो."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

"तिथे गांधीजींनी काँग्रेसचे सरचिटणीस व्हावं असा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, गांधीजींनी ते पद स्वीकारण्यास नकार दिला. मला ही गोष्ट आवडली नाही. तिथून गांधीजी राजकुमार शुक्ल यांच्याबरोबर चंपारणला जाण्यासाठी पाटण्याला गेले आणि मी पुरीला गेलो."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

ते पुढे लिहितात, "मी राजकुमार शुक्ल यांचा एक खटला लढवत होतो. त्यामुळे ते गांधीजींनी पाटण्यात माझ्या घरी घेऊन आले. त्यावेळेस मी घरी नव्हतो. शुक्ल यांनी जेव्हा माझ्या नोकरांना सांगितलं की हे आपले पाहुणे आहेत. त्यानंतर नोकरांनी माझे अशील आल्यानंतर जसं व्हरांड्यात अंधरुण घालत असत त्याच प्रकारची व्यवस्था करण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून दिली."

राजेंद्र प्रसाद आणि गांधीजींची भेट

गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांनी 'मोहनदास' या नावानं गांधीजीचं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्रात त्यांनी लिहिलं आहे की, "गांधीजींच्या वेशभूषेवरून राजेंद्र प्रसाद यांच्या नोकरांना ते महत्त्वाचे व्यक्ती वाटले नाहीत. त्यामुळे त्यांनी गांधीजींना विहिरीतून पाणी काढण्याची परवानगी दिली नाही तसंच घरातील शौचालय वापरण्याचीही परवानगी दिली नाही."

"त्याचवेळेस गांधीजींना आठवलं की लंडनमध्ये शिकणारे मजहरुल हक देखील त्याच शहरात राहतात. गांधीजींनी त्यांच्याकडे संदेश पाठवला आणि ते गांधीजींना घेण्यासाठी स्वत: त्यांच्या कारमधून आले. त्याच रात्री त्यांनी गांधीजींना मुजफ्फरपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवलं."

नंतर जेव्हा राजेंद्र प्रसाद पाटण्याला परतले तेव्हा त्यांना या सर्व घटनेची माहिती मिळाली. दुसऱ्याच दिवशी ते गांधीजींना भेटण्यासाठी मोतीहारीला गेले. त्यावेळेस गांधीजींनी एक साधा कुर्ता घातला होता.

3 डिसेंबर 1955 ला दिल्लीच्या पालम विमानतळावर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सौदी अरबचे किंग साऊद बिन अब्दपल अजिज अल साऊद यांचं स्वागत केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 3 डिसेंबर 1955 ला दिल्लीच्या पालम विमानतळावर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सौदी अरबचे किंग साऊद बिन अब्दपल अजिज अल साऊद यांचं स्वागत केलं होतं.

गांधीजींना भेटून राजेंद्र प्रसाद यांना फारच अवघडल्यासारखं आणि लज्जीत झाल्यासारखं झालं. आपल्या नोकरांच्या वर्तवणुकीबद्दल त्यांनी माफी मागितली.

त्यानंतर गांधीजी चंपारणमध्ये जितके दिवस राहिले तितके दिवस राजेंद्र प्रसाद त्यांच्यासोबत राहिले. गांधीजींबरोबर राहिल्यामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात मोठा बदल झाला.

राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "मी जातीपातीचं काटेकोरपणे पालन करायचो. बिगर-ब्राह्मण लोकांच्या हातचं मी काही खात नसे. हळूहळू आम्ही सर्वजण एकत्र जेऊ लागलो. एक-एक करत आम्ही आमचे सर्व नोकर परत पाठवले."

"आम्ही आमचे कपडे स्वत: धुवायचो, स्वत: विहिरीतून पाणी काढायचो आणि भांडीदेखील स्वत:च घासायचो. जर आम्हाला जवळच्या गावात जायचं असेल तर आम्ही पायीच जायचो. ट्रेनमध्ये नेहमीच तिसऱ्या वर्गातून प्रवास करायचो. एका क्षणात आम्ही आमच्या आयुष्यातील सर्व सुखसोयी सोडल्या होत्या."

बिहारच्या भूंकपातील मदतकार्य

1934 मध्ये बिहारमध्ये मोठा भूकंप आला होता. त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांचं नाव प्रसिद्ध झालं. त्या भूकंपात प्रचंड नुकसान झालं होतं. जवळपास सर्वच इमारती, घरं कोसळली होती. हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तर कित्येक हजार लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.

या विनाशाची बातमी पोहोचताच सरकारनं त्या परिसरातील सर्व राजकीय कैद्यांची सुटका केली. जवाहरलाल नेहरू पाटण्याला आले आणि तिथून ते भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी मुंगेरला गेले.

ब्रिटिश इंडियाचे अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासह राजेंद्र प्रसाद.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटिश इंडियाचे अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासह राजेंद्र प्रसाद.

राजेंद्र प्रसादांनी लिहिलं आहे की तो परिसर आपल्या हातांनी स्वच्छ करण्याचा आणि ढिगाऱ्यांखाली दबलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा निर्धार नेहरूंनी केला.

त्यांनी लिहिलं आहे की, आमच्यावर कामाचं इतकं प्रचंड ओझं होतं की आमचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. संपूर्ण बिहारचा रेल्वे आणि रस्ते मार्गाशी असलेला संपर्क तुटला होता.

तिथे सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची होती. आम्ही कितीतरी नवीन विहिरी खोदून घेतल्या आणि अनेक नष्ट झालेल्या विहिरींची डागडूजी करून घेतली.

यानंतर 1935 मध्ये एक वर्षांनं क्वेटामध्ये जेव्हा भूकंप आला तेव्हा राजेंद्र प्रसाद यांच्यावर पुन्हा एकदा मदतकार्याची जबाबदारी देण्यात आली.

स्वत:च केली होती पगार कपात

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे सर्वाधिक काळ राहणारे राष्ट्रपती होते. ते 12 वर्षे राष्ट्रपती होते. 25 जानेवारी 1960 च्या रात्री त्यांची मोठी बहीण भगवती देवी यांचं निधन झालं.

जेव्हा त्या फक्त 19 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हापासून त्या आपला लहान भाऊ राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबर राहत होत्या. काही तासांपूर्वीच आपल्या लाडक्या बहिणीचं निधन झालेलं असताना देखील राजेंद्र प्रसाद 26 जानेवारीच्या सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सलामी घेण्यासाठी उपस्थित होते.

परेडहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीच्या अत्यंसंस्काराची व्यवस्था केली.

राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती झाले त्यावेळेस राष्ट्रपतीचा पगार दरमहा 10 हजार रुपये असायचा. राजेंद्र प्रसाद यांनी त्याच्या अर्धा म्हणजे फक्त 5,000 रुपये पगार घेतला. नंतरच्या काळात तर त्यांनी त्यात आणखी कपात करून दरमहा फक्त 2,500 रुपये इतका पगार घेतला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 2 सप्टेंबर 1946 ला हंगामी सरकार बनलं तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी राजेंद्र प्रसाद यांचा अन्न आणि कृषी मंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला होता.

वर्ष संपता संपता नेहरूंनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना राज्यघटना समितीचा अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतला.

राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराच्या सोहळ्यात जाऊ नये अशी नेहरूंची इच्छा होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराच्या सोहळ्यात जाऊ नये, अशी नेहरूंची इच्छा होती.

नेहरूंनी राजेंद्र प्रसाद यांना ही बाब स्पष्ट केली होती की हे पद स्वीकारण्याआधी त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागेल. कारण नेहरूंच्या दृष्टीकोनातून सरकारमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी व्यक्ती राज्यघटना समितीचा अध्यक्ष व्हायला नको होती. राजेंद्र प्रसाद यांना हा युक्तिवाद आवडला नव्हता.

दुर्गा दास यांनी 'फ्रॉम कर्झन टू नेहरू अँड आफ्टर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, याचा परिणाम असा झाला की नेहरू-प्रसाद आणि पटेल यांच्यात तणाव निर्माण झाला. जेव्हा त्यातून मार्ग निघाला नाही तेव्हा ती गोष्ट गांधीजींकडे नेण्यात आली.

गांधीजींनी राजेंद्र प्रसादांना बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. गांधीजींनी त्यांना सांगितलं की त्यांनी दोन्ही पदांवर राहता कामा नये. राजेंद्र प्रसादांना मुद्दा लक्षात आला होता आणि त्यांनी लगेचच आपला राजीनामा नेहरूंकडे पाठवला.

गांधीजींचे पुत्र देवदास यांनी मला सांगितलं होतं की राजेंद्र प्रसादांच्या वागण्यामुळे गांधीजींची थोडी निराशा झाली होती.

ते म्हणाले होते की हे पाहून मला आश्चर्य वाटलं की 'राजेंद्र बाबूंसारखी व्यक्ती देखील सत्तेची आकांक्षा बाळगू शकते.'

त्यादरम्यान नेहरूंनी त्यांना काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्याचाही प्रस्ताव दिला होता, मात्र राजेंद्र प्रसादांनी तो नाकारला. कारण त्यांना वाटत होतं की मंत्रिमंडळ आणि राज्यघटना समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी असं केलं जातं आहे.

नेहरूंना राजगोपालाचारींना बनवायचं होतं राष्ट्रपती

नेहरूंना एक परंपरा सुरू करायची होती. ती म्हणजे जर देशाचा पंतप्रधान उत्तर भारतातील असेल तर राष्ट्रपती दक्षिण भारतातून असला पाहिजे. यामुळे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना देशाचा पहिला राष्ट्रपती बनवण्याची त्यांची इच्छा होती.

नेहरूंचे सहाय्यक राहिलेल्या एम. ओ. मथाई यांनी 'रेमिनिसेंसेज ऑफ नेहरू एज' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "राजेंद्र प्रसाद यांनी देशाचा पहिला राष्ट्रपती बनवण्याची नेहरूंची इच्छा नव्हती. कारण त्यांच्या दृष्टीकोनातून राजेंद्र प्रसाद पुराणमतवादी आणि परंपरावादी होते. त्यांनी राजेंद्र प्रसाद यांच्याशी बोलून त्यांना केंद्रीय मंत्री आणि नियोजन आयोगाचा अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, राजेंद्र प्रसाद यांनी त्यामध्ये रस नव्हता."

काही दिवसांतच नेहरूंना अंदाज आला होता की काँग्रेसचे बहुतांश नेते राजाजींच्या बाजूनं नव्हते. कारण 1942 मध्ये महात्मा गांधींनी जेव्हा 'भारत छोडो' आंदोलन सुरू केलं होतं, तेव्हा राजाजींनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

मथाई लिहितात, "सरदार पटेल यांचादेखील राजाजींच्या नावाला विरोध होता. शेवटी नेहरूंनी राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजाजींना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं."

भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींना श्रद्धांजली अर्पण करताना भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींना श्रद्धांजली अर्पण करताना भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी.(संग्रहित छायाचित्र)

नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्यामधील वैचारिक मतभेद 1930 च्या दशकापासूनच सुरू झाले होते. सरदार पटेल, राजाजी आणि आचार्य कृपलानी यांनी नेहरूंच्या समाजवादाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर हे मतभेद सुरू झाले होते.

1950 मध्ये राजेंद्र प्रसाद यांनी कच्छमध्ये ऐतिहासिक सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्यातील दरी आणखी रुंदावली होती.

दहाव्या शतकात महमूद गझनीनं सोमनाथ मंदिर लूटलं होतं आणि तिथे विध्वंस केला होता.

दुर्गा दास लिहितात, "एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रमुखानं कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं योग्य नाही ही राजेंद्र प्रसाद यांच्या सोमनाथला जाण्यास विरोध करण्यामागची नेहरूंची भूमिका होती. मात्र राजेंद्र प्रसाद नेहरूंच्या या विचारांशी सहमत नव्हते. ते म्हणाले की सोमनाथ हे एका आक्रमकाला केलेल्या राष्ट्रीय प्रतिकाराचं एक प्रतीक आहे. मी एक धार्मिक व्यक्ती आहे आणि मी या गोष्टीपासून स्वत:ला वेगळं करू शकत नाही."

राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेल आणि नवानगरचे जाम साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पाहिला.

दुर्गा दास पुढे लिहितात, "या गोष्टीवर नेहरू नाराज झाले आणि त्यांनी माहिती-प्रसारण मंत्रालयाला आदेश दिला की या प्रसंगी राजेंद्र प्रसाद यांनी दिलेलं भाषण प्रसारण करण्यात येऊ नये."

हिंदू कोड बिलावरुन नेहरू आणि राजेंद्र प्रसादांमध्ये मतभेद

1952 मध्ये काशी यात्रेच्या वेळेस राजेंद्र प्रसाद यांनी पंडितांचे पाय धुतले होते. ही गोष्ट देखील नेहरूंना आवडली होती.

यावर राजेंद्र प्रसादांनी उत्तर दिलं होतं की, "देशातील सर्वात मोठी व्यक्तीदेखील विद्वानांच्या उपस्थित छोटी असते."

संसदेत हिंदू कोड बिलावर चर्चा झाली तेव्हा राजेंद्र प्रसादांनी खासदारांना सांगितलं की ते या बिलाच्या विरोधात आहेत.

त्यांनी नेहरूंना देखील पत्र लिहिलं की राज्यघटनेनुसार राष्ट्रपती संसदेचा एक भाग असतो. राष्ट्रपतींची इच्छा असेल तेव्हा ते संसदेत प्रेसिडेन्शियल बॉक्समध्ये बसू शकतात. मात्र नेहरू या मताशी सहमत नव्हते.

नेहरूंनी राजेंद्र प्रसाद यांना लिहिलं की संसदेचा भाग असण्याचा अर्थ असा आहे की त्यांनी वर्षातून एकदा संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करावं.

संसदेत प्रेसिडेन्शियल बॉक्स फक्त यासाठी बनवण्यात आला आहे की त्यामध्ये बसून परदेशी पाहुण्यांना संसदेचं कामकाज पाहता यावं. मात्र नेहरूंनी ही व्यवस्था देखील केली की राष्ट्रपतींना आपल्या स्टडीमध्ये बसून संसदेच्या दोन्ही सभागृहांचं पूर्ण कामकाज ऐकता येईल.

जवाहरलाल नेहरू.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जवाहरलाल नेहरू.

या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्यातील दुरावा इतका वाढत गेला की गरज पडल्यावरच ते दोघे एकमेकांशी बोलत असत.

हळूहळू नेहरूंचा कल उप-राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडे होऊ लागला. नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्यातील संबंध औपचारिक स्वरुपाचे होत गेले. मात्र ते दर आठवड्याला राजेंद्र बाबूंना भेटायला जात राहिले आणि सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती त्यांना देत राहिले.

मथाई लिहितात, "दोघांचे वैयक्तिक संबंध फारसे चांगले नव्हतेच. मात्र सर्वसामान्य लोकांसमोर नेहरूंनी राष्ट्रपतींचा नेहमीच योग्य तो सन्मान दिला."

असं असूनही 1955 मध्ये जेव्हा नेहरू सोविएत युनियनच्या (आताचा रशिया) दौऱ्यावरून परत आले तेव्हा राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला.

हा सन्मान नेहरूंना एका मेजवानीच्या वेळेस कोणत्याही उद्धहरणाशिवाय (सायटेशन) देण्यात आला.

याबद्दल जेव्हा राजेंद्र प्रसाद यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, "नेहरू खरोखरंच भारतरत्न आहेत. त्यांना औपचारिकपणे भारत रत्न का देऊ नये?"

नेहरूंना राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा राजेंद्र प्रसाद नको होते

राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपतीपदावर दुसऱ्यांदा निवड व्हावी, असं नेहरूंना वाटत नव्हतं. या पदासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांचं नाव त्यांच्या डोक्यात होतं.

नेहरूंना वाटत होतं की सात वर्ष या पदावर राहिल्यानंतर राजेंद्र प्रसाद स्वत: निवृत्त होऊ इच्छितात.

दुर्गा दास लिहितात, "राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असेल? हे जाणून घेण्यासाठी मी मौलाना आझाद यांच्याकडे गेलो."

महात्मा गांधींसह जवाहरलाल नेहरू.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महात्मा गांधींसह जवाहरलाल नेहरू.

तेव्हा आझाद यांनी उत्तर दिलं की, "मला वाटतं की राजेंद्र प्रसाद यांनी पुन्हा राष्ट्रपती व्हावं. मी जेव्हा राजेंद्र प्रसाद यांना हाच प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की या बाबतीत मी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करेन. त्यांना म्हणायचं होतं की नेहरू जसं म्हणतील तसंच ते करतील."

आझादांव्यतिरिक्त गोविंद वल्लभ पंत आणि कामराज यांचा देखील राजेंद्र प्रसाद यांनाच पाठिंबा होता.

दुर्गा दास लिहितात, "नेहरूंनी राजेंद्र प्रसाद यांची भेट घेऊन सांगितलं की तुम्ही अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हा. त्यावर राजेंद्र प्रसादांचं उत्तर होतं की ही गोष्ट माझ्या आरोग्यावर अवलंबून आहे. राधाकृष्णन यांना राष्ट्रपती पदासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागली."

राजेंद्र प्रसादांच्या परदेश दौऱ्यांबाबत नेहरूंचा संकोच

राजेंद्र प्रसाद पुन्हा एकदा राष्ट्रपती झाल्यामुळे राधाकृष्णन खूपच निराश झाले.

एम. ओ. मथाई लिहितात, "नेहरूंनी त्यांना खूश करण्यासाठी सरकारच्या अनुक्रमात बदल करून उप-राष्ट्रपतींना सरकारमध्ये दुसरा क्रमांक दिला. याआधी अनुक्रमात उप-राष्ट्रपती तिसऱ्या क्रमांकावर असायचे. त्यांनी उप-राष्ट्रपतींना देशांतर्गत प्रवासासाठी हवाई दलाच्या विमानाचा वापर करण्याचीही परवानगी दिली."

मथाई पुढे लिहितात, "राजेंद्र प्रसाद यांच्या परदेश दौऱ्याच्या कोणत्याही प्रस्तावाबाबत नेहरू फारसे उत्साही नसायचे. नेहरूंना वाटत होतं की राजेंद्र प्रसाद परदेशात भारताची आधुनिक धर्मनिरपेक्ष प्रतिमा मांडत नाहीत."

आपल्या पहिल्या कार्यकाळात राजेंद्र प्रसाद 1955 मध्ये फक्त एकदाच नेपाळच्या सरकारी दौऱ्यावर गेले. 1958 मध्ये मोठ्या नाईलाजानं ते जपान दौऱ्यासाठी तयार झाले.

दुर्गा दास लिहिलात, "जपानमध्ये सम्राटाच्या मेजवानीत फक्त शाकाहारी पदार्थच वाढवण्यात आले. हनाईमध्ये होळीच्या दिवशी एका मेजवानीच्या वेळेस तिथले एक नेते हो ची मिन्ह यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या चेहऱ्यावर गुलाल लावला. ते म्हणाले की आमच्यात आणि भारतात काहीही फरक नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीत भारताचं अनुकरण करतो."

Crown Prince Akihito, wearing a garland, and Crown Princess Michiko of Japan are welcomed on arrival at Palam Airport

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 29 नोव्हेंबर 1960 रोजी पालम विमानतळावर जपानचे क्राऊन प्रिन्स अखितो आणि प्निन्सेस मिचिको यांचे स्वागत करताना डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

1959 मध्ये भारतातून परतल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहावर यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अमेरिकेच्या दौऱ्याचं आमंत्रण दिलं. त्यांना राजेंद्र प्रसादांना अमेरिका दाखवायची होती.

दुर्गा दास पुढे लिहितात, "आपल्यापैकी अनेक जणांनी अमेरिकेचा दौरा केला आहे. त्यामुळे तुम्ही लगेचच तिथे जाण्याची आवश्यकता नाही, असं सांगत नेहरू आणि परराष्ट्र मंत्रालयानं या दौऱ्याला नकार दिला."

लष्करप्रमुख जनरल थिमय्या यांनी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती हेच सैन्याचे सर्वोच्च सेनापती असतात असं असूनही नेहरूंनी याची माहिती राष्ट्रपतींना दिली नाही. नंतर संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी याबाबत राजेंद्र प्रसाद यांची माफी देखील मागितली.

निवृत्तीनंतर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीऐवजी पाटण्यात राहण्याचा निर्णय घेतला.

28 फेब्रुवारी 1963 ला राजेंद्र प्रसाद यांचं पाटण्यात निधन झालं. त्यावेळेस ते गंगेच्या काठावरील 'सदाकत आश्रम' या काँग्रेसच्या जुन्या प्रदेश मुख्यालयात राहत होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.